कैदी सुटले, त्याची कथा

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा म्हणे भारत आणि पाकिस्तान हे देशच नव्हते. म्हणजे तिथली जमीन होती, पाणी होतं, आकाश होतं, सगळं सगळं होतं. माणसंसुद्धा होती. पण हे दोन देश नव्हते. तिथं होतं हिंदुस्तान. "सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा' मधलं हिंदुस्तान. आता त्यातलं "मजहब नही सिखाता...' वगैरे भाग तेवढासा काही खरा नाही. कविकल्पना म्हणून द्या झालं सोडून. तर अशा या हिंदुस्तानात इतिहासाचं पुस्तक भरेल इतक्‍या ऐतिहासिक गोष्टीबिष्टी झाल्या. नंतर मग अल्पसंख्याक समुदाय (नाव नाही घ्यायचं गडे!) आणि इतरांमध्ये खूप खूप मारामाऱ्या झाल्या. त्यातले काही तिकडे गेले, बाकीचे इकडेच राहिले. तिकडे जे गेले ते त्याला पाकिस्तान म्हणू लागले. उरलेल्यांनी आपल्या जमिनीला नाव दिले इंडिया दॅट इज भारत.

आता देश झाले दोन. पण त्यात अशी गंमत झाली, की झाड तिकडे पण त्याची मूळं इकडे किंवा व्हाईस व्हर्सा म्हणजे उर्ध्वमूलः अधोशाखौ वगैरे वगैरे. तर त्या झाडावरच्या पक्षांचं आणखीच विचित्र. ते भुर्ररदिशी उडायचे आणि तिकडे जायचे. पुन्हा भुर्ररदिशी इकडे यायचे. त्यांचं चालायचं हो. कारण त्यांना मुळातच कोणी पासपोर्ट विचारायला जायचंच नाही. आता कच्छच्या रणात नित्यनेमाने येणाऱ्या अग्निपंख पक्ष्यांचा व्हीसा किती दिवसांचा आहे, याची चौकशी करायला कोण जाईल तडमडायला? पण माणसांचं तसं नसतं. तरीही माणसं मोठी शहाणी. कारण की एवढा ग्रे मॅटर असूनसुद्धा त्यांचा मेंदू अजूनही उत्क्रांत होत आहे. या माणसांनी, किंबहुना नागरिकांनी रेडक्‍लिफ नामे जे साहेब होऊन गेले त्यांनी नकाशावर आखून दिलेल्या रेषांवर जाऊन तेथे कुंपणाचे खांब रोवले. काही ठिकाणी तर काटेरी तारांची भेंडोळीही नेऊन ठेवली. हेतू हा की तिकडच्या कोणी इकडे येऊ नये आणि व्हाईस व्हर्सा. आता असा कडेकोट बंदोबस्त केल्यानंतर, शिवाय तेथे शिपाई बंदुका ताणून बसल्यानंतर काय बिशाद आहे, की कोणी इकडचा तिकडे जाईल किंवा व्हाईस व्हर्सा. पण...

पण माणसं येत-जातच राहिली. कोणी बॉम्ब पेरायला, कोणी गर्द, हेरॉईन विकायला, तर कोणी काम-धंदा शोधायला. कोणी तर अगदी वाट चुकूनसुद्धा. उदाहरणार्थ राधेश्‍याम. राहणार कथुआ. असाच पाकिस्तानात गेला. कोट लखपत तुरूंगात सात वर्षे होता. होय, हाच तो तुरूंग. सरबजितसिंहला तिथंच ठेवलंय. सरबजितसिंह. राहणार भिकविंड, पंजाब. तो पाकिस्तानात कशासाठी गेला हे एक गूढच आहे. त्याच्या घरचे म्हणतात, दारू प्यायला होता. त्या नशेत भरकटला. पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ नावाचे शांतताप्रिय गृहस्थ आहेत. त्यांचं "सत्य' वेगळंच आहे. ते म्हणतात, तो भारताचा हेर आहे. त्याने पाकिस्तानात पाच बॉम्बस्फोट केले. चौदा लोकांना ठार केलं. त्याला फाशीची शिक्षा दिलीय.
पण जमनादास रामजीबद्दल तर अशी काहीच शंका नाही. जुनागढ जिल्ह्यातल्या कोडिनालचा तो मच्छीमार. सात महिन्यांपूर्वी तो बोट घेऊन मासे पकडायला गेला आणि पाकिस्तानी मरिन गार्डच्या जाळ्यात अडकला.

किंवा मुमताझ बेगम. राहणार कराची. घरची गरीबी. आपल्या पिल्लांना घेऊन कामाच्या शोधात भटकत भटकत सीमा पार करून भारताच्या पंजाबात आली. पोलिसांनी तिला पकडलं.
आणखी किती जणांची कहाणी सांगणार? सगळ्यांची गोष्ट सारखीच. कोणी चुकून सीमापार केली होती. कोणी व्हीसा निर्बंधांचा भंग केला होता. पाकिस्तानचा मोहंमद बाबर तर आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी चांदीचे दागिने खरेदी करायला आला होता. काय सांगावं, यातलाच एखादा हेरही असेल किंवा दहशतवादी. अशा लोकांना लावायच्या फूटपट्ट्या वेगळ्याच असतात. पण इतरांचं काय? मुमताझ बेगमवर खुनाचा आरोप ठेवला होता. तिला पाच वर्षं तुरूंगात काढावी लागली. जमनादास रामजी खोल समुद्रात मासेमारीला गेला. आता तिथं तो अडाणी मनुष्य कशी शोधणार सीमारेषा? त्याला पाकिस्तानी सैनिकांनी पकडलं. सात महिने तो कारावासात होता. त्याची बोटही त्यांनी जप्त केली. ती आता त्याच समुद्रात गस्त घालण्यासाठी ते वापरताहेत.

एक सरबजित सोडला, तर या सगळ्यांचं नशीब थोर म्हणायचं. परवाच त्यांची सुटका झाली. त्यांच्याबरोबर 435 भारतीय आणि 152 पाकिस्तानी कैद्यांनाही सोडून देण्यात आलं. आता शांततेच्या नावाने त्यांची मुक्तता झाली, हे खरंच. पण तो त्यांचा हक्कही होता. कारण ज्या कैद्यांनी त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण केला होता, अशांनाच सोडण्यात आलं आहे. पण असंही नाही म्हणता येत. समजा, नसतंच सोडलं, तर कोण काय करणार होतं? कायद्याचं राज्य, मानवाधिकार वगैरे ठीक. पण शत्रूराष्ट्राच्या नागरिकांना कसले आलेत कायदे? युद्धात त्यांना मारायचं असतं आणि शांततेच्या काळात त्यांचा द्वेष करायचा असतो, यालाच तर राष्ट्रवाद म्हणतात! अन्यथा, जिनिव्हा करारासह सगळे आंतरराष्ट्रीय कायदे इस्लामाबादच्या मिनारांवर ठेवून पाकिस्तानने 1971 च्या युद्धापासूनचे 54 युद्धकैदी अजूनही आपल्या कारागृहांमध्ये कशाला ठेवले असते? परवा कैद्यांच्या सुटकेचा मोठाच कार्यक्रम झाला वाघा सीमेवर. तेथे बाजूलाच या युद्धकैद्यांचे नातेवाईक मुशर्रफ यांना विनंती करीत उभे होते. त्यातल्या अनेकांना हेही माहित नव्हतं, की ज्याच्या सुटकेसाठी आपण प्रयत्न करीत आहोत तो जीवंत आहे की मेलाय? या युद्धकैद्यांना कोट लखपत कारागृहातच ठेवण्यात आलेलं आहे. "भुट्टो - ट्रायल अँड एक्‍झिक्‍युशन' नावाच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आढळतो. त्यातल्या अनेकांना आता म्हणे वेड लागलं आहे. देशासाठी ते लढले होते. लढाईच्या काळात त्यांच्यासाठी "जरा याद करो कुर्बानी' वगैरे गाणी त्यांच्या-त्यांच्या "वतन के लोगों'नी ऐकली. बस्स! याहून अधिक कोण काय करणार? समजा सरबजितचं प्रकरण उद्‌भवलंच नसतं, तर कैद्यांची सुटका होते काय आणि न होते काय कोणी लक्ष दिलं असतं? या एका वर्षात पाकिस्तानने एक हजार 165 मच्छीमार कैद्यांची सुटका केली. होता कुणाला त्याचा पत्ता?

पण यावेळी परिस्थिती भिन्न आहे. सध्या शांततेचा मूड आहे या दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांमध्ये. तेव्हा त्या भरात त्यांनी हा कैदीमुक्ती सोहळा उरकून घेतला इतकंच. याने शांतता प्रक्रियेस हातभार लागेल का? तर त्याचा काही नेम नाही. मुळात चॅनेलवाल्यांनी दोन-तीन दिवस लावून धरला म्हणजे तो मोठा विषय असतोच असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारत-पाकिस्तानातली शांतता ना बॉर्डरवर ठरत, ना अशा काही टोकन घटनांवर. ती खलबतखान्यांमध्ये ठरते.... दूर तिकडं "व्हाइट हाऊस'मधल्या. आणि असं जोवर आहे, तोवर या दोन्ही देशांच्या कुंपणावरची काटेरी तारांची भेंडोळी तशीच राहणार आहेत. सैनिक खंदकांमधून बंदुका ताणून असेच बसणार आहेत. आणि मग अशीच कोणी तरी मुमताझ बेगम किंवा राधेश्‍याम पुन्हा तुरूंगात जाऊन पडणार आहे... असेच शांततेचे मोसमी वारे वाहू लागेपर्यंत.

(सकाळ-सप्तरंग, 18 सप्टेंबर 2005)

No comments: