गांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर


स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा महात्मा गांधी यांच्या हत्येत अजिबात हात नव्हता, असे ख्यातनाम संशोधक-लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे मत आहे. अंदमानात नुकत्याच झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मोरे यांनी या विषयाला हात घातला होता. त्यांचे म्हणणे असे, की गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर सावरकर हयात नसताना गांधीहत्येची चौकशी करण्यासाठी सरकारने कपूर समितीची नेमणूक केली होती. सावरकरवाद्यांनी सावरकरांच्या सांगण्यावरून गांधींची हत्या केल्याचा उल्लेख या समितीने जाता जाता नमूद केला. मात्र अहवालाच्या दोन खंडांमध्ये या संदर्भातील एकही पुरावा समितीने दिलेला नाही. समितीला असा उल्लेख करण्याचा अधिकार नव्हता. मात्र अहवालातील त्याच परिच्छेदाचा आधार घेऊन सावरकरांच्या विरोधात लिहिले जाते. न्यायालयाने सावरकरांनी निर्दोष मुक्त केले असल्याने गांधीहत्येत त्यांचा हात होता, असे कुणी म्हणत असेल तर त्याबाबत पोलिसांत तक्रार केली पाहिजे. कपूर आयोगाच्या अहवालातील तो परिच्छेदच रद्द करण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. आताचे सरकार किमान सावरकरद्वेषी नाही. त्यामुळे याचा विचार होईल असे वाटते. यासंदर्भात अनुयायांनी पुढाकार घ्यावा.

मोरे यांचा तीव्र आक्षेप आहे तो कपूर आयोगाच्या सावरकरांसंबंधीच्या निष्कर्षांवर. गांधीहत्या अभियोगातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष सुटका केली आहे. (He is found not guilty of the offences as specified in the charge and is acquited…) पण कपूर आयोग म्हणतो की सावरकरांचा कटात हात होता. मोरे म्हणतात तसे म्हणण्याचा आयोगाला अधिकारच नव्हता. शिवाय तसे म्हणण्यायोग्य कोणताही पुरावा न्यायालयाने दिलेला नाही. मग आयोगाने कशावर विसंबून सदरहू निष्कर्ष काढला. हे पाहण्यासाठी हा आयोग कोणत्या परिस्थितीत स्थापन झाला ते समजून घेतले पाहिजे.

गांधीहत्या कटाचा निकाल लागून सुमारे सोळा वर्षे झाली होती. मुळात असा काही कट नव्हताच हे नथुराम गोडसेचे म्हणणे होते. न्यायालयात मात्र पुराव्यानिशी असा कट असल्याचे सिद्ध झाले होते.
या प्रकरणात ‘अपराधी व्यक्ती सुटली असेल पण एकाही निरपराध्याला शिक्षा झालेली नाही, हे काकासाहेब गाडगीळांचे वाक्य आहे. अनेकांची भावना हीच होती. या कटातील सगळे चेहरे समोर आलेले नाहीत, असे अनेकांना वाटत होते. गांधी हत्येपूर्वी तसे काही घडणार आहे हे काही जणांना माहीत होते, हे न्यायालयातही समोर आले होते. तशात ऑक्टोबर १९६४ मध्ये या कटात जन्मठेपेची शिक्षा झालेले विष्णू करकरे, मदनलाल पहावा आणि गोपाळ गोडसे यांची सरकारने सुटका केली. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी १२ नोव्हेंबर १९६४ रोजी पुण्यातल्या उद्यान कार्यालयात सत्यनारायण महापूजा घालण्यात आली होती. १५०-२०० लोक त्यासाठी जमले होते. त्यांच्यासमोर तरूण भारतचे संपादक ग. वि. केतकर यांचे भाषण झाले. त्यात ते म्हणाले, की गांधींच्या हत्येच्या तीन महिने आधी आपण गांधींना मारणार असल्याचे नथुराम त्यांना म्हणाला होता. ते हे सगळे रंगवून सांगत असताना गोपाळ गोडसे तेथेच बसले होते. त्यांनी त्यांना आता जास्त काही बोलू नका असे सुचवले. त्यावर केतकर म्हणाले, आता मी हे सांगितले म्हणून काही ते (सरकार) मला अटक करणार नाहीत. या वक्तव्यामुळे नंतर मोठाच गदारोळ उठला. हत्याकटाचे धागेदोरे नीट जुळवण्यासाठी सरकारवरील दबाव वाढत होता. तेव्हा अखेर सरकारने २२ मार्च १९६५ रोजी जी. एस. पारेख या विधिज्ञाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली. पण त्याच महिन्यात पारेख यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्यामुळे पुढे २१ नोव्हेंबर १९६६ रोजी सर्वोच्च नायायालयाचे माजी न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या एकसदस्यीय चौकशी आयोगाची नियुक्ती करण्यात आली. आयोगासमोर अनेकांच्या साक्षी झाल्या. त्यात सावरकरांचे सचिव गजानन विष्णु दामले आणि अंगरक्षक अप्पा कासार हेही होते.

सावरकरांवर गांधी हत्याकटात सामील असल्याचा आरोप दिगंबर बडगे याच्या साक्षीवर आधारलेला होता. तो माफीचा साक्षीदार. त्याच्या म्हणण्यानुसार, १४ जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे त्याला घेऊन दादरला सावरकर सदनात गेले होते. तेथे ते दोघेच आत सावरकरांना भेटण्यासाठी गेले. पाच-दहा मिनिटांनी ते बाहेर आले. १७ जानेवारीला आपण सावरकरांच्या अखेरच्या दर्शनासाठी जाऊ या असे नथुरामने सुचवले. त्यानुसार ते पुन्हा सावरकर सदनात गेले. बडगेला खालीच थांबायला सांगून आपटे आणि नथुराम वर गेले. पाच-दहा मिनिटांनी ते उतरले. त्यांच्या मागोमाग सावरकर आले आणि म्हणाले, यशस्वी होऊन या. ते सावरकर सदनात गेल्याचे अभिनेत्री शांता आपटे यांनीही पाहिले होते. पण त्यांचे आणि सावरकरांचे काय बोलणे झाले हे कोणालाच माहीत नाही. बडगेची ही साक्ष पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयाने अग्राह्य मानली. तेव्हा सावरकरांच्या विरोधातल्या या साक्षीच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढणे हे अयोग्य (अनसेफ) आहे, असे न्यायमूर्तींचे मत पडले.

पण नंतर कपूर आयोगासमोर बडगे याच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला तो दामले आणि कासार यांच्याकडून. दोघांनीही मुंबई पोलिसांना ४ मार्च १८४८ रोजी दिलेल्या जबानीनुसार १३ वा १४ जानेवारी १९४८ रोजी करकरे आणि मदनलाल सावरकरांना भेटले होते. १५ वा १६ जानेवारीला रात्री आपटे आणि गोडसे त्यांना भेटले होते. त्यानंतर २३ किंवा २४ जानेवारीला म्हणजे गांधींवरील बॉम्बहल्ल्यानंतर तीन-चार दिवसांनी आपटे आणि गोडसे सावरकरांशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यांच्या या म्हणण्याने बडगेची साक्ष भक्कम होत होती. याशिवाय या प्रकरणाचे तपासअधिकारी पोलीस उपायुक्त जमशेद नगरवाला यांनीही त्यांच्या अहवालात लिहून ठेवले होते, की सावरकर हेच या कटाच्या मागे आहेत आणि ते आजारपणाचे सोंग आणत आहेत. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून न्या. कपूर यांनी निष्कर्ष मांडला, की सावरकर आणि त्यांचा गट हाच या कटामागे होता.

या निष्कर्षात एक बारीकशी पण महत्त्वाची फट आहे. ती म्हणजे, दामले आणि कासार यांच्या साक्षी विशेष न्यायालयासमोर झाल्या नव्हत्या. तसे का हा महत्त्वाचा प्रश्नच आहे. पण त्या झाल्या असत्या, गोडसे-आपटे आणि सावरकर यांची भेट हत्येआधी झाली होती असे सिद्ध झाले असते, तरी त्यातून त्यांचे काय बोलणे झाले हे कसे सिद्ध करता आले असते. यशस्वी होऊन या हे सावरकरांचे आशीर्वचन गांधीहत्येसंबंधीच होते हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सरकार पक्षाकडे नव्हता. तसा पुरावा न मिळाल्याने सावरकरांची सुटका झालेली आहे. त्यामुळे आयोगाच्या म्हणण्यास तसा काही अर्थ राहात नाही. मनोहर माळगावकरांसारख्या अभ्यासकानेही सावरकरांना निर्दोष मानलेले आहे.

पण ही झाली न्यायालये, आयोग आणि कायद्याची गोष्ट. याबाबत गांधीहत्या हे सत्कृत्य मानणारी मंडळी काय म्हणतात हे आजच्या काळात अधिक महत्त्वाचे ठरते. मी नथुराम गोडसे बोलतोय हे वादग्रस्त नाटक. त्यात इतिहासाचे प्रचंड विकृतीकरण करण्यात आले आहे. सावरकर हे नथुरामला हुतात्मा मानत किंवा त्याची तुलना ते दधिची ऋषींशी करत असे या नाटकात म्हटले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की नथुरामच्या कृत्याला त्यांचा आशीर्वाद होता. नथुरामचे बंधु गोपाळ गोडसे यांचे गांधीहत्या आणि मी हे पुस्तक वाचल्यानंतरही कोणाचीही हीच भावना व्हावी. या पुस्तकात त्यांनी कोठेही सावरकरांचा या कटात सहभाग होता असे म्हटलेले नाही. पण भाषेचे वळण असे ठेवलेले आहे की वाचणारास तसा भास व्हावा. थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी या पुस्तकाच्या परीक्षणात हा मुद्दा मांडलेला आहे. त्यांच्या शिवरात्र या लेखसंग्रहात हे परीक्षण येते. त्यात त्यांनी म्हटले आहे, सावरकरांविषयी गोडसे यांनी काय करायचे ठरवले आहे हेच स्पष्ट होत नाही. स्वातंत्र्यवीर या कटाचे सहभागी होते, पण कौशल्याने कट रचल्याने स्वातंत्र्यवीरांवर आरोप सिद्ध करता येण्याजोगा पुरावाच सरकार उपलब्ध करू शकले नाही. म्हणून सावरकर निर्दोष सुटले असे गोडसे यांना म्हणावायाचे आहे काय? हेच त्यांचे मत असले तर मग तसे त्यांनी स्पष्ट म्हणावे. पण गोडसे तसे पुस्तकाच्या पुढच्या आवृत्त्यांमध्येही म्हणत नाहीत. अटक ते लाल किल्ला या प्रकरणात गोडसे म्हणतात, मी सावरकरांकडे जाऊन आलो होतो आणि त्याचा त्यांच्याजवळ पुरावा होता असे अधिका-यांचे म्हणणे होते. तसे काही असण्याचा संबंध नव्हता हा माझा विश्वास होता. पुढे ते म्हणतात, सावरकरांना गोवण्याचे दूषण माझ्या माथी तरी आले नाही. त्यांची आणि माझी भेट झाली होती किंवा नाही ही गोष्ट आज काळाच्या उदरात लुप्त झाली आहे. हे पुस्तक जन्मठेप भोगून आल्यानंतर त्यांनी लिहिले आहे. तो इतिहास असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या इतिहासाची ही अशी त-हा!

खुद्द गोपाळ गोडसे हेच सावरकरांबद्दल गोलमाल भाषा वापरतात, तेथे इतरांबद्दल काय बोलावे? सावरकरांचे विरोधक तर त्यांना गांधीहत्येसाठी जबाबदार धरत आहेतच. नथुराम हा सावरकरांचा सचिव होता, त्यांना दैनिक काढण्यासाठी सावरकरांनी मोठी रक्कम दिली होती, हे कोण कसे विसरणार? पी. एल. इनामदार हे गोपाळ गोडसे आणि डॉ. दत्तात्रय परचुरे यांचे वकील. त्यांच्या द स्टोरी ऑफ द ट्रायल इन द रेड फोर्ट (ऑक्टोबर १९७६) या पुस्तकात लिहिले आहे, की लाल किल्ल्यात खटला चालला त्या संपूर्ण काळात सावरकरांनी त्यांच्या डावीकडे बसलेल्या नथुरामकडे एकदाही साधे वळूनसुद्धा पाहिले नाही, बोलण्याची गोष्ट तर दूरच... सावरकरांच्या या वागण्यामुळे नथुराम खूप कष्टी असे. शिमल्यात नथुरामबरोबर त्यांची शेवटची भेट झाली तेव्हाही, आपण सावरकरांच्या एका हस्तस्पर्शासाठी, सहानुभूतीच्या एका स्पर्शासाठी, दृष्टीक्षेपासाठी कसे आसुसलो होतो असे नथुराम म्हणाल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे. नथुरामच्या मनात सावरकरांबद्दल अशी भक्तीभावना होती हे कोण विसरणार? त्यातूनच सावरकरांवर असा आरोप होत आहे. गोपाळ गोडसे हे स्वतः त्या कटात असल्याने यांना तो पुसून काढण्याची संधी होती. पण तेच स्वतः संदिग्ध राहून संशय वाढवताना दिसले. आता तर तेही गेले... त्यांचे अनुयायी मात्र अजूनही स्वातंत्र्यवीरांच्या भाळावरचा डाग राहून राहून गडद करताना दिसतात. तेव्हा एकट्या कपूर आयोगालाच दोषी मानण्यात काय अर्थ?


No comments: