आंदोलन फोडण्याचे शास्त्र


संप, बंद, मोर्चे, निदर्शने, धरणे, उपोषण हे आंदोलनाचे काही प्रकार. ही आंदोलने सहसा केली जातात अन्यायाविरोधात. काही मागण्यांसाठी. काही बदल घडवून आणण्यासाठी. त्या मागण्या कायदेशीरदृष्ट्या योग्य की अयोग्य, तो अन्याय खरा की काल्पनिक वगैरे भाग वेगळा. त्या चर्चेत शिरता केवळआंदोलनआणि तेही प्रस्थापित व्यवस्था वा सरकार यांविरोधात केलेले आंदोलन याचा विचार केला, तर एक बाब लक्षात येते. ती म्हणजे आंदोलन कुणाचेही असो, ते पुकारणाऱ्यांकडे, त्यात सहभागी होणाऱ्यांकडे, ते संपकरी, ते मोर्चेकरी, ते उपोषण करणारे, निदर्शक यांच्याकडे अन्य समाज ज्या दृष्टीने पाहतो, ती दृष्टी मोठ्या प्रयत्नाने खास कमावून देण्यात आलेली आहे. त्याचे एक साधेसे उदाहरण म्हणून महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी झालेल्या आणि गाजलेल्या एका मोठ्या संपाकडे पाहता येईल


तो होता शेतकऱ्यांचा संप. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच येथील शेतकरी संपावर गेले होते. कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव या त्यांच्या मागण्या होत्या. त्या पूर्ण करता येणार नाहीत असे सरकारने जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांनी संप आंदोलन पुकारले. माध्यमांतून, समाजमाध्यमांतून गदारोळ सुरू झाला. दोन्ही बाजूंनी. शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्याही. शेतकरी म्हणजे बळीराजा. तो अन्नदाता. आणि सरकार हे शेतकरीविरोधी. ही शेतकऱ्यांच्या पक्षपात्यांची भावना होती.

   

शेतकऱ्यांचे हे आंदोलन दोन प्रकारे चाललेले होते. एकतर गावोगावी शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आणि दुसरीकडे त्यांनी शहरांची नाकेबंदी करण्याचे ठरवले. शहरांत कोणताही कृषिमाल जाता कामा नये, यासाठी त्यांनी ठिकठिकाणी महामार्ग रोखले. माल घेऊन चाललेले ट्रक अडवले आणि त्यातील माल रस्त्यावर फेकून दिला. काही ठिकाणी दगडफेक, तोडफोडही झाली. ते सारे पाहून आपलानागरी' समाज फार हळहळला. विशेषतः रस्त्यावर ओतून दिलेले दूध, फेकलेल्या फळभाज्या पाहून सारी शहरे सात्विक संतापली. म्हणाली, फेकून कशाला द्यायचे ते दूध, त्या भाज्या. हा कसला माज? ही कसली अन्नदेवतेची विटंबना? तेही भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दरिद्रीनारायण राहात असताना? हे सारे गोरगरिबांच्या पोटात गेले असते तर…? ही अशी नासधूस करणाऱ्यांना का शेतकरी म्हणायचे? ते शेतकरी नाहीतच. मग ते कोण होते? हे शेतकरी महाराष्ट्रातील असल्याने त्यांना खलिस्तानी म्हणता येत नव्हते. तोवर शहरी नक्षलवाद हा शब्द प्रचलित झालेला नव्हता. फारसा. तेव्हा त्या शेतकऱ्यांना राजकीय पक्षांचे भाडोत्री कार्यकर्ते ठरवण्यात आले. आंदोलक सामान्य जन नाहीत, तर ते राजकीय पक्षांशी संबंधित आहेत, म्हटले की सरकारला बरे असते. यातली बारीकशी मौज अशी, की यात असे गृहित धरलेले असते, की देशातल्या सामान्य जनांना काहीही राजकीय विचार, समज, जाणीव काहीही नसते. ते तद्दन सामान्य असतात. असो.


तर याच काळात समाजमाध्यमांतून नोकरदारकरदाती मंडळी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावर तुटून पडली. अनेक शेतकरी कसे श्रीमंत असतात, ते गाड्या कशा उडवतात, पोरांची लग्ने कशी थाटामाटात करतात, पाणी-वीज चोरतात आणि वर कर्जमाफी मागतात असा तो टीकेचा सूर असे. त्यातूनच मग संपकरी नेते हे कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या विचारांचे आहेत, त्यांच्यामागे कोण आहे अशा चर्चा सुरू झाल्या. हे सर्व सुरू असतानाच, शेतकरी संपामध्ये फूट पडली. मग हळुहळू संप संपला. हे कसे झाले, अशा आंदोलनांमध्ये अनेकदा असेच का घडते, या सगळ्याचा अर्थ काय आणि मुख्य म्हणजे यात प्रोपगंडाचा संबंध काय हा आपल्यासमोरचा सवाल आहे. आणि त्याचे उत्तर दडले आहे मोहॉक व्हॅली फॉर्म्युल्यामध्ये


CONAN CASTRO - MOHAWK VALLEY FORMULA (official video)


मोहॉक हे अमेरिकेतल्या न्यू यॉर्क राज्यातले खोरे. तेथे रेमिंग्टन रँड ही कंपनी होती. टाईपरायटर आदी वस्तूंचे उत्पादन करायची ती. जेम्स रँड हे तिचे अध्यक्ष होते. १९३६च्या मे महिन्यात त्या कंपनीतील कामगार संघटनेने संपाची हाक दिली. तो साधारण बारा महिने चालला. फार काही वेगळा नव्हता. मोर्चे, निदर्शने, हाणामाऱ्या, कामगारांतील वाद, मालकांची अडेलतट्टू भूमिका, नंतर वाटाघाटी, चर्चा, आरोप-प्रत्यारोप, आणि मग समेट... सारे काही नेहमीप्रमाणेच होते. हा संप अधिक हिंसक होता इतकेच. कोणाचा जीव गेला नाही त्यात, परंतु हाणामाऱ्या, दगडफेक असे प्रकार खूप घडले. पुढे न्यायालयातून तेथील कामगारांना न्याय मिळाला. पण मधल्या काळात जेम्स रँड यांनी हा संप ज्या प्रकारे हाताळला, ते कामगारांशी ज्या प्रकारे लढले, त्यातून आंदोलन हाताळण्याचे, संप फोडण्याचे एक सूत्र निर्माण झाले. तोच हा मोहॉक व्हॅली फॉर्म्युला


त्याचे निर्माते म्हणून जेम्स रँड यांचे नाव घेतले जाते. पण अमेरिकी विचारवंत नॉम चॉम्स्की यांच्या मते, या सूत्राच्या निर्मितीत जनसंपर्क क्षेत्रातील तेव्हाच्या अनेक मातब्बरांचा सहभाग होता. या सूत्राला ते लोक संप फोडण्याची शास्त्रीय पद्धत म्हणत. ते विरुद्ध आपण या द्वंद्वाच्या पायावर ही पद्धत उभी आहे.


वस्तुतः कोणतेही संपकरी हे काही परग्रहावरचे प्राणी नसतात. ते आपल्यातीलच असतात. आपल्यावर अन्याय झालेला आहे ही त्यांची भावना असते. आपल्या मागण्यांसाठी ते झगडत असतात. पण मोहॉक व्हॅली सूत्रातील पहिला नियम हा आहे, की या संपकऱ्यांनातेठरवायचे. सामान्य जनता म्हणजेआपण’. त्या आपल्या विरोधात त्यांना उभे करायचे. म्हणजे उदाहरणार्थ आंदोलक हे शिक्षक असतील, तर बाकीच्या समाजघटकांना त्यांच्याविरोधात उभे ठाकण्यास प्रवृत्त करायचे. आंदोलक हे व्यवस्थेत तोडफोड करणारे आहेत, समाजकंटक आहेत, समाजासाठी - म्हणजे सामान्य नागरिक, उद्योजक, व्यावसायिक, कामगार, कामगारांची कुटुंबे, गृहिणी अशा सर्व वर्गांसाठी म्हणजेच आपल्यासाठीधोकादायक आहेत, अशी प्रतिमा तयार करायची. आपल्या सर्वांना शांततेत जगायचे असते. संघर्ष नको असतो आपल्याला. एकमेकांच्या हातात हात घालून एकसंघपणे समाज चालला पाहिजे ही इच्छा असते आपली. सामाजिक सौहार्द हे आपले श्रेयस आणि प्रेयस असते. पण हे संपकरी सामाजिक सौहार्दाचे वातावरणच नष्ट करू पाहात आहेत, हे लोकांसमोर ठेवायचे


साधी गोष्ट आहे. समजा आपल्याला कोणी विचारले, की तुम्हांला सामाजिक सौहार्द हवे की नको? तुमचा सामाजिक शांततेला पाठिंबा आहे की नाही? तर आपण काहीनाही असे म्हणणार नाही. हे प्रश्न तुमचे देशावर प्रेम आहे की नाही, तुम्ही आपल्या सैनिकांच्या पाठीशी आहात की नाही?’ यांसारखेच असतात. त्यांना कोण नकारार्थी उत्तर देईल? खरे तर हे प्रश्न अत्यंत पोकळ आणि भाबडे असतात. पण आंदोलक हे शांतता आणि सौहार्द यांचा भंग करीत आहेत, असे सांगितल्याबरोबर आपण त्या आंदोलकांच्या विरोधात उभे राहतो ते या भाबडेपणाने. आता प्रत्येक वेळी शांतता आणि सौहार्द हाच मुद्दा असेल असे नाही. तो त्या-त्या वेळेनुसार, त्या-त्या आंदोलकांनुसार बदलेल. म्हणजे तो कधी शेतमालाच्या नासधुशीचा असेल, कधी तो विकासाचा असेल, कधी अन्य कशाचा


मोहॉक व्हॅली सूत्रातील दुसरे सूत्र आहे - आंदोलकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे प्रतिमाहनन. आंदोलनाची शक्यता दिसताच पहिल्यांदा काय करायचे, तर या नेत्यांची बदनामी. ते नेते लोकांना भडकावणारे, पेटविणारे. ते विकले गेलेले. कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करणारे. ते देशद्रोही. ते जातीयवादी. ते भ्रष्ट. ते व्यसनी-व्यभिचारी. तेराजकारणकरणारे समाजकंटक. विविध लेबले चिकटवायची त्यांना. त्याचबरोबर त्यांच्या विश्वासार्हतेवर आघात करायचा. ती संपवून टाकायची. लोकशाहीत लोकसंख्या महत्त्वाची असते आणि नेत्यांची ताकद त्यांच्या अनुयायांत असते या दोन गोष्टी लक्षात घेऊन, त्या आंदोलक नेत्यांमागे मोजकेच लोक आहेत, हे सातत्याने, वारंवार समाजमनावर बिंबवायचे. मूठभर समाजकंटक उभे राहतात आणि सगळ्या समाजाला वेठीस धरतात, अशा आशयाचे वाक्य अनेक आंदोलनांत आपण ऐकलेले आहे. ते येते या सूत्रानुसारच. आंदोलक हे अल्पसंख्य आहेत आणि म्हणून ते बहुसंख्येच्या विरोधात आहेत आणि बहुसंख्याकांची बाजू नेहमीच न्यायाची असते आणि म्हणून आपण बहुसंख्याकांबरोबर राहिले पाहिजे, हे स्पष्ट सांगताही मग जनतेला समजते. अशा प्रकारे त्या आंदोलनास असलेली सामाजिक सहानुभूती खिळखिळी केली जाते. ती खिळखिळी करताना पुन्हा बदनामीचे तंत्र वापरले जाते. आंदोलक हे विध्वंसक आहेत. ते बायकांची छेड काढतात. सामान्य नागरिकांवर दादागिरी करतात. ते अस्वच्छता पसरवतात. ते रानटी, गावठी. एखाद्या व्यक्तीने केलेला एखादा गैरप्रकार सर्व आंदोलकांना चिकटवला जातो. नाना शिक्के मारून त्यांच्या विषयीची समाजातील सहानुभूती नामशेष होईल असे पाहिले जाते


यासाठी आणखी एक मार्ग आहे. नागरिकांच्या समितीचा. अशी समिती स्थापन करायची. समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, धर्मगुरू, लेखक, बँकर, उद्योजक, व्यापारी अशा विविध घटकांना एकत्र आणायचे आणि त्यांच्याद्वारे आंदोलकांवर विविध मार्गांनी दबाव आणायचा. या समितीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या सभा बोलवायच्या. पत्रके काढायची. यातून दोन गोष्टी साधल्या जातात. आंदोलकांच्या विरोधात समाजाचे नेते आहेत असे दाखविता येते आणि त्यातून आंदोलक हे समाजविरोधी वा देशविरोधी आहेत असे दाखवून देता येते. आंदोलनाविरोधात जनभावना तयार होते. हे आंदोलकांच्या विरोधातील प्रतिआंदोलनच. वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या संदर्भात हा प्रकार आपणांस सातत्याने दिसतो. सरकारविरोधात कोणी आंदोलन केले की त्या आंदोलकांच्या विरोधात मोर्चे काढले जातात. काही लोकांनी पत्रके काढली की लगेच त्यांच्या विरोधात त्याहून अधिक लोकांच्या सह्या असलेली पत्रके काढली जातात. हल्ली तर समाजमाध्यमे आणि मुख्य धारेतील माध्यमेही यासाठी वापरली जातात. समाजमाध्यमी संदेश, मीम्स यांद्वारे आंदोलनाची बदनामी साधली जाते. तसे करण्यासाठी अनेकदा व्यावसायिक संस्थांचे आणि पाळीव-पत्रकारांचे, प्रभावकांचे साह्य घेतले जाते. व्हॉट्सॲप, फेसबुक यांसारख्या माध्यमांमुळे हे काम अधिक सोपे झाले आहे. हल्ली नागरिकांच्या समिती म्हणून जणू हे व्हॉट्सॲप ग्रुप काम करीत आहेत

 

मोहॉक व्हॅली सूत्रातील आणखी एक महत्त्वाची बाब आहे ती कायदा आणि सुव्यवस्थेची. जोवर एखादे आंदोलन शांततामय मार्गाने चाललेले असते, अहिंसक पद्धतीने चाललेले असते तोवर समोरची बाजू हतबल असते. अगदी एखादा हुकूमशहा जरी सत्तेवर असला, तरी त्याला जनतेच्यासँक्शनची, मान्यतेची आवश्यकता असते. त्यासाठीच अगदी हुकूमशाही देशांतही निवडणुकीची नाटके केली जात असतात. कारण त्यांना माहित असते, की एकदा का जनतेची मान्यता गेली की सत्ता पलटण्यास वेळ लागत नाही. अहिंसक, शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर एखाद्या सरकारने दंडशक्तीचा प्रयोग केला, तर जनतेत असंतोष निर्माण होऊ शकतो. लोकांची सहानुभूती आंदोलकांना मिळू शकते. महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरोधात अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग निवडला होता तो काही उगाच नव्हे. अशा प्रकारच्या आंदोलनात मग समाजातील प्रत्येक घटक, स्त्रिया, वृद्ध, लहान मुलेही सहभागी होऊ शकतात. अशा आंदोलनात नैतिक ताकद असते. महात्मा गांधींची अहिंसा आणि सत्याग्रह यांची खिल्ली उडविणाऱ्या अनेकांच्या हे लक्षातच आलेले नसते, की काही काळापूर्वी महाराष्ट्रात निघालेल्या मराठा मूक मोर्चांनी अशीच नैतिक ताकद दाखवून दिली होती


आणि म्हणूनच शांततामय आंदोलनात अनेकदा गुंड घुसवून हिंसाचार घडविला जातो. आंदोलकांना डिवचून, चिडवून उत्तेजित करून त्यांनी हिंसाचारास प्रवृत्त व्हावे असे वातावरण निर्माण केले जाते. आणि एकदा का कोणत्याही आंदोलनात हिंसा शिरली की ते मोडणे केव्हाही सोपेच असते. आंदोलकांची संख्या कितीही मोठी असो, राज्याच्या दंडशक्तीपुढे ती नेहमीच नगण्य असते. अनेकांच्या हे लक्षातच येत नाही, की हिंसाचाराची सर्वांत मोठी क्षमता असते ती राज्याकडे. पोलिसांपासून लष्करापर्यंतच्या यंत्रणा असतात त्यांच्याकडे. लोकांच्या मान्यतेनेच त्या स्थापन झालेल्या असतात. या लोकांच्या नावानेच, ‘कायदा आणि सुव्यवस्थाराखण्यासाठी त्या अशी हिंसक आंदोलने मोडून काढू शकतात. देशातील कामगारांच्या संपाने याचा वेळोवेळी अनुभव घेतलेलाच आहे.  


आंदोलनातील हिंसाचारालाच नव्हे, तर एकूणच कोणत्याही संघर्षाला यात विरोध केला जात असतो. वस्तुतः हिंसाचाराला विरोध हा असलाच पाहिजे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. परंतु येथे जेव्हा आपण हिंसाचाराबद्दल बोलतो, तेव्हा तो संप फोडण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला हिंसाचार असतो. संघर्षाचे म्हणाल, तर मुळातच व्यवस्थेला संघर्ष नकोच असतो. तेव्हा, आंदोलकांची बाजू कितीही बरोबर असो, त्यांच्या मागण्या योग्य आणि न्याय्य असोत, त्यांच्यावर अन्याय होत असो, परंतु त्याविरोधात संघर्ष करण्याचा मार्ग संप वा बंद वा उपोषण हा नव्हे. त्यांनी संबंधितांशी शांततेने चर्चा करून समस्या सोडविली पाहिजे, अशीच भूमिका प्रसृत केली जात असते. संघर्षामुळे समाजाचे म्हणजे आपले नुकसान होते. हे आपण नेहमीच सामाजिक सौहार्द, शांतता आणि विकासाच्या बाजूचे असतो. ते म्हणजे कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या संघटनावाले. त्या संघटनेच्या नेत्यांना सतत संघर्षच हवा असतो. कारण त्यावरच त्यांचे पोट चालत असते. ते आंदोलनजिवी असतात. तेव्हा आपण आपल्या हिताचे संरक्षण केले पाहिजे. अखेर संप हे विघातक, हिंसक, लोकशाहीच्या विरोधातील असतात. आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी संप संपविला पाहिजे, हा सारा प्रचार त्यातूनच येत असतो. हा सर्व प्रचार म्हणजेच मोहॉक व्हॅली फॉर्म्युला


हे सर्व सुरू असतानाच, दुसरीकडे संप वा बंद कसा फसलेला आहे, कारखाने वा जनजीवन कसे सुरळीत चाललेले आहेत, याचा प्रचार केला जातो. प्रसिद्धी माध्यमांतून अपमाहितीचा भडिमार केला जातो. माहिती नियंत्रित केली जाते. मोहॉक व्हॅलीतील संपांमध्ये हेच तंत्र वापण्यात आले होते. कारखान्यांत कामावर येण्यासाठी कामगार तयार आहेत, परंतु आंदोलक नेत्यांचे गुंड त्यांना धमकावत आहेत. अमुक ठिकाणी संपावरील कामगारांनी माघार घेतली. आंदोलकांचा तमुक नेता मिल मालकांशी चर्चा करीत आहेत... अशा नाना अफवा तेव्हा पसरविण्यात आल्या होत्या. वाचताना हे सारे साधे वाटते. परंतु अमेरिकेच्या औद्योगिक जगतात अतिशय प्रभावी ठरले होते हे सूत्र. आणि आजही ते प्रभावी ठरत आहे


एखाद्या आंदोलनाविषयी चर्चा करताना हे सारे लक्षात घ्या. त्या आंदोलनाच्या मागण्या, त्याची योग्यायोग्यता याबाबत मतभेद असू शकतात. चर्चा व्हावी ती त्याविषयी. त्याला जर फाटे फोडले जात असतील, त्या आंदोलनात हिंसाचार होत असेल, तर पाहा त्यामागे कोण आहे? त्या आंदोलनाच्या नेत्यांना बदनाम केले जात असेल, आंदोलकांना समाजद्रोही ठरवले जात असेल, तर पाहा मोहॉक व्हॅली फॉर्म्युला तर तेथे कार्यरत नाही ना? तसे असण्याचीच जास्त शक्यता असेल


(सप्टेंबर २०१९ मध्येइत्यादीदिवाळी अंकासाठी लिहिलेला प्रदीर्घ लेख, तसेचअक्षरनामापोर्टलमध्ये ११ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झालेला लेख यांचा संक्षिप्त आणि संपादित भाग.

अक्षरनामातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: