सचिन ट्विटरवर आला, तर काय झाले?

अखेर श्रीयुत सचिन रमेश तेंडुलकर ट्विटरवर आले. 4 मे रोजी त्यांनी या वेबसाईटवर दाखला घेतला आणि लिखाण सुरू केले. ही गोष्ट सामान्य नसल्याने त्याची बातमी झाली. ती विविध वृत्तपत्रांत व चित्रवाणी वाहिन्यांवरून झळकली आणि दुसऱ्याच दिवशी दुपारपर्यंत सचिनच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 80 हजारांवर गेली. ती वाढतच चालली आहे. हे अपेक्षितच होते. कारण सचिन ट्विटरवर येणे याचा साधासोपा अर्थ असा होता, की त्याच्या चाहत्यांना "बाप्पाशी गप्पा' मारण्याचा हमरस्ता खुला झाला आहे! अखेर सचिन हा अनेकांसाठी साक्षात्‌ क्रिकेटेश्‍वर आहे!!

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सचिन क्रिकेटविश्‍वात आहे. क्रिकेटचे मैदान आणि भारतीयांचे मन या दोन्हींवर तो राज्य करीत आहे. त्याच्या बॅटचा तडाखेबंद फटका पाहण्यासाठी रसिक जेवढे उत्सुक असतात, तेवढेच ते त्याच्या एका शब्दासाठी व्याकुळ असतात. परंतु हा गडी सहसा क्रिकेटबाह्य विषयांवर बोलत नाही. भरभरून बोलणे हे त्याच्या अंतर्मुख स्वभावाला मानवत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल सर्वांच्याच मनात एक सुप्त आकर्षण आहे. आता मात्र वयाच्या या टप्प्यावर बहुधा त्याला जरा मोकळे व्हावेसे वाटले असावे आणि म्हणूनच त्याने ट्विटरवर आपले खाते खोलले असावे. एकंदरच "मोकळे होणे', "सोशली कनेक्‍ट' राहणे ही सध्या सेलेब्रिटींची गरज बनल्याचे दिसत आहे.

लोकप्रिय असण्याचे अनेक फायदे असतात; परंतु त्यात एक तोटाही असतो. लोकप्रियतेच्या शिखरावरची हवा खूपच विरळ असते! तुम्ही जेवढे लोकप्रिय तेवढे तुम्ही एकटे पडत जाता. तुमचा सामाजिक संवाद जवळजवळ बंद होतो. समाजाशी संवाद साधण्याचा एकच मार्ग तुमच्यासाठी बाकी असतो. तो म्हणजे प्रस्थापित माध्यमांचा. परंतु त्यातूनही तुम्हाला जे म्हणायचे आहे, ते नेमके तसेच लोकांसमोर येईल याची खात्री नसते. प्रस्थापित मीडिया प्रत्येक वेळी तुमचे म्हणणे मांडेल, याचीही खात्री नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो एकदिशा मार्ग असतो. त्यातून संवादाचे समाधान मिळणे अशक्‍य असते. सोशल मीडियाने ही अडचण दूर केलेली आहे. तुम्ही आणि लोक यांतील मध्यस्थ दूर केले आहेत. पुन्हा या माध्यमातून तुम्ही तुम्हास हव्या त्या विषयावर बोलू शकता, चर्चा करू शकता, वाद घालू शकता. (आणि निर्माणही करू शकता!) मध्यंतरी सलमान खानने ट्विटरवर एका तुटक्‍या, गुळगुळीत होऊन भोकं पडलेल्या स्लिपरचा फोटो टाकला होता. आणि लिहिले होते की - इस चप्पल के मालिक को चप्पल देना बनता है बॉस! ही अशी भंकस एरवी प्रस्थापित मीडियातून करणे सलमानसारख्यालाही शक्‍य नव्हते! पण सोशल मीडियावर कोणतीही बंधने नाहीत. म्हणूनच सचिनप्रमाणे भारतातील अनेक सेलिब्रिटी आज ट्विटरवर आहेत. काही फेसबुकवर आहेत. अमिताभसारखा व्यस्त आणि श्रेष्ठ अभिनेता ब्लॉगवर आहे.

पण सोशल मीडिया हे केवळ सेलिब्रिटींचेच माध्यम आहे का? तर तसे नाही. असंख्य लोक आज कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया साईटवर आहेत. जगभरात सर्वत्र औद्योगिक क्रांतीने विभक्त कुटुंबसंस्थेला जन्म दिला. आयुष्य ठराविक चौकटीत कोंबले गेले. कुटुंबे चौकोनी - त्रिकोनी झाली. वास्तविक पौर्वात्य देशांची ही जीवनरीत नव्हे. परंतु बाह्य परिस्थितीने ती त्यांच्यावर लादली गेली. आता तर तंत्रक्रांतीने या चौकटीलाही तडे गेले. प्रत्येक माणसाचा स्वतंत्र कोष झाला. परंतु निदान पौर्वात्य माणसे तरी असे जगू शकत नाहीत. कुळ-गणगोत यांत असणे हे त्याच्या गुणसूत्रांत आहे. त्याला इतरांपासून तुटून जगता येत नाही. भारत किंवा चीनमध्ये मोबाईल फोनचा सर्वाधिक वापर होतो, त्याचे कारण हे आहे. आणि भारतासारख्या देशात ऑर्कुट, फेसबुक आणि आता ट्विटरला जगातील अन्य देशांच्या तुलनेने प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे त्याचेही हेच कारण आहे. या साईट्‌समुळे आपणांस आपल्या अटी आणि शर्तींवर इतरांशी जोडून घेणे सहजसाध्य झाले आहे. ते सोईस्करही आहे. हे "जोडले जाणे' कदाचित आभासी असेल; पण ते आजच्या पिढीला पुरेसे वाटते आहे आणि म्हणूनच इंटरनेटवरील सोशल मीडिया साईट्‌सना एवढा प्रतिसाद मिळत आहे.

यानंतर आता एक प्रश्‍न येतो, की या साईट्‌सवर केवळ चॅटिंगच, गप्पा-टप्पाच चालतात काय? चालत नाहीत असे नाही. आजही काही लोक फेसबुक अकाऊंटवर "हाय, हाऊ आर यू?' असा फालतू स्क्रॅप टाकून जातात. पण सोशल मीडिया साईट्‌स त्यासाठी नाहीत. उलट आज तर माहिती प्रसारणाचे एक माध्यम म्हणून सोशल मीडिया साईट्‌स समोर येऊ लागल्याचे दिसत आहे. ट्विटर या साईटने याबाबत चांगलीच आघाडी घेतली आहे. अनेक बातम्या हल्ली ट्विटरवरून "ब्रेक' होत आहेत. क्षणार्धात जगभरात पोचत आहेत. याहून अधिक म्हणजे प्रस्थापित माध्यमांसाठी ही साईटच बातमीचा स्रोत बनली असल्याचे दिसून आले आहे. आयपीएल प्रकरणात आपण हे पाहिले आहे.

याच आयपीएल प्रकरणाच्या निमित्ताने, भविष्यात सोशल मीडियासाईट्‌स हा प्रस्थापित मीडियाला एक समर्थ पर्याय बनू शकतील काय, अशी एक चर्चा माध्यम अभ्यासकांमध्ये पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र आज तरी आपल्याकडील वृत्तपत्रे आणि चित्रवाणी वाहिन्यांनी त्याची काळजी करण्याचे कारण नाही. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतातील डिजिटल डिव्हाईड. इंडियन रिडरशिप सर्व्हे 2010च्या गेल्या तिमाहीतील अहवालानुसार भारतीय लोक हल्ली मीडियावर रोज सरासरी 125 मिनिटे वेळ खर्च करतात. मात्र त्यातील इंटरनेटचा वाटा सर्वात कमी आहे. तेव्हा जोवर मोबाईल फोनमध्ये कवडीमोलाने इंटरनेट येत नाही, तोवर वृत्तपत्रे आणि वाहिन्यांना मरण नाही. पण आता भारतात मोबाईलची तिसरी पिढी येऊ घातली आहे. ती थ्री-जी टेक्‍नॉलॉजी स्वस्तात उपलब्ध झाली, तर साहजिकच मोबाईलमधून इंटरनेट सर्फिंग, सोशल नेटवर्किंग याला जोर येईल.

अशा वेळी कल्पना करा, की तुम्ही रस्त्याने चालला आहात. अचानक तुमच्यासमोर अपघात होतोय. तुम्ही पटकन्‌ तुमच्या मोबाईल कॅमेऱ्याने त्याचा व्हिडीओ टिपला. तो एमएमएस तुमच्या मित्रांना पाठविला. त्यांनी तो आणखी लोकांना पाठविला. कोणी तो ट्विटरवर, फेसबुकवर, ब्लॉगवर टाकला... चित्रवाणी वाहिन्यांच्या आधी तुमची ही अपघाताची बातमी जगभर पोचलेली असेल... आणि मग वाहिन्यांना घ्यावा लागेल, तो केवळ त्या बातमीचा फॉलोअप. वृत्तपत्रे तर त्यानंतर काही तासांनी तुमच्या दारी येणार. ती काय करतील? एकूणच या सोशल मीडिया साइट्‌समुळे भविष्यात प्रस्थापित मीडियाची संपूर्ण भूमिकाच बदलणार आहे. आजच त्याची काही अंशी सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता हेच पाहा ना, की सचिन तेंडुलकरने त्याच्या बोटाच्या जखमेचे टाके काढले, ही त्याच्या चाहत्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बातमी आपल्याला सर्वात आधी दिली ती ट्विटरनेच!


ट्विटरची टिवटिव
काही वर्षांपूर्वी भारतात ऑर्कुट या सोशल नेटवर्किंग साईटची मोठी क्रेझ होती. नंतर फेसबुक आले. ब्लॉग्ज आले आणि सध्या ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटची चलती आहे. ट्विटर हे काही तरी "कूल' प्रकरण आहे याचा साक्षात्कार भारतीयांना झाला तो अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान. बराक ओबामा हे ब्लॅकबेरीशिवाय क्षणभर राहू शकत नाहीत आणि ते त्यावरून सतत ट्विट करीत असतात, हे समजल्यानंतर आपल्याकडील अनेक राजकीय नेतेही ट्विटरकडे वळले. पण या साईटचा खऱ्या अर्थाने बोलबाला झाला तो माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यामुळे. ट्विटरवर त्यांनी भारत सरकारच्या काटकसर मोहिमेसंदर्भात केलेल्या "कॅटल क्‍लास' शेरेबाजीमुळे मोठा वाद निर्माण झाला आणि ही साईट चर्चेत आली. विशेष म्हणजे याच साईटमुळे - म्हणजे या साईटवर ललित मोदी यांनी केलेल्या एका ट्विटमुळे पुढे आयपीएलगेट उजेडात आले. त्यात शशी थरूर आणि मोदी दोघांनाही आपल्या खुर्च्या गमवाव्या लागल्या. या सर्व प्रकरणात ट्विटरचा गाजावाजा होतच राहिला. (या अर्थाने शशी थरूर यांना ट्विटरचे ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणावयास हरकत नाही!) आता पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरच्या निमित्ताने ही साईट मीडियात झळकू लागली आहे.



(प्रसिद्धी : सकाळ, ११ मे २०१०, ई-सकाळ)

Read more...

मी निर्विकार!

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत आज माझ्या मनात कोणतेही विकार नाहीत!

मी एक सामान्य माणूस आहे.
स्ट्युपिड कॉमन मॅन!
भारत माझा देश आहे आणि सगळ्यांचं असतं तेवढंच माझं माझ्या देशावर प्रेम आहे.
त्यामुळं सव्वीस-अकराच्या हल्ल्याबद्दल मी खूपखूप चिडायला पाहिजे.
चिडून मी दहशतवाद्यांना, पाकिस्तानला, तिथल्या आणि इथल्या राजकारण्यांना शिव्या घालायला पाहिजेत.
कसाबला फाशी द्या, अशी प्रतिक्रिया पाठवायला पाहिजे पेपरला.
दहशतवादी कधीही येतात, कुठूनही येतात आणि माणसं मारून जातात, म्हटल्यावर मी घाबरायला तरी पाहिजे.
पण तसं काहीही मला वाटत नाहीये!

मी मुंबईकर आहे.
मी दहशतवादाचा चेहरा पाहिलाय. मुलुंड बॉम्बस्फोटाने पुसलं गेलेलं बहिणीचं कुंकू पाहिलंय.
पण तरीही आज मी दहशतवादाबद्दल निर्विकार आहे.
माझी संवेदनशीलता मेलीय का? कातडी गेंड्याची झालीय का?
तसंही असेल! तसंच असेल!!
पण हे कशामुळं झालं असेल?
मी रोज पेपर वाचतो म्हणून तर नसेल?

मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
विदर्भात नक्षल्यांच्या हल्ल्यात १२ जवान शहीद
कोकणात वादळात हरवलेले २० मच्छीमार अद्याप बेपत्ता
मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता
मी रोज बातम्या वाचतो.
हिंसाचाराच्या, भ्रष्टाचाराच्या, महागाईच्या, खुनाच्या, निवडणुकीच्या, बलात्काराच्या, सन्माननीय सदस्यांनी विधानभवनात केलेल्या गोंधळाच्या, फीवाढीच्या आणि सिनेमाच्या. गेल्या आठ-दहा दिवसांपासून सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या. (वर्ष झालं त्या हल्ल्याला. म्हणजे त्याला "वर्धापनदिन' म्हणायचं का, असा एक प्रश्‍नसुद्धा मला कधीकधी पडतो!)

तर आता मी सरावलोय.
जसे आपण सगळे, "काश्‍मीर खोऱ्यात काल रात्री आतंकवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांसह चार जवान शहीद झाले', या बातम्यांना सरावलोय. पेपरातही आतल्या पानात असतात अशा बातम्या. जाहिरातींच्यावर कुठंतरी सिंगल कॉलमात.

तर मी सरावलोय आता अस्मानी आणि सुल्तानी दहशतवादाला. तर याचीही एक गंमतच झालीय.
लोक म्हणतात, अरे, हे तर मुंबई स्पिरिट!

स्पिरिट तर स्पिरिट!
बॉम्बस्फोट झाला, म्हणून काय दुसऱ्या दिवशी कचेरीला सुट्टी नसते ना भाऊ. जावंच लागतं.
म्हातारीचं मयत झाकून नातीचं लग्न उरकावंच लागतं!

तर आपणांस, दुर्घटना झाली की त्यात आपण मेलो नाही याची खात्री करून, लगेच काहीही झाले नाही, अशा बधीरतेने आपल्या कामास लागणे, अशीसुद्धा "स्पिरिट ऑफ मुंबै'ची डेफिनेशन करता येईल.

कृपया, या व्याख्येतील "बधीरतेने' हा शब्द अधोरेखीत करावा, ही विनंती. कारण की, ती आमची अत्यंत महत्त्वाची व प्रयत्नें कमावलेली मनोवस्था आहे.
या मनोवस्थेमुळेच आम्हांस शांत निद्रा येते. कुठलेही प्रश्‍न पडत नाहीत.
उदाहरणार्थ -
दहशतवादी कधीही, कसेही, कुठेही कसे येऊ शकतात?
आमच्या सुरक्षा व गुप्तचर यंत्रणा अशा वेळी काय करत असतात?
२६-११ नंतर रेल्वेस्थानकांवर उभारलेले वाळूच्या पोत्यांचे बंकर नेहमी रिकामेच का असतात?
मेटल डिटेक्‍टर हे लग्नमंडपाच्या प्रवेशद्वारांसारखे का भासतात?
२६-११चे सगळेच कटवाले कोर्टापुढं का आलेले नाहीत?
हल्लेखोरांचा मुकाबला करणारे काही पोलिस अजूनही शौर्यपदकापासून का वंचित आहेत?
पोलिसांकडे पुरेशी शस्त्रं सोडा, त्यांच्या वॉकीटॉकीला चांगल्या बॅटऱ्या आजही का मिळत नाहीत?

हे व तत्सम प्रश्‍न मला तर अजिबात पडत नाहीत.
मी एक सामान्य माणूस आहे.
स्ट्युपिड कॉमन मॅन!
(पूर्वप्रसिद्धी - ईसकाळ, २६ नोव्हें. २००९)

Read more...

वृत्तवाहिन्या "मोठ्या' कधी होणार?

भारतीय टीव्ही तुलनेने नवा आहे. तो उत्क्रांत होत आहे. त्यामुळे चुका घडणारच. त्यातून शिकत शिकतच वाहिन्या प्रगल्भ होत जाणार, असे म्हटले जाते. ते योग्यच आहे. परंतु माध्यम अजून नवे असतानाच, त्यास चांगले वळण लावण्याची, चांगल्या प्रथा- परंपरा निर्माण करण्याची आवश्‍यकता असते. आज वृत्तवाहिन्यांमध्ये एखादेच प्रणव रॉय अशी जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. बाकीच्या संपादकांची त्यास तयारी आहे काय?

दहशतवादी, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, एवढेच नव्हे; तर आपली स्वतःची असहायता या सगळ्यांवर सर्वसामान्य मुंबईकर प्रचंड संतापलेला आहे. त्याचबरोबर इलेक्‍ट्रॉनिक मीडियावरही तो चिडलेला आहे. मुंबईवरील हल्ल्याचं वार्तांकन करताना अनेक वृत्तवाहिन्यांनी जे संकेतभंग केले, त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनातून हे माध्यम उतरलं आहे. गेल्या काही दिवसांत विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेली वाचकपत्रे, लेख यातून हीच चीड दिसून येत आहे. आणि गंमत म्हणजे, लोक आपल्यावर का चिडले आहेत, हेच अद्याप वृत्तवाहिन्यांच्या कारभाऱ्यांच्या लक्षात आलेलं नाही! किंवा त्यांना ते लक्षातच घ्यायचं नाही! त्यामुळेच, आम्ही एवढा जीव धोक्‍यात घालून वार्तांकन केलं,

लोकांना सेकंदासेकंदाला ब्रेकिंग न्यूज दिल्या, माहिती दिली, तरी आमच्यावरच टीका होत आहे, असे म्हणत वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आदळआपट करीत आहेत.

या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जी काही मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. परंतु केवळ मेहनतीने भागत नसते. अशा घटनांच्या वेळी प्रसारमाध्यमांकडून जी संयमाची, संवेदनशीलतेची अपेक्षा असते, त्या कसोटीवर इलेक्‍ट्रॉनिक मीडिया उतरलेला नाही. टीव्हीच्या बातम्या दहशतवादी वा त्यांचे सूत्रधार पाहत होते की नाही, त्यांचा त्यांना उपयोग होत होता की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. काही वाहिन्यांच्या मते असं काही झालंच नाही. त्यामुळे एका क्षणी प्रशासनाने लाइव्ह कव्हरेजवर बंदी घातल्यानंतर एका चॅनेलच्या मालकाने अगदी सोनिया गांधींपर्यंत धाव घेऊन ही बंदी उठविण्यास भाग पाडलं, अशी चर्चा आहे. दहशतवादी केवळ आमचाच चॅनेल पाहत आहेत, असा नगारा एक हिंदी वाहिनी पिटत होती, हे विसरून; दहशतवाद्यांना लाइव्ह कव्हरेजचा उपयोग झाला हा एनएसजीचा आरोप विसरून, वादाकरिता वाहिन्यांची बाजू मान्य केली, तरी एक प्रश्‍न उरतोच, की कमांडो कारवाईचं थेट प्रक्षेपण करणं ही आपली राष्ट्रीय गरज होती काय?

मुद्दा संयमाचा, संवेदनशीलतेचा आहे. वाहिन्यांनी बातम्यांचे किरकोळीकरण केलं. "ब्रेकिंग न्यूज'" या शब्दप्रयोगाची लाज काढली, हे माफ करता येईल. पण त्यांच्या असंवेदनशीलतेचं काय? प्रत्येक व्यक्तीचं खासगी जीवन असतं, त्याची खासगी स्पेस असते. तिचा सन्मान करायचा असतो, हे तत्त्व टीव्ही मीडियाने केव्हाच मोडीत काढलेलं आहे. मृतदेहांचं प्रदर्शन न करण्यामागे हेच तत्त्व असतं. त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या भावनांची जपणूक त्यात अध्याहृत असते. नाईन-इलेव्हनच्या बळींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन अमेरिकेतील वाहिन्यांनी भरविलं नव्हतं! भारतीय वाहिन्यांनी अशी संवेदनशीलता दाखविल्याचं स्मरणात नाही! वाहिन्यांना दिवसाचे २४ तास वृत्तरतीब घालावा लागतो, त्यातून असं घडतं म्हणतात. खरं तर कोणत्याही वृत्तवाहिनीवर बातम्या अशा दाखविल्या जातात त्या फार फार तर आठच तास. बाकीच्या वेळात बातम्यांशी निगडित अन्य कार्यक्रम दाखविले जात असतात. परंतु या आठ तासांचा अवकाश भरण्याइतक्‍या बातम्याही वाहिन्यांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यातून मामुली घटना राष्ट्रीय महत्त्वाच्या केल्या जातात, एकाच व्हिडीओ क्‍लिपचं दळण दळलं जातं आणि माणूस मरणात असो वा तोरणात, "अब आप को कैसा लग रहा है' असे चीड येणारे प्रश्‍न विचारले जातात! येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की ट्‌वेंटी फोर बाय सेव्हन बातम्या आणि सेकंदा सेकंदाला ब्रेकिंग न्यूज ही सर्वसामान्यांची (वाहिन्यांची नव्हे!) गरजच नाही. ती बाजारपेठेने निर्माण केलेली चैनीची बाब आहे! वाहिन्यांना ती चैनही योग्य प्रकारे भागविता येत नसेल, तर त्यांनी त्या फंदात पडू नये, इतका सोपा हा मामला आहे!

दृश्‍यात्मकता आणि नाट्यमयता ही निश्‍चितच टीव्ही माध्यमाची गरज आहे. परंतु या आवश्‍यकतेचं एवढं अवडंबर माजविलं गेलं आहे, की त्यामुळे बातम्यांना सोपऑपेराची कळा आलेली आहे. "वादेवादे जायते तत्त्वबोधः' असं भारतीय संस्कृती मानते. पण मुळातच पाश्‍चात्य मॉडेलवर आपल्या वाहिन्या उभ्या असल्याने, येथे वाद वा संवाद क्वचितच घडतात. वादाचे कार्यक्रम हे बिग फाईट असतात, संगीताची महायुद्धं असतात आणि लोकशाही निवडणुका वा क्रिकेटचे सामने संग्राम असतात! भारतीय वृत्तवाहिन्यांची सर्वात मोठी चूक कोणती असेल, तर ती हीच. त्यांनी बातम्यांना आक्रमक मनोरंजनमूल्य दिलं! धार्मिक दंतकथांना बातमी म्हणून सादर करणं, सेलिब्रिटींच्या सर्दी-पडशाच्या ब्रेकिंग न्यूज देणं काय किंवा कमांडोंची कारवाई व्हिडीओ गेम लावल्याच्या उत्साहात दाखविणं काय, हा याचाच परिपाक आहे. हे सर्व पाहणारे प्रेक्षक आहेत आणि त्यांच्यासाठीच हे आम्हांला करावं लागतं, असा युक्तिवाद येथे सहज करता येईल. तो करण्यास कोणाचीही हरकत नाही. पण मग आपण जबाबदार पत्रकार नसून, लोकानुनय करणारे वृत्तडोंबारी आहोत हे एकदा वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मान्य करून टाकावे!

भारतीय टीव्ही तुलनेने नवा आहे. तो उत्क्रांत होत आहे. त्यामुळे अशा चुका घडणारच. या चुकांतूनच शिकत शिकत वाहिन्या प्रगल्भ होत जाणार, असे म्हटले जाते. ते योग्यच आहे. परंतु माध्यम अजून नवे असतानाच, त्यास चांगले वळण लावण्याची, चांगल्या प्रथा- परंपरा निर्माण करण्याची आवश्‍यकता असते. आज इलेक्‍ट्रॉनिक मीडियात दिसणाऱ्या विकृती प्रिंट मीडियात नाहीत का? काही वृत्तपत्रांत त्या आहेतही. परंतु वृत्तपत्रांचा मूळ प्रवाह उच्छृंखल, वावदूक नाही. तो तसा नाही, याला कारण आजच्या संपादकांचे पूर्वज आहेत. आज वृत्तवाहिन्यांमध्ये एकादेच प्रणव रॉय अशी जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. बाकीच्या संपादकांची त्यास तयारी आहे काय?
(सकाळ, रविवार, ७ डिसेंबर २००८)

Read more...

सौंदर्याच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे!

1.
सौंदर्य म्हणजे काय?
ते कुठं असतं? कशात असतं? कसं असतं?
नशीब, यक्षाने युधिष्ठिराला असे काही सवाल घातले नव्हते! नाही तर पुढचं महाभारतच घडलं नसतं!
यातला गमतीचा भाग सोडा. पण हे खरोखरच अवघड सवाल आहेत यात काही प्रश्‍न नाही!
त्यांची उत्तरं शोधण्याचे प्रयत्न तत्त्वज्ञान्यांपासून काव्यचिंतकांपर्यंत अनेकांनी केले आहेत. त्यातल्या अनेकांची लाईफलाईन त्या शोधातच संपली. त्यातही काहींना सौंदर्याचं शास्त्र मांडण्यात यश आलं. पण ते त्यांचं-त्यांचं उत्तर होतं! साधं काव्यापुरतं बोलायचं तर रविकिरण मंडळाच्या कविता आणि आजच्या दलित कविता यांच्या सौंदर्याला एकाच शास्त्राचा काटा कसा लावणार? नाहीच लावता यायचा. कारण -
सौंदर्य हा "ज्याचा-त्याचा प्रश्‍न' आहे!

तो ज्याच्या-त्याच्या मनाचा, संस्कारांचा, ज्ञानाचा, प्रज्ञेचा खेळ आहे!
कुणीतरी म्हटलंच आहे ः सौंदर्य हे पाहणाराच्या नजरेत असतं.
तशी नजर असेल, तर मग तुम्हाला खास निसर्गसौंदर्य पाहायला म्हणून पर्यटनस्थळी जावं लागणार नाही आणि "निसर्गसौंदर्य आलं की आम्हाला उठवा हं', असं गाडीतल्या सहप्रवाशाला सांगावंही लागणार नाही. तशी नजर असेल, तर ते डालड्याच्या डब्यात लावलेल्या सदाफुलीतसुद्धा दिसेल. रस्तेदुभाजकावर लावलेल्या रंगीतबुटक्‍या रोपट्यांतही दिसेल. मुलाने चित्रकलेच्या वहीत गिरबाडलेले तीन डोंगर, त्यामधून दिसणारा अर्धा सूर्य, खालून वाहणारी नदी, किनाऱ्यावर माड, त्याआड "चारआकडी' पाखरं आणि त्याखाली छानसं कौलारू घर अशा चिरंतन निसर्गचित्रातही दिसेल!

2.
आमचा एक सुहृद डोळ्यांची खूप काळजी घेणारा. परवाच त्याने कुठलासा इम्पोर्टेड गॉगल घेतला. म्हटलं, अरे त्याच्या किमतीत एक अख्खा डोळा आला असता! तर असे अनेक चष्मे आजकाल बाजारात मिळतात. पण सौंदर्यदृष्टीचा चष्मा... तो काही विकत मिळत नाही! तो आपला आपणच बनवावा लागतो. बनवायचा असतो!
जरा आजूबाजूला पाहिलं की लक्षात येईल, असे चष्मे बनविलेली किती तरी माणसं आपल्या भोवती वावरत आहेत. त्यांना या जगात केवढं सौंदर्य भरलेलं आहे हे तर दिसतंच, पण कुरूपाचं सुरूप कसं करायचं हेही सुचत जातं. मग आपसूक त्यांची धडपड सुरू होते आपली माती, आपली माणसं सुंदर करण्याची! आता त्यांना ते पूर्णतः जमतं का? नसेल जमत. पण प्रयत्न तर तोच असतो. आणि अखेर "कुछ खार तो कम कर गए गुजरे जिधर से हम' असं काही झाल्याशिवाय थोडंच राहतं? अशी माणसं ज्या रस्त्यावरून जातात तिथली धूळ उडून रस्ता थोडा तरी स्वच्छ होतोच. आनंदवनाच्या कर्मयोग्यापासून राळेगणच्या साधकापर्यंतच्या अनेक माणसांच्या धडपडीचा दुसरा अर्थ तो काय आहे? आपलं विश्‍व सुंदर करता करता ही अशी माणसंही मग नकळत सुंदर होऊन जात असतात!
सर्वांच्या परिचयाची म्हणून ही दोन नावं घेतली. पण असे अनेक-अनेक सौंदर्यप्रेमी आहेत आपल्यात, आपल्या गावात, आपल्या घरा-दारात. गोलगोल भाकरी बडवतानाची आईची वत्सल तन्मयता यातसुद्धा राजे, सौंदर्य आहे! शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या वावरातले काटेकुटे कमी व्हावेत म्हणून झटणाऱ्या पी. साईनाथांसारख्या पत्रकाराच्या लेखणीतही सौंदर्य आहे!
फक्त ते पाहणारी नजर हवी!!

3.
"सौंदर्याच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे,' असं बालकवी म्हणतात. ही सौंदर्याची सुमनं म्हणजे काही गुलबकावलीची फुलं नसतात! ती दुर्मिळ नसतात आणि महाग तर नसतातच नसतात. आयुष्य जाहिरातपुरस्कृत आणि समाजजीवनाचा "शो-बीझ' झाल्याच्या आजच्या काळात आपल्याला उगाचच असं वाटतं, की महाग ते सुंदर. असं समीकरण होणं मार्केटवाल्यांच्या सोयीचं असेल, पण ते खासच चुकीचं आहे.
एका दिवाळीच्या सुटीत आमच्या सोसायटीतल्या बच्चेकंपनीने दोन दिवस खपून भलामोठा आकाशकंदील केला होता. आता त्याचे कोन भूमितीशी वैर साधणारे झाले होते, हे कुणाच्याही सहज लक्षात येत होते. पण आम्हाला नाही ते दिसले! आम्हांला त्या कंदिलात मुलांचा आनंद दिसत होता. त्यांनी नाकाच्या शेंड्याला जीभ लावून केलेलं चिकट-काम दिसत होतं. आम्हांला तो कंदील विकतच्या शोभिवंत कंदिलांपेक्षा अनंत पटीने सुंदर दिसत होता! सौंदर्यदृष्टी म्हणतात ती याहून काय वेगळी असते?
सौंदर्यशास्त्राची गणितं कोणाला मांडायची त्याने मांडावीत, आपल्या सौंदर्याच्या व्याख्या इतक्‍या साध्यासोप्या ठेवल्या ना, तर "हे जीवन सुंदर आहे' असं मुद्दामहून आळवायचीही गरज पडणार नाही. ते गाणं असंच आपल्या मनात मुरत-मुरत आपल्याला सतत ताजं ठेवत राहील. फक्त ती नजर तेवढी कमवायला हवी!!

(सकाळ-प्रेरणा, ता. 22 ऑक्‍टो. 2007)

Read more...

आणीबाणीच्या निमित्ताने...

26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत्र्यांचा संकोच झाला. हुकुमशाहीचा नंगानाच सुरू झाला... मग तमाम विरोधी पक्षांनी देशाला साद दिली : "अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली वगैरे. जयप्रकाश नारायण यांनी "संपूर्ण क्रांती'चा नारा दिला. भारतात दुसरे स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले...

आणीबाणीचे वाचन करण्याची ही एक पद्धत आहे. किंवा मग "अनुशासनपर्व' या विनोबाविरचित सूत्राद्वारेही तिचे मापन करता येते. यातील सत्य, अर्धसत्य आणि असत्य हा नंतरचा भाग. एक मात्र खरे, की महाराष्ट्रात आणीबाणीचे पहिले वाचनच अधिक "प्रतिष्ठित' आहे. येथील समाजवादी साथी आणि संघीय स्वयंसेवक यांनी गेली तीस वर्षे सांगितलेल्या आणीबाणीच्या कथा-कहाण्या वाचून कोणाचाही समज व्हावा, की इंदिरा गांधी ही एक भयंकर सत्तापिपासू बाई होती.

आणीबाणी हे एक सत्यच आहे. ते नाकारण्याचा प्रश्‍नच नाही. 26 जून 1975 ते 18 जानेवारी 1977 या कालावधीत देशातील आचार-विचार-उच्चार-संघटना स्वातंत्र्य गोठवून टाकण्यात आले होते. देश प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेला होता आणि आपल्या अंगभूत सरंजामशाही मूर्खपणामुळे या नोकरशहांनी अनेक ठिकाणी अतिरेक केला होता. संजय गांधी यांनी कुटुंबनियोजनाला प्राधान्य दिले. नोकरशहांनी अविवाहित युवकांपासून विधुर वृद्धांपर्यंत कुणाचीही नसबंदी करून या कार्यक्रमाचा विचका केला. (नसबंदी म्हणजे सुन्ता या गैरसमजानेही त्यात भरच घातली.) आणीबाणीत देशाला एक शिस्त आली होती, रेल्वे वेळेवर धावत होत्या, बाबूलोक कार्यालयांमध्ये कामच करू लागले होते, हे जितके खरे; तितकेच आणीबाणीत लालफीत होती, भ्रष्टाचार होता, शासकीय दमनशाही होती, बोलक्‍या मध्यमवर्गाला बोलायची सोय राहिलेली नव्हती आणि सर्वसामान्यांच्या जीवनात कोणताही फरक पडलेला नव्हता, हेही खरे.

18 जानेवारी 1977 च्या रात्री इंदिरा गांधींनी निवडणुका घेण्याची घोषणा केली. प्रश्‍न असा आहे, की या दीड वर्षांत असे काय घडले, की त्यामुळे इंदिरा गांधी यांच्यातील सत्तापिपासा शमली? जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस, नानाजी देशमुख, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे आदी नेत्यांच्या चळवळींमुळे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी मागे घेतली, असे म्हटले; तर इंदिरा गांधी यांच्यावरील सत्तांध, हुकुमशहा, फॅसिस्ट वगैरे आरोपांचे काय? अशा प्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्या हातात आलेली सत्ता कदापि सोडत नसतात. इंदिरा गांधी अशा प्रवृत्तीच्या नव्हत्या असे म्हणावे; तर मग असे काय झाले, की त्यांना आणीबाणी लागू करावी लागली?

"इंदिरा गांधी, द इमर्जन्सी ऍण्ड इंडियन डेमोक्रॅसी' या आपल्या पुस्तकात पी. एन. धर यांनी म्हटले आहे, की "आणीबाणीचा अर्थ जर कायद्याच्या राज्याचा संक्षेप हा असेल तर 26 जून 1975 च्या कितीतरी आधी ही लोकशाही पद्धत ढासळू लागली होती.' 1971मध्ये इंदिरा गांधी यांचे सरकार सत्तेवर आले. तोच बांगला देशाचा पेच निर्माण झाला. एक कोटी बांगला निर्वासितांमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा बोजा आला. त्यात युद्ध झाले. भरीस भर म्हणून 72 चा दुष्काळ. भारत-पाक युद्धानंतर अमेरिकेने मदत थांबविली होती. दुष्काळामुळे देशातील अन्नधान्याचे उत्पादन आठ टक्‍क्‍यांनी कमी झाले होते. 1973 मध्ये "ओपेक'ने तेलाच्या किमती चौपटीने वाढवल्या. त्यामुळे धान्य, खते अशा आयात वस्तूंच्या किमती वाढल्या. 1974च्या मध्यापर्यंत किमतीची पातळी 30 टक्‍क्‍यांवर पोहोचली. चलनफुगवटा आटोक्‍यात ठेवण्यासाठी काही अप्रिय निर्णय घेणे सरकारला भाग पडले. वेतनवाढीतील आणि जादा महागाई भत्त्यातील निम्मी रक्कम गोठविण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष मात्र वाढला. या वातावरणातच जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे संप पुकारला. तिकडे अहमदाबादमधील एल. डी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मेसचे दर वाढले म्हणून केलेल्या आंदोलनाने गुजरातेत वणवा भडकला. जेपींचे "नवनिर्माण आंदोलन' त्यातूनच सुरू झाले. अवघा देश अस्थिरतेच्या गर्तेत सापडला होता.

या सर्व घटनांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचेही संदर्भ होते. अमेरिका आणि चीन यांच्यातील मैत्रीपर्वाला नेमकी याच कालखंडात, 1971 मध्ये सुरूवात झालेली आहे. त्यात जन. याह्या खान यांनी किती मोलाची कामगिरी बजावली याचा तपशील वॉल्टर आयझॅकसन यांनी लिहिलेल्या किसिंजर यांच्या चरित्रातून मिळतो. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष निक्‍सन इंदिरा गांधींचा किती द्वेष करीत होते, हेही या पुस्तकातून समजते ः "नेहमीच्या संभाषणात, म्हणजे ते रागात नसतील तेव्हा इंदिरा गांधींचा उल्लेख "दॅट बिच' असा करीत असत. रागात असतील तेव्हा याहून घाणेरड्या शिव्या देत.' इंदिरा गांधी यांनी केलेले सिक्कीमचे विलिनीकरण, बांगला देश स्वतंत्र करून अमेरिकेच्या भूराजकीय योजनांना दिलेला छेद यामुळे अमेरिकेचा संताप झालेला होता. भारत-पाक युद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाबरोबर भारताने केलेला करार त्यांच्या नजरेत खुपत होता. 1974चा अणुस्फोट ही अमेरिका आणि चीनला मोठी चपराक होती. इंदिरा गांधींना सत्तेवरून हुसकावून देणे हे अमेरिकेच्या फायद्याचे होते. अमेरिकन कॉन्सुलेटमधील एक अधिकारी पीटर बर्ले हा नवनिर्माण आंदोलकांच्या सतत संपर्कात होता! चिलीत साल्वादोर अलांदे सत्तेवर आल्याने निक्‍सन बेचैन झाले होते. 1973मध्ये सीआयएने त्यांचा काटा काढला. तत्पूर्वी वाहतुकदारांनी संप करून चिलीतील अन्नधान्याची वाहतूक ठप्प केली होती. त्यामुळे मोठी भाववाढ झाली होती. भारतात ऐन दुष्काळात फर्नांडिस यांनी रेल्वे संप पुकारला होता. येथे चिलीची पुनरावृत्ती करण्याचा डाव आहे की काय अशी शंका इंदिरा गांधींना वाटत होती. बांगला देशात मुजीब सरकार उलथवून टाकण्याचे कट रचले जात असल्याचे गुप्तचरांचे अहवाल त्यांना मिळतच होते. (पुढे आणीबाणीनंतर दोनच महिन्यांनी, भारताच्या स्वातंत्र्यदिनी मुजीब रहमान यांची हत्या करण्यात आली.) जाने
वारी 1975मध्ये रेल्वेमंत्री एल. एन. मिश्रा यांची हत्या झाली.

इंदिरा गांधी यांची निवडणूक न्यायालयाने रद्दबातल ठरविली म्हणून, सत्ता वाचविण्यासाठी त्यांनी आणीबीणी पुकारली असा एक आरोप करण्यात येतो. मार्च 1971 मध्ये झालेल्या निवडणुकीत रायबरेलीतून बड्या आघाडीचे उमेदवार राजनारायण यांचा पराभव करून इंदिरा गांधी निवडून आल्या. त्यावर, बनावट शाईमुळे आणि भ्रष्टाचारामुळे त्या निवडून आल्या असा आरोप राजनारायण केला. अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. विठ्ठलराव गाडगीळ यांनी लिहिलेल्या अखेरच्या लेखामध्ये (12 जून 2001) या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. तो निकाल हा राजकीय कटाचा भाग होता, असा त्यांचा निष्कर्ष आहे. या खटल्याचा निकाल काय लागणार, हे त्यापूर्वी पंधरा दिवस आधी खुद्द इंदिरा गांधींनाही माहित होते! पुपुल जयकर यांनी इंदिरा चरित्रात हे नमूद केलेले आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वेंगलराव यांनी आपल्या जीवनकहाणीत स्पष्टच म्हटले आहे, की अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्या. जगमोहन सिन्हा यांनी जयप्रकाश नारायण यांना निकालाच्या आधी तब्बल दोन महिने, आपण इंदिरा गांधी यांच्या विरोधात निकाल देणार आहोत असे सांगितले होते. वेंगलराव यांच्या प्रमाणेच या गोष्टीची माहिती तत्कालिन राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी आणि पिलू मोदी यांना होती.

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली ती या परिस्थितीत हे समजून न घेतले तर ती इतिहासाशी प्रतारणा ठरेल. आणीबाणीचे समर्थन करण्याचा येथे सवालच नाही. "भाकरी की स्वातंत्र्य' असा प्रश्‍न एकदा खुद्द इंदिरा गांधींनीच केला होता. पण तो चूक आहे. म्हणूनच आणीबाणीही योग्य नव्हती. पण अनेकदा वास्तव आदर्शांवर मात करते. इंदिरा गांधी यांचे मूल्यमापन करताना हेही समजून घेतले पाहिजे.

(ता. 26 जून 2005च्या अंकासाठी.
आणीबाणीला 30 वर्षे झाल्यानिमित्ताने.)

Read more...