बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाणे हे इतिहासाला धरून नसल्याने त्याविरोधात गेल्या महिन्यात संतापाची लाट निर्माण झाली. सर्वांचे म्हणणे एकच होते, की इतिहासाचा विपर्यास सहन केला जाणार नाही, करता कामा नये. ही एक चांगलीच गोष्ट झाली. इतिहासाशी वृथा खेळ नको असा आग्रह धरला जाणे ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे. असा आग्रह धरल्यामुळे आणखी एक झाले. ते फारसे कुणाच्या लक्षात आलेले दिसत नाही, पण पुराव्यांनिशी इतिहास जे सांगतो ते आणि तेवढेच मान्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या अंगावर आली.
काशीबाई ही पेशव्यांची पत्नी. तशात ती एका पायाने अधू. त्यात पुन्हा तो काळ. सोवळ्या ओवळ्याचा, पडदागोशाचा. तेव्हा काशीबाई काही अशा नाचणार नाहीत. असे जे म्हटले जाते ते खरेच आहे. पण हे म्हणताना मस्तानीही तशी नाचणार नाही हेही जाणून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. ती पेलायची तर त्याकरीता मस्तानी कोण होती येथून सुरूवात करावी लागणार आहे. त्यासाठी गंभीर साधनांद्वारे इतिहास समजावून घ्यावा लागणार आहे. मनावरील कादंबरीमय इतिहासाची आणि ऐकीव आख्यायिकांची भूल उतरवून फेकावी लागणार आहे. खरा तोच इतिहास दाखवा असे संजय लीला भन्साळीला बजावताना खरा तो इतिहास जाणून घेण्याचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. शिवाय हे केवळ तेवढ्यावरच भागणारे नाही. आपल्यासमोर जो इतिहास पुराव्यांच्या पायावर सध्या उभा आहे तो पचविण्याची कुवत आपल्याला दाखवावी लागणार आहे. अशी ताकद खरोखरच आपल्यात आहे का?
Read more...