बदले उत्सवाचा, सगळाच रागरंग!

(माझा पहिला लेख... सकाळच्या सप्तरंग पुरवणीतला. यंदाच्या गणेशोत्सवात तीस वर्षे झाली त्याला...)

थंड पडलेल्या समाजाला उठवायचे, तापवायचे, एकत्र आणायचे आणि त्यातून आपले राजकीय आणि सामाजिक उद्दिष्ट साध्य करायचे, या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला चालना दिली, आणि तो खऱ्या अर्थाने ‘सार्वजनिक’ केला. या उत्सवामागची खरी प्रेरणा धार्मिक असण्यापेक्षा राजकीय आणि समाजिकच अधिक असल्यामुळे उत्सवामध्ये जनजागृती करणअयाच्या दृष्टीने अनेक कार्यक्रम सादर होऊ लागले. गणपतीपुढे भजन, कीर्तन, प्रवचन यांसारखे धार्मिक कार्यक्रम होणे साहजिकच होते. ती त्या समाजाची गरज होती. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे होते ते निरनिराळे मेळे, शाहिरी पथके यांचे कार्यक्रम. कारण ती त्या काळाची गरज होती.
प्रसिद्ध भावगीत गायक गजाननराव वाटवे यांनी हे मेळए प्रत्यक्ष पाहिले आहेत. त्या वेळेचे वातावरण प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या काळात गणेशोत्सवात ते स्वतःही भावगीत गायनाचे कार्यक्रम करीत होते. त्वाह्चा उत्सव, त्याचे स्वरूप यांविषयी ते सांगतात, “वेगळाच होता तो गणेशोत्सव! सक्तीची वर्गणी, गणपती पुढची नाच-गाणी, सिनेमातल्या गाण्यांच्या चालीवरची गणपतीची गाणी, असा प्रकार त्या वेळी नव्हता. तेव्हा शिस्त महत्त्वाची होती. तेव्हाचे कार्यक्रमही अतिशय चांगले असत. दहा-दहा दिवस गणपतीपुढे कीर्तन, भावगीत गायन, पोवाडे, मेळे चा

लत. कलाकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये अतिशय सहकार्याची भावना होती तेव्हा!”
‘गेले ते दिन गेले’चा एक उदास सूर त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. पण त्या आठवणींमध्ये हरवून जायला त्यांना आवडत होते. त्या वेळच्या मेळ्यांविषयी ते सांगत होते, “लोकजागृतीचे प्रमुख साधन म्हणून ‘मेळा’ ही संस्था निघाली. त्यामध्ये सामाजिक, राजकीय गीते असतच. पण शैक्षणिक, धार्मिक, औद्योगिर या विषयांवरची पदेही म्हटली जात. ‘अहो, तुम्हा काय ठावी दारूची मजा’ हे दारुबंदीपरचे उपरोधिक गाणे तर तेव्हा फार प्रसिद्ध होते. त्यात एक ओळ होती - ‘ढेकूण, चिलटे, उवादिकांशी आमुची सदा दोस्ती. आमुच्या नुसत्या पाहोट्यामधी एक लाख वस्ती.’”

अशी चटकदार, प्रबोधनपर गीते गाणाऱ्या मेळ्यांना लोकप्रियता आणि लोकाश्रय न मिळाला तर नवलच! त्यामुळे पुम्यामध्ये असे असंख्य मेळे तयार झाले होते. यांतील अहिताग्नि राजवाडे, दादा भिडे, शंकरराव महाजन आदींचा ‘सन्मित्र-समाज मेळा’, वज्रदेही तालीम हुतूतू मंडळआचा ‘वज्रदेही शूर  मेळा’, काँग्रेसचा ‘रणसंग्राम मेळा’, ‘पैसा फंड मेळा’, ‘समर्थ मेळा’ हे मेळे अतिशय लोकप्रिय होते.
“या मेळ्यांत साधारण दहा ते बारा जण असायचे. एखादा डफ, ढोलकी, तबला, तुणतुणी आणि सायकलरिक्षावर ठेवलेली मोठी बाजाची पेटी घेऊन ते प्रत्येक गणपतीपुढे जाऊन कार्यक्रम करायचे. पूर्ण काँग्रेसी मेळा. त्यामुळे त्यांचा पोषाख खादीचा गणवेश, डोक्यावर शुभ्र गांधी टोपी, हातात काठ्या, असा असायचा.”
“काँग्रेसचे मेळे गांधीजी, नेहरू यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांवरची कवनं, पोवाडे म्हणत असत. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मेळ्यांचा भर ऐतिहासिक गोष्टींवर, सत्यशोधक मेळ्यांमध्ये कर्मकांडावर प्रहार करणारी पदे म्हटली जात,” असे सांगून श्री. वाटवे म्हणाले, “या मेळ्यांमध्ये म्हटल्या जाणाऱ्या देशभक्तिपर गीतांचा समाजावर निश्चितच परिणाम होत होता. ‘पैसाफंड मेळा’, ‘समर्थ मेळा’ तर इतके प्रसिद्ध होते, की त्यांचे कार्यक्रम अगदी तिकिटे लावून व्हायचे.”
निरनिराळ्या मेळ्यांचे गणवेश अगदी ठराविक असत. ‘सन्मित्र समजा’ मेळ्याचा गणवेश टोपी, जाकीट आणि सदरा असा असायचा. क्वचित प्रसंगी ते रूमाल, उपरणे किंवा पागोटेही घालत…
(पान लावणाऱ्या उपसंपादकाने या ठिकाणी जरा घोळ केला. मधली वाक्येच कापून टाकली.)
…’रणसंग्राम मेळा’ हा असे. त्यामुळेसाहजिकच या मेळ्यांवर ब्रिटिश सरकारची ‘मेहरनजर’ बसली अन् मग त्यांच्यावर ‘सेन्सॉरशिप’ लादली गेली. मेळ्यांची पदे सार्वजनिक ठिकाणी म्हणण्यापूर्वी पोलिसांकडे तपासणीसाठी द्यावी लागत. नंतर परवाना पद्धतही सुरु केली होती.” खुद्द वाटवे यांनाही या ‘सेन्सॉरशिप’ची झळ बसली होती.
मेळ्यांवर सरकारने नियंत्रणे घातली असली, तरी मेळ्यांनी आपली प्रबोधनाची भूमिका बऱ्याच प्रमाणात योग्य रीतीने चोख बजावली होती. श्री. वाटवे याचे बरेचसे श्रेय तेव्हाच्या समाजालाही देतात. पारतंत्र्यात असलेला तो समाज राजकीय चळवळींशी प्रत्यक्ष निगडित असो वा नसो, त्याला राजकीय आणि सामाजिक जाणीव होती. “त्या वेळी समाजाची अभिरूची खरोखर उच्च प्रतीची होती. काव्यगायनाच्या कार्यक्रमात कवितेची एखादी ओळ अडली, तर एखादा श्रोताच उठून ती ओळ सांगायचा. मात्र काव्यगायनाच्या आणि मेळ्यांच्या श्रोत्यांमध्ये तसा फरक असायचा. मेळ्यांना सर्व थरांतले लोक गर्दी करायचे.” मेळ्यांनाही आपल्या श्रोतृवर्गाची चांगली जाण होतीच!
श्रोत्याला नेमके काय द्यायचे आहे, ते मेळ्यातील कलाकारांना पुरते ठाऊक असे. श्रोत्यांची राजकीय जिज्ञासा शमविण्याचा आणि त्यांना जागृत करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न हे मेळे करीत असत. ‘सन्मित्र-समाज मेळा’ यासाठी प्रसिद्ध होता. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुःसूत्रीच्या प्रचारासाठी ‘सन्मित्रा’ची आघाडी असे.

सुंदरी ‘स्वदेशी’ बाला
वर योजि बहिष्काराला
दृढ निश्चय कुसुमित मला
तत्कंठी प्रेमे घाली
बोहले आर्यभू बनले
असे लग्नविधीचे रुपकात्मक वर्णन गीतांमधून केले जात असे. तर भारत-मित्र समाजाच्या मेळ्यांतून
दख्खनची दर्जना, श्री टिळकांची वाजे रणभेरी
होमरूलाची प्राणप्रतिष्ठा करावयासाठी
देशबंधूंना हीच विनंती भारतमित्राची
ध्येय साधण्यासाठी पाळा आज्ञा बाळाची
अशी आवाहनपर पद्ये गायली जात.
सोप्या भाषेत गीते असल्यामुळे त्यांनी जनमानसाची पकड फारच थोड्या वेळात घेतली. गणेशोत्सव झाल्यानंतरही कितीतरी काळ मेळ्यांमधील पदे लोकांच्या ओठांवर खेळत असत.
मात्र ज्या चांगल्या गोष्टींचा प्रचार व्हावा, लोकांमध्ये जागृती यावी या स्तुत्य हेतूने मेळा ही संस्था प्रचारात आली होती, त्या मूळ हेतूलाच काही काळानंतर छेद जाऊ लागला. जहाल-मवाळ, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, हिंदू-मुसलमान यांच्यात वाद पेटविण्याकरीता, एकमेकांविरुद्ध प्रचार करण्याकरिता मेळ्यांचा उपयोग होऊ लागला. आपल्या पदांमधून एकमेकांची टवाळी, निंदा करण्याची अहमहमिका मेळ्यांमध्ये सुरू झाली. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर पोलिसांकडे पदे तपासण्यास देण्याची पद्धतही संपुष्टात आली. त्यामुळे तर मेळ्यांचा अधिकच दुरुपयोग होऊ लागला आणि मग या प्रकारांना आळा घालण्यासाठी पुण्यातील प्रा. के. आर. कानिटकर, श्री. स. मुजुमदार, ल. रा. गोखले, अण्णासाहेब वर्तक, वैद्यपंचानन कवडे यांच्या नेतृत्वाखाली एक ‘मेळा समिती’ नेमण्यात आली. पण हळूहळू मेळ्यांची मूळची प्रवृत्तीच हरवत चालली. पुढे पुढे तर त्यांमधून सिनेमाची गाणीही म्हणण्यात येऊ लागली. अशातच स्वातंत्र्य मिळाले. उत्सवाचे इप्सित साध्य झाले. करमणुकीची नवनवी साधने आणि त्यांमध्ये ‘मेळा’ ही संस्था कुठेतरी नाहीशी झाली.
बदले जुना जमाना
नटले नवीन ढंग
बदलेहि उत्सवाचा
सगळाच रागरंग
गेली कथा - पुराणे
संकीर्तनेही गेली
व्याख्यान प्रवचनांनी
तर धूम ठोकियेली
हे एका मेळ्यातील पद म्हणजे वर्तमानाच्या हातात हात घालून येत्या भविष्याचा घेतलेला वेधच नाही का? आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे सर्व स्वरूपच आज पालटले आहे. आपल्या हातात मनोरंजनाची, प्रबोधनाची इतकी साधने आहेत, की त्यामुळे जुन्या काळातील मेळ्यांची गरजही नाहीशी झाली आहे. परंतु आज जरी त्यांची आवश्यकता नसली, तरी एक मान्य करायला हवे, की मेळ्यांनी आपला काळ अगदी गाजवला होता. चेतवला होता.
(सकाळ, सप्तरंग, रविवार, ८ सप्टें. १९९१)

००००

या लेखाविषयी - 

रविवार, ८ सप्टेंबर १९९१. काळ असाच गणेशोत्सवाचा.
तीस वर्षे झाली त्याला. पुणे सकाळमध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम करीत होतो. नुकताच सायंसकाळ सुरू झाला होता. त्यातील मजकूर भरो आंदोलनात आमचा हातभार लागायचा. सिनेमाविषयक फुटकळ लेख हे त्यातले आमचे योगदान. आज फोकनाड वाटते ते लेखन. पण सराव झाला त्याने लेखनाचा. परिचय झाला शैलीशी.
हे लिहित असतानाच अचानक एके दिवशी एक ‘असाईनमेन्ट’ मिळाली. लेख लिहायची. तीही सप्तरंगसाठी. आठवत नाही नीटसे. पण बहुधा ऋता बावडेकर यांनी ती दिली. सांगितले, की गणेशोत्सवात पूर्वी मेळे असायचे. त्यावर लिहा.
आता ओतूरसारख्या गावातून पुण्यात नुकत्याच गेलेल्या माझ्यासारख्या माणसाला ते पुण्यातले मेळे वगैरे कुठून ठाऊक असणार? बरे कोणाला विचारावे इतकी ओळखही नाही.
ग्रंथालयात जाऊन आधी त्यावर काही मजकूर मिळतोय का ते पाहिले. तेथे जाधव सर होते. राजा माणूस. त्यांनी बरीच मदत केली.
त्या मेळ्यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेल्यांतील दोन जणांची नावे समजली तेव्हा. एक म्हणजे गजाननराव वाटवे आणि दुसरे बबनराव नावाडीकर. भावगीत गायनाच्या क्षेत्रातील ही फार मोठी नावे. माझ्यासारख्या प्रशिक्षणार्थी पत्रकाराशी बोलतील का ते ही शंका होतीच. धाडस करून गेलो त्यांचा पत्ता शोधत. ते भेटले. बोलले.
त्या सगळ्यातून माझ्या आयुष्यातला माझा म्हणावा असा आणि प्रसिद्ध झालेला पहिला लेख तयार झाला. ८ सप्टेंबरच्या सप्तरंगची कव्हर स्टोरी म्हणून तो छापून आला. अगदी मी दिलेल्या मथळ्यासह.
मथळा होता - बदले उत्सवाचा, सगळाच रागरंग!
पाय धरतीवर नव्हते त्या दिवशी. स्वतःचे नाव छापून येण्यातील अप्रूप या वयातही कमी झालेले नाही. तेव्हा तर वाटत होते, पुण्यातील सगळे लोक आपल्याला आता नावानिशी ओळखू लागले आहेत.
त्या आनंदात ऑफिसात गेलो. रविवारचा दिवस. फारशी वर्दळ नव्हती. अशोकराव रानडे सर डेस्कवर बसले होते.
मोठा दरारा त्यांचा. लेखनात इकडचा काना तिकडे झालेला चालायचा नाही त्यांना. सकाळच्या शैलीशी फटकून काही आले की त्यांचे शब्दफटके खावे लागायचे.
त्यांनी मला हाक मारली. म्हणाले, हा लेख तुम्ही लिहिलाय?
हो सर. थोडीशी छाती काढूनच म्हणालो असेन मी ते.
हा फोटो कशाचा आहे? त्यांनी लेखातील छायाचित्रावर बोट ठेवून विचारले.
म्हटले, तेव्हाच्या मेळ्यातला आहे सर तो.
मग याला कॅप्शन कुठंय? असा फोटो छापतात का? वाचकांनी काय समजायचे?
यावर काय बोलणार? ते बोलत होते ते बरोबरच होते. पण चूक माझी. मुळात तो फोटो कोणी लावला, ते पान कोणी लावले, किंबहुना ते पान कधी आणि कुठे लावले, याचा मला पत्ताच नव्हता. नवख्या पोरांना रविवार पुरवणीची पाने जेथे लावतात तेथे कोण जाऊ देणार?
पण रानडेंना ते कसे सांगणार?
त्यांचा ओरडा खाऊन, पडलेले अपमानीत तोंड घेऊन कसाबसा सटकलो तिथून.
त्यावेळी वाटले, अख्खे पुणे हसतेय आपल्याला.
३० वर्षे झाली त्याला या गणेशोत्सवात. तो प्रसंग आणि त्याने दिलेला धडा आजही पक्का लक्षात आहे.
आज तो लेख वाचताना त्यातील त्रुटीच प्रकर्षाने जाणवतात. तरीही पहिला लेख म्हणून त्याचे मोल माझ्यादृष्टीने काही औरच. 

No comments: