भारतीय टीव्ही तुलनेने नवा आहे. तो उत्क्रांत होत आहे. त्यामुळे चुका घडणारच. त्यातून शिकत शिकतच वाहिन्या प्रगल्भ होत जाणार, असे म्हटले जाते. ते योग्यच आहे. परंतु माध्यम अजून नवे असतानाच, त्यास चांगले वळण लावण्याची, चांगल्या प्रथा- परंपरा निर्माण करण्याची आवश्यकता असते. आज वृत्तवाहिन्यांमध्ये एखादेच प्रणव रॉय अशी जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. बाकीच्या संपादकांची त्यास तयारी आहे काय?
दहशतवादी, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, एवढेच नव्हे; तर आपली स्वतःची असहायता या सगळ्यांवर सर्वसामान्य मुंबईकर प्रचंड संतापलेला आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियावरही तो चिडलेला आहे. मुंबईवरील हल्ल्याचं वार्तांकन करताना अनेक वृत्तवाहिन्यांनी जे संकेतभंग केले, त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनातून हे माध्यम उतरलं आहे. गेल्या काही दिवसांत विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेली वाचकपत्रे, लेख यातून हीच चीड दिसून येत आहे. आणि गंमत म्हणजे, लोक आपल्यावर का चिडले आहेत, हेच अद्याप वृत्तवाहिन्यांच्या कारभाऱ्यांच्या लक्षात आलेलं नाही! किंवा त्यांना ते लक्षातच घ्यायचं नाही! त्यामुळेच, आम्ही एवढा जीव धोक्यात घालून वार्तांकन केलं,
लोकांना सेकंदासेकंदाला ब्रेकिंग न्यूज दिल्या, माहिती दिली, तरी आमच्यावरच टीका होत आहे, असे म्हणत वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आदळआपट करीत आहेत.
या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जी काही मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. परंतु केवळ मेहनतीने भागत नसते. अशा घटनांच्या वेळी प्रसारमाध्यमांकडून जी संयमाची, संवेदनशीलतेची अपेक्षा असते, त्या कसोटीवर इलेक्ट्रॉनिक मीडिया उतरलेला नाही. टीव्हीच्या बातम्या दहशतवादी वा त्यांचे सूत्रधार पाहत होते की नाही, त्यांचा त्यांना उपयोग होत होता की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. काही वाहिन्यांच्या मते असं काही झालंच नाही. त्यामुळे एका क्षणी प्रशासनाने लाइव्ह कव्हरेजवर बंदी घातल्यानंतर एका चॅनेलच्या मालकाने अगदी सोनिया गांधींपर्यंत धाव घेऊन ही बंदी उठविण्यास भाग पाडलं, अशी चर्चा आहे. दहशतवादी केवळ आमचाच चॅनेल पाहत आहेत, असा नगारा एक हिंदी वाहिनी पिटत होती, हे विसरून; दहशतवाद्यांना लाइव्ह कव्हरेजचा उपयोग झाला हा एनएसजीचा आरोप विसरून, वादाकरिता वाहिन्यांची बाजू मान्य केली, तरी एक प्रश्न उरतोच, की कमांडो कारवाईचं थेट प्रक्षेपण करणं ही आपली राष्ट्रीय गरज होती काय?
मुद्दा संयमाचा, संवेदनशीलतेचा आहे. वाहिन्यांनी बातम्यांचे किरकोळीकरण केलं. "ब्रेकिंग न्यूज'" या शब्दप्रयोगाची लाज काढली, हे माफ करता येईल. पण त्यांच्या असंवेदनशीलतेचं काय? प्रत्येक व्यक्तीचं खासगी जीवन असतं, त्याची खासगी स्पेस असते. तिचा सन्मान करायचा असतो, हे तत्त्व टीव्ही मीडियाने केव्हाच मोडीत काढलेलं आहे. मृतदेहांचं प्रदर्शन न करण्यामागे हेच तत्त्व असतं. त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या भावनांची जपणूक त्यात अध्याहृत असते. नाईन-इलेव्हनच्या बळींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन अमेरिकेतील वाहिन्यांनी भरविलं नव्हतं! भारतीय वाहिन्यांनी अशी संवेदनशीलता दाखविल्याचं स्मरणात नाही! वाहिन्यांना दिवसाचे २४ तास वृत्तरतीब घालावा लागतो, त्यातून असं घडतं म्हणतात. खरं तर कोणत्याही वृत्तवाहिनीवर बातम्या अशा दाखविल्या जातात त्या फार फार तर आठच तास. बाकीच्या वेळात बातम्यांशी निगडित अन्य कार्यक्रम दाखविले जात असतात. परंतु या आठ तासांचा अवकाश भरण्याइतक्या बातम्याही वाहिन्यांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यातून मामुली घटना राष्ट्रीय महत्त्वाच्या केल्या जातात, एकाच व्हिडीओ क्लिपचं दळण दळलं जातं आणि माणूस मरणात असो वा तोरणात, "अब आप को कैसा लग रहा है' असे चीड येणारे प्रश्न विचारले जातात! येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की ट्वेंटी फोर बाय सेव्हन बातम्या आणि सेकंदा सेकंदाला ब्रेकिंग न्यूज ही सर्वसामान्यांची (वाहिन्यांची नव्हे!) गरजच नाही. ती बाजारपेठेने निर्माण केलेली चैनीची बाब आहे! वाहिन्यांना ती चैनही योग्य प्रकारे भागविता येत नसेल, तर त्यांनी त्या फंदात पडू नये, इतका सोपा हा मामला आहे!
दृश्यात्मकता आणि नाट्यमयता ही निश्चितच टीव्ही माध्यमाची गरज आहे. परंतु या आवश्यकतेचं एवढं अवडंबर माजविलं गेलं आहे, की त्यामुळे बातम्यांना सोपऑपेराची कळा आलेली आहे. "वादेवादे जायते तत्त्वबोधः' असं भारतीय संस्कृती मानते. पण मुळातच पाश्चात्य मॉडेलवर आपल्या वाहिन्या उभ्या असल्याने, येथे वाद वा संवाद क्वचितच घडतात. वादाचे कार्यक्रम हे बिग फाईट असतात, संगीताची महायुद्धं असतात आणि लोकशाही निवडणुका वा क्रिकेटचे सामने संग्राम असतात! भारतीय वृत्तवाहिन्यांची सर्वात मोठी चूक कोणती असेल, तर ती हीच. त्यांनी बातम्यांना आक्रमक मनोरंजनमूल्य दिलं! धार्मिक दंतकथांना बातमी म्हणून सादर करणं, सेलिब्रिटींच्या सर्दी-पडशाच्या ब्रेकिंग न्यूज देणं काय किंवा कमांडोंची कारवाई व्हिडीओ गेम लावल्याच्या उत्साहात दाखविणं काय, हा याचाच परिपाक आहे. हे सर्व पाहणारे प्रेक्षक आहेत आणि त्यांच्यासाठीच हे आम्हांला करावं लागतं, असा युक्तिवाद येथे सहज करता येईल. तो करण्यास कोणाचीही हरकत नाही. पण मग आपण जबाबदार पत्रकार नसून, लोकानुनय करणारे वृत्तडोंबारी आहोत हे एकदा वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मान्य करून टाकावे!
भारतीय टीव्ही तुलनेने नवा आहे. तो उत्क्रांत होत आहे. त्यामुळे अशा चुका घडणारच. या चुकांतूनच शिकत शिकत वाहिन्या प्रगल्भ होत जाणार, असे म्हटले जाते. ते योग्यच आहे. परंतु माध्यम अजून नवे असतानाच, त्यास चांगले वळण लावण्याची, चांगल्या प्रथा- परंपरा निर्माण करण्याची आवश्यकता असते. आज इलेक्ट्रॉनिक मीडियात दिसणाऱ्या विकृती प्रिंट मीडियात नाहीत का? काही वृत्तपत्रांत त्या आहेतही. परंतु वृत्तपत्रांचा मूळ प्रवाह उच्छृंखल, वावदूक नाही. तो तसा नाही, याला कारण आजच्या संपादकांचे पूर्वज आहेत. आज वृत्तवाहिन्यांमध्ये एकादेच प्रणव रॉय अशी जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. बाकीच्या संपादकांची त्यास तयारी आहे काय?
(सकाळ, रविवार, ७ डिसेंबर २००८)
Read more...
त्यांचे असत्याचे प्रयोग!
-
गांधींविषयी गैरसमज पसरविणा-या, त्यांचे चारित्र्यहनन करणा-या अशा अनेक गोष्टी
पसरविल्या जात आहेत. त्यांची बनावट चित्रे तयार करून ती प्रसारित केली जात
आहेत...