अश्लीलतेच्या नावाने....

(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२)
|| १ ||
एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चाड राहिलेली नाही. रोजची वृत्तपत्रं (उदा. चित्रपट पुरवण्या), चित्रपट (कुणा एकाचं नाव सांगता येईल का इथं? सगळेच म्हणा ना... डर्टी पिक्चर वगैरे!), नाटकं (उदा. फुल्या फुल्याच्या मनीच्या गुजगोष्टी. हे नाव चारचौघात उच्चारणंही कसंसंच वाटतं!), जाहिराती (उदा. कामसूत्र वगैरे) यांपासून साहित्यापर्यंत सर्वत्र अश्लील धुडगूस चालू आहे. लोक वाट्टेल तसं ग्राम्य वागत आहेत. पेयपानगृहांपासून समुद्रकिना-यांपर्यंत सर्वत्र सनातन भारतीय परंपरेला हरताळ फासण्याचे असभ्य उद्योग सुरू आहेत. हे सगळं थांबलं पाहिजे. ही असंस्कृतता आपण बंद केली नाही, तर पाच हजार वर्षांच्या भारतीय परंपरेचे पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी नाही, असंच म्हणावं लागेल. हे कदापि चालणार नाही. हे आम्ही सहन करणार नाही....
असे काही ज्वलजहाल सुविचार आपल्या मनात खदखदत असतील, तर मग आपल्यापुढं एकच पर्याय राहतो. तो म्हणजे ही सगळी अश्लीलता, असभ्यता, असंस्कृतता, ग्राम्यता मुळापासून निखंदून काढण्याचा. आता हे निर्मूलनाचं संस्कृती बचावो काम करायचं तर त्याची सुरुवात कुठूनतरी, म्हणजे खरं तर सुरुवातीपासूनच करायलाच पाहिजे. तेव्हा मग ही सुरूवात शोधणं आलं.

Read more...