रॉ विषयी आणखी काही...


अॅमेझॉनवरही आहे ते. 
त्यासाठी येथे क्लिक करा. रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा या पुस्तकाबद्दल नियतकालिकांतून, समाजमाध्यमांतून, तसेच ब्लॉगमधून बरेच लिहिले गेले. 
आनंदाचा भाग हा, की त्यातील सर्वच प्रतिक्रिया चांगल्या, पुस्तकाचे स्वागत करणाऱ्या होत्या. 

त्यांपैकी हे लेख. पहिला 'जनपरिवार' मध्ये प्रकाशित झालेला. जॉन कोलासो यांच्यासारख्या जाणत्या व्यक्तीने तो लिहिलेला आहे. 
तरुण आणि अभ्यासू पत्रकार नामदेव अंजना यांनीही या पुस्तकाबद्दल भरभरून लिहिले. आपल्या ब्लॉगनामा मध्ये ते लिहितात - 
काश्मीरप्रश्न ऐन भरात असताना आणि त्यावरून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धाडसाबद्दल, एक घाव दोन तुकडे’टाईप निर्णयक्षमतेबद्दल देशभर चर्चा सुरु असताना आणि त्यातच ‘गेल्या 70 वर्षात काय झालं?’ या प्रश्नाची अपार चलती असताना, रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ हे पुस्तक हाती आलं.
वाचताना खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकांबाबत बोलायचं झाल्यास याआधी लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे, अनुराधा पुनर्वसु अनुवादित ‘अमृता-इमरोज’, सारंग दर्शने अनुवादित ‘शोध राजीव गांधी हत्येचा’ आणि अवधुत डोंगरे अनुवादित ‘राजीव गांधी हत्या : एक अंतर्गत कट’ ही तीन पुस्तकं मी वेड्यासारखी वाचली होती. त्यानंतर बहुधा ‘रॉ’वरील हे पुस्तकच त्या वाचन-वेडानं वाचलवं असावं. पुढल्या पानावर काय आहे, याची भयंकर उत्सुकता मनात सातत्याने बाळदग अगदी भान हरपून हे पुस्तक पूर्ण केलं.
त्यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 


कर्ण उर्फ सौरभ यांनी त्यांच्या गप्पिष्ट या ब्लॉगमध्ये लिहिला आहे. त्यात ते म्हणतात - 
सध्या भारतीय गुप्तचर संस्थेच्या सूरस कथा सांगणारे भक्तिरसाने ओतपोत असे बरेच सिनेमे निघत आहेतते मला फारच सुमार वाटतात. गुप्तहेर संघटनेचं काम इतकं ग्लॅमर्स नसत याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे या असल्या सिनेमांपासून मी दोन हात दूरच राहतो.चांगल्या पुस्तकाचा शोध हा मराठीत लिहिलेल्या रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा” या पुस्तकावर येऊन थांबला. हे पुस्तक रवि आमले यांनी लिहिले आहे. पुस्तक आपल्याला सुरुवातीपासूनच खेळवून ठेवते...या पुस्तकात रॉ च्या फक्त यशस्वी कारवाया आहेत असे लेखकाने आधीच नमूद केल्याने पुस्तक एकतर्फी वाटत नाही...
ज्यांना भारतीय राजकारणगुप्तहेर संघटनात्यांच्या कारवाया यांबद्दल जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक योग्य आहे.
श्रीजीवन तोंदले यांनी त्यांच्या पुस्तक एक्स्प्रेस या ब्लॉगमध्येही त्यांच्या वाचकांना रॉचा परिचय करुन दिला आहे. त्यात ते लिहितात - 
२९३ पानाच्या या पुस्तकामध्ये तब्बल २४ प्रकरणाद्वारे लेखकाने रॉ च्या सर्व कामगिरीची माहिती मांडली आहे. ही सर्व कहाणी वाचल्या नंतर या संस्थेचा अभिमान वाटतो.
त्यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  

याबरोबरच प्रीतम कातकर, मुंबई यांनी मराठी पुस्तकप्रेमी या फेसबुक पेजवर या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. 

गणेश कुबडे यांनी त्यांच्या माझे मनोगत या ब्लॉगमध्ये या पुस्तकाबद्दल सविस्तर लिहिले आहे. त्यात ते म्हणतात - 
स्वातंत्र्यानंतर खरंच आपल्या देशात काय घडलं,त्यातील आव्हाने कोणती होती आणि तुटपुंज्या साधणासह आपण आंतराष्ट्रीय पटलावर कशी भरारी मारली याचा इतिहास बघवयाचा असेल तर एकदा हे पुस्तक अवश्य वाचावे. माझ्या या लेखात पुस्तकातील  पहिल्या प्रकरणाचा उल्लेख मी कुठेच नाही केला.प्रकरणाचे शिर्षक आहे “ याला म्हणतात “ रॉ ”…!अद्भुत प्रकरण आहे ते जानेवारी 1971 साली घडलेलं...जाणून घ्यायचं आहे ना,चला तर मग नक्की वाचा...जवळपास तीनशे पानांचं पुस्तक आणि चोवीस प्रकरणे असं या पुसकाचं स्वरूप आहे. वाचनाचा आनंद घेत वाचल्यास अगदी दोन ते तीन दिवसात संपूर्ण वाचून होऊ शकतं...
माझे मनोगतवरील हा लेख येथे वाचता येईल. वाचनवेडा या पुस्तकप्रेमींच्या फेसबुक पेजवर सिद्धार्थ जाधव यांनीही या लेखाची लिंक दिली आहे. 

याशिवाय अनेक वाचकांनी फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून या पुस्तकाबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. हे सर्व फार भारी होते... 
या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.


Read more...

पाऊस : पडद्यावरचा...

(लोकप्रभासाठी (५ ऑगस्ट २०१३) लिहिलेला हा लेख. ललित वगैरे ढंगातला. खरं तर परीक्षाच होती ती. आज त्याचंही हसूच येतंय... पण मज्जाही वाटतेय... ललितबिलित जमल्याची...) पाऊस. 
वर्षा. बारिश. रेन.
त्याचेही अनेक प्रकार.
कधी भुरभुरता. कधी भुताळा.
कधी मुसमुसता, दुःखाच्या मंद सुरांसारखा,
तर कधी मुसळधार, उमड घुमड बरसणारा.
पाऊस टीनच्या छतावर जलतरंग वाजवणारा.
रान आबादानी करणारा . मन सुलगवणारा.
रहमानांच्या जलरंगी चित्रांसारखा.

पण कुठे असतो हा पाऊस?
हा असा काव्यमय पाऊस ज्यांच्या गावात पडतो ते भाग्यवानच म्हणायचे.
आमच्या बीपीएल डोळ्यांना पाऊसधारांतले हे सौंदर्य कधी दिसतच नाही.
सौंदर्य पाहणा-याच्या डोळ्यांत असते असं म्हणतात. खरेच असेल ते. नाही तर आपला पाऊस असा कसा असता?  गद्य, संपादकीय पानावरच्या लेखांसारखा!

तसे आम्हीही मनातल्या मनात नन्ना रे नन्ना रे करत बरसो रे मेघा म्हणतोच की. पण त्या प्रत्येक ये रे ये रे पावसाला एका प्रार्थनेची पार्श्वधूनही असते आमच्या मनी. की, पड बाबा. हवाच आहेस तू. पण अवेळी धिंगाणा घालू नकोस. सकाळी ऐन कचेरीसमयी कोसळू नकोस. तेवढी लोकल अडवू नकोस. पण तो का आपलं ऐकणा-यातला असतो? पूरग्रस्त गावातल्या माणसांप्रमाणेच वेधशाळेला धाब्यावर बसवतो तो. तिथं आपलं सामान्यांचं आर्त काय ऐकणार तो? माणसाच्या हुकूमाचा ताबेदार असायला तो थोडाच चित्रपटातला पाऊस असतो?


Read more...