(लोकप्रभासाठी (५ ऑगस्ट २०१३) लिहिलेला हा लेख. ललित वगैरे ढंगातला. खरं तर परीक्षाच होती ती. आज त्याचंही हसूच येतंय... पण मज्जाही वाटतेय... ललितबिलित जमल्याची...)
पाऊस.
वर्षा. बारिश. रेन.
त्याचेही अनेक प्रकार.
कधी भुरभुरता. कधी भुताळा.
कधी मुसमुसता, दुःखाच्या मंद सुरांसारखा,
तर कधी मुसळधार, उमड घुमड बरसणारा.
पाऊस टीनच्या छतावर जलतरंग वाजवणारा.
रान आबादानी करणारा . मन सुलगवणारा.
रहमानांच्या जलरंगी चित्रांसारखा.
पण कुठे असतो हा पाऊस?
हा असा काव्यमय पाऊस ज्यांच्या गावात पडतो ते भाग्यवानच
म्हणायचे.
आमच्या बीपीएल डोळ्यांना पाऊसधारांतले हे सौंदर्य कधी दिसतच
नाही.
सौंदर्य पाहणा-याच्या डोळ्यांत असते असं म्हणतात. खरेच असेल
ते. नाही तर आपला पाऊस असा कसा असता? गद्य, संपादकीय पानावरच्या
लेखांसारखा!
तसे आम्हीही मनातल्या मनात नन्ना रे नन्ना रे करत बरसो रे
मेघा म्हणतोच की. पण त्या प्रत्येक ये रे ये रे पावसाला एका प्रार्थनेची
पार्श्वधूनही असते आमच्या मनी. की, पड बाबा. हवाच आहेस तू. पण अवेळी धिंगाणा घालू
नकोस. सकाळी ऐन कचेरीसमयी कोसळू नकोस. तेवढी लोकल अडवू नकोस. पण तो का आपलं ऐकणा-यातला
असतो? पूरग्रस्त गावातल्या माणसांप्रमाणेच वेधशाळेला धाब्यावर बसवतो तो. तिथं आपलं
सामान्यांचं आर्त काय ऐकणार तो? माणसाच्या हुकूमाचा ताबेदार असायला तो थोडाच चित्रपटातला
पाऊस असतो?
चित्रपटात कसा तो हवा तेव्हा येतो. काले मेघा काले मेघा
पानी तो बरसाओ, बिजुरी की तलवार नहीं, बुंदों के बाण चलाओ असं म्हणायची खोटी, गाणं
संपता संपता तो येतोच. यावंच लागतं त्याला राजे हो. कारण तोही आता चित्रपटांच्या
पडद्यांवरचं एक पात्र असतो. त्याचीही एक भूमिका असते आणि त्यालाही अभिनय करायचा असतो.
हे मात्र शंभर टक्के खरं. थोडं डोळ्यांवर आडवा हात ठेवून पाहाल, तर लक्षात येईल,
की हिंदी चित्रपटांत पाऊस पडतो तो विशिष्ट भूमिकेतूनच. नायिकेला भिजवणं हे त्याचं
एक प्रमुख काम असतं. कोणी म्हणेल, पण ते तर काय धबधबेही करतात. त्यासाठी कोणी थोर
अविष्कारपुरूष राज कपूर यांचा दाखला देईल. त्यांचं कधी पावसाविना अडलं नव्हतं. राम
तेरी गंगा मैलीमधली गजगामिनी मंदाकिनी काय किंवा सत्यम् शिवम् सुंदरम् मधली
एकवस्रा झीनत काय, त्यांचं ओलेतं रुप दाखविण्यासाठी राजसाहेबांना धबधबे पुरले.
तेव्हा नायिकेला भिजवण्यासाठी पाऊसच हवा असतो असं नव्हे. पण त्याचंही एक गणित
असतं. म्हणजे नायिका नीतळ पांढ-या साडीत आली की चतुर प्रेक्षकांनी ओळखावं, भीजपाऊस
आता लांब नाही. पण या भीजपावसाची मौज धबाबा धबधब्यांत नसते. प्रत्येकवेळी नायिकेला
धबधब्याखाली कुठे नेणार? बरं नायिका धबधब्याखाली न्हायला जाते असं दाखवायचं असेल,
तर ती आदिवासी-पहाडी किंवा किमान गाँव की छोरी तरी हवी. पण प्रत्येक सिनेमात अशी
लिरिल गर्ल कशी दाखवणार? तेव्हा भीजपाऊस हवाच.
या भीजपावसाची मौज काही वेगळीच असते. म्हणजे आमचे
प्रत्यक्षातले वासू आणि सपना मरीन ड्राइव्हवर भिजायला गेले, तरी घडीची छत्री घेऊन
जातात. वरून पाऊसधारा, पुढे उसळता दर्या, मागे वाहता रस्ता आणि मध्ये कट्ट्यावर हे
दोघे एका छत्रीत. आधे सुखे, आधे गिले. गुलजारच्या काव्यगीतातल्यासारखे. आता ही
छत्री पावसापासून आडोसा म्हणून असते की आणखी कशासाठी, हे त्यांचे त्यांना ठाऊक.
हिंदीतल्या भीजगाण्यांत मात्र छत्री नसतेच. अपवाद - प्यार हुआ, इकरार हुवा सारख्या
गीताचा. भीजगीतांची बिनाका गीतमाला लावली ना, तर हे गाणं चिरंतन पहली पायदानपरच
असणार. आठवतंय ना ते?
मुंबईचा फुटपाथ. दाटलेलं आभाळ. साडीतली नर्गिस. साधीशी.
हातात पिशवी अन् छत्री. सोबत राज कपूर. घोट्याइतकी पँट. कोट. डोक्यावर गोल हॅट.
अचानक हवा सुटते. थेंब कोसळू लागतात आणि क्षणार्धात जोराचा पाऊस पडू लागतो.
मुंबईचाच पाऊस तो. छत्री उघडता उघडता निम्मे भिजवून टाकणारा. पण नर्गिसला तर
छत्रीही उघडण्याचे भान नाही. ती कुंपणाला तशीच बिलगून उभी. राज कपूरही भिजतोय. मग
तो हळूच तिच्या हातातून छत्री काढून घेतो. उघडतो. आणि तिच्या डोक्यावर धरतो. तो
मात्र पावसात. ते तिला कसं चालणार? ती त्याच्याकडं छत्री सारते, तर हा पठ्ठ्या असा श्री
चारशेवीस की, ती स्वतःच्याच डोक्यावर घेतो. आता ती भिजतेय. ते लक्षात येताच तो
तिच्याकडे छत्री देतो. ही म्हणजे पंचाईतच झाली. असं केलं, तर कोणीतरी एक भिजणारच.
अखेर नर्गिसच धाडसाने पाऊल उचलते. पुढे सरते. त्याला छत्रीत घेते. त्यांचं प्रेम
होतंच. तिच्या चेह-यावरूनच तिच्या काळजात उमटलेली प्रेमवेदना स्पष्ट दिसत होती. पण
आता तिने त्या वेदनेलाही होकार दिला होता. त्या छत्रीमध्ये... तर अशी रोमँटिक
छत्री पुढे कधी कोणत्या गाण्यात दिसलीच नाही. दिसली ती केवळ पुढच्या ओलेतेपणाला
वाट मोकळी करून देणारी, गाण्याच्या प्रारंभीच उडून जाणारी छत्री.
पुढे छत्री दिसली ती आडदांड सनी देओलच्या अर्जुनमध्ये. राहुल
रवैलचा तो चित्रपट. राजकारणातला तरुणाईचा वापर यावर भाष्य करणारा. त्या चित्रपटात
पाठलागाची एक हिंसक दृश्यमालिका होती.
सनीचा मित्र आणि त्याच्या मागे लागलेले तलवारधारी गुंड.
जीवाच्या आकांताने तो पळतो आहे. त्या गुंडांच्या डोळ्यांतही रक्त चढलेले आहे.
कोसळत्या पावसात तो पाठलाग सुरू आहे आणि आपल्याला दिसतात त्या केवळ छत्र्याच
छत्र्या आणि त्यातून वाट काढणारे ते गुंड. वरच्या कोनातून टिपलेली ती दृश्यमालिका.
त्यातला तो पाऊस आणि छत्र्यांचा वापर त्या दृश्याला एक वेगळंच काळंगडद परिमाण देऊन
गेला होता.
गुन्हेगारीपट आणि पाऊस यांचं नातं जरा अधिकच घट्ट आहे. हा
हॉलिवूडच्या वातावरणाचा प्रभाव म्हणता येईल. पण अशा प्रकारच्या चित्रपटांमधला पाऊस
जरा जास्तच खरा दिसतो हे बाकी मान्य करायलाच हवं. हाणामारीला पाऊस अधिक धार आणतो
की काय कोण जाणे? ते सत्याच्या उत्कर्षबिंदूला येणारं गणेशविसर्जनाचं दृश्य पाहा. त्यात पाऊस
नसला, तरी वातावरणातला कुंद पावसाळा अगदी चित्रपटगृहातही जाणवतो आपल्याला. आणि
त्यातलं ते उर्मिलाचं पाऊसगीत. गीला गीला पानी. गुलजारचे शब्द आणि रामू वर्माने
दाखवलेला पुन्हा मुंबईचाच पाऊस. चाळींतला. रस्त्यावरचा. उभ्या काळ्या-पिवळ्या
टॅक्स्या भिजवणारा. आणि त्यात ती आपल्या घराच्या बाल्कनीतून त्या पावसाचं ओलंपण
पिवू पाहणारी उर्मिला. आठवणीत जपावं असं ते गाणं होतं.
मुंबईच्या पावसाची पडद्यावरची रूपं आणि रंगही किती भिन्न
आहेत नाही? गीला गीला पानीमधल्या त्या पावसाला गिरणगावाची उदासवाणी छटा आहे. तोच जेव्हा
रिमझिम गिरे सावनमध्ये दिसतो, तेव्हा किती उत्फुल्ल भासतो. किती छान दिसतो.
पाहतानाच जाणवते की अमिताभने आज कचेरीला जाता जाता दांडी मारलेली आहे. बाहेर मस्त
पाऊस बरसतो आहे. अशा वेळी कोण कधी ऑफिसला जातं काय? त्याने ठरवलंय आज पावसात फिरायचं. मौसमीबरोबर.
तीही मोठ्या उत्साहाने त्याच्याबरोबर निघाली आहे. मागे गाणं वाजत आहे – रिमझिम
गीरे सावन, सुलग सुलग जाए मन. आणि हे दोघे भटकत आहेत. आनंदाने. दिशाहीन. कधी गेट
वे, कधी मरीन ड्राइव्ह, तर कधी असेच कुठल्याशा रस्त्यांवरून. भरपावसात. पण तो पाऊस
कसा आहे? अंग सुखावणारा. उबदार. सागराप्रमाणेच मनात आनंदलाटा उसळवणारा. अमिताभ-मौसमीचं
ते एकमेकांना बिलगत भटकणं पाहून कोणालाही वाटावं, की मुंबईचा पाऊस प्यावा तर असा. वाफाळत्या,
आलं घातलेल्या अमृतमय चहाचा घोट चवीचवीने घ्यावा तसा.
रिमझिम गिरे सावनमधल्या पाऊसचित्रांहून अगदी वेगळा पाऊस
दिसतो तो हंसते जख्ममधल्या तुम जो मिल गये हो या रफीगीतात. अगदी गूढ वाटतो तो.
प्रिया राजवंशच्या डोळ्यांइतकाच. षड्यंत्रातून फुटल्यासारखं तिचं हसणं आणि
टॅक्सीच्या धुरकट काचांतून अंगावर येणारा तो पाऊस. त्या पावसात चमकणारे दूरच्या
ता-यांसारखे लाल दिवे आणि भन्नाट वेगाने मागे सरकणारा रस्ता. पडद्यावर असा
जलरंगातला पाऊस कोणी चितारला नव्हता. ते श्रेय चेतन आनंद या अवलिया
दिग्दर्शकाचं.
...तर विषयाला प्रारंभ झाला होता पावसाच्या भूमिकेपासून.
नायिकेला भिजवण्याइतक्या महत्त्वाच्या कामाशिवाय हिंदी चित्रपटांतला पाऊस आणखी एक
काम करीत असतो. किंबहुना त्याचं खरं काम तेच असतं. नायक आणि नायिकेची गाठ घालून
देण्याची. म्हणजे पुढं नायक म्हणायला मोकळा, की जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की
रात. रोशनचं हे बरसात की रात मधलं गाणं. बोल साहिरसाहेबांचे आणि आवाज मोहम्मद रफी
यांचा. काय समीकरण जुळून आलं होतं ते. पाऊस न दिसणारं हे बहुधा हिंदीतलं एकमेक
पाऊसगीत असावं. आपला नायक रेडिओतून हे गाणं म्हणतोय आणि नायिका ते ऐकतेय, असं ते
दृश्य. कल्पना चांगलीच होती. त्यात त्रुटी एकच होती. नायक रेडिओतून गाणं म्हणतोय
म्हटल्यावर त्याचा चेहरा दाखवायची काही गरजच नव्हती! भारतभूषण ही काय नायक म्हणून पाहण्याची वस्तू
आहे? दूरदर्शनवरून बातम्या द्याव्यात तितक्याच निर्विकारपणे तो ते गाणं म्हणतो.
खरं तर रफीचं पार्श्वगायन आणि मधुबाला एवढ्यावर ते गाणं थांबवायला हवं होतं. बरसात
की रात हा १९६०मधला चित्रपट. तेव्हा किमान तेव्हापासून तरी हे पावसाचं
नायक-नायिकेचं मिलन घडवून आणण्याचं काम सुरू आहे असं आपण म्हणू शकू. बाकीचं खोदकाम
हिंदी चित्रपटांच्या इतिहासतञ्ज्ञांनी किंवा सन १९७० मध्येच थांबलेल्या
चित्रपटसंगीताच्या समीक्षकांनी करावं. असो.
नायिकांना पावसात भिजायला जेवढं आवडतं, तेवढंच त्या
ढगांच्या गडगडाटाला घाबरतात. एवढं त्या स्वैपाकघरातल्या झुरळालाही घाबरत नसतात. पण
तिकडं आभाळात फटाका वाजला की त्यांनी पट्दिशी मारलीच नायकाला मिठी. आता बेताबमधली
अमृता सिंग हा काय पावसाला घाबरणारा पठ्ठ्या आहे काय? पण तिचं गाणं बघा – बादल
यूँ गरजता है. डर कुछ ऐसा लगता है. बरं ही भीती कसली, तर - चमक चमक के लपक के ये
बिजली हम पे गिर जाएगी. बहाणाच म्हणायचा याला. दुसरं काय?
बेताबमधल्या त्या गाण्याची एक ओळ मोठी खरी आहे – आग बरसती
है सावन में पानी का है नाम. मंझीलमध्ये गीतकार योगेश यांनीही तीच भावना मांडली
आहे. – रिमझीम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भिगे आज इस मौसम में, लगी कैसी ये
अगन. तर कवि ग्रेस ज्याला शुभ्र फुलांची ज्वाला म्हणतात ना तेच हे. मनात आग
पेटवणारं पाणी. हे पाणी अंग ओलं करतं आणि काळजातला प्रेमाग्नी फुलवतं. आराधनामध्ये
रुप तेरा मस्ताना हे गीत वाजत असताना पडद्यावर पेटलेली आग दिसत असते. पण नीट पाहाल
तर त्या पडद्यामागे अविरत कोसळत असलेला थंड पाऊसही कुठे तरी जाणवून जाईल.
टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई ही रविना टंडनची
मोहरामधली याचिका आणि लगी आज सावन की फिर वो झडी है, वही आग फिर सीने मे जल पडी है
मधली श्रीदेवीची वेदना यांची तुलना कशी करणार? पावसाची आग लावण्याची भूमिका सारखीच आहे. पण एक
आग प्रेमाची आहे. दुसरी विरहाची. कालची अल्लड अवखळ श्रीदेवी प्रेमभंगाने आतून
भाजलेली आहे. श्रीदेवीच्या डोळ्यांत कायम एक लहान मुलांसारखा आश्चर्यभाव असतो. ते
डोळे आता विझले आहेत. पण अचानक पाऊस येतो आणि तिच्या पायात घुंगरू बांधून जातो. ती
नाचू लागते. भिजू लागते. विनोद खन्नाच्या मनात मात्र त्या पावसाने पुन्हा जुहीला
गमावल्याचे दुःख ताजं केलं आहे. श्रीदेवीच्या त्या बागडण्यात त्याला जुही दिसते
आणि तो गाऊ लागतो – वही तो है मौसम मगर रुत नही वो. मेरे साथ बरसात भी रो पडी है.
तशी पाहू गेलं, तर पावसाची अनेक रूप आपल्याला हिंदी चित्रपटगीतांतून दिसतात. आज रपट जाए तो हमें न उठैयो या अमिताभ-स्मिताच्या गाण्यातला पाऊस पाहा. कसा रांगडा वाटतो. रांगडा आणि रुमानी. पण कोणी लालभडक पाऊस पाहिलाय?
चमेलीत आहे तो. गर्दलाल. बिंधास्त. एका कवीने सवाल केला होता, की पाण्या तुझा रंग कसा? त्याला उत्तरही त्यानेच दिलं होतं, ज्यात मिसळाल त्याच्यासारखा. चमेलीतल्या भागे रे मन कहीं, आगे रे मन चला या गाण्यातल्या पावसाला करिनाचा रंग आहे. त्या चित्रपटात तिची भूमिका वारांगनेची आहे. पण वारांगनेलाही मन असतंच की. ते कोसळत्या पावसाने भरूनही येऊ शकतं. तो आनंद व्यक्त करण्याची तिची रीत वेगळी असेल. तिच्या नाचात ती सुसंस्कृतता नसेल. पण तिची भावना तर त्या पाऊसधारांइतकीच स्वच्छ आहे. ती भिजतच चारचाकी गाडीत बसते. आणि एका क्षणी अचानक तिला तो पाऊस ‘दिसतो’. उचंबळून येतं तिचं मन. पाऊसधारांनी आणि आत्मदर्शनाने. गाडीच्या काचेवर जमा झालेल्या जलबिंदूंमध्ये ती स्वतःचं नाव लिहिते – चमेली. आणि पुढच्याच क्षणी बाहेर पडून ती पाऊस लुटू लागते. आपल्या नराला आव्हान देण्यासाठी एखाद्या मादीने केलेलं हे पाऊसनृत्य नाहीच. तशी गाणी हिंदी चित्रपटांत भरपूर आहेत. पण हे गाणं वेगळंच. करिनाच्या लालसाडीसारखं. भडक आणि तरीही वेगळं. त्याला दुसरा शब्द नाही.
तर असा हा पाऊस. पडद्यावरचा. वेगवेगळ्या भावभावनांना वाट
करून देणारा. तो कधी काव्यमय असतो तर कधी त्यात हिंसा असते. कधी तो नुसताच
निरुद्देश कोसळत असतो, तर कधी कथा पुढं नेण्यासाठी येऊन जातो. लेखक-दिग्दर्शकाला
हवा तेव्हा, हवा तसा.
एरवी पाऊस कधी आपल्या हातात नसतो.
घोडे जैसी चाल आणि हाथी जैसी दुम घेऊन तो आपल्याच मर्जीने
येत-जात असतो.
माधुरी आणि शाहरूखच्या दिल तो पागल है मधल्या गाण्यात एक
सवाल आहे – ओ सावन राजा कहाँ से आए तुम?
तो कोठून येतो, हे सामान्य विज्ञानाचं पुस्तकंही सांगेल
आपल्याला.
पण त्याची ही वेगवेगळी रुपं, ती मात्र पडद्यावरूनच येतात.
आपल्या मनात.
No comments:
Post a Comment