हे पुस्तक लिहिण्यामागील (दुसरे) कारण होते ते गेल्या काही वर्षांत सातत्याने दिसून येत असलेली आपल्याच नजिकच्या इतिहासाबद्दलची दुर्भावना. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांत काहीच झाले नाही, हे पालुपद सातत्याने कानावर पडत होते. अजूनही पडते. या ‘काहीच झाले नाही’च्या शेरेबाजीमध्ये अर्थातच देशाच्या पाकिस्तानविषयक धोरणांचाही समावेश असतो. आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणांविषयी तिरस्काराची भावना असते त्यात. हे सारेच निसंशय प्रचारकी आहे. खेद याचा, की अनेकांची त्यावर श्रद्धा आहे. आपण देशाच्या संरक्षणात कमी पडलो, विशेषतः पाकिस्तानपुढे आपण नेहमीच मान तुकवली, शांततावादाने दुबळे केले आपल्याला... हा प्रचार अनेकांना खराच वाटत असतो. ही सर्व टीका काँग्रेसविरोधातील आहे अशी त्यांची भाबडी समजूत असते. वस्तुतः त्या टीका आणि आरोपांतून आपण आपल्याच देशवासीयांनी केलेल्या कामाला बट्टा लावत असतो. आपल्यासमोर हिंदुस्थानच्या फाळणीचा इतिहास सतत उभा केला जातो. परंतु त्यानंतर आपण पाकिस्तानची फाळणी केली हे मात्र कोणाच्याही ध्यानीमनी नसते. आपल्यासमोर पंजाब आणि काश्मीर येथील दहशतवाद असतो. पाकिस्तानात फुटत असलेले बॉम्ब आणि तेथील विविध प्रांतातील स्वतंत्रतावादी चळवळी यांची मात्र आपल्याला माहिती नसते. आपल्या सामर्थ्याबाबत एवढा शंकेखोर असलेला देश जगाच्या पाठीवर दुसरा कोणता नसेल. या शंकांमधून राजकीय लाभ मिळत असेल कोणाला. परंतु त्यातून देशाविषयी विकृत न्यूनगंड निर्माण होत होता......तो न्यूनगंड, त्या शंका परास्त करण्यासाठी रॉसारख्या संस्थांचा इतिहास समोर येणे आवश्यक होते. त्याबाबत इंग्रजीत अलीकडच्या काही वर्षांत पाच-सहा पुस्तके प्रसिद्ध झाली. रॉशी संबंधित असलेल्या अधिका-यांनीच ती लिहिलेली असल्याने त्यांचे मूल्य मोठेच आहे. परंतु एकतर ती संख्या फारच कमी आहे आणि दुसरी बाब म्हणजे काही अपवाद वगळता रॉच्या कारवायांचा एकत्रित इतिहास त्यातून अभावानेच मिळतो. मराठीतून तर तसे लेखनच झालेले नाही. ती कमतरता या पुस्तकातून भरून निघेल असे वाटते...
('मनोगत' मधून.)
- रवि आमले, मनोविकास प्रकाशन, डिसेंबर २०१८, पाने २९३, किंमत - २९९ रु.
रॉ पोस्ट्स
(रॉ आणि गुप्तचर यंत्रणा या संदर्भात यापूर्वी लिहिलेले लेख -
१. हेरस्य कथा रम्यः (सकाळ)
२. रॉ फाईल (लोकसत्ता)
३. रॉ मटेरियल - पडद्यामागचे राजकारण समजून घेण्यासाठी (लोकसत्ता)
४. रॉ आणि पाकिस्तान (लोकसत्ता)
५. काळोखातल्या झुंजारकथा (लोकसत्ता-लोकरंग)
६. पाकिस्तानी पाखंड (लोकसत्ता)
७. दोन हेरांच्या गप्पा... (लोकसत्ता)
८. अजित डोभाल : भारताचे जेम्स बॉण्ड... सुपर स्पाय, इ. इ. (अक्षरनामा)
९. मिशेल नावाचा 'चॉपर' (सकाळ)
Read more...