मी निर्विकार!

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत आज माझ्या मनात कोणतेही विकार नाहीत!

मी एक सामान्य माणूस आहे.
स्ट्युपिड कॉमन मॅन!
भारत माझा देश आहे आणि सगळ्यांचं असतं तेवढंच माझं माझ्या देशावर प्रेम आहे.
त्यामुळं सव्वीस-अकराच्या हल्ल्याबद्दल मी खूपखूप चिडायला पाहिजे.
चिडून मी दहशतवाद्यांना, पाकिस्तानला, तिथल्या आणि इथल्या राजकारण्यांना शिव्या घालायला पाहिजेत.
कसाबला फाशी द्या, अशी प्रतिक्रिया पाठवायला पाहिजे पेपरला.
दहशतवादी कधीही येतात, कुठूनही येतात आणि माणसं मारून जातात, म्हटल्यावर मी घाबरायला तरी पाहिजे.
पण तसं काहीही मला वाटत नाहीये!

मी मुंबईकर आहे.
मी दहशतवादाचा चेहरा पाहिलाय. मुलुंड बॉम्बस्फोटाने पुसलं गेलेलं बहिणीचं कुंकू पाहिलंय.
पण तरीही आज मी दहशतवादाबद्दल निर्विकार आहे.
माझी संवेदनशीलता मेलीय का? कातडी गेंड्याची झालीय का?
तसंही असेल! तसंच असेल!!
पण हे कशामुळं झालं असेल?
मी रोज पेपर वाचतो म्हणून तर नसेल?

मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
विदर्भात नक्षल्यांच्या हल्ल्यात १२ जवान शहीद
कोकणात वादळात हरवलेले २० मच्छीमार अद्याप बेपत्ता
मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता
मी रोज बातम्या वाचतो.
हिंसाचाराच्या, भ्रष्टाचाराच्या, महागाईच्या, खुनाच्या, निवडणुकीच्या, बलात्काराच्या, सन्माननीय सदस्यांनी विधानभवनात केलेल्या गोंधळाच्या, फीवाढीच्या आणि सिनेमाच्या. गेल्या आठ-दहा दिवसांपासून सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या. (वर्ष झालं त्या हल्ल्याला. म्हणजे त्याला "वर्धापनदिन' म्हणायचं का, असा एक प्रश्‍नसुद्धा मला कधीकधी पडतो!)

तर आता मी सरावलोय.
जसे आपण सगळे, "काश्‍मीर खोऱ्यात काल रात्री आतंकवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांसह चार जवान शहीद झाले', या बातम्यांना सरावलोय. पेपरातही आतल्या पानात असतात अशा बातम्या. जाहिरातींच्यावर कुठंतरी सिंगल कॉलमात.

तर मी सरावलोय आता अस्मानी आणि सुल्तानी दहशतवादाला. तर याचीही एक गंमतच झालीय.
लोक म्हणतात, अरे, हे तर मुंबई स्पिरिट!

स्पिरिट तर स्पिरिट!
बॉम्बस्फोट झाला, म्हणून काय दुसऱ्या दिवशी कचेरीला सुट्टी नसते ना भाऊ. जावंच लागतं.
म्हातारीचं मयत झाकून नातीचं लग्न उरकावंच लागतं!

तर आपणांस, दुर्घटना झाली की त्यात आपण मेलो नाही याची खात्री करून, लगेच काहीही झाले नाही, अशा बधीरतेने आपल्या कामास लागणे, अशीसुद्धा "स्पिरिट ऑफ मुंबै'ची डेफिनेशन करता येईल.

कृपया, या व्याख्येतील "बधीरतेने' हा शब्द अधोरेखीत करावा, ही विनंती. कारण की, ती आमची अत्यंत महत्त्वाची व प्रयत्नें कमावलेली मनोवस्था आहे.
या मनोवस्थेमुळेच आम्हांस शांत निद्रा येते. कुठलेही प्रश्‍न पडत नाहीत.
उदाहरणार्थ -
दहशतवादी कधीही, कसेही, कुठेही कसे येऊ शकतात?
आमच्या सुरक्षा व गुप्तचर यंत्रणा अशा वेळी काय करत असतात?
२६-११ नंतर रेल्वेस्थानकांवर उभारलेले वाळूच्या पोत्यांचे बंकर नेहमी रिकामेच का असतात?
मेटल डिटेक्‍टर हे लग्नमंडपाच्या प्रवेशद्वारांसारखे का भासतात?
२६-११चे सगळेच कटवाले कोर्टापुढं का आलेले नाहीत?
हल्लेखोरांचा मुकाबला करणारे काही पोलिस अजूनही शौर्यपदकापासून का वंचित आहेत?
पोलिसांकडे पुरेशी शस्त्रं सोडा, त्यांच्या वॉकीटॉकीला चांगल्या बॅटऱ्या आजही का मिळत नाहीत?

हे व तत्सम प्रश्‍न मला तर अजिबात पडत नाहीत.
मी एक सामान्य माणूस आहे.
स्ट्युपिड कॉमन मॅन!
(पूर्वप्रसिद्धी - ईसकाळ, २६ नोव्हें. २००९)

Read more...