पेगॅससने केलेली पाळतशाही हा मुद्दा सध्या आपल्याकडे गाजतो आहे. मुळात तंत्रज्ञान आधुनिक झाले, पेगॅसस आले ही समस्याच नाही. तंत्रज्ञानात सुधारणा होतच जाईल. समस्या आहे ती तंत्रज्ञानाचे वापरकर्ते कोण आहेत आणि त्यांचा हेतू काय आहे यात. तेव्हा पेगॅससच्या निमित्ताने प्रश्न विचारायला हवा, की या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांवर लक्ष कोण ठेवणार? त्यासाठी हवेत भक्कम कायदे.
मॉस्कोमधील ब्रिटिश दूतावासातील एका केबिनमध्ये एक अधिकारी व्हीएचएफ रिसिव्हर ऐकत बसला होता. त्यावरून तो रशियाच्या वायुसेनेचे संदेश चोरून ऐकत असे. त्या दिवशी रिसिव्हरमधून त्याला अचानक वेगळेच आवाज ऐकू येऊ लागले. त्याच्या लक्षात आले, हा तर आपल्याच अधिकाऱ्याचा आवाज. तो या रिसिव्हरमधून कसा येतो? नक्कीच आपल्या अधिकाऱ्याचे बोलणे रशियन चोरून ऐकत असावेत; पण ते कसे काय? त्याने आपल्या वरिष्ठांना त्याची माहिती दिली. चौकशी सुरू झाली. केजीबीने दूतावासात गुपचूप मायक्रोफोन बसविला असावा, असा संशय होता. कानाकोपऱ्यात त्याचा शोध घेण्यात आला; पण काहीच सापडले नाही. पीटर राइट हे 'एमआय-फाइव्ह' या ब्रिटिश गुप्तचर संस्थेचे माजी सहायक संचालक. त्यांनी तो शोध घेणाऱ्या तंत्रज्ञांशी बोलून अंदाज बांधला, की हे नक्कीच वेगळे प्रकरण आहे. रशियाने नक्कीच ध्वनीकंपनांच्या आधारे आवाज ऐकण्याचे तंत्र शोधून काढले असावे.
यानंतर सहा महिन्यांनी मॉस्कोतील अमेरिकी दूतावासातील तंत्रज्ञांना असेच एक छोटेसे यंत्र सापडले. त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले, की पीटर राइट यांचा अंदाज खरा होता. आपण बोलताना आजूबाजूच्या वस्तूंवर उमटणारे तरंग पकडून, त्यांतून तेथे चाललेले बोलणे ऐकण्याचे काम करणारे मायक्रोफोन रशियाने बनविले होते. ही १९५१ मधील गोष्ट. त्या काळातील ही अशी तंत्रे आणि यंत्रे बाबा आदमच्या जमान्यातील वाटावीत, अशी प्रगती या ७० वर्षांत झाली आहे. काळ संगणकाचाच नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. 'पेगॅसस' हे सायबरअस्त्र या काळाचे अपत्य आहे.
Read more...