नवं पुस्तक - प्रोपगंडा



हे पुस्तक म्हणजे ‘प्रचारभान’मधील लेखांचे निव्वळ संकलन नाही. वृत्तपत्रीय लेखनाला दोन मर्यादा असतात. एक म्हणजे उपलब्ध जागेची आणि दुसरी संपादकीय भूमिकेची. ‘लोकसत्ता’त ही दुसरी मर्यादा कधीच जाणवली नाही हे येथे आवर्जून नमूद करायला हवे. एखाद्या लेखकास सदर दिले, म्हणजे ती जागा त्याची झाली. आपणांस पटत नसलेली वा आपल्या वृत्तपत्राच्या भूमिकेत बसत नसलेली मते तो मांडत असला, तरी ते त्याचे स्वातंत्र्य आहे. त्या लेखनस्वातंत्र्याच्या आड संपादकांनीही येता कामा नये, ही संपादक गिरीश कुबेर यांची भूमिका. पत्रकारितेत हे हल्ली दुर्मीळच. जागेची मर्यादा मात्र असतेच. त्या विशिष्ट शब्दसंख्येतच लेख बसवावा लागतो. त्यामुळे सांगण्यासारख्या बऱ्याच मजकुराला कात्री लावावी लागते. विस्तार टाळावा लागतो. पुस्तकाच्या पायात या बेड्या नसतात. या पुस्तकासाठी ‘प्रचारभान’मधील सर्वच लेखांचे पुनर्लेखन, संपादन केले. त्यात भर घालून ते अधिकाधिक माहितीपूर्ण व्हावेत असा प्रयत्न केला. या विषयाबद्दल नव्याने उपलब्ध झालेल्या माहितीची त्याला जोड दिली. सदरात जाऊ शकली नव्हती अशी काही प्रकरणे नव्याने लिहिली. यामुळे ‘प्रचारभान’च्या तेव्हाच्या वाचकांनाही या पुस्तकातून नवे काही वाचल्याचे समाधान मिळू शकेल, असा विश्वास वाटतो....




Read more...