स्वातंत्र्यवीर
सावरकर यांचा महात्मा गांधी यांच्या हत्येत अजिबात हात नव्हता, असे ख्यातनाम
संशोधक-लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे मत आहे. अंदमानात नुकत्याच झालेल्या विश्व
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मोरे यांनी या विषयाला हात घातला होता.
त्यांचे म्हणणे असे, की गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष
मुक्तता केली होती. त्यानंतर सावरकर हयात नसताना गांधीहत्येची चौकशी करण्यासाठी
सरकारने कपूर समितीची नेमणूक केली होती. सावरकरवाद्यांनी सावरकरांच्या
सांगण्यावरून गांधींची हत्या केल्याचा उल्लेख या समितीने जाता जाता नमूद केला.
मात्र अहवालाच्या दोन खंडांमध्ये या संदर्भातील एकही पुरावा समितीने दिलेला नाही.
समितीला असा उल्लेख करण्याचा अधिकार नव्हता. मात्र अहवालातील त्याच परिच्छेदाचा
आधार घेऊन सावरकरांच्या विरोधात लिहिले जाते. न्यायालयाने सावरकरांनी निर्दोष
मुक्त केले असल्याने गांधीहत्येत त्यांचा हात होता, असे कुणी म्हणत असेल तर
त्याबाबत पोलिसांत तक्रार केली पाहिजे. कपूर आयोगाच्या अहवालातील तो परिच्छेदच रद्द
करण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. आताचे सरकार किमान
सावरकरद्वेषी नाही. त्यामुळे याचा विचार होईल असे वाटते. यासंदर्भात अनुयायांनी
पुढाकार घ्यावा.
मोरे यांचा तीव्र
आक्षेप आहे तो कपूर आयोगाच्या सावरकरांसंबंधीच्या निष्कर्षांवर. गांधीहत्या
अभियोगातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष सुटका केली आहे. (He is found
not guilty of the offences as specified in the charge and is acquited…) पण कपूर आयोग
म्हणतो की सावरकरांचा कटात हात होता. मोरे म्हणतात तसे म्हणण्याचा आयोगाला अधिकारच
नव्हता. शिवाय तसे म्हणण्यायोग्य कोणताही पुरावा न्यायालयाने दिलेला नाही. मग
आयोगाने कशावर विसंबून सदरहू निष्कर्ष काढला. हे पाहण्यासाठी हा आयोग कोणत्या
परिस्थितीत स्थापन झाला ते समजून घेतले पाहिजे.
गांधीहत्या कटाचा
निकाल लागून सुमारे सोळा वर्षे झाली होती. मुळात असा काही कट नव्हताच हे नथुराम
गोडसेचे म्हणणे होते. न्यायालयात मात्र पुराव्यानिशी असा कट असल्याचे सिद्ध झाले
होते.
Read more...