कोण म्हणतो हे टिळकांना रूचले नसते?

ज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला ते जर आता असते आणि अशा प्रकारचा गोंगाटाचा गणेशोत्सव साजरा होताना त्यांनी पाहिले असते तर त्यांनाही हे रूचले नसते. उलट त्यांनीच अशा प्रकारच्या दणदणाटाच्या गणेशोत्सवाला विरोध केला असता.-    मुंबई उच्च न्यायालय, ता. २८ ऑगस्ट २०१५

सण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या कसे साजरे करायचे ही सध्याची मोठीच वादंगाची गोष्ट. उत्सवप्रिय मंडळांचे म्हणणे असे की ही बाब धार्मिक. परंपरेने चालत आलेली. आम्ही याबाबतीत कोणाचेही ऐकणार नाही. उत्सव दणक्यात साजरे होणारच. विरोधी मंडळींचे म्हणणे असे की या उत्सवांनी सर्वसामान्य शहरी नागरिकांना त्रास होतो. तो होता कामा नये. यात प्रश्न गणेशोत्सवाचा आला की लोकमान्य टिळकांची आठवण सर्वांनाच येते. लोकमान्यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणपत्युत्सवास चालना दिली. ते श्रेय त्यांचेच. हा उत्सव सुरू करण्यामागे त्यांची भावना निव्वळ धार्मिक होती असे मात्र नाही. ते स्वतःही काही फार मोठेसे आचारमार्गी नव्हते. तेव्हा हा उत्सव सुरू झाला तो लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढवावी या हेतूने. साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी या उत्सवाला राष्ट्रीय घटना म्हणून गौरविले आहे. तेव्हा एक बाब स्पष्ट व्हावी की हा उत्सव सुरूवातीपासूनच राजकीय स्वरूपाचा आहे. तत्पूर्वी तो होतच होता. राजेरजवाडे वगैरे लोक तो मोठ्या धामधुमीने तो करीत. दहा दहा दिवस तो चाले. त्यासाठी वाडे शृंगारले जात. हत्ती, घोडे लावून मिरवणुका निघत. मंडपांत गाणे-बजावणे, पुराण-कीर्तने, लळीते सोंगे वगैरे प्रकार होत. पण त्यामागील भावना धार्मिक असे. टिळकांनी त्या धार्मिक भावनेला राजकारणाची जोड दिली.

ही बाब नीट समजून घेण्याची आहे. कारण अगदी आजच्या गणेशोत्सवाच्या स्वरूपाचे मूळ त्यातच कुठेतरी आहे. गणेशोत्सवाच्या सार्वजनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर येतो तो ११ ऑगस्ट १८९३चा मुंबईत झालेला हिंदु-मुसलमान दंगा. मुंबईतल्या दंग्यांचा इतिहास तसा जुनाच. १८५० साली तेथे पारशी-मुसलमानांत दंगा झाला. १८७४ मध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. वातावरणात ही विद्वेषाची हवा होतीच. १८९३च्या दंग्यानंतर पुण्यात नागपंचमीचा सण आला. तेव्हा ही हवा अधिकच तापली. दंगा होता होता राहिला. यावर केसरीचे (१५ ऑगस्ट, १८९३) म्हणणे असे होते, की मुसलमान लोक शेफारून गेले आहेत व ते जर शेफारले असले तर त्याचें मुख्य कारण सरकारची फूस हें होय. केळकर टिळक चरित्रात सांगतात, की या दंग्यानंतर सुमारे सहा आठवड्यांनी गणपती उत्सव सुधारून वाढविण्याची कल्पना प्रथम निघाली. हिंदूंच्या वेगळ्या सभा भरवून दंग्यांसंबधांचे स्पष्ट मत जाहीर करण्याची चळवळ सुरू असता एक दिवशी, टिळक, नामजोशी वगैरे मंडळी बाबामहाराजांच्या वाड्यांत जमली व तेथे उत्सवास नवीन वळण देण्याची कल्पना मुक्रर झाली... या ब्राह्मण मंडळींना दगडूशेट हलवाई, भोरकर वकील, बंडोबा तरवडे, गावडे पाटील, भाऊसाहेब रंगारी वगैरे ब्राह्मणेतर मंडळी हौसेने मिळाली व सालच्या उत्सवास नमुनेदार स्वरूप झाले.

एकंदर सार्वजनिक गणेशोत्सव हा हिंदू-मुस्लिम वादातून निर्माण झालेली प्रतिक्रियात्मक घटना होती. केळकरांनी स्पष्टच म्हटले आहे, की 
मुसलमानांच्या चढेलपणाच्या वृत्तीमुळेंच काही अंशी हा उत्सव हाती घेण्याची कल्पना सुचली, व जे हिंदु लोक ताबुतांची पूजा करितात त्यांना सलोख्याने वागवून घेण्यास मुसलमान लोक तयार नसल्याने, हिंदूंना ताबुतांपासून परावृत्त करावें, व उत्साहनिवृत्त केलेल्या या लोकांना स्वधर्माशी संबंध असलेली अशी कांही तरी नवीन करमणूक मिळवून द्यावी, असा टिळकांचा बोलून चालून उद्देशच होता. 
याला प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचाही दुजोरा मिळतो. ते म्हणतात, 
६० वर्षांपूर्वी लो. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची टूम काढली. हिंदूंचे एकजीव संघटन व्हावे, त्यांनी मुसलमानांच्या मोहरमसारख्या परधर्मी फिसाटांत भाग घेऊ नये आणि नाच गाणे उत्सव चव्हाट्यावर जामावाने करायचे तर ते गणेशोत्सवाच्या निमित्ताने करावे, एक दोन नव्हे तर तब्बल दहा दिवस रात्री करावे आणि मनाची हौस पुरवावी असा तो हेतू होता. 
यानंतरचा त्यांचा सवाल महत्त्वाचा आहे. ते विचारतात, 
गेल्या ६० वर्षांत ते संघटन किती झाले, हे ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे. मोहरमवरचा बहिष्कार अखेर हिंदु मुसलमानांची राजकारणी चुरस आणि अखेर पाकिस्तान भस्मासुराचा जन्म यात उमटला. धर्मबुद्धी झाली म्हणावी तर तिचाही काही थांगपत्ता नाही. उलट उत्सव आणि मेळ्यांतून टिळकपक्षीय प्रतिस्पर्ध्यांच्या हुर्रवडीचे, बदनामीचे आणि समाज-राजकारणी दडपणींचे प्रकार मात्र मुबलक होत गेले. 
येथे प्रबोधनकारांनी ज्या मेळ्यांचा उल्लेख केला आहे ते नेमके काय प्रकरण आहे हे पाहणे आवश्यक आहे.
मेळे म्हणजे फिरता ऑर्केस्ट्राच म्हणा ना. जुन्या जमान्यातले विख्यात भावगीतगायक गजाननराव वाटवे (१९१७-२००९) हे या मेळ्यांचे साक्षीदार. त्या काळात ते स्वतःही गणेशोत्सवांत गात असत. १९९१ मध्ये एका लेखाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. या मेळ्यांबद्दल ते अगदी भरभरून बोलले. लोकजागृतीचे प्रमुख साधन म्हणून मेळा ही संस्था निघाली. मेळ्यांत साधारण दहा ते बारा जण असायचे. एखादा डफ, ढोलकी, तबला, तुणतुणी आणि सायकलरिक्षावर ठेवलेली बाजाची पेटी घेऊन ते प्रत्येक गणपतीपुढे जाऊन कार्यक्रम करायचे. पुण्यामध्ये असे अनेक मेळे तयार झाले होते. यांतील अहिताग्नी राजवाडे, दादा भिडे, शंकरराव महाजन आदींचा सन्मित्र समाज मेळा, १९२५ ते १९४० चा काळ अक्षरशः गाजवणारा भारतमित्र समाज मेळा, वज्रदेही तालीम हुतूतू मंडळाचा वज्रदेही शूर मेळा, काँग्रेसचा रणसंग्राम मेळा, पैसा फंड मेळा, समर्थ मेळा हे मेळे अतिशय लोकप्रिय होते.

ते लोकप्रिय असणारच होते. कारण त्यातील अनेकांचा संबंध गणेशोत्सवापेक्षा शिमग्याशीच अधिक होता. प्रबोधनकार सांगतात, 
माझ्या आठवणीप्रमाणे अगदी पहिल्या वर्षापासून या मेळ्यांनी म-हाटी इतिहासातले हिंदु-मुसलमान विषयक मुकाबले निवडून त्यावर मुसलमानांची कठोर निंदा करणअयाचा सर्रास धूमधडाका चालवला होता.... आस्ते आस्ते ती टिंगल निंदेची महामारी सुधारक स्त्री पुरूष, रानडे, गोखले, परांजपे इत्यादि नामांकित नेत्यांवरही वळली. टिळकपक्षीय राजकारणाच्या एकूणेक विरोधकांचा निरर्गल शब्दांत शिमगी समाचार घेण्याचे सत्र म्हणजे हे गणेशोत्सवी मेळे बनले. 
प्रारंभी ब्राह्मणी मेळे इतरांची टर टिंगल उडवीत. पुढे छत्रपती मेळा त्यांना प्रत्युत्तर देऊ लागला. हा सगळा दंगा एवढ्या थराला गेला की त्यात ब्रिटिश सरकारला हस्तक्षेप करावा लागला. मेळ्यांच्या पदांवर सरकारी सेन्सॉरशिप लावण्यात आली. पुढे तर परवाना पद्धत सुरू करण्यात आली. प्रत्येक मेळ्याबरोबर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येऊ लागला. हे सगळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पहिल्या २५-३० वर्षांतले चित्र. एका मेळ्यातलेच पद आहे –
बदले जुना जमाना
नटले नवीन ढंग
बदलेहि उत्सवाचा
सगळचा रागरंग
गेली कथा-पुराणे
संकीर्तनेही गेली
व्याख्यान प्रवचनांनी
तर धूम ठोकियेली

प्रबोधनकार सांगतात, 
या मेळ्यांनी महाराष्ट्रात बेकीचा आणि हेव्यादाव्यांचा मनस्वी वणवा पेटवण्याचेच दुष्कर्म आजवर केले आहे.
तेव्हा हे स्पष्टच आहे की गणेशोत्सवाचे स्वरूप पहिल्यापासूनच राजकीय गोंधळाचे आहे. हा उत्सव लोकप्रिय झाला खरा. प्रबोधकार सांगतात, 
गणेशोत्सवात रंगणारे बामणेतर केवळ उत्सवप्रियतेच्या मानवी भावनेमुळेच त्यात भाग घेऊ लागले. यापेक्षा त्यात विशेष काही कधीच नव्हते आणि आजही नाही. वर्षाकाठी करावयाची काही मजा, ठीक आहे. बसवा एक मूर्ती. घाला मंडप. जमवा वर्गण्या. काढा मेळे. होऊन जाऊ द्या दहा दिवसांची गम्मत जम्मत. देवतेचा मान, काही भक्ती, भाव, पापभीरूत्व, पावित्र्याची चाड, कोठे काही नाही... केवळ करमणूक म्हणून किंवा अनेक पंडितांची पांडित्यपूर्ण कथा, कीर्तने, व्याख्यानें, प्रवचने होतात म्हणून गणेशोत्सवाचा मुलाजा राखायचा तर तसली तहानभूक भागवण्याची शेकडो क्षेत्रे आज लोकांना उपलब्ध आहेत. तेवढ्यासाठी गणेशोत्सवाची काही जरूर नाही... वर्षाकाठी लोकांचे खिसे पिळून काढलेल्या पैशांच्या खिरापतीने दहा दिवस कसला तरी जल्लोस करून काही मतलबी सज्जनांच्या बहुमुखी स्वार्थाची भूक भागविण्यापलीकडे आजवर तरी या गणेशोत्सवाने जनतेच्या कल्याणाची एकही सिद्धी साधलेली नाही. 
हे प्रबोधनकार ठाकरेच म्हणतात म्हणून बरे. थोर विचारवंत राजारामशास्त्री भागवत यांनीही त्याकाळी धर्मोत्सवाऐवजी सार्वजनिक गणेशोत्सव करण्यास विरोध केला होता. आज असे कोणी म्हणेल तर त्याची खासच धडगत नाही. त्या सिक्युलराकलबुर्गीनंतर तुमचाच नंबर म्हणून प्रेमपत्रे येण्याचीच शक्यता जास्त. मुद्दा असा, की प्रबोधकारांनी हे सगळे लिहून ठेवल्याला इतकी वर्षे झाल्यानंतरही गणेशोत्सवाच्या आशयात काही फरक पडला आहे का? तर तसे मुळीच दिसत नाही. तो आपापले राजकारण साधण्याचाच काही जणांचा मार्ग राहिलेला आहे. टिळकपंथीयांनी त्यांच्या राजकारणासाठी त्याचा वापर केला. तो भला की बुरा या फंदात जाण्याचे येथे कारण नाही. पण आजचा गणेशोत्सव टिळकांना भावला नसता हे म्हणण्यातही काही अर्थ नाही. तेव्हाच्या या उत्सवाच्या टिकाकारांना उत्तर देताना टिळकांनी केसरीत लिहिले होते – 
धर्मबुद्धी ज्यांच्या मनाला शिवत देखील नाहीं, जडाच्या पलीकडे ज्यांची बुद्धी जाऊंच शकत नाहीं त्या अभागी व्यक्तींची कींव करण्यापलीकडे आम्हांस त्यांच्यासंबंधानें कांहीच म्हणावयाचे नाहीं. श्रीमंगलमूर्तीच्या महोत्सवाच्या वेळीं दिवाभीताप्रमाणें ह्या दोन-चार मंडळींनीं खुशाल आपल्या खोलींत दडून रहावें. 
आज गणेशोत्सवातील गोंगाटाविरोधात बोलणारांना हेच ऐकविले जात आहे. फरक काही पडलेलाच नाही.
आपल्या हे लक्षातच येत नाही की याचे कारण गणेशोत्सवाच्या सार्वजनिकीकरणात आणि राजकियीकरणात दडलेले आहे. तो राजकारण्यांचा राजकीय हेतूंसाठीचाच उत्सव आहे. त्याकडे धार्मिक दृष्टीने पाहणे हा आपल्या धर्मभोळ्या दृष्टीचा आणि त्या उत्सवामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये असे म्हणणे हा आपल्या धर्मद्रोही विचारसरणीचा दोष. तो स्वीकारून हल्लीच्या काही मतलबी सज्जनांच्या बहुमुखी स्वार्थाची भूक भागविण्याचे कार्य त्यातून घडत असेल तर ते सार्वजनिक हिताचे मानण्यात एवढी काय अडचण आहे?


1 comment:

Ravi Amale said...

टिळकांवरील या लेखावर एका ब्लॉगवर आलेली प्रतिक्रिया... त्यात त्यांनी माझ्यावर कसला तरी कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप केला आहे. स्पष्टपणे बोलले नाहीत. पण त्यांना काय म्हणायचे ते नीटच कळते. रवि आमले ब्राह्मणांच्या विरोधात लिहित आहेत असे त्यांना म्हणायचे आहे. जात कशी पक्की बसलेली असते ना डोक्यात? त्यातही आपल्या जातीचा प्रश्न आला की माणसे कशी खवळतात नाही? वाचा टीका....


कुणीही उठावे आणि लोकमान्यांवर बोलावे!
मराठीत लिहिणाऱ्यांच्या जगात गेले काही दिवस एक नवा रवि उगवला आहे. त्याचे आडनाव आमले. रवि आमले. हे गृहस्थ फार हुशारीने एक कार्यक्रम राबवीत असतात. तो कोणता हे त्यांचे लिखाण वाचून कुणालाही कळेल. एक नवी संस्कृती महाराष्ट्रात रुजू घातलेली आहे. तिचे हे एक पाईक. त्यांच्यावर हे स्फुट लिहिण्याचे कारण लोकप्रभेत आलेला त्यांचा लेख. त्या लेखाचे शीर्षक आहे : कोण म्हणतो हे टिळकांना रुचले नसते?
ह्या नव्या रविने टिळक हे कसे होते ह्यावर त्यांचा नवा प्रकाश टाकला आहे. लेखात त्यांनी म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सव आला की लोकांना टिळकांची आठवण होते. हे खरे आहे. खुद्द रविसाहेबांनाही टिळकांवर लिहावेसे वाटले. त्यांच्यासाठी निमित्त झाले न्यायालयाच्या निर्णयाने. त्यात न्यायालय म्हणते –
ज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला ते जर आता असते आणि अशा प्रकारचा गोंगाटाचा गणेशोत्सव साजरा होताना त्यांनी पाहिले असते तर त्यांनाही हे रुचले नसते. उलट त्यांनीच अशा प्रकारच्या दणदणाटाच्या गणेशोत्सवाला विरोध केला असता.

– मुंबई उच्च न्यायालय,

ता. २८ ऑगस्ट २०१५.

टिळकांबद्दलचे जे आकलन न्यायालयाला झाले त्याच्या नेमके उलट आकलन रवि आमल्यांना झाले आहे.

शीर्षकावरूनच कळेल की लेखकाचे हेच म्हणणे आहे की : टिळकांना आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप खचितच रूचले असते!
एकदा एक सिद्धांत मांडायचा ठरवला की तो सिद्ध करणे अगदी सोपे असते. आता ह्याच लेखाचे पाहाल तर टिळकांचे बोलणेच टिळकांवर उलटवून दाखविलेले दिसेल. ही किमया अाजकाल अनेकांना जमते. त्यात टिळक विषय असेल तर आपली बुद्धी परजायला अनेक तयार असतात. ज्यांची विकृती पूर्णावस्थेला पोचलेली असते ते आपल्या मनची वाक्ये त्यांच्या तोंडी घालतात. आमल्यांनी तो उघड मार्ग न पत्करता अधिक कौशल्याचा मार्ग पत्करलेला आहे. त्यामुळे आता अनेकांना सिद्ध करता येईल की धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कामही टिळकांच्या नावे जमा आहे!
काल एका जबाबदार व्यक्तीच्या या विषयावरील स्फुटावर तशी प्रतिक्रियाही आली! थोडक्यात आमल्यांचा लेख प्रभावी आहे!

हे रवि आमले कोणीही असतील, असे निघायचेच पण लोकप्रभेसारख्या साप्ताहिकाला न शोभणारी ही गोष्ट झाली. ही चूक त्यांना आता दुरुस्त करता येणार नाही.

रवि आमले यांचा लेख प्रतिवाद करण्याच्या लायकीचा नाही. त्याचा निषेध करावा आणि सोडून द्यावे. समाजाची काळजी करण्यास श्री गणराय समर्थ आहेत.