असे वाटते आहे, की काळच बदललाय. पूर्वी बरे होते. तीनच ऋतू होते. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. आता त्यात अवकाळाचीही भर पडलीय. यंदा तर आपल्याकडे पाऊस पडला नाही असा महिना गेला नाही. तो कधीही येतो. गारांसह धोधो कोसळतो. पिके नेली त्याने. त्यामुळे निदान पाण्याचे मरण तरी नाही असे वाटले होते. पण आजही मराठवाडा, विदर्भातील अनेक गावे कोरडी पडली आहेत. पाण्यासाठीची वणवण सुरूच आहे लोकांची.
असे वाटते, की पूर्वी खरेच रामराज्य होते. पाऊसपाणी चांगले होते. वळीव तेव्हाही होता. पण तो वैशाखाचाच पाहुणा. मोसमी पाऊस यायचा तो नेमका सात जूनला. अर्थात तेव्हाही एखादे नक्षत्र कोरडे जायचे. पण भरपाई व्हायची. वावरे चांगली पिकायची. आबादीआबाद व्हायची.
पण मग हा आधुनिक काळ उगवला. तुमचे ते औद्योगिकीकरण झाले. गावगाडा बुडाला आणि शहरे सजली. कारखान्यांत माल पिकू लागला. पण अजून धान्याचे कारखाने काही विज्ञान आणि तंत्रज्ञान काढू शकलेले नाही. ते अजूनही शेतातच पिकते. तेथे तुम्ही हरितक्रांती केली. कसली कसली हायब्रिड वाणे आणली. त्याला ना चव, ना धव. कस तर नाहीच. त्या संकराने येथे कसले कसले आजार आणले. माणसे पूर्वी किती जगत. अंगाला कधी सुई टोचून घ्यावी लागायची नाही त्यांना. जन्मतःच धडधाकट. सागवानी लाकडासारखी. पूर्वी पेशवाईत म्हणे एका बसणी शंभर शंभर लाडू खाणारी माणसे होती. आज एक चपाती जड जाते पोटाला. तरणी तरणी पोरे हृदयविकाराने जातात आणि लहान लहान पोरांच्या डोळ्यांवर चष्मे दिसतात. याला का प्रगती म्हणायची?
तर हे सगळे केले ते मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपाने. म्हणजे झाले असे की कारखाने आले. त्यांपायी नैसर्गिक साधनसंपत्तीचे ओरबाडणे सुरू झाले. पूर्वी या देशात निबिड अरण्ये होती. ती तुटली आणि तेथे सिमेंटची जंगले उभी राहिली. त्याचा परिणाम पावसाच्या चक्रावर झाला. झाडेच नाहीत म्हटल्यावर कसा पडणार पाऊस? त्यामुळे धरती तापू लागली. ग्लोबल वॉर्मिंग पूर्वी कधी ऐकले होते? ते झाले. वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले. एल निनोचे संकट उभे राहिले. समुद्रातले प्रवाहही विचित्र वागू लागले आणि सगळेच बिघडले. हा बिघाड पृथ्वीला कडेलोटाच्या टोकावर घेऊन चालला आहे. पर्जन्यचक्र मोडून पडले आहे. ओला वा सुका.. पण दरसाल दुष्काळ पडतोच आहे.
तिकडे दोन वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या इंटर गव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेने पर्यावरणातील बदलांसंबधीचा एक अहवाल सादर केला आणि हे संकट किती गहिरे आहे हे पाहून सर्वांचेच डोळे खाडकन् उघडले. या अहवालानुसार हवामान असे काही बिघडले आहे की त्यामुळे यापुढील काळात जगात अन्नधान्याचा दुष्काळ पडणार आहे. हरितगृह वायूंचे प्रमाण वाढल्याने कुठे पाणीटंचाई तर कुठे पूर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. रोगराई वाढणार आहे. समुद्राची पातळी वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक शहरांना धोका निर्माण झाला आहे. एकंदर पृथ्वीची वाटचाल विनाशाकडे सुरू आहे. हे सारे थोपवायला हवे.
प्रश्नच नाही. पर्यावरणाचा जो विनाश आपण करतो आहोत तो थोपवायलाच हवा. त्याचे संरक्षण केलेच पाहिजे. विकासाच्या प्रचलित कल्पनांचा फेरविचार करून शाश्वत विकासाकडे जायलाच हवे. त्यासाठी अनेक जण प्रामाणिकपणे सद्हेतूने प्रयत्न करीत आहेत, याबाबत शंकाच नाही. पण आणि परंतु...
पर्यावरणाच्या नावाने जो भयगंड निर्माण केला जात आहे, जी मिथके प्रसृत केली जात आहेत त्यात खरोखरच काही तथ्य आहे का हेही तपासून घेतले पाहिजे. याचे कारण एकतर ही मिथके अज्ञानावर वा कमी वा निवडक माहितीवर आधारलेली आहेत. त्यामुळे त्यांत सत्यांश नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यातून निर्माण होणा-या भयगंडाचा वापर विज्ञानाच्या विरोधात आणि प्रतिगामी समाजनिर्मितीसाठी केला जातो. प्राचीन काळी भारतातून दुधामधाच्या नद्या वाहात होत्या अशा गौरवगाथा सांगणारी मंडळी समाजाला प्राचीन समाजरचनेकडे नेण्यास उत्सुक असतात हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. त्याकरीता हे पाहिले पाहिजे की खरोखरच प्राचीन काळी सदासर्वदा दुधामधाच्या नद्या वाहात होत्या का? तर तसे काही दिसत नाही. अवर्षण तेव्हाही होते. दुष्काळ तेव्हाही होता. पाणीटंचाईच्या झळा पूर्वीही बसत असत.
पाणी आणि चारा टंचाईचा अगदी जुन्यातला जुना उल्लेख आढळतो तो ऋग्वेदात. दाशराज्ञ युद्ध ही ऋग्वेदातील सर्वात जुनी घटना. हे तेव्हाचे महायुद्धच. त्यात तब्बल वीस राजांनी सहभाग घेतला होता आणि लढाईतील एकूण सैन्याची संख्या होती सुमारे सहाशे. हरियुपिया (म्हणजे हरप्पा? याबाबत शंका आहेत.) येथे परुष्णीच्या (रावी) काठावर झालेल्या या लढाईमागे विश्वामित्र आणि वसिष्ठ या पुरोहितांतील वैर हे एक कारण होते, परंतु त्याचबरोबर हे युद्ध पशुधन, त्यांच्यासाठीची कुरणे आणि पाण्यासाठीही होते, असे उल्लेख आढळतात.
हे विश्वामित्र पुन्हा महाभारतातही येतात. त्याचा नेमका काळ ठाऊक नाही. धर्मग्रंथांचा काळ मागे मागे नेण्याची आपल्याकडील अनेकांना खोड असून, काही जणांच्या मते हा काळ इसवीसनाच्या आधी किमान साडेपाच हजार वर्षे आहे. म्हणजे आजपासून सुमारे साडेसात हजार वर्षांपूर्वीच्या काळात थोरला दुष्काळ पडला होता. महाभारतात त्याची जी कथा येते त्यानुसार तो त्रेता-द्वापारयुगाचा संधिकाल होता. त्या काळात तब्बल बारा वर्षे पाऊस पडलाच नाही. त्यामुळे नद्या आटल्या. शेते करपली. दुष्काळाने त्राहीत्राही झाले. माणसे, जनावरे यांचे भूकबळी जाऊ लागले. सर्वत्र हाडांचे ढिगारे दिसू लागले. त्या काळात एकेदिवशी भुकेने व्याकूळ झालेल्या विश्वामित्रांनी श्वपच नामक एका चांडाळाच्या घरातून मेलेल्या कुत्र्याच्या पायाचे हाडमांस पळवले. दुष्काळापायी राजर्षीला चोरी करावी लागली.
सिंधु संस्कृतीलाही अवर्षणाची झळ बसल्याचे पुरावे आहेत. काही अभ्यासकांच्या मते इ.स.पू. २००० पर्यंत मोसमी पावसाचे तेव्हाचे चक्र बिघडत चालले होते आणि त्यामुळे अनेक वर्षांचे दुष्काळ पडू लागले होते. हे केवळ भारतातच घडत होते असे नव्हे तर ईजिप्त आणि तुर्कस्तानमध्येही हीच परिस्थिती होती. यामुळे हरप्पात अन्नधान्याचे संकट निर्माण झाले होते. हे वारंवार पडणारे दुष्काळ आणि ज्या नद्यांच्या काठी ही संस्कृती वसली होती त्या नद्यांचे आटणे याचा परिणाम ही संस्कृती नामशेष होण्यात झाला, हे लक्षणीय आहे.
दुष्काळाची अशी वर्णने पुढे अगदी सोळाव्या शतकापर्यंत येतात. त्यातील काही दुष्काळ तर अनेक वर्षे चालल्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील दुर्गादेवीचा दुष्काळ हा त्यातलाच एक. त्याचे साल १४७८. हा दुष्काळ बारा वर्षे टिकला असे म्हणतात. १४४८ आणि १४६० या वर्षांतला दुष्काळ दामाजीचा दुष्काळ म्हणून ओळखला जातो. या काळात मंगळवेढ्याचे संत दामाजीपंत हे बिदरच्या बादशहाच्या पदरी तहसीलदार होते. या दुष्काळात माणसे मरू लागल्याचे पाहून त्यांनी सरकारी कोठारातील धान्य लोकांना फुकट वाटले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मवर्षीही असाच थोरला दुष्काळ पडला होता. डच कंपनीतील एक ज्येष्ठ व्यापारी व्हॅन ट्विस्ट याने त्याबद्दल लिहून ठेवले आहे –
“पाऊस इतका अल्प पडला की पेरणी केलेले बी तर वाया गेलेच पण साधे गवतसुद्धा उगवले नाही. गुरेढोरे मेली. शहरांतून आणि खेड्यांतून शेतात आणि रस्त्यांवर प्रेतांच्या राशी पडल्यामुळे इतकी दुर्गंधी सुटली होती की रस्त्यावरून जाणे भयावह होते. गवत नसल्यामुळे गुरेढोरे प्रेतेच खाऊ लागली...”बादशहानाम्यात तर याहून भयंकर वर्णन येते. या दुष्काळात -
“मृतांच्या हाडांची भुकटी पिठात मिसळून ते विकले जात असे. शेवटी दारिद्र्य इतके शिगेला पोहोचले की माणसे माणसांना खाऊ लागली आणि पुत्रप्रेमापेक्षा त्याचे मांस पित्याला प्रिय वाटू लागले.”रामदास या दुष्काळाबाबत म्हणतात –
बहु कष्टले कष्टले कितीयेक मेले
वीसा लोकांत लोकांत एकचि राहिले
याच काळातले एक पत्र आहे –“थोरला दुकाल पडिला त्या दुकालामध्ये आपण उपासी मरो लागलो अन्न मिळेनासे जाले मुलेलेकरे अनेवीण राहिली हात-पाये सुजले, पदरी रुका नाही, दाणा न मिले मायेने आपली पोटीची लेकरे खादली धारण दर होनास दोनी पायली धान्य जाले यैसा कठीण समये पडला...”
(सुपे परगण्यातील कोल्हाले बुद्रुकचे कुलकर्णी तिमाजी खंडेराव यांचे वतनमागणी संबंधीचे पत्र, सन १६३०)
उत्तर भारतात १५५५ ला पडलेला दुष्काळही असाच भीषण होता. या दुष्काळात पोटाची खळगी भरण्यासाठी माणसे नरमांस खात असल्याचे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले असल्याचे बदौनी नामक एका मध्ययुगीन इतिहासकाराने लिहून ठेवले आहे. अबुल फझलच्या ऐने अकबरीमध्येही त्याला पुष्टी मिळते. एकमेकांना खाण्यापर्यंत माणसांनी मजल गाठली होती असे त्याने लिहून ठेवले आहे. ही सगळी वर्णने इ.स. पू. साडेपाच हजार ते सोळावे शतक या काळातली. या कालखंडात आपल्याकडे आधुनिक कारखाने नव्हते. तेव्हा प्रदुषण नव्हते. जंगलसंपदा अमाप. तेव्हा हरितगृह वायुंचा परिणाम होण्याचे कारण नव्हते. शिवाय लोकही धार्मिक. यज्ञयाग वगैरे करीत असत. आणि तरीही या काळात लोकांना प्रसंगी नरमांस खाण्यास भाग पाडणारे अवर्षण आणि दुष्काळ पडत होते. याची संगती कशी लावायची?
हल्ली ऋतूचक्र बदलले आहे हे खरेच आहे. परंतु त्यात नवे असे काहीच नाही. रामायणात वर्षाऋतुचा प्रारंभ भाद्रपदात होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. याचा अर्थ मोसमी पावसाचा प्रारंभ काळ बदलत बदलत आता ज्येष्ठापर्यंत आला आहे. आणि या सर्वांचा अर्थ वातावरणातील, हवामानातील हे बदल प्रामुख्याने नैसर्गिक आहेत. त्यांना मानवी हस्तक्षेप काही प्रमाणात कारणीभूत आहेतच. ते नाकारण्याचे कारण नाही. वाद फक्त त्याच्या प्रमाणाचा आहे.
‘स्टेट ऑफ फीअर’ या कादंबरीतून ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ही पर्यावरणवादी वैज्ञानिकांनी ठोकलेली लोणकढी थाप आहे असे मत (त्यासंबंधीच्या वैज्ञानिक पुराव्यांसह) मांडणारे विख्यात लेखक मायकल क्रायटन यांना जरा बाजूला ठेवले तरी काही गोष्टी ध्यानात घ्याव्याच लागतात. उदाहरणार्थ आयपीसीसीच्या राजेंद्र पचौरी आणि मंडळींनी सन २०३५ पर्यंत हिमालयातील हिमनद्या नामशेष होतील असा इशारा दिला होता. हा इशारा मुळचा हिननद्यांविषयक शास्त्रज्ञ डॉ. सय्यद हुस्नानी यांचा. तो आयपीसीसीने आपल्या २००७च्या अहवालात उचलला. पुढे त्यात भयगंडाचाच अधिक भाग असल्याचे स्पष्ट झाले. तीच गत अमेझॉन खो-यातील पर्जन्यवनांच्या विनाशासंबंधीची. हवामान बदलामुळे सुमारे ४० टक्क्यांपर्यंतची ती पर्जन्यवने नष्ट होतील असे या अहवालात नमूद करण्यात आले होते. ही माहिती वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडच्या हवाल्याने देण्यात आली होती. ती माहितीही त्यांनी नेचर मासिकातून उचलली होती आणि त्या मासिकातील लेख होता वृक्षतोडीबाबतचा.
आयपीसीसीच्या म्हणण्यानुसार मागील दहा वर्षांत पृथ्वीचे तापमान ०.२५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. ही भयावहच बाब. पण तसे झालेच नाही. आणि हे तथ्य खुद्द आयपीसीसीच्या अहवालाचे प्रमुख लेखक हॅन्स व्हॉन स्टॉर्च यांनीच स्पष्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या १५ वर्षांत तापमानात केवळ ०.०६ अंश सेल्सिअस एवढी म्हणजे जवळजवळ शून्य अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. ते सांगतात, हवामानातील बदल का थांबले आहेत याचे नेमके उत्तर कोणाकडेच नाही.
हे उत्तर निसर्गात आहे. हवामानावर अनेक घटक परिणाम करीत असतात. ते पृथ्वीवरले असतात, पृथ्वीबाहेरचेही असतात. आणि दुष्काळाबाबत बोलायचे तर हल्ली दुष्काळ पडतात, परंतु त्यांचे मानवी जीवनावरील परिणाम मात्र घटले आहेत. हल्ली माणसे माणसांना खात नाहीत. लुटतात, इतकेच.
तर सांगण्याचा मुद्दा असा, की पर्यावरण, हवामान, ग्लोबल वॉर्मिंग, दुष्काळ, पूर अशा गोष्टींबाबत आपण आपले सावधपणे ऐकलेलेच बरे! कारण हल्लीचा काळ म्हणे वाईट आहे!!
संदर्भ –
- आर्यांच्या शोधात – मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन,
- शिवकालीन महाराष्ट्र – डॉ. अ. रा. कुलकर्णी, राजहंस प्रकाशन,
- Land of the Seven Rivers : Brief History of India’s Geography – Sanjay Sanyal, Penguin,
- State of Fear : Michael Crichton, Harper Collins,
- ‘As Its Global Warming Narrative Unravels, The IPCC Is In Damage Control Mode’ – James Taylor, Forbes, 26/9/2013,
- ‘Amazongate : new evidence of the IPCC's failures’ – Christopher Booker, The Telegraph, 30/1/2010)
चित्र - नीलेश जाधव
No comments:
Post a Comment