बहुत ज्ञाती नागवलीं।
कामनेने वेडी केली।
कामना इच्छितांच
मेलीं। बापुडी मूर्खे।।
अनेक ज्ञानी
म्हणविणारे लोक कामनेने वेडे झाल्याने नागविले जातात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त
होत नाही. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून धडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न
कमावताच मरून जातात.
(दासबोध, ५.२.३७)
००००००००००
काळ बाजारीकरणाचा
आहे. या बाजाराचा एक मूलभूत नियम आहे. मागणी आणि पुरवठ्याचा. मागणीनुसार पुरवठा
केला जातो. पुरवठा असेल आणि मागणी नसेल, तर ती उत्पन्न केली जाते. त्यासाठी
पंधरावी कला - जी जाहिरात – ती पणाला लावली जाते. एकंदर बाजार सुरूच राहील हे
पाहिले जाते. हा बाजार कशाचाही असू शकतो. तो धर्माचा असतो. अध्यात्माचा असतो.
राधेमाँ हे अशा बाजारातील पुरवठ्याचे प्रकरण असते. राधेमाँ हे बाजारातील एक
ब्रँडनेम असते. असे ब्रँड अनेक असतात. गरज आणि ऐपतीनुसार लोक त्या-त्या ब्रँडचा
अंगिकार करीत असतात. हे एकदा नीट ध्यानी घेतले की राधेमाँच्या निमित्ताने सध्या जो
काही गदारोळ सुरू आहे त्याचा अर्थ लावणे सोपे जाते.
राधेमाँ हा ज्यांचा
ब्रँड नाही, त्यांना ती तिस-या दर्जाच्या चित्रपटांतील तिस-या दर्जाची नटी वाटू
शकते. तिच्या नटण्यापासून तिच्या नाचण्यापर्यंत सारेच मूर्ख वाटू शकते. ही
पंजाबातील एक सामान्य गृहिणी. मुले, नातवंडे असलेली. तिच्याकडे असे कोणते
ब्रह्मज्ञान आहे हे कोणालाच माहीत नाही. कारण ती फारशी बोलतच नाही. ती फक्त ओठ
मिटून हसत असते. बटबटीत मेकअपने सजविलेल्या तिच्या त्या तरूण भासणा-या चेह-यावर ते
हसू फारच वेडगळ वाटते. पण तिच्या त्या हसण्यात अनेकांना मोक्षाचे द्वार दिसते.
माता बालकांना आपल्या कुशीत घेऊन जोजविते. ही माता बालकावर प्रसन्न झाली की
बालकाच्या कुशीत जाऊन स्वतःला जोजवून घेते. त्यावेळी तर त्या भक्तास भवसागर तरून
गेल्याचाच भास होत असावा. आणि तिचा तो दरबार. चित्रपटाच्या सेटसारखा. तिथली ती
गाणी. त्यात तल्लिन झालेले भक्तजन. त्यांच्या मनातील भक्तीचा अंदाज बांधायचा असेल
तर ते उधळत असलेल्या पैशाकडे लक्ष द्यावे. जो जेवढा श्रीमंत आणि दानशूर, त्याची
भक्ती तेवढी थोर. असे ते सगळे उबग आणणारे वातावरण. पण हे कोणासाठी तर ज्यांचा
राधेमाँ हा ब्रँड नाही त्यांच्यासाठी. राधेमाँच्या भक्तांसाठी ती साक्षात देवी
आहे. माता आहे. सुभाष घई नावाचे तिचे एक अनुयायी आहेत. हे एक अपयशी नट. नंतर
यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माते झाले. त्यांच्या मते राधेमाँचे नाचणे ही तर तिची
बाललीला आहे. त्यांना त्यात काहीही वावगे वाटत नाही. इतरांना तसे का वाटावे हा
तिच्या भक्तांना खरोखरच सतावणारा, लक्षात न येणारा प्रश्न आहे.
त्यांचेही बरोबरच
आहे की!
या देशात एखादा
बाबा, बुवा, महाराज, संत (हा शब्द आजच्या अर्थाने घ्यावा आणि तो लक्षात येत नसेल
तर नाशिकला तुरंत जावे!),
साध्वी, माता ही मंडळी जेवढी विक्षिप्त, विचित्र तेवढी त्यांची थोरवी मोठी असे
मानण्याची एक पद्धतच आहे. म्हणजे बघा, एखादा माणूस एखाद्या गावात असाच कधी तरी
उगवतो. त्याची वसने घाण असतात. तो वेडेचाळे करत असतो. बोलतो तेही अर्थहीन. पण काही
लोक असतातच की ज्यांना त्यातूनही वेदवाणी ऐकू येते. ते त्याचा देव करतात. त्याच्या
चमत्कारकथा रंगविल्या जातात आणि पाहता पाहता त्या माणसाचा संत होतो आणि नीट बाजार
मांडला तर सावकाशीने त्याचे संस्थानही उभे राहते. असे काही संत असतात की जे
सदान्कदा अमली पदार्थांच्या धुंदीत असतात. काही भक्तांना शिव्या देतात. काही उठसूठ
नाचत असतात. आणि तरीही त्या ब्रँडला अनुयायी असतात.
काही भक्तांना असे
ब्रँड मानवत नसतात. त्यांना चमत्कारात रस असतो. आपल्याकडील जादूगार असे प्रयोग
दाखवित असतात. पण ते त्याला सत्संग म्हणत नाहीत. त्यामुळे ही मंडळी चमत्कारी
बाबांकडे जातात. तेथेही जादूचेच प्रयोग असतात. कोणी हातातून सोन्याची घड्याळे
काढून देतो, तर कोणी राख. अशा जादुगारांचे पितळ उघडे पडले तरी त्याने अशा भक्तांना
काहीही फरक पडत नसतो. कारण पितळ उघडे पडणे हीसुद्धा आपल्या बाबामहाराजांचीच लीला
असे ते मानतात.
याहून वरचा ब्रँड
अध्यात्म सांगणा-या बाबाबुवांचा. हे पदरचे काहीच सांगत नसतात. त्या अर्थाने ते
प्रवचनकारच. पण जरा वरच्या कोटीतले. कारण त्यांच्याकडे मोठे सजवलेले व्यासपीठ
असते. त्या व्यासपीठाच्या समोर आवर्जून विदेशी गो-या कातडीच्या भक्तजनांची शोकेस
मांडलेली असते. बाबा-बुवा-माताजी यांच्याकडे गो-या चामडीच्या भक्तांची जेवढी जास्त
मांदियाळी तेवढे त्यांचे ब्रँडमूल्य मोठे. तर हे संतमहात्मे चमत्कार दाखवित नसतात.
त्यांचे लक्षावधी भक्तजन, देशोदेशीचे आश्रम, त्यांच्याकडे येणारे राजकीय नेते,
अभिनेते आणि अभिनेत्री हेच त्यांचे चमत्कार. इतरांना ते भोंदू वाटू शकतात, जशी आज
राधेमाँ ही अनेकांना भोंदू वाटत आहे. लोक अशा ‘चोरटा मैंद पामरू, द्रव्यभोंदु’च्या नादी का लागतात
असे इतरांना वाटू शकते, जसे आज ते राधेमाँच्या बाबतीत अनेकांना वाटत आहे. परंतु शेवटी
हा सगळा वाटण्याचा, मानण्याचा, प्रत्येकाच्या दृष्टीकोनाचा मामला असतो. म्हणूनच
बलात्काराच्या आरोपाखाली एखादा संत तुरूंगात गेला तरी त्याच्या भक्तांना तो
मर्यादापुरूषोत्तम रामच वाटतो आणि त्याच्यावरचे आरोप हे सरकारचे, अन्य धर्मियांचे
षड्यंत्रच वाटते. कारण हे असे ब्रँड ही ‘घालीन लोटांगण वंदिन चरणम्’साठी सदा उत्सुक असलेल्यांची आवश्यकता
असते.
हे कोणीही सांगेल की
प्रत्येक काळ हा कठीणच असतो. आपणांस भलेही गतकाळ रम्य वगैरे वाटत असला तरी तेथेही
समस्या, विवंचना होत्याच. तेव्हा जागतिकीकरणाने, आधुनिकीकरणाने, बाजारीकरणाने न
भूतो असे संकट कोसळले आहे असा आव आणण्यात काही अर्थ नाही. पूर्वीही लोकांना मोक्ष,
स्वर्ग, चौ-यांशीच्या फे-यातून सुटका हे हवे होते. आजही तेच हवे आहे, असे म्हणता
येईल. कारण मोक्ष, चौ-यांशीच्या फे-यातून सुटका, स्वर्गाची प्राप्ती, परमात्म्यात
विलिन होणे या सगळ्याचा भौतिक अर्थ शांती हाच आहे. मागणी आहे ती या शांतीला. ती
मानसिक असते आणि म्हणूनच ज्याने त्याने स्वतःच प्राप्त करायची असते. पण परंपरांनी,
धर्मग्रंथांनी सांगून ठेवले आहे की सद्गुरुवाचून सापडेना सोय. या एका वाक्याने या
भूतलावरील तमाम बा-बु-सं-मा यांची सोय लावून दिलेली आहे. ही मंडळी त्यांच्या
अनुयायांना शांती देतात का? तशी ती देत असतील तर प्रश्नच मिटला. मग त्यांनी
काहीही चाळे केले तरी ते क्षम्य मानता येतील. पण त्यांच्याकडे जाऊन मिळतो तो फक्त
आभास. माणसे त्या आभासातच रमतात. जशी ती चित्रपटांत रमतात.
राधेमाँसारखी
बाबुसंमा मंडळी अध्यात्माचा संमोहक चित्रपटच तर दाखवत असतात!
ते जोरदार प्रमोशन,
ती पोस्टरे, बॉक्सऑफिसवर होणारी गर्दी, सजविलेली व्यासपीठे, झगमगाटी आरास,
आखीव-रेखीव पटकथा, गीत-संगीत-पार्श्वसंगीत, नायकाचे नृत्य, डायलॉगबाजी... खलनायक
तर असतातच. धर्माचे शत्रू, परधर्मी, परपंथी, झालेच तर सरकार. त्यांच्याशी लढाई
झाली तर आणखी रंगत. याच्या जोडीला नेणिवेच्या पातळीवरून केलेली लैंगिक आवाहने. एक
छानसा मसालापट. अधुनमधून असा सत्संगी मसालापट पाहण्याचा आणखीही एक लाभ असतो.
आपापल्या सामाजिक परिस्थितीतून निर्माण झालेली एकटेपणाची भावना त्या सत्संगी
गर्दीत विरून जात असते. आपण झुंडीचा भाग बनतो. ती झुंडच आपल्याला मानसिक
सुरक्षितता आणि पौरुष पुरवते. या चित्रपटाची कोणी वेगळी समीक्षा करण्यास धजावले तर
ही झुंडच त्याचा समाचार घेते.
या सगळ्या लाभांच्या
बदल्यात करायचे काय असते? तर नियमाने मसालापटास हजेरी लावायची. विशिष्ट
बिल्ले, खास वेश – गणवेश परिधान करायचा, कोणी नामस्मरणाच्या नावाखाली लक्ष लक्ष
नावे लिहून वह्या भरा यांसारखी गर्दभकर्मे सांगेल तर ती मेंदू झाकून करायची, आणि
बाबुसंमा मंडळींसमोर सदा समर्पण भावना ठेवायची. बस्स इतकेच!
अध्यात्माचे
मल्टिप्लेक्स भरपूर आहेत. एकलपडदेही खूप आहेत. या. ब्रँडदार मसालापट पाहा आणि
मनःशांतीचा आभास घेऊन घरी जा.
राधेमाँने याहून
वेगळे काय केले? तिने
मागणी तसा पुरवठा केला. मग चूक तिची आहे असे कसे म्हणावे? बरे, समजा तिच्या फुग्याला टाचणी लागून
तिला शिक्षा झाली, तर लोक काय घरी जातील? ते दुसरा ब्रँड शोधतील!
हे म्हणजे त्या
दामदुप्पट करून देणा-या योजनांसारखेच आहे. एकीचा बाजार उठला की तमाम लोभीजन
दुसरीमागे लागतात. आणि त्या प्रत्येकालाच असे वाटत असते, की फसवणूक करणारे ते
दुसरे होते. आपली ही योजना चालवणारी मंडळी म्हणजे आपल्या उद्धारासाठी अवतरलेली
देवमाणसेच!
तेव्हा अशा या
देवमाणसांचे नेहमीच भले होत जाणार आहे. मागणीनुसार पुरवठा होतच राहणार आहे.
No comments:
Post a Comment