1.
साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बिघडते म्हणजे काय होते? तर तिच्यात असभ्य शब्द येतात. परभाषेतले शब्द येतात. बोलीभाषा घुसखोरी करते. तिचं व्याकरण बिघडतं. अशुद्धलेखन बळावतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे भाषेचं समाजातलं वजन, प्रतिष्ठा नाहीशी होते. म्हणजे होतं काय, की ती भाषा बोलणाऱ्या लोकांचं सामाजिक मूल्य कमी होतं. आर्थिक वजन घटतं. परिस्थिती अशी निर्माण होते, की समजा नाही त्या भाषेत बोललं, तरी कुणाचं काही नुकसान होत नाही. मग हळूहळू असं होतं, की तो कमी वजनवाला भाषिक समाज जास्त वजनवाल्या भाषिक समाजाच्या मानसिक गुलामगिरीत अडकतो. त्याने मग तो एक तर जास्त वजनवाल्या समाजाचीच भाषा बोलायला लागतो किंवा त्यांचे शब्द उचलतो, त्यांच्या भाषिक लकबींचं अनुकरण करू लागतो. बरं शब्दांची अशी सरमिसळ कमी वजनवाल्यांच्या भाषेतच होते असाही काही नियम नाही. एकमेकांच्या सानिध्यात येणाऱ्या सगळ्याच भाषा एकमेकांकडून अशी उसनवारी करीत असतात.
मध्ये काही काळ गेला, की अचानक कोणाच्या तरी लक्षात येतं, की अरे, आपली भाषा भ्रष्ट होत चालली आहे. मग भाषाशुद्धीच्या चळवळी निर्माण होतात. त्यांचं म्हणणं काय असतं, तर आपण आपली पारंपरिक, जुनी भाषाच बोलूया. परभाषेतले शब्द हुसकावून लावूया. ज्यांच्यावाचून आपलं अडतं अशा परभाषेतल्या शब्दांना आपल्या भाषेत प्रतिशब्द शोधूया. येथे एक लक्षात घ्या, की म्हणजे हे भाषाशुद्धीवाले प्राध्यापक, लेखक, समिक्षक, पुढारी व तत्सम लोक परंपरावादी असणं ही आवश्यक बाब होऊन बसते! तर मुद्दा असा, की हा हलकल्लोळ झाला, की खरोखरच काही परकी शब्द गळून पडतात. काही राहतात. कालांतराने ते परकी आहेत हेच विसरलं जातं. ते त्या भाषेत जिरून जातात. असं हे चक्र फिरतच असतं.
उदाहरणार्थ आपली मराठी भाषाच घ्या...
2.
"सलिलयपदसंचारा, पयडिय मयणा, सुवण्ण रयणेल्ला
मरहठ्ठ भासा कामिणि य अडवीय रेहन्ती'
सललितपदसंचारा, प्रकटितमदना, सुवर्णरचनावती अशी कामिनी असणारी मराठी भाषा आपल्या वैभवात विराजत आहे. धर्मोपदेशमाला या नवव्या शतकातील ग्रंथात "मरहठ्ठ भासे'चा असा गौरव केलेला आहे. या भाषेचा इतिहास कुठून सुरू होतो बरं? मराठीतलं पहिलं लिखित वाक्य (म्हणजे आपल्याला माहित असलेलं) आहे ः "श्री चामुण्डराये करवियले'. हा श्रवणबेळगोळचा शिलालेख शके 905चा. ज्याअर्थी शके 905 (सन 983) मध्ये मराठी लिहिली जाऊ लागली होती, त्याअर्थी तत्पूर्वी ती किमान दोन-तीन शतके तरी सहजच उत्पन्न झालेली असणार. याचा अर्थ मराठी भाषा इसवीसन 600 ते 700च्या सुमारास उत्पन्न झाली असणार.
आता कोणतीही भाषा अशी एकाएकी निर्माण होत नाही. तिची निर्मिती आणि विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असते. तेव्हा मराठीही अशीच हळूहळू, शब्दाला शब्द जोडत निर्माण झाली असणार. तर हे जे शब्द मराठीत आले, ते कोठून आले? काही लोक म्हणतात, संस्कृतमधून आले. असा एक सिद्धांत आहे, की पूर्वी संस्कृत ही लोकांच्या बोलण्यातली भाषा होती. ख्रिस्तपूर्व 600 च्या सुमारास तिचं रोजच्या व्यवहारातली भाषा म्हणून महत्व कमी झालं. याच काळात महाराष्ट्री, पाली, शौरसेनी, मागधी या भाषा बनण्यास सुरूवात झाली. ख्रिस्तपूर्व 200च्या सुमारास याच भाषा प्रचारात आल्या. प्राकृत म्हणतात त्या याच भाषा. पण या भाषाही फार काळ त्याच स्वरूपात टिकल्या नाहीत. त्यांचेही अपभ्रंश झाले आणि तेच पुढे रूढ आणि प्रतिष्ठित झाले. म्हणजे, संस्कृतमधील शब्दांची उसनवारी करून महाराष्ट्री प्राकृत भाषा तयार झाली. मग तिचा अपभ्रंश झाला आणि त्यातून मराठी भाषा आकाराला आली, असं हे सगळं प्रकरण आहे.
3.
आता हे जे भाषाशास्त्र आहे, त्याचीही एक गंमत आहे. सर विल्यम जोन्स (1746-1794) हे जे भाषातज्ञ होते, त्यांनी एक भाषाशास्त्रीय सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी, संस्कृत आणि ग्रीक आणि लॅटीन या भाषा-भगिनी आहेत आणि त्यांचा उगम एकाच भाषेतून झाला असावा, असा सिद्धांत मांडला. या मूळ काल्पनिक भाषेला त्यांनी "इंडो-युरोपियन' असं नाव दिलं. ही भाषा बोलणारे लोक ते आर्यवंशाचे. ते मध्य आशियातल्या कॉकेशस पर्वतापासून सर्वत्र पसरले. काही भारतात आले. मग त्यांना ऋग्वेद वगैरे "दिसला.' हा सिद्धांत लांबवत नेला, की लक्षात येतं, की मराठी ही आर्य लोकांच्या भाषेतून निर्माण झालेली भाषा आहे आणि द्रविडांच्या भाषा वेगळ्या आहेत. परंतु आपल्याकडचे सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ विश्वनाथ खैरे यांनी एक "संमत' विचार मांडला आहे. त्यानुसार मराठी आणि तमिळ या भाषा आणि संस्कृतीचेही गाढ संबंध होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठीतल्या अनेक शब्दांची व्युत्पत्ती शोधायची तर त्यासाठी तमिळ भाषेचा आधार घ्यावा लागतो. शिवाय काही शब्द तर शुद्ध तमिळच आहेत. उदाहरणार्थ छे, इश्श, अय्या हे उद्गार. ते सांगतात, ओवी, अंगाई, पोवाडा, गोंधळ हे सगळं तमिळमधून आलं. खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सगळं तमिळमधूनच आलेलं आहे. शेंडीपासून बोटापर्यंतच्या सर्व मानवी अवयवांचे शब्द तमिळ आहेत. हे तर काहीच नाही. खरी गंमत आहे ती मऱ्हाटमोळं या शब्दाची. "अस्सल मराठी भाषे'ला आपण मराठमोळी म्हणतो. ज्ञानेश्वरांनी "मऱ्हाटाची बोलु' असा शब्दप्रयोग केलेला आहे. खैरे सांगतात, की तमिळमधला मर्रा मराठीत मऱ्हा झाला. त्याचा अर्थ "न झाकलेलं, उघडं, स्पष्ट.' आणि मोळि म्हणजे बोली, भाषा. ज्ञानेश्वरीत 22 वेळा हा जो "मऱ्हाटाची बोलु' हा शब्द आलेला आहे तो याच अर्थाने!
विश्वनाथ खैरे यांचा हा संमत विचार पाहताना, शं. बा. जोशी यांच्या "मऱ्हाटी संस्कृती - काही समस्या' या ग्रंथाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. त्यात त्यांनी मराठी आणि कानडी भाषेचा संबंध दाखवून दिला आहे. पण पुढं "महाराष्ट्र संस्कृती'त पु. ग. सहस्त्रबुद्धेंनी त्याचा प्रतिवाद केला आहे.
पण याबाबतच्या वादात न पडता आपण सध्याचं प्रचलित मत प्रमाण मानू यात. ते असं, की संस्कृत, महाराष्ट्री प्राकृत, तिच्यावरून महाराष्ट्री अपभ्रंश आणि तिच्यापासून मराठी अवतरली. केव्हा, तर सुमारे तेराशे वर्षांपूर्वी. ती समृद्ध होत होत एक वेळ अशी आली, की चक्रधरस्वामींनी आपल्या महानुभाव पंथाची मुख्य भाषा मराठी केली. चक्रधरांचे एक शिष्य भटोबास यांनी काशीच्या एका पंडिताला, "हे अस्मात्-कस्मात् आम्ही नेणों गाः सर्वज्ञें आम्हां मराठी निरूपिले ः तीतें पूसा' असं रोखठोक सुनावलं. म्हणजे तोवर मराठीला चांगलंच बळ आलेलं होतं. हे पुढं ज्ञानेश्वरीतूनही दिसतं. यानंतरचा मराठीचा प्रवास संतकवींच्या मार्गाने, एकनाथ, तुकाराम येथपर्यंत सहजच होतो. आणि शिवकालात जरा मागे वळून पाहिलं की लक्षात येतं, की अरे, मराठीत केवळ संस्कृत, प्राकृत, महाराष्ट्री, तमिळ वा कानडीचीच भर पडलेली नाही, तर आता अरबी-फार्सीही या शिवारात जोमाने वाढू लागलेली आहे. तेव्हा मग शिवाजी महाराजांनी "राज्यव्यवहारकोश' तयार करवून घेतला. भाषाशुद्धीचा हा पहिला प्रयोग. पण तो काही फारसा यशस्वी झाला नाही. म्हणजे पुढेही "पेशव्यां'चा "पंतप्रधान' झालाच नाही.
4.
ंमहानुभावांनंतर मराठीत गद्यनिर्मिती झाली ती बखरींद्वारे आणि त्यानंतर त्यासाठी थेट इंग्रजांची राजवट सुरू व्हावी लागली. इंग्रजी अमदानीत येथे छपाईकला आली. मग इंग्रजीच्या धर्तीवर मराठी गद्याची रचना सुरू झाली. ही मंडळी शास्त्री-पंडित असल्याने मराठीवरील संस्कृतचा वरचष्मा वाढू लागला आणि त्यांचा फार्सी-अरबी-उर्दूशी फारसा संबंधच आलेला नसल्याने ते शब्दही त्यांच्या पुस्तकांतून कमी होत गेले. रूढ होते तेवढे मात्र राहिले. पण इंग्रजी शब्दांचं प्रमाण वाढू लागलं. तेव्हा विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी "निबंधमाले'त लिहिलं, की "जर सध्याप्रमाणे इंग्रजी शब्दांची व रचनेची आपल्या भाषेत सतत भेसळ होत गेली ..... तर तिचे स्वरूप पालटता पालटता असे होईल की, ती इंग्रजीपासून निवडता येणार नाही व तिच्या मूळ स्वरूपाचा मागमूसही राहणार नाही.' 1929 सालचं एक पुस्तक आहे. गो. गो. मुजुमदार यांचं "मराठीची सजावट' म्हणून. त्यात त्यांनी त्यांच्या वेळच्या मराठी भाषेतील शब्दांची टक्केवारी दिली आहे. त्यानुसार 100 मराठी शब्दांमध्ये त्यांना शुद्ध संस्कृत 14, विकृत संस्कृत 18, प्राकृतिक 20, देशज व प्रादेशिक 16, कानडी 2, तमिळ-तेलगू जवळजवळ शून्य, हिंदी 1/2, गुजराथी 1/2, अरबी, फार्सी, उर्दू व तुर्की 17, इंग्रजी, पोर्तुगीज व अन्य पाश्चात्य भाषा 3 आणि बेपत्ता शब्द 9 आढळले! या पार्श्वभूमीवर माधवराव पटवर्धन (यांचं टोपणनाव माधव ज्युलियन असं आहे!), बॅ. सावरकर यांची भाषाशुद्धीची चळवळ येते. मराठीतील फारसी, उर्दू, अरबी, इंग्रजी आदी परकीय शब्दांची हकालपट्टी करून मराठीला शुद्ध, सु"संस्कृत' रूप देणे हे त्यांचं ध्येय होतं. म्हणजे "नजर' काढून "दृष्टी' देणं. पण झालं काय, की तीही चळवळ परिणामकारक ठरली नाही. आणि आज ओरड होत आहे ती मराठीवरील इंग्रजीच्या आक्रमणाची.
5.
या आक्रमणाचा समाचार घेण्यापूर्वी आपण मराठीतील काही तथाकथित परकी शब्द पाहूया. -
अरबी ः अक्कल, इरादा, इतराजी, इमला, इमान, इमारत, इरसाल, उरुस, ऊर्फ, औरस, कत्तल, कदम, कनात, कफन, करार, र्ज, कलम, कायद, कारकीर्द, किंमत, खजील, खलाशी, खलास, खासा, खालसा, गहजब, गुलाम, जादा, जाहीर, जंजिरा, जुजबी, तब्येत, तकवा, तकरार, तहशील, ताईत, तुफान, दफ्तर, दर्जा, दाखल, दीन, नक्कल, लिफापा, साहेब, सैतान, हिंमत, हिशेब...
फार्सी ः अब्दागीर, अलगुज, कारभार, खुशामत, खुशाल, गोषवारा, चाबूक, जबानी, जहागीर, तावदान, दरबार, दस्तूर, दिरंगाई, पायखाना, बाग, बगीचा, बिलंदर, मशीद, महिना, मोहोर, मेणा, रसद, रवानगी, लेजीम, सरकार...
पोर्तुगीज ः काजू, कंपू, फालतू, फीत, घमेले, पगार, टिकाव, बिजागरी, अननस, बिस्कीट, चावी, कोबी, पोपयी, पेरू, पाद्री, हापूस, भोपळा, खमीस...
फ्रेंच ः फिरंगी, काडाबीन, काडतूस, कुपन, वलंदेज...
देश्य ः कल्ला, खेटर, डोके, ढोपर, थोबाड, करडू, कालव, कोकरू, टोणगा, पोपट, रेडा, आघाडा, काकवी, घोसाळे, चटणी, जोंधळा, आड, उंबरा, कुंटा, बडबड, रांजण, मुलगा, वाईट, नाजूक...
ऑस्ट्रिक ः तांबूल, तांबोळी, कापूस, कापड, मयूर, लाकूड, इंगळ, आले, उंदीर, कचरा, ऊस, नांगर, लिंग, अमा (स्तन), गजकर्ण, गाल, गोचीड, कंबल...
यातील अनेक शब्द मराठी भाषेत इतके रूढ झालेले आहेत, की ते अन्य भाषेतून आले आहेत असं मुद्दामहून सांगितलं नाही, तर कळणारही नाही.
आता हे काही शब्द पाहा ः डॅंबीस, वाघीण, फरसबी, झंपर, लालटेन, फलाट, गवन. यांचं मूळ पाहायचंय? पाहा ः डॅंबीस - डॅम धीस , वाघीण - वॅगन , फरसबी- फ्रेच बीन , झंपर - जंपर, लालटेन - लॅंटर्न, फलाट - प्लॅटफॉर्म, गवन - गाऊन. परकी भाषेतून मराठीत अनेक शब्द असे एक तर अपभ्रंश स्वरूपात किंवा जसेच्या तसे आले आहेत आणि ते मराठीच बनून गेले आहेत. आता एखादा परकी शब्द मराठी बनला आहे, हे ओळखायचं कसं? तर त्याची एक साधी कसोटी आहे. तो शब्द एखाद्या आडगावातल्या निरक्षर बाईच्या बोलण्यात आहे की नाही ते पाहा. बाईच का, तर तिचा त्यामानाने बाह्यजगाशी कमी संबंध येतो म्हणून. अशी बाई जर परकी भाषेतला एखादा शब्द सहज बोलताना वापरत असेल, तर मग आपण तरी तो का नाकारावा?
लक्षात घ्या, शब्द म्हणजे नुसता अक्षरांचा पुंजका नसतो. त्याला अर्थ असतो. त्यामागे संकल्पना असतात. त्याच्या पाठीशी एक अख्खी संस्कृती असते. आता जर एखादी गोष्ट मराठीला नवीनच असेल, तर साहजिकच तिचं वर्णन करणारे शब्द मराठीत नसणार. आता उदाहरणार्थ इग्लू घ्या. एस्किमो लोकांचं हे हिवाळ्यातलं घर म्हटल्यावर मराठीला ते ठाऊक असणं शक्यच नाही. तेव्हा मग एकतर त्या घराचं वर्णन करणारा सार्थ शब्द मराठीला स्वतः तयार करावा लागेल किंवा मग सरळ त्याला इग्लूच म्हणावं लागेल. कधी कधी अशीही गोची होते, की आपण एखाद्या शब्दाचं भाषांतर करून त्याला पावन करून घ्यायला जावं, तर त्याचा अर्थच अत्तरासारखा उडून जातो आणि खाली नुसताच अक्षरांचा बोळा उरतो. असे बोळे अनेक आहेत. ते पाहिले की आपण किती उत्कृष्ट भोंगळपणा केलेला आहे, याची गंमत वाटते. एसटीच्या कंडक्टरला ज्याने वाहक हा प्रतिशब्द ठेवला, त्याला तर दंडवतच घालायला हवेत! प्रतिशब्द चपखल नसेल तर तो लोकांमध्ये रुळत तर नाहीच, पण त्याने भाषेलाही बेंगरुळपणा येतो.
6.
आता काळच असा आला आहे, की सगळे कोट कोसळून पडले आहेत. खंदक बुजले आहेत. नुसतीच माहिती क्रांती झालेली नाही, तर माहितीचा कचरासुद्धा निर्माण झाला आहे. तो दूरचित्रवाणीतून, इंटरनेटमधून पसरत चालला आहे. नाना प्रकारचे तंत्रज्ञान, विविध शोध, नवनवीन संकल्पना भोवताली पिंगा घालत आहेत. जगण्याचा एकही कोपरा उरलेला नाही, की ज्याला जागतिकीकरणाने स्पर्श केलेला नाही. हे आपण नाकारणार असू तर प्रश्नच मिटला. पण त्याला नकार देणं हे तरी आपल्या हाती राहिलेलं आहे का? तर नाही. म्हणजे हा एक प्रकारचा बलात्कार मानला, तरी सहन करणं भाग आहे. कटू आहे; पण आहे हे असं आहे. आता या जागतिकीकरणाचं पुढारपण युरोप, अमेरिकेकडे आहे हे उघडच आहे. त्यांची भाषा इंग्रजी. म्हणून तिचं वजन जास्त. आणि मुंबईत मराठीत बोललं तर लोक आपल्याला घाटी मामा म्हणतील की काय अशी भीती तर आमच्या साहेब लोकांनाही वाटते. म्हणजे मराठीचं वजन असं उतरलेलं. ही अशी वस्तुस्थिती आहे. त्या विरुद्ध झगडूच नये असं नाही. पण ती आहे, हे तरी मान्य करायला हवंच. मग या परिस्थितीत मराठी काय करू शकते? तर इंग्रजीतून आलेल्या शब्दांना त्यांच्या सगळ्या अर्थछटांसह, त्यामागील समग्र संकल्पनांसह आपलंसं करणं किंवा मग त्यांना चपखल प्रतिशब्द तयार करणं, एवढंच करू शकते. जपानी, चिनी, रशियन भाषांनी ते केलं आहे. मराठीने तो प्रयत्न कधी केलाच नाही, असंही नाही. पण त्यातून काय उगवलं, तर शासकीय मराठी. एकूण ते मराठी म्हणजे मराठीला आयुष्यातून उठविण्याचेच धंदे! इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द निर्माण करणे याचा अर्थ त्यांचं संस्कृत भाषांतर करणे नव्हे. हे आपण लक्षातच घेतलं नाही. आणि सगळा बट्ट्याबोळ करून ठेवला.
एक गंमत बघा. एकोणिसाव्या शतकातलं वृत्तपत्र आहे, "प्रभाकर' नावाचं. गोविंद विठ्ठल ऊर्फ भाऊ महाजन हे त्याचे संपादक. त्यांनी 1842 साली लिहिलं होतं, की "सांप्रत मुंबई येथील हिंदू लोक इंग्रेजी भाषा आणि विद्या यांपासून उपयोग आहे म्हणोन त्या शिकणे हाच पुरषार्थ मानून त्यात सर्व वेळ खर्च करितात. आणि देश परंपरागत जी स्वभाषा किंवा त्या भाषेचे मूळ आणि धर्मशास्त्रे आणि पुराणे यांच्या ज्ञानास साधन अशी जी संस्कृत भाषा तिचा अभ्यास करण्याकडेस काहीच लक्ष देत नाहीत, यामुळे येथील लोकांची भाषा व स्थिती ही विलक्षण होत चालली आहेत; ती अशी की ते बोलू लागले असता पंचवीस शब्दांमध्ये वीस शब्द इंग्रेजी येऊन, मध्ये विभक्ती, अव्यये, सर्वनामे आणि प्रसिद्ध क्रियापदे, इतकी मात्र बहुधा स्वभाषेचे उपयोगात आणतात.' हे प्रसिद्ध झालं त्याला 163 वर्षं झाली आणि आजही हेच बोललं जात आहे. आणि तरीही मराठी जिवंत आहे! आता यावर कोणी म्हणेल, की ही तर "मुंटा-मराठी'ची भलामण झाली. तर ते तसं नाही.
माणसांच्या सांस्कृतिक पुढारपणाची मिरास "महाराष्ट्र टाइम्स'कडे आहे, असं म्हणतात. या वृत्तपत्राची "मुंबई टाइम्स' ही पुरवणी ज्या भाषेत निघते त्यावर अनेकांनी टीका केलेली आहे. पण त्याच्या खपावर त्याचा खास परिणाम झालेला आहे, असं काही दिसत नाही, हेही ध्यानी घेतलं पाहिजे. पण खपतं ते सगळंच चांगलं असतं असंही नाही, हेही ध्यानी घेतलं पाहिजे. "मुं.टा.' मध्ये येणारी बाटगी मराठी आपण म्हणूनच स्वीकारू शकत नाही. कारण ते जे काही चाललं आहे ते अतिशय कृत्रिम आहे. मराठी शब्द असतानाही ते बाजूला ठेवून त्याऐवजी इंग्रजी शब्द वापरायचे हा आपल्या मराठीपणाविषयीचा न्यूनगंड झाला. त्याची लागण नव्याने श्रीमंत झालेल्या उच्चशिक्षित वर्गाला झालेली आहे. 1842 मध्ये हेच होतं. 2005 मध्ये हेच आहे. पण याप्रकारची बाटगी मराठी बोलणारे लोक, भले त्यांचा आवाज मोठा असेल, पण संख्येने कमीच आहेत. जे आहेत ते मराठी म्हणून राहिलेले आहेत की काय याबद्दलही शंकाच आहे. शिवाय हे लोक जे बोलतात ती मराठी नाही, हे सगळ्यांनाच समजत असल्याने, मूठभर "कॉस्मोपॉलिटन उपऱ्यां'च्या बोलीत अगदी कविता-बिविता रचल्या गेल्या आणि त्यालाच कोणी आजच्या युगाचा उद्गार वगैरे जरी म्हणालं, तरी त्याने काही फरक पडणार नाही. मराठी भाषेत झालंच, तर एका बोलीची भर पडेल. आपण तिला बाटगी बोली वा तत्सम काहीही म्हणू शकतो.
जपायला हवं, ते "मराठी' म्हणून मराठीचा गळा घोटणाऱ्यांपासून. हे छुपे मारेकरी असतात. ते वृत्तपत्रांच्या कचेऱ्यांत बहुतकरून आढळतात. इंग्रजीतून येणाऱ्या बातम्यांचं मराठीत भाषांतर करणं हे त्यांचं काम असतं. आता वळीव पडला, तर बिनदिक्कत "मान्सूनपूर्व पाऊस' पडला, असं म्हणणारे हे लोक. यांना मराठी भाषा आणि संस्कृतीची किती ओळख आहे हे कोणीही सांगेल. मराठीतील अनेक अर्थगर्भ शब्द केवळ यांच्या भाषांतराच्या नादामुळे विस्मृतीत गेले आहेत. मराठीला आणखी कुणापासून जपायला हवं, तर ते तिला सोवळं नेसवू पाहणाऱ्या सनातन्यांपासून. यांचा इंग्रजी विरोध मराठीला संस्कृतची दासी बनवू पाहणारा आहे.
7.
ंमराठीचं खरंच भलं व्हावं असं वाटत असेल, तर खुशाल नव्या संकल्पना घेऊन नवे शब्द येऊ द्या. मराठीचा शब्दकोश श्रीमंत होऊ द्या. जे लोकगंगेत टिकेल ते राहील. बाकीचा कचरा आपोआप निघून जाईल. काळजीच करायची तर मराठीच्या सौष्ठवाची करा. मराठीवरील आक्रमण काही आजच होत आहे अशातला भाग नाही. इसवी सनाच्या प्रारंभी भारतात शक, पल्लव, आभीर, हूण, कुशाण इत्यादी रानटी टोळ्या आल्या. अकराव्या शतकात मुस्लिम फौजांनी आक्रमण केलं. पुढं इंग्रज आले. या सगळ्यांना मराठीने पचविलं आहे. एवढंच नव्हे, तर त्यातूनही ती समृद्ध झाली आहे. तेव्हा ती एवढ्या-तेवढ्याने मरणार नाही हे नक्की. मराठी बदलेल. पण मरणार नाही. बदलांचं भय बाळगण्याचंही कारण नाही. असं पाहा, मराठीला तेराशे वर्षांचा इतिहास आहे. तेव्हा त्याचा अर्थ असा होत नसतो, की आपण आज तेराशे वर्षांपूर्वीचीच मराठी बोलत आहोत. आपण आज बोलतो ती मराठी ज्ञानोबा-तुकाराम बोलत नव्हते, चक्रधर बोलत नव्हते. ही सातवाहनांचीही मराठी नाही. तीच उद्या असेल, असं नाही. मराठीचा इतिहास हेच सांगतो आहे. तेव्हा भाषेने बदलू नये, असा अट्टहास कोणी धरू नये. हां, आता जर आपण सगळे मिळून मराठी संस्कृतीच बुडवायला निघालो असलो, तर मग मराठी भाषा राहिली काय आणि गेली काय... कोण फिकीर करतो? किंवा हू केअर्स?
..........................
संदर्भ ः "महाष्ट्र संस्कृती'- पु. ग. सहस्रबुद्धे,
"प्राचीन महाराष्ट्र'- ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर,
"मराठी गद्य लेखनशैलीचा उद्गम आणि विकास'- श्री. दि. परचुरे,
"विश्वनाथ खैरे आणि त्यांचा संमत विचार'- स. ह. देशपांडे यांचा लेख (मौज 2003).
----------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी - रूची दिवाळी अंक 2005
Read more...