डिजिटल मेट्रिक्‍स

आ धी शून्य होते. मग एक आला. त्यांच्या संयोगातून एक बीट जन्मास आले. असे आठ बिट्‌स एकत्र आले. त्यांचा बाईट बनला. बीट्‌समधील एक आणि शून्याच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स तयार झाल्या, त्यांचे बाईटस बनत गेले. आधी किलोबाईट, मग मेगाबाईट, गिगाबाईट असे करता करता मग त्यातून जन्मास आली डिजिटल सृष्टी!
डिजिटल क्रांतीचं उपनिषद लिहायचं ठरलं, तर ते असंच लिहावं लागेल.
एका अर्थी हे सगळं भारतीय तत्वज्ञानाच्या फार जवळ जाणारं आहे. शून्यातून विश्‍वाची उत्पत्ती झाल्याचं नाही तरी आपण मानतोच. तसंच हे एक आणि शून्यातून निर्माण झालेलं डिजिटल विश्‍व आहे...

आता समजा "एक आणि शून्य'च्या यंत्रभाषेचा शोधच लागला नसता तर? तर माहितीला - इन्फर्मेशनला पंख फुटले असते? किंवा समजा माहितीच नसती, म्हणजे उदाहरणार्थ संकेतस्थळंच नसती इंटरनेटवर, तर तुमच्या त्या मोडेमला आणि आयपी सर्व्हरला काही प्रयोजन राहिलं असतं? मुद्दा असा, की डिजिटल क्रांती आणि माहिती क्रांती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. डिजिटल क्रांतीशिवाय माहिती क्रांती झाली नसती आणि माहिती क्रांतीशिवाय डिजिटल क्रांतीला अर्थच आला नसता.

आता हे सगळं विवेचन करताना आपण हे गृहितच धरलेलं आहे की अगदी आपल्याकडेसुद्धा डिजिटल क्रांतीची लाट आलेली आहे. आणि ही जशी एका क्षणात सुरु होणारी प्रक्रिया नाही, तशीच ती कुठल्याशा क्षणी थांबणारीही गोष्ट नाही. आता हे डिजिटल चक्र फिरतच राहणार आहे. यापुढचा मानवी विकासाची अवघी दिंडी याच तालावर पुढं जाणार आहे. निदान आणखी कुठचा नवा ताल सापडेपर्यंत तरी. सध्या सगळं जग नॅनोटेक्‍नॉलॉजीकडे अपेक्षेने पाहात आहे. पण पुढचं पुढं...

आपल्याला रस आहे तो या डिजिटल क्रांतीने तुमच्या-माझ्या आयुष्यावर काय परिणाम केले आहेत किंवा आणखी कोणते परिणाम होणार आहेत, हे पाहण्यात. तर एक गोष्ट तर स्पष्टच दिसत आहे, की या क्रांतीने जग आणखी जवळ आणलं आहे. आपल्याकडच्या संतांनी, विचारवंतांनी "हे विश्‍वची माझे घर' असा एक फार सुंदर अध्यात्मिक विचार मांडलेला आहे. आजचे विचारवंत पूर्ण भौतिक अर्थाने वैश्‍विक खेड्याची कल्पना मांडत आहेत. मौज म्हणजे हे खेडं तसं अगदी अत्र्यांच्या "गावगाडा'मध्ये शोभावं असं आहे. जुन्या मॉडेलचं. म्हणजे त्यात बारा बलुतेदारांसह सगळं काही आहे. जात-पात, वर्णव्यवस्था सर्व काही. फरक इतकाच, की त्याची पातळी जागतिक आहे. तर हेच ते आपलं जागतिकीकरण.

आपल्याकडं एक गमतीदार प्रथा आहे. म्हणजे नव्या काही संकल्पना वगैरे आल्या, की लगेच आपल्या पोथ्या उघडून सांगायचं, की हे तर आमच्याकडं पूर्वीच होतं. आता जागतिकीकरण म्हटलं, की काही लोक लगेच म्हणतात, हे काही नवं नाही. ते तर पूर्वीपासूनच होतं. होतं, तर असेलही. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे तो जागतिकीकरण या ज्या संकल्पनेचा आपण येता-जाता उद्धार करीत असतो, त्या संकल्पनेवरही डिजिटल क्रांतीचा मोठा परिणाम झालेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ हिंदुस्थानातली श्रमशक्ती आणि संपत्ती हवी असेल, तर ब्रिटिशांना तिथं जाऊन वसाहती स्थापन करणं भाग होतं. त्यासाठी लढाया करायला लागायच्या. त्यासाठी मग सैन्य नेणं आलं. प्रशासकीय व्यवस्था लावणं आलं. दमनयंत्रणा उभारणं आलं. आता डिजिटल क्रांतीच्या काळात हे काही करायची गरजच नाही. कामं आउटसोर्स करून तुम्ही तुम्हाला हवं ते साध्य करु शकता. पुन्हा त्यात तुमचा फायदाच फायदा असतो. शिवाय ती कामं करणारांचाही फार तोटा नसतो.

औद्योगिक क्रांतीनंतर जे वसाहतीकरण सुरु झालं, तो वास्तविक जागतिकीकरणचाच वेगळा मुखवटा होता. त्याला मोठा विरोध झाला. वसाहतीकरण हे ज्या राष्ट्रवादातून, ज्या भांडवलशाहीतून, साम्राज्यवादातून निर्माण झालं, त्याच्याविरोधात साम्यवाद, लोकशाही समाजवाद यांसारखी मूल्यं आणि विचारधारा फुलल्या. आजचं डिजिटल क्रांतीतून अवतरलेलं जागतिकीकरण हे एवढं सर्वंकष आहे, की त्याविरोधात काही असू शकतं याचं साधं भान निर्माण होणंही अशक्‍यप्राय झालेलं आहे! डिजिटल क्रांतीने एक वेगळ्याच प्रकारची वर्गव्यवस्था निर्माण केलेली आहे. ती एवढी विचित्र आहे, की एकाचवेळी तुम्ही शोषकही असता आणि शोषितही. त्यात आणि पुन्हा डिजिटल डिव्हाईड या भानगडीची भर आहेच! म्हणजे माहिती आणि माहितीची साधनं असणारा आणि नसणारा असे दोन नवेच वर्ग जन्माला घालून या व्यवस्थेने एक छानसा गोंधळ उडवून दिलेला आहे.

वर म्हटल्याप्रमाणे माहिती क्रांती ही डिजिटल क्रांतीचीच दुसरी बाजू आहे. आपण म्हणतोच की सध्याचं जग हे माहिती-तंत्रज्ञानाचं जग आहे. माहिती हे सामान्य जनांच्या हातातील अस्त्र आहे. टेलिव्हिजन, रेडिओ, इंटरनेट, टेलिफोन, नियतकालिकं ही सगळी माहितीची साधनं आहेत. आजच्या डिजिटल क्रांतीने हे सगळं आमच्या आवाक्‍यात आलेलं आहे. आता माहितीची साधनं आपल्या हातात आहेत हे ठीक. पण माहितीचं काय? ती कोणाच्या हातात आहे?

माहितीच्या महाजालावर - इंटरनेटवर कोणाचं नियंत्रण राहणार हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे. सध्या इंटरनेटवर "आयकॅन' (इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाईन्ड नेम्स ऍण्ड नंबर्स)चं नियंत्रण आहे. आणि या संस्थेवर अमेरिकेच्या कॉमर्स डिपार्टमेंटचं नियंत्रण आहे. तर ते स्वतंत्र समितीकडे द्यावं यावरून अमेरिका विरुद्ध युरोपियन युनियन, ब्राझीलच्या नेतृत्त्वाखालील काही तिसऱ्या जगातील देश यांच्यात वाद आहेत. त्याचवेळी राष्ट्र विरुद्ध व्यक्ती असेही संघर्ष सुरु झालेले आहेत. चीनमध्ये इंटरनेटवर सेन्सॉर लादण्यात आलेलं आहे. चिनी राज्यकर्त्यांना हवीत, तेवढीच संकेतस्थळं चिनी नागरिक पाहू शकतात. म्हणजे माहितीची साधनं हातात आहेत, पण हवी ती माहिती आपण मिळवू शकत नाही अशी तऱ्हा. खरं तर हा प्रश्‍न एकट्या चीनपुरताच नाही. उद्या तुमच्या-आमच्या दारातही तो येणार आहे. डिजिटल क्रांतीमुळे जो इंटरनेट नामक जादुचा दिवा आपल्या हातात आलेला आहे, त्याने कोणतीही माहिती आपण मिळवू शकतो. जगातील तमाम प्रस्थापित आणि सत्ताधाऱ्यांना हे कदापि परवडणारं नाही. म्हणूनच येणारा काळा हा सेन्सॉरशिपचा काळ असणार आहे. ते सेन्सॉर धार्मिक बुरख्यातलं असेल, राजकीय पडद्यातलं असेल, वा राष्ट्रवादाचा झेंडा नाचवणारं असेल. किंवा त्याहून भयंकर म्हणजे ते भ्रष्ट, चुकीची, अर्धसत्य अशी माहितीच तेवढी प्रसवणारंही असेल.

चित्रपट, संगीत, चित्रं, मजकूर यांत डिजिटल तंत्रज्ञानाने बेमालूम बदल करणं सहज शक्‍य झालेलं आहे. ही जेवढी चांगली तेवढीच तोट्याचीही बाब आहे. उदाहरण म्हणून "विकिपेडिया' हा विश्‍वकोश घ्या. हा नेटवरील विश्‍वकोश सध्या भलताच लोकप्रिय आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात आपण आपणांस वाटेल ती भर घालू शकतो. वाट्टेल त्या विषयावर लिहू शकतो. आधीची माहिती संपादित करु शकतो. तर मध्यंतरी अमेरिकेतील काही संसद सदस्यांनी त्यांच्याबाबतच्या माहितीत बदल केल्याचं प्रकरण मध्यंतरी उजेडात आलं होतं. तर दुसऱ्या एका प्रकरणात एका प्रतिष्ठीत व्यक्तीचा थेट केनेडींच्या हत्येशी संबंध जोडणारा मजकूर या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला होता. प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्या पदरचे श्‍लोक घालण्याचे प्रकार आपल्याकडे घडत. मौखिक परंपरेमुळे ते सहजशक्‍य होतं. छापील पुस्तकांमध्ये तसं करण्यास खूपच कमी वाव होता. डिजिटल तंत्रामुळे ते आता पुन्हा सहज शक्‍य झालेलं आहे. "गुगल' ही कंपनी सध्या एका प्रकल्पावर काम करीत आहे. "गुगल' या संकेतस्थळाचा वापर करणाऱ्या तमाम लोकांची माहिती, त्यांचे ई-मेल्स वा त्यांनी अपलोड केलेला सगळा मजकूर "गुगल'च्या संगणकांवर कायमचा साठवून ठेवला जाणार आहे. एका अर्थी हे इतिहास लेखनाचंच काम आहे. तो इतिहास वास्तविक असेल याची खात्री मात्र कोणालाही देता येणार नाही. यातूनच पुन्हा माणसाच्या प्रायव्हसीचाही मुद्दा पुढं येतो.

डिजिटल क्रांतीचे इतर परिणाम, दुष्परिणाम काय असतील ते असोत, या क्रांतीने व्यक्तीच्या प्रायव्हसीला मात्र गिलोटिनवर चढवलं आहे. आपण इंटरनेटवर कुठं जातो, काय पाहतो या सगळ्याची नोंद होत असते. संकेतस्थळांवर रजिस्टर होण्यासाठी आपण जे फॉर्म भरतो, त्यातील माहिती अनेक संकेतस्थळं जाहिरात कंपन्यांना विकतात. त्यातून पैसे कमावतात. स्पायवेअर्स हेच काम आपल्या नकळत करीत असतात. अमेरिकेच्या "नॅशनल सिक्‍युरिटी एजन्सी'त तर त्यांना शंकास्पद वाटेल तो ई-मेल वाचला जातो. ही गुप्तचर संघटना वातावरणातून जाणारा प्रत्येक संदेश ऐकू शकते! डिजिटल क्रांतीमुळेच त्यांना ते शक्‍य झालेलं आहे. मोबाईल फोनने तर माणसाला स्वतःची अशी स्पेस ठेवलेलीच नाही. माणूस सदासर्वदा आपला कुणालाही उपलब्धच! त्यात पुन्हा मोबाईल ट्रॅकिंग नावाचं जे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, त्यामुळे तर तुम्ही नेमके कुठे आहात हे ऑनलाइन पाहणं शक्‍य झालं आहे. मोबाईलमधील कॅमेरे, कॉल रेकॉर्डिंग यांसारख्या बाबींमुळे तर माणसाच्या प्रायव्हसीचा परिघ अधिकाधिक आक्रसत चाललेला आहे. ऑर्वेलच्या "नाईन्टीन एटी फोर'च्या दिशेने तर आपली वाटचाल चाललेली नाही ना, अशी शंका यावी अशी एकंदर परिस्थिती आहे.

पण तरीही डिजिटल क्रांती आपण नाकारता कामा नये. जागतिकीकरण शिंगावर घ्यायचं असेल, तर तिला पर्याय नाही. उद्याचा काळ हा माहिती आणि माहितीची साधनं हाती असणारांचाच असणार आहे. म्हणूनच डिजिटल डिव्हाईडच्या या किनाऱ्यावर उभं राहणं केव्हाही श्रेयस्कर.

(पूर्वप्रसिद्धी - गोमंतक, डिजिटल पुरवणी)

No comments: