‘कॉर्बेट’चे रहस्य!
पुलवामा हल्ल्याचे वृत्त आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यास कसा ‘प्रतिसाद’ दिला हा प्रश्न सध्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजवताना दिसतो. ते स्वाभाविकच आहे. याचे कारण अशा एखाद्या घटनेला राष्ट्रप्रमुख या नात्याने एखादी व्यक्ती कशा प्रकारे प्रतिक्रिया देते यावर तिच्या व्यक्तिमत्वाचे मापन करता येऊ शकते. पुलवामा हल्ल्यानंतरही मोदी हे कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात एका वाहिनीच्या चित्रिकरणात मग्न होते, हे वृत्त मोदी यांच्या ‘कामदार’ प्रतिमेलाच नव्हे, तर ’५६ इंची’ प्रतिमेलाही तडा देणारे ठरते. आता प्रश्न एवढाच आहे की, ती बातमी खरी आहे का? पत्रमाध्यमे म्हणतात खरी आहे. विरोधक त्यावरून टीका करत आहेत. भाजपचे प्रवक्ते सांगतात की ते सारेच खोटे आहे. प्रचंड चिखलफेक सुरू आहे त्यावरून. पण त्या सर्व गदारोळात त्या एक-दोन तासांत नेमके झाले काय हे मात्र धुसरच आहे. खरेच काय झाले होते त्या दिवशी?
०००
१४ फेब्रुवारी. गुरुवार. डेहराडून विमानतळ.
सकाळी सव्वा सात वाजता पंतप्रधानांचे खास विमान तेथे उतरले. तेथून ते रुद्रपूरला जाणार होते. तेथे ते उत्तराखंड सरकारच्या एकात्मिक सहकारी विकास प्रकल्पाचे उद्घाटन करणार होते. दीनदयाल उपाध्याय शेतकरी कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटपाचा कार्यक्रमही होता. मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्यांची तेथे. पण तत्पूर्वी त्यांचा आणखीही एक कार्यक्रम होता. जिम कॉर्बेट अभयारण्याचा सैरसपाटा. आपल्या व्यग्र दिनक्रमातून त्यांनी त्यासाठी खास वेळ काढला होता. कारण? आता सरकारी पातळीवरून पेरण्यात आलेल्या बातम्यांनुसार सांगायचे तर - तेथे ते राष्ट्रीय उद्यानाच्या तीन प्रकल्पांचे अनावरण करणार होते. बचाव केंद्र, सफारी सुविधा आणि उद्यानावर पाळत ठेवण्यासाठीची व्यवस्था यांचे ते उद्घाटन करणार होते. त्याच बरोबर ते डिस्कव्हरी वाहिनीच्या एका माहितीपटासाठी चित्रिकरणही करणार होते. आयएएनस या वृत्तसंस्थेने १४ तारखेलाच पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, ही भेट पूर्वनिश्चित नव्हती! म्हणजे असे काही कार्यक्रमच नव्हते तेथे. मोदी तेथील वाघ आणि हत्ती दर्शनासाठी येणार असल्याचे त्या बातमीत म्हटले होते.
यावर कडी अशी, की ‘प्रकल्प उद्घाटना’चा तो कार्यक्रम अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. त्यास पत्रकारांना प्रवेश नव्हताच, पण - ‘अमर उजाला’च्या वृत्तानुसार - इतिहासात पहिल्यांदाच व्हॅलेन्टाईनच्या दिवशी हे उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.
तसाही तो दिवसच खराब होता. सकाळपासून हवा बिघडली होती. पाऊस पडत होता. डेहराडून विमानतळावर पंतप्रधान अडकून पडले होते. घड्याळाचे काटे पुढे-पुढे सरकत होते. अडीच-तीन तासांनी हवामानात सुधारणा झाली आणि त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले.
बिजनौर जिल्ह्यातील भिक्कावाला गावातील सेंट मेरी इंटरकॉलेजच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरले तेव्हा दुपारचे १२.१० वाजले होते. तेथून त्यांच्या गाड्यांचा काफिला निघाला. कालागढ, रामगंगा बांध असे करीत ते रामगंगा सरोवरला पोचले. तेथे त्यांच्यासाठी मोटारबोटीची व्यवस्था करण्यात आली होती. त्या बोटीतून ते पश्चिमी रामगंगा नदीमार्गे कालागढ धरणाकडे रवाना झाले. त्यावेळी त्यांच्यासमवेत डिस्कव्हरीचे वाहिनीप्रमुख, तसेच राज्यसभेचे सदस्य अनिल बलूनीही होते असे वृत्त आहे. अर्ध्या तासाच्या या प्रवासात मोदींनी नदीपात्रातील मगरींचे निरीक्षण केले. ते सगळे क्षण चित्रित करण्यात आले. यानंतर त्यांनी ढिकला भागात जंगलाची सैर केली.
दरम्यान, दुपारी ३.१५ ते ३.३० या काळात (रिपब्लिक वाहिनीनुसार दुपारी २.१५ वाजता.) तिकडे काश्मीरमध्ये जवानांच्या काफिल्यावर दहशतवादी हल्ला झाला. हळुहळू त्याचे ‘फ्लॅश’ वाहिन्यांवर येऊ लागले. रिपब्लिकनच्या संकेतस्थळाने त्याचा पहिला ‘अपडेट’ दिला ३.५२ला, तर एनडीटीव्हीच्या संकेतस्थळाने ४.२९ला. एएनआय या वृत्तसंस्थेने ४.५३ वाजता केलेल्या ट्विटमध्ये अजून शहिदांची संख्या बाराच होती.
याकाळात मोदी अजून कॉर्बेट उद्यानातच होते. ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’च्या वृत्तानुसार दुपारी साधारण चारपर्यंत मोदींना या हल्ल्याची कल्पनाच नव्हती. एवढ्या उशीरा आपल्याला ही माहिती देण्यात आल्यामुळे ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर संतापले. (दोन दिवसांपूर्वी दोन वाहिन्यांनीही असे वृत्त ‘चालविले’ होते. पण काही वेळातच ती बातमी ‘उतरविण्यात’ आली.) ‘इटी’च्या वृत्तानुसार, मग चार ते पावणे पाचपर्यंत मोदी फोनवरून सातत्याने त्या घटनेचा आढावा घेत होते.
कॉर्बेटहून रुद्रनगरला येत असताना, सायंकाळी चारच्या सुमारास मोदींना हे वृत्त समजले असे ‘वरिष्ठ सरकारी अधिका-या’च्या हवाल्याने ‘इटी’ आपणास आता सांगतो. पण दुस-या दिवशी अमर उजालात आलेली बातमी वेगळाच घटनाक्रम देते. त्या वृत्तपत्राच्या स्थानिक वार्ताहराला आपल्या त्या बातमीने काय हंगामा होणार आहे याची कल्पनाही नसेल. त्याने अत्यंत उत्साहाने आणि तपशिलाने मोदींच्या त्या दौ-याची माहिती दिली होती. त्याला आत काय झाले ते माहिती नसावे. पण रुद्रपूर येथे ठरलेल्या सभेला फोनवरूनच संबोधित करण्याचा निर्णय मोदींनी घेतला होता. दूरदर्शनने त्या सभेचे थेट प्रक्षेपण केले होते. त्यात ‘खराब हवामानामुळे’ हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यात कुठेही पुलवामा हल्ल्याचे कारण देण्यात आले नव्हते. दूरदर्शनच्या त्या ध्वनिचित्रफितीत वेळ दिसते सायं. ५.०९ ची. त्यात सोबतच हल्ल्याच्या बातमीचा टिकरही आपणांस दिसतो. ७ मिनिट २२ सेकंद म्हणजे ५.१६ वाजेपर्यंत ते भाषण चालले.
यानंतर काय झाले? मोदी ढिकलातून निघाले. ते धनगढी गेटपर्यंत पोचले तेव्हा सायंकाळचे साडेसहा वाजले होते. अंधार पडला होता. तेथील अधिका-यांशी दहा मिनिटे बोलून, ६.४० ला त्यांचा काफिला गेटबाहेर पडला. त्यावेळी अनेक कार्यकर्ते बाहेर उभे होते. मोदी झिंदाबादच्या घोषणा देत होते. हा काफिला सुंदरखाल, ढिकुली, रिंगोडा येथून गेला. त्यावेळीही लोक रस्त्यावर दुतर्फा उभे होते. मोदींचा जयजयकार करीत होते. अमर उजालाच्या बातमीनुसार यानंतर मोदी रामनगर येथील पीडब्लूडी गेस्टहाऊसला पोचले. तेथे त्यांनी चहा-नाश्ता घेतला.
अजून पावसाचेच वातावरण होते. हेलिकॉप्टरने प्रवास करणे धोक्याचे होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी रामनगर ते बरेली हा १७५ किलोमीटरचा प्रवास रस्त्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यात जोखीम होती. पण इलाज नव्हता. बरेलीत मोदींचे विमान उभे होते....
या सर्व घटनाक्रमावरून एक दिसते की त्या दिवशी दुपारी साडेबारा ते सायंकाळी किमान पावणेसात वाजेपर्यंत मोदी कॉर्बेट उद्यानातच होते. चारच्या सुमारास त्यांना हल्ल्याची बातमी कळाली असे सांगण्यात येते. तेव्हा प्रश्न असा पडतो की त्यांनी तातडीने दिल्लीला निघण्याचा निर्णय का घेतला नाही? की हल्ल्याची तीव्रता तोवर जाणवली नव्हती? बहुधा तसेच असावे. कारण हल्ल्यानंतर दोन तासांनी ५.०९ वाजता मोदींनी केलेल्या भाषणात हल्ल्याचा उल्लेखही नव्हता. नेहमीप्रमाणेच ते प्रचारी भाषण करीत होते. तेथे एवढी गर्दी जमली होती तेव्हा मोदींनी भाषण करायलाच हवे होते असे आता म्हटले जाते. ‘देश चलना चाहिये’ अशी सारवासारव केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद करतात. पण त्या ‘चालण्यात’ हल्ल्याचा उल्लेखही नसावा?
हा हल्ला होणार हे काही मोदींना आधी माहित नव्हते. त्यामुळे त्यांनी जंगलसैर केली, तेथे चित्रिकरण केले यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. मोदींना कॅमेरा आवडतो, त्याला कोण काय करणार? पण हल्ल्यानंतर सुमारे दोन तास ते कॉर्बेट उद्यानातच थांबले ही बाब मात्र खटकण्यासारखी आहे. या काळात तेथे चित्रिकरणही सुरू होते की काय हे आता एक राष्ट्रीय रहस्यच बनले आहे.
०००
तो ‘डुब्या’ क्षण…
नऊ-अकराच्या हल्ल्याची बातमी समजल्यानंतर अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी दिलेली अत्यंत मंद प्रतिक्रिया सर्व जगाने पाहिली. त्यावेळी ते एका शाळेत मुलांना गोष्ट वाचून दाखवत होते. त्यांना ती बातमी सांगण्यात आल्यानंतरही त्यांनी काहीच घडले नाही अशा पद्धतीने ते वाचन सुरूच ठेवले. डुब्या हे त्यांचे टोपण नाव. तो क्षण आता डुब्या मोमेन्ट म्हणून ओळखला जातो. कंदहार विमान अपहरण प्रकरणी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे तर तब्बल पावणेदोन तास अंधारात होते असे सांगण्यात येते. हे उजेडात आले ते वाजपेयांचे साहायक कांचन गुप्ता यांनी नंतर लिहिलेल्या एका लेखातून… आणि आता पुलवामा हल्ल्याची खबरही उशीरा मिळाली मोदींना आणि त्यानंतरही ते सभेला संबोधित करीत होते असे आरोप होत आहेत.
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ - रविवार विशेष - ता. २३ फेब्रुवारी २०१९)
Read more...
No comments:
Post a Comment