नाना पाटेकरांची एक प्रतिमा आहे. रांगडा आणि परखड मनुष्य
अशी. ते मोठे अभिनेते आहेतच. पण तिथंही पुन्हा हीच प्रतिमा आहे. तिथं त्याला फक्त
एक जोड असते. हळव्या रोमँटिकपणाची. नाना कविता-बिविता म्हणू लागतात, तेव्हा भलतेच
उबदार वाटतात. धनगरी घोंगडीसारखे. या प्रतिमांमुळं होतं असं, की नाना आपले वाटता
वाटता, त्यांचा दरारा वाटू लागतो. प्रत्यक्ष बाळासाहेबांना चार शब्द सुनावण्याची
ऐपत असलेला हा मनुष्य. त्यांच्या फटकळ वाणीचा दरारा वाटणारच.
नानांच्या अंधेरीच्या घरी जाताना त्यामुळे थोडी धाकधूकच
होती, की त्यांचा मूड असला तर बरं. रस्त्यात चार ठिकाणी पत्ता विचारत पोचलो,
तेव्हा संध्याकाळ झाली होती. इमारतीच्या खालून संपादकांनी त्यांना मोबाईल लावला.
त्यांनी खिडकीतून खाली डोकावलं आणि खणखणीत साद दिली – गिरीश...
म्हटलं, व्वा! अंधेरीच्या उच्चभ्रू सोसायटीत अशी वरून जोरात हाक मारणं हे
टिपिकलच!
Read more...