आणीबाणीच्या निमित्ताने...

26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत्र्यांचा संकोच झाला. हुकुमशाहीचा नंगानाच सुरू झाला... मग तमाम विरोधी पक्षांनी देशाला साद दिली : "अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली वगैरे. जयप्रकाश नारायण यांनी "संपूर्ण क्रांती'चा नारा दिला. भारतात दुसरे स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले...

आणीबाणीचे वाचन करण्याची ही एक पद्धत आहे. किंवा मग "अनुशासनपर्व' या विनोबाविरचित सूत्राद्वारेही तिचे मापन करता येते. यातील सत्य, अर्धसत्य आणि असत्य हा नंतरचा भाग. एक मात्र खरे, की महाराष्ट्रात आणीबाणीचे पहिले वाचनच अधिक "प्रतिष्ठित' आहे. येथील समाजवादी साथी आणि संघीय स्वयंसेवक यांनी गेली तीस वर्षे सांगितलेल्या आणीबाणीच्या कथा-कहाण्या वाचून कोणाचाही समज व्हावा, की इंदिरा गांधी ही एक भयंकर सत्तापिपासू बाई होती.

आणीबाणी हे एक सत्यच आहे. ते नाकारण्याचा प्रश्‍नच नाही. 26 जून 1975 ते 18 जानेवारी 1977 या कालावधीत देशातील आचार-विचार-उच्चार-संघटना स्वातंत्र्य गोठवून टाकण्यात आले होते. देश प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेला होता आणि आपल्या अंगभूत सरंजामशाही मूर्खपणामुळे या नोकरशहांनी अनेक ठिकाणी अतिरेक केला होता. संजय गांधी यांनी कुटुंबनियोजनाला प्राधान्य दिले. नोकरशहांनी अविवाहित युवकांपासून विधुर वृद्धांपर्यंत कुणाचीही नसबंदी करून या कार्यक्रमाचा विचका केला. (नसबंदी म्हणजे सुन्ता या गैरसमजानेही त्यात भरच घातली.) आणीबाणीत देशाला एक शिस्त आली होती, रेल्वे वेळेवर धावत होत्या, बाबूलोक कार्यालयांमध्ये कामच करू लागले होते, हे जितके खरे; तितकेच आणीबाणीत लालफीत होती, भ्रष्टाचार होता, शासकीय दमनशाही होती, बोलक्‍या मध्यमवर्गाला बोलायची सोय राहिलेली नव्हती आणि सर्वसामान्यांच्या जीवनात कोणताही फरक पडलेला नव्हता, हेही खरे.

18 जानेवारी 1977 च्या रात्री इंदिरा गांधींनी निवडणुका घेण्याची घोषणा केली. प्रश्‍न असा आहे, की या दीड वर्षांत असे काय घडले, की त्यामुळे इंदिरा गांधी यांच्यातील सत्तापिपासा शमली? जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस, नानाजी देशमुख, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे आदी नेत्यांच्या चळवळींमुळे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी मागे घेतली, असे म्हटले; तर इंदिरा गांधी यांच्यावरील सत्तांध, हुकुमशहा, फॅसिस्ट वगैरे आरोपांचे काय? अशा प्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्या हातात आलेली सत्ता कदापि सोडत नसतात. इंदिरा गांधी अशा प्रवृत्तीच्या नव्हत्या असे म्हणावे; तर मग असे काय झाले, की त्यांना आणीबाणी लागू करावी लागली?

"इंदिरा गांधी, द इमर्जन्सी ऍण्ड इंडियन डेमोक्रॅसी' या आपल्या पुस्तकात पी. एन. धर यांनी म्हटले आहे, की "आणीबाणीचा अर्थ जर कायद्याच्या राज्याचा संक्षेप हा असेल तर 26 जून 1975 च्या कितीतरी आधी ही लोकशाही पद्धत ढासळू लागली होती.' 1971मध्ये इंदिरा गांधी यांचे सरकार सत्तेवर आले. तोच बांगला देशाचा पेच निर्माण झाला. एक कोटी बांगला निर्वासितांमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा बोजा आला. त्यात युद्ध झाले. भरीस भर म्हणून 72 चा दुष्काळ. भारत-पाक युद्धानंतर अमेरिकेने मदत थांबविली होती. दुष्काळामुळे देशातील अन्नधान्याचे उत्पादन आठ टक्‍क्‍यांनी कमी झाले होते. 1973 मध्ये "ओपेक'ने तेलाच्या किमती चौपटीने वाढवल्या. त्यामुळे धान्य, खते अशा आयात वस्तूंच्या किमती वाढल्या. 1974च्या मध्यापर्यंत किमतीची पातळी 30 टक्‍क्‍यांवर पोहोचली. चलनफुगवटा आटोक्‍यात ठेवण्यासाठी काही अप्रिय निर्णय घेणे सरकारला भाग पडले. वेतनवाढीतील आणि जादा महागाई भत्त्यातील निम्मी रक्कम गोठविण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष मात्र वाढला. या वातावरणातच जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे संप पुकारला. तिकडे अहमदाबादमधील एल. डी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मेसचे दर वाढले म्हणून केलेल्या आंदोलनाने गुजरातेत वणवा भडकला. जेपींचे "नवनिर्माण आंदोलन' त्यातूनच सुरू झाले. अवघा देश अस्थिरतेच्या गर्तेत सापडला होता.

या सर्व घटनांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचेही संदर्भ होते. अमेरिका आणि चीन यांच्यातील मैत्रीपर्वाला नेमकी याच कालखंडात, 1971 मध्ये सुरूवात झालेली आहे. त्यात जन. याह्या खान यांनी किती मोलाची कामगिरी बजावली याचा तपशील वॉल्टर आयझॅकसन यांनी लिहिलेल्या किसिंजर यांच्या चरित्रातून मिळतो. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष निक्‍सन इंदिरा गांधींचा किती द्वेष करीत होते, हेही या पुस्तकातून समजते ः "नेहमीच्या संभाषणात, म्हणजे ते रागात नसतील तेव्हा इंदिरा गांधींचा उल्लेख "दॅट बिच' असा करीत असत. रागात असतील तेव्हा याहून घाणेरड्या शिव्या देत.' इंदिरा गांधी यांनी केलेले सिक्कीमचे विलिनीकरण, बांगला देश स्वतंत्र करून अमेरिकेच्या भूराजकीय योजनांना दिलेला छेद यामुळे अमेरिकेचा संताप झालेला होता. भारत-पाक युद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाबरोबर भारताने केलेला करार त्यांच्या नजरेत खुपत होता. 1974चा अणुस्फोट ही अमेरिका आणि चीनला मोठी चपराक होती. इंदिरा गांधींना सत्तेवरून हुसकावून देणे हे अमेरिकेच्या फायद्याचे होते. अमेरिकन कॉन्सुलेटमधील एक अधिकारी पीटर बर्ले हा नवनिर्माण आंदोलकांच्या सतत संपर्कात होता! चिलीत साल्वादोर अलांदे सत्तेवर आल्याने निक्‍सन बेचैन झाले होते. 1973मध्ये सीआयएने त्यांचा काटा काढला. तत्पूर्वी वाहतुकदारांनी संप करून चिलीतील अन्नधान्याची वाहतूक ठप्प केली होती. त्यामुळे मोठी भाववाढ झाली होती. भारतात ऐन दुष्काळात फर्नांडिस यांनी रेल्वे संप पुकारला होता. येथे चिलीची पुनरावृत्ती करण्याचा डाव आहे की काय अशी शंका इंदिरा गांधींना वाटत होती. बांगला देशात मुजीब सरकार उलथवून टाकण्याचे कट रचले जात असल्याचे गुप्तचरांचे अहवाल त्यांना मिळतच होते. (पुढे आणीबाणीनंतर दोनच महिन्यांनी, भारताच्या स्वातंत्र्यदिनी मुजीब रहमान यांची हत्या करण्यात आली.) जाने
वारी 1975मध्ये रेल्वेमंत्री एल. एन. मिश्रा यांची हत्या झाली.

इंदिरा गांधी यांची निवडणूक न्यायालयाने रद्दबातल ठरविली म्हणून, सत्ता वाचविण्यासाठी त्यांनी आणीबीणी पुकारली असा एक आरोप करण्यात येतो. मार्च 1971 मध्ये झालेल्या निवडणुकीत रायबरेलीतून बड्या आघाडीचे उमेदवार राजनारायण यांचा पराभव करून इंदिरा गांधी निवडून आल्या. त्यावर, बनावट शाईमुळे आणि भ्रष्टाचारामुळे त्या निवडून आल्या असा आरोप राजनारायण केला. अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. विठ्ठलराव गाडगीळ यांनी लिहिलेल्या अखेरच्या लेखामध्ये (12 जून 2001) या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. तो निकाल हा राजकीय कटाचा भाग होता, असा त्यांचा निष्कर्ष आहे. या खटल्याचा निकाल काय लागणार, हे त्यापूर्वी पंधरा दिवस आधी खुद्द इंदिरा गांधींनाही माहित होते! पुपुल जयकर यांनी इंदिरा चरित्रात हे नमूद केलेले आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वेंगलराव यांनी आपल्या जीवनकहाणीत स्पष्टच म्हटले आहे, की अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्या. जगमोहन सिन्हा यांनी जयप्रकाश नारायण यांना निकालाच्या आधी तब्बल दोन महिने, आपण इंदिरा गांधी यांच्या विरोधात निकाल देणार आहोत असे सांगितले होते. वेंगलराव यांच्या प्रमाणेच या गोष्टीची माहिती तत्कालिन राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी आणि पिलू मोदी यांना होती.

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली ती या परिस्थितीत हे समजून न घेतले तर ती इतिहासाशी प्रतारणा ठरेल. आणीबाणीचे समर्थन करण्याचा येथे सवालच नाही. "भाकरी की स्वातंत्र्य' असा प्रश्‍न एकदा खुद्द इंदिरा गांधींनीच केला होता. पण तो चूक आहे. म्हणूनच आणीबाणीही योग्य नव्हती. पण अनेकदा वास्तव आदर्शांवर मात करते. इंदिरा गांधी यांचे मूल्यमापन करताना हेही समजून घेतले पाहिजे.

(ता. 26 जून 2005च्या अंकासाठी.
आणीबाणीला 30 वर्षे झाल्यानिमित्ताने.)

No comments: