एका मूषकाची रोजनिशी

यावेळी आम्ही पणच केला होता. रोजनिशी लिहायचीच. नंतर मग सगळे विचारत बसतात, कसा झाला उत्सव? काय काय केलंत? सगळ्यात उंच मूर्ती कोणाची होती? आणि आपल्याला काही म्हणता काही आठवत नाही! आठवतं ते फक्त नाका-तोंडात गेलेलं समुद्राचं काळंखारं पाणी!! (विसर्जनानंतर पुढं सहा महिने फॅमिली डॉक्‍टरचे अंक कुरतडावे लागतात. तेव्हा कुठं प्रकृती संतुलन होतं!) तेव्हा ठरवलं. यंदा सगळं लिहून काढायचं! खरं तर हे संस्कृतातच लिहून काढणार होतो. पण मग म्हटलं, अखेर आपल्यालापण मुंबईत दहा दिवस राहायचंय! कुठं ना कुठं राज भेटणारच! कशाला उगाच पंगा घ्या! उद्या त्याने मराठीद्वेष्टे उंदीर मारा म्हणून पिंजरे लावले, तर केवढी पंचाईत व्हायची! त्यापेक्षा मराठीत लिहिलेलं बरं!! जमल्यास परत गेल्यावर अमृतातें पैजा जिंकता येईल! झालंच तर एखादं पुस्तकही काढता येईल!

बाप्पांना ही कल्पना सांगितल्यावर तर ते ताज्या माव्याचा मोदक मिळाल्याप्रमाणे खुश झाले. म्हणाले, उत्तम आयडिया आहे! त्यावर आम्ही म्हणालो, त्यांच्याकडूनच घेतलीय ही कल्पना. तर बाप्पा चक्रावलेच. म्हणाले, आयडियावाले आता पुस्तकंही प्रायोजित करायला लागले? झी मराठीवरचे कार्यक्रम कमी पडले की काय? तेव्हा आम्ही म्हणालो, त्याची काही आयडिया नाही! पण ही कल्पना आम्ही घेतलीय ती गोदातटीच्या उत्तमरावांकडून. गेल्या साहित्य संमेलनाच्या रणधुमाळीतही त्यांनी डायरी लिहिली आणि मग तिचंपुस्तक काढलं - "स्वागताध्यक्षाची डायरी' म्हणून. त्यावर बाप्पा म्हणाले, व्वा!! काढा काढा पुस्तक. हवं तर आम्ही साळगावकरांना सांगतो प्रस्तावना लिहायला. एकदा आमच्यावरचे लेख लिहून झाले की मग काय ते मोकळेच असतील!! बाप्पांची ही सूचना ऐकून आम्हांस अत्यंत आनंद झाला. साक्षात्‌ गणेशाचं पेटंट ज्यांच्याकडं आहे, ते आपल्या पुस्तकास प्रस्तावना लिहिणार, म्हणजे काय साधी गोष्ट आहे?

परंतु यामुळे आमच्यावरची जबाबदारी वाढली आहे. आता रोजनिशी अधिक "अनुभवसंपृक्त' करावी लागणार! तिच्यात "वास्तवाची दाहकता आणि शब्दांचं लालित्य' आणावं लागणार! म्हणजे यासाठी आता साहित्य सहवासात जाऊन काही पुस्तकं कुरतडावी लागणार! पण त्यासाठी वेळ कसा मिळणार? लालबागला आताच केवढी गर्दी झालीय. नवश्‍यांच्या रांगेतून वाट काढत चिवडागल्ली मार्गे निघायचं म्हटलं, तरी दोन दिवस जाणार! अजून महापौरांच्या हेलिकॉप्टरचीही काही बातमी नाही! नाही तर त्यातून जाता आलं असतं. डॉक्‍टरबाईंना इकोफ्रेंडली रिक्वेस्ट करायला हवी!!

------------------------------------------------------------------------------------------------------------------

खड्डे आणि आरास!

भाद्रपद, शुक्‍ल 5, शके 1930

ऐसे पाहा, नागपंचमी जाहली आणि नाशिक बाजावाले गावाबाहेर जाऊन तालमी करू लागले. इकडे मुंबैतील मंडळवाले मंडपसजावटवाले आणि मूर्तिशाळावाले यांस शोधू लागले. त्रस्त नाटकांचे त्रस्त निर्माते मस्त कंत्राटदारांच्या शोधात निघाले. त्याच सुमारास आमुच्या इटुकल्या मेंदूमध्ये ही रोजनिशी लिहिण्याची वेगळी (तुमची हरेक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी कैसी वेगळी असते, अगदी तैसी!) कल्पना फुटून आली! अगदी त्याच समयी आम्ही एक ठाम निर्धार केला होता, की काहीही झाले, अगदी उदईक राजभैया छटपुजेस गेले, तोगडियांनी रोजे धरिले, तरीही आपण मुंबैतील खड्ड्यांवर अवाक्षरही लिहावयाचे नाही! जाण्यासम अन्य विषय असतां आपण खड्ड्यांमध्ये का जावयाचे ऐसी सुज्ञ मूषकनिती त्यामागे होती!

किंतु आपण ठरवतो एक आणि होते एक! आपण राजीनामा देतो आणि तो कोणी स्वीकारीतच नाही! तैसे आमुचेही जाहले! आम्हांस मुंबैतील रस्ते व त्यांवरील खड्डे यांविषयी लिहिणे भागच पडले आहे. एका वाक्‍यखंडात सांगतो, येसमयी आमुच्या मिशा आणि शेपटी यादरम्यान ऐसा एकही अवयव नाही की जो झांजरलेला नाही! आम्ही बाप्पांना कालच स्पष्ट केले आहे, की येथून पुढे तुम्हांस मुंबैत फिरावयाचे असल्यास हवे तर गो कार्ड काढा! आम्ही वाहनसेवा देणार नाही!!

बाकी मग उत्सवास छानच प्रारंभ जाहला आहे. सर्वीकडे छानछान महागमहाग आरास केलेली आहे. लालबागच्या राजासमोरचे हत्ती पाहून तर आमुचे चक्षूच चक्रावले! केवढे ते अगडबंब हत्ती! काय त्यांचा सरंजाम! इतुकी गगनावेरी गेलेली महर्गता, टंचाईसदृश परिस्थिती (हे विलासरावांचे शासकीय मराठी! टंचाईसदृश म्हणजे हो काय? एकतर टंचाई असते किंवा नसते. टंचाईसारखे दिसणारे म्हणजे काय बरे? बाप्पांस एकदा पुसले पाहिजे.) ऐसे सर्व असतानाही महाराष्ट्र एवढे हत्ती पोसतो म्हणजे जय महाराष्ट्रच म्हणावयास हवे!! परंतु ते दिसतात अगदी इंद्राच्या ऐरावताप्रमाणे. तैसाच तो इंद्रास हेवा वाटावा ऐसा वडाळ्याचा जीएसबी गणपती. त्यांस तर आम्ही कुबेर गणपतीच म्हणतो! ती मूर्ती पाहून आम्ही बाप्पास विनोदाने म्हटलेही, की एवढे दागिने घालणारे दोनच पुरूष आमुच्या माहितीत आहेत. एक बाप्पा आणि दुसरे बप्पी!! परंतु बाप्पा तरी काय करणार? भक्ती हल्ली तोळ्यावर तोलली जाते ना! असो.

घरोघरीच्या दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन जाहले आहे. आता अवघी मुंबापुरी अधिकच फुलून जाईल. रस्त्यांवर पाय ठेवण्यासही जागा मिळणार नाही. तेव्हा लवकरात लवकर कोटातील शिर्डीचा देखावा पाहूनि घ्यावा. नंतर मग फेस्टिव्हले सुरू जाहली, की पुण्यास प्रस्थान ठेवावे लागेल. अर्थात यंदा त्याची तैशी काही चिंता नाही. एखाद्या चित्रवाणी वाहिनीवरून त्याचे थेट प्रक्षेपण होईलच. परंतु आपण समक्ष हजर राहण्याच्या तयारीत असलेले बरे. काय सांगावे, कदाचित सुरेश"सांई' आपणांसही स्वर्गलोकीचे हायकमिशनर म्हणून पाचारण करतील! बाप्पा त्यांना ही सुबुद्धी देवो!!

---------------------------------------------------------------------------------------------------

उत्सवाचे रंग
भाद्रपद, शुक्‍ल 6, शके 1930


ष्यप्राणी पण काय असतात ना एक एक! आम्हास पुसुन राहिलेत, की सेलेब्रिटिंनी कोणकोणचे व कायकाय नवस केलेत बाप्पांना? आम्ही का लंबकर्ण आहोत की मनकवडे? तयांचे नवस तयांना आणि बाप्पांनाच ठावे! प्रथम आम्हास हेच समजत नाही, की सेलिब्रेशन कुणाचे आहे? गणपतीबाप्पांचे की नेते-अभिनेत्यांचे? मग खरेखुरे सेलेब्रिटी कोण? या पृथ्वीतलावर कशाची काही टोटलच लागेनाशी झाली आहे हल्ली!!

किंतु अनुभवाने एक सांगतो, की सेलेब्रिटी नेते असतील, तर तयांचे नवस दोन प्रकारचे असतात. बोलावयाचे आणि करावयाचे! अखिल विश्‍वात शांती नांदू दे, पाऊसपाणी चांगले होऊ दे, तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे... येणेप्रकारचा दिवाळी भेटकार्डावरचा मजकूर हा बोलावयाचा नवस जाहला! वाहिन्यांचे लोक येतात ना पुढाऱ्यांच्या आरत्या टिपायला आणि ओवाळायला, तेव्हा त्यांच्या माईकांत मुख घालोनि हे नवस बोलावयाचे असतात. आणि करावयाचे नवस? त्याचा पत्ता तर तयांच्या हस्तास कर लावोनि "संकटी पावावे... निर्वाणी रक्षावे' असे, का कोण जाणे, पण मनःपूर्वक म्हणणाऱ्या (म्हणजे असे आमुचे निरिक्षण आहे हं!) त्यांच्या सौभाग्यवतींनाही लागत नसतो! ते ठिकाणी आमुच्यासम सामान्य मूषकाची काय कथा? असो. ते आणि तयांचे नवस!! त्याचा आपणां सामान्यांशी काही संबंध नसतो हेच एक परमसत्य!! पुनश्‍च असो.

कालपासूनि उत्सवास रंग भरू लागला आहे एवढे खरे! तो रंगही कसा अगदी ऑईलपेन्टसम घट्ट व चकचकीत! सायंसमयी एवढी पर्जन्यवर्षा झाली, परंतु त्यावरी शिंतोडे उडाले नाहीत! लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी तर हजारो लोकांनी म्हणे डबल शिफ्ट केली आठाठ तासांची! हीच तऱ्हा नागपुरी टेकडी गणेशापासून पुण्यनगरीतील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनरांगेची! समय कमी-जास्त भरेल, परंतु प्रतिक्षेमधील भाव तोच होता. मुंबापुरीच्या समस्त जन्तेला याबाबतीत मात्र आम्ही मानले हं! बेस्टचे वाहन स्टॅं. टा. नुसार पाच मिनिटे उशीरा आल्यास रांगेत ताटकळणारा मुंबैकर अस्वस्थ होऊन माता-भगिनीचे मनोमन स्मरण करू लागतो. आणि येठिकाणीच काय, परंतु एरवीही हर मंगलवारी सिद्धिविनायकाच्या रांगेत 15-16 कलाक आरामात उभा राहतो... बाप्पाकडे काही मागण्याकरीता! तो शाहरूख खाननामक अभिनेता एका जाहिरातीत "संतुष्ट मत रहो' ऐसा संदेश देतो, ते तर या समस्त असंतुष्टांचे अथर्वशीर्ष जाहले नाही ना? बाप्पांस पुसले पाहिजे. त्या रांगेतील ज्या प्राणीमात्राच्या मनी भेसळहीन भक्तीभाव असेल, त्यास मात्र आमुचा खास मूषकनमस्कार!

जाता जाता - काल पुण्यपत्तनी 19 हजार महिलांनी अथर्वशीर्षाचे एकसमयी एकसुरी पठण केले. अहाहा! नुसते हे एकोनि आमुचे कर्ण झंकारू लागले आहेत! किती सुंदर असेल नाही तो कोरस!!
-------------------------------------------------------------------------

पासाचा त्रास!
भाद्रपद शुक्‍ल 9, शके 1930

वडाळ्याहूनी भोईगल्लीतून परळासी आलो. तेथूनी राईट टर्न घेऊनी करीरोड गाठले. स्टेशनानजिकच्या गणेशास वंदन करूनी चिंचपोकळीकडे मोर्चा वळविला. गणेशगल्ली करूनी सरदार हॉटेलानजीक पोचलो, तोच तेथील एका बोळातल्या बिळात आमुचे एक आप्त आपुल्या फॅमिलीसह बैसलेले दिसले. मनोमनी म्हटले, हे तो येथील सन ऑफ सॉईल! (पक्षी - भूमिपुत्र. भूमीत बीळ करून राहणारा तो.) मग ते हा एकमेव मऱ्हाटमोळा उत्सव सोडूनि येथे ऐसे म्हाडाने बाहेर काढलेल्या भाडेकरूजैसे का बरे बैसले आहेत? त्यांस मूषकनमस्कार करूनी विचारिले, की सज्जनहो, आपली वस्ती तो लालबागेतील चाळीतील. मग ऐश्‍या उत्सवसमयी आपण येथे कैसे? त्यावरी आपल्या सुपुत्राच्या शिरावरील पिसाची रंगीबेरंगी कॅप सारखी करीत ते वदले, की आदरणीय साहेब, (बहुधा पूर्वी यांनी आराराबांच्या बंगल्यातल्या सत्काराच्या शाली कुरतडल्या असाव्यात! अन्यथा ऐसे संबोधन त्यांच्या ओठी कैसे यावे?) आप्तस्वकीयांच्या त्रासास कंटाळूनी आम्ही येथे तूर्तास वास्तव्य करूनी आहोत. तेव्हा त्यास पुसले, की कैसा त्रास? मग सध्या तुरूंगाबाहेर असलेल्या एखाद्या पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार का बरे केली नाहीत? तेव्हा ते बोलले, की तसा त्रास नाही. पासाचा त्रास आहे! आम्ही महदश्‍चर्याने वदलो, म्हंजे? तेव्हा तो भूमिपुत्र खुलासा करता जाहला, की गेल्या चार-पाच दिवसांत कोठूनी कोठूनी उंदिर येऊ लागलेत... कसलेही नाते लावितात, ओळखी सांगतात आणि म्हणतात, की राजाच्या दर्शनाचा पास द्या! परवा तर एक जण म्हणाला, की तुम्हांकडे "सकाळ' येतो, आमुच्याकडेही "सकाळ' येतो, तेव्हा आपण सकाळभाऊ. पास द्या! तयांची ती वैतागवाणी ऐकोनी आम्ही मनोमनी महदश्‍चर्य व्यक्त करूनी पुढे निघालो आणि पाहतो तो काय, केवढी गर्दी! केवढा जनसमुदाय!

गेल्या दोन-तीन दिवसांपासूनी खरोखरच अवघ्या गिरणगावची गणेशपंढरीच जाहली आहे! जणू गणोबाची जत्राच!! अगदी पिपाण्या-फुगे-कागदी तल्वारी-पिसाच्या टोप्या-लिंबू सरबतयुक्त जत्रा!! तिकडे भेंडीबाजार-कुर्ल्यात रमझानची जाग आणि इकडं गिरणगावात गणेशोत्सवाची. मुंबईस सध्या निद्रा नाही!!

असा अवघा मौजेचा माहोल सर्वत्र असताना, मधूनच मनी हलकीशी हुरहूर दाटूनी येऊ लागली आहे. परवा विलासराव बाप्पांचे दर्शन घेत होते तेव्हा, सुशीलकुमारजी बाप्पांपुढची समई लावत होते तेव्हा, त्यांच्याही डोळ्यांत ऐशीच काही हुरहूर दाटलेली आमच्या चर्मचक्षूंस दिसली होती.... कशाची बरे असेल ही हुरहूर? बाप्पांस पुसले, तेव्हा ते गळ्यातल्या नवलखा पुष्पहाराशी खेळत मिश्‍किलपणे म्हणाले, विसर्जनाचा दिन जवळजवळ येऊ लागतो, तेव्हा सकलांच्या मनीं ऐशीच हुरहूर दाटूनी येते!!

सत्य आहे! पाच दिवसांचा गणपती गेला. काल गौराईला निरोप दिला. पाहता पाहता अनंतचतुर्दशी उजाडेल! भेट कितीही काळची असो, तिच्यावर नेहमीच वियोगाची छाया का बरे असते? बाप्पास पुसले पाहिजे...

----------------------------------------------------------------------------

आम्ही परीक्षक!
भाद्रपद शुक्‍ल 10, शके 1930

पेडररोडला सूरसरस्वतीच्या उत्सवास काल जाऊनी आलो. तिचे नाम आशा! आता गणेशोत्सव सोडूनी आम्ही तिकडे का गेलो, ऐसा सवाल जया मनी उभा राहिल, तो वा ती नतद्रष्टच! कारण की, महाराष्ट्रात आल्यानंतर येथील सांस्कृतिक-सामाजिक जीवनात समरस होणे हे सहसा आवश्‍यकच आहे, ऐसे म्यां मूषकास वाटते! माणसांना काय वाटते, ते त्यांचे त्यांना ठावे! तेव्हा मानवी मनातील आशा सतत तेवती ठेवणाऱ्या त्या हिंदुस्थानी सूरांस वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊनी आम्ही परतलो. त्या सूरमयी कंठाचे वय लालबागच्या राजाइतुकेच आहे, हा एक विलक्षण योगायोग!! असो.

काल आणखी एक छानच गोष्ट घडली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीची विशेष व्यक्तींकरीताची रांग मोडीत काढण्यात आली! ऐशा गोष्टी सर्वत्र घडल्यास सर्वत्रांना किती बरे वाटेल बरे. गणनायक तर मोदभरे आणखी एक मोदकच मटकावील! अखेर त्या गणनायकापुढे व्हीआयपींची काय मिजास!

तिकडे पुण्यनगरीत कलमाडीसाईंचा फेस्टिव्हलही प्रचंड रंगात आलेला आहे. काल म्हणे हेमामालिनीबाईंचे नृत्य जाहले. ते याचि देही याचि डोळा पाहण्याची अति मनिषा होती. परंतु कार्यबाहुल्यामुळे नाही जाता आले! आता तुम्ही म्हणाल, की आम्ही येथे ऐसे कोणते कार्य करतो? तर त्याचे ऐसे जाहले, की एरवी आम्ही इकडे-तिकडे उंडारतच असतो, तेव्हा बाप्पाच म्हणाले, की मूषका, तू परीक्षक का बरे होत नाहीस? आम्ही चक्रावलोच. म्हटले, बाप्पा, तुमच्यासाठी परीक्षा देणे आणि परीक्षा घेणे यात काही अवघड नाही. एकदा पृथ्वीप्रदक्षिणेच्या परीक्षेस बसलात, तर नारदबुवांस हातोहात बनविले! आणि परीक्षा तर सर्वांचीच घेता तुम्ही! परंतु ते आम्हांस कैसे जमावे? त्यावर बाप्पा, डोळे बारीक करून मिश्‍किल हसले व वदले, की अरे मूषका, आपण गणेशदर्शन स्पर्धा घेऊ या. सार्वजनिक गणेशमंडळांची. म्हटले, व्वा! म्हणजे कोणत्याही मंडळाचा गणपती आपणांस विनासायास पाहता येणार. पण या परीक्षेस निकष तो कोणता लावावयाचा? बाप्पांना म्हटले, निकष जरा ऑब्जेक्‍टिव्हच ठेवा! म्हणजे निकालात मुंबै विद्यापीठासारखे घोळ होणार नाहीत. त्यावर बाप्पा म्हटले, बाकी झेंडू स्पर्धा सुरू आहेतच. तेव्हा आपण स्पर्धा घेऊ या सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या भक्तीची! ज्याची भक्ती अस्सल व थोर तो विजेता!...

काय सांगू तुम्हांस, त्या क्षणापासून आम्ही सारखे भिरभिरतोच आहोत. पण....

------------------------------------------------------------------------------------------
उत्साहावर पाणी!
भाद्रपद शुक्‍ल 11, शके 1930

भाद्रपदमासी हर्षमानसी पाऊस दाटे चोहीकडे... आम्हांला कविता सुचू लागलीये!
ंबैतल्या या भीजपावसाने बाहेर कोठे तोंड काढिता येईना... दिवसभर मंडपातच मस्त आरत्या आणि गाणी ऐकत बसूनी होतो. नंतर नंतर त्याचाही कंटाळा येऊ लागला. तशात रात्री मांडवाच्या मागारी चाललंय काय, म्हणूनी बघावयास गेलो, तर तीनपत्ती पाहण्यातच रमलो! खूपच जाग्रण जाहले. त्याकारणें या अवघ्या इकोफ्रेंड्‌ली गदारोळातही डोळ्यांच्या पापण्या फटाफट मिटत होत्या. पण निद्रादेवीही प्रसन्न होत नव्हती. दृष्टीसमोरी सारख्या त्या आल्प्स की कोठल्या पर्वतांच्या रांगा येत होत्या... तेथे म्हणे काही तरी ब्रह्मांडनिर्मितीचा कारभार होणार आहे! ते नेमके काय आहे? त्याने, ते टीव्हीवाले सांगतात, तसा प्रलय वगैरे खरोखरच होणार का? की त्या नुसत्याच अफवा? हे सर्व ब्रह्मांडनायकास विचारावयास गेलो, तर ते रागावलेच. म्हणाले, कशास त्या बाष्कळ हिंदी वाहिन्या पाहतोस? उगा बुद्धीभेदासी कारण!.. बुद्धिदात्याच्या या संतापाचे राज काय बरे असावे? काल राजा-राजभेट जाहली, त्याचा तर हा परिणाम नव्हे?

पण बाप्पा काहीही म्हणोत, आम्ही चित्रवाणी वाहिन्या पाहतो, ते बाप्पा शप्पथ, बाप्पांच्या दर्शनासाठीच! (परवा चुकूनी एक वाहिनी पाहिली... तर तेथे काही बापे आणि काही बायका एका घरात उघड्यावर राहताहेत, भांडताहेत, एकमेकांच्या कुचाळक्‍या करताहेत, ऐसे काही परमकिळसवाणे चाललेले! लोक ते चवीने पाहतात म्हणे! आम्ही मूषक बरे! रात्री घरभर फिरत असतो, पण असे नको ते पाहात बसत नाही!!) आणि या वाहिन्या आम्ही पाहात नसतो, तर आम्हांस ठाकरे-गणेशाच्या दर्शनाचा अलभ्य लाभ तरी मिळाला असता का? अहाहा! काय ती गणेशमुर्ती होती! हुबेहूब बाळासाहेब... अगदी तो काळा चष्मा, तो उंचावलेला हात आणि त्यावरी पांघरलेली ती भगवी शाल यांसह साक्षात बाळासाहेब! फरक फक्त सोंडेचा!! ती मूर्ती पाहूनी मनी आले, की बुलडाण्याच्या ज्या कोणा बाल गणेशोत्सव मंडळाने ती मूर्ती बसविली, ते धादांत बालच असावेत!! आम्हांस ही एक मौजच वाटते! या दहा दिवसांत आमुच्या गणोबांना काय-काय अवतार दिले जातात! परवा एका मंडपात गणोबा कृष्णावतारात बासरी वगैरे वाजवित उभे होते! माता सरस्वतींनी हे पाहिले, तर त्यांना निद्रानाश जडायचा!!

जाऊ दे... या पावसाने उगाच मनावर मळभ दाटून आलेय! नाही नाही ते विचार मनी येताहेत!! पर्जन्यराजा, विसर्जनाच्या दिवशी तरी जरा रजा घे रे बाबा...

-------------------------------------------------------

उत्सवाचा शो
भाद्रपद शुक्‍ल 12, शके 1930

अहाहा! आज कैसे मोकळे मोकळे वाटू लागले आहे! आम्हांस तर अगदी शीळ घालीत फिरावेसे वाटते आहे! नाही म्हटले, तरी मनी धास्ती व भीती व घबराट होतीच. भय ऐसे, की गणेशविसर्जनापूर्वी या वसुंधरेचेच विसर्जन होते की काय! परंतु बाप्पा असताना वार्ता विघ्नाची येणारच कैसी! तर तेणेप्रमाणे आल्प्सच्या कुशीत ब्रह्मांड निर्मितीचे कूट उलगडणे सुखरूप सुरू जाहले. ते कारणे आकाशगंगेच्या प्रवाहात किंचितशीही खळबळ जाहली नाही. ना महाप्रलय आला, ना जगबुडी जाहली! या प्रयोगाची वार्ता ऐकूनी बाप्पांच्या सोंडेआड एक मिश्‍किल हास्य तरळून गेल्याचे आम्ही या डोळ्यांनी पाहिले! उत्सवात तेच ते चित्रपटसंगीत व तेच ते फेस्टिव्हली कार्यक्रम व तेच ते सेलेब्रिटी मेकपी-चेहरे पाहूनी बाप्पांची अवस्थाही मराठी वाहिन्यांच्या प्रेक्षकांसम जाहली होती! विश्‍वनिर्मितीगूढउकलीच्या रिऍलिटी शोने त्यांस तेवढाच रिलिफ गावला असेल!! असो.

कालपासूनी आम्ही आमुचे वास्तव्य केशवजी नाईक चाळीतील बिळात हलविले आहे. बरे वाटले! आमुचे एक बिळकरी शेजारी सांगत होते, की बळवंतराव टिळकांनी 115 वर्षांपूर्वी येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली होती. ते व शिवाय आमुच्या स्नेहलताबाई देशमुखसुद्धा या चाळीच्या रहिवासी आहेत, हे ऐकूनी आम्हांस या चाळीबद्दल खूपच प्रेम दाटूनी आले. परंतु मुंबैकरांस काही या चाळीचे प्रेम वाटत नाही ऐसे दिसते. अन्यथा, इतुक्‍या ऐतिहासिक मंडळाच्या गणेशाकडे मुंबैने इतुके अगाध दुर्लक्ष केले नसते! असो. कालमहिमा म्हणतात, तो यासच!! आम्ही आमच्या बिळकरी शेजाऱ्यास यावरी एक छान व सुंदर तोडगा सुचविला. तो ऐसा, की गणेशाची मूर्ती बसवा न बसवा, परंतु डेकोरेशन किमती करा व हिंदी नट-मोगऱ्यांस सहर्ष पाचारण करा!! म्हणजे मग चॅनेलांचे कॅमेरे आणि भक्तांचे मोहरे येद वळतील!! अर्थात हेही असो.

तर आता या फेस्टिव्हलाचे शेवटचे काही दिवस (चुकूनी येथे "खेळ' असे म्हणणार होतो!) उरले आहेत. कोंकणातली मंडळी एव्हाना परतू लागली आहे. म्हणजे आता विसर्जनापर्यंत गर्दी वाढता वाढता वाढतच जाणार, हे नक्की. काल एवढी पर्जन्यवर्षा असूनही गर्दीत काही खंड नव्हता. आमुचे "साम'वेदी वार्ताहर सांगत होते, की उत्सवामुळे नाटक व चित्रपटगृहे गरीब मंडळांच्या मंडपांप्रमाणे ओस पडली आहेत. बरोबरच आहे, लाईव्ह मनोरंजन (वुईथ बाप्पाज भक्ती) ऐसा प्रयोग सुरू असताना, कोण त्या कचकड्याच्या पडद्यांकडे पाहिल बरे!! अर्थात हेही असोच...

-----------------------------------------------------------------------------------------------

बाप्पा कुणाचा?
भाद्रपद शुक्‍ल 12, शके 1930

गर्दी.
प्रचंड गर्दी, अफाट गर्दी, अलोट गर्दी, असीम गर्दी. रस्त्यात गर्दी, रेल्वेत गर्दी, रांगेत गर्दी, मंडपात (ती मात्र ओन्ली लालबागच्या राजाच्या व गणेशगल्लीतल्या) गर्दी! बाकीची गणेशमंडळे तैसी निवांत (व म्हणून कार्यकर्ते चिंताक्रांत) आहेत! बाप्पाचा महिमा अगाध; परंतु तो गाण्यास प्रसारमाध्यमे नसतील, तर त्याचा एका दुर्वेइतकाही उपयोग नाही! हा कली व काल महिमा!!

ऐसे सुविचार करीत आम्ही आमुच्या कृष्णविवरात (पक्षी - बिळात) पेंगत होतो, तोच अचानक आमुच्या कर्णसंपुटात एक तप्त वाक्‍य परप्रांतीयांच्या लोंढ्यासम घुसले! "बाप्पा कुणाचा?' ते ऐकताच आम्ही नाकावरच्या मिशांपासून शेपटीच्या शेंड्यापर्यंत झंकारून उठलो! ही वाणी कोणाची, ऐसे म्हणून आम्ही पाहू गेलो, तो काय! एका तारांकित वाहिनीवरूनी एक बालक तो सवाल पुसता जाहला होता. बाप्पा कोणाचा? व त्याचा सहकारी लालबागेतून उत्तर देत होता - की बाप्पा त्याच्या भक्तांचा!!

म्हटले, हा काही धार्मिक प्रश्‍नोत्तरांचा कार्यक्रम असेल... हॅलो सख्या ऐसा वगैरे! परंतु ती बालके संतापलेली होती व एकच चित्रफीत पुनःपुन्हा दाखवित होती. तेव्हा एकूण हा सर्व बिग बॅंग काय आहे, हे नीट व व्यवस्थित पाहावे म्हणोनी आम्ही चित्रवाणी संचासमीप गेलो व त्याच्या कर्ण्यास कर्ण लावूनी ऐकू लागलो. तेवरी आम्हांस जे समजले ते ऐसे, की लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महिला भाविकांस धक्काबुक्की करण्याचे जे महत्कार्य चालविले होते, त्यावरूनी हे तारांकित पत्रकार संतप्त जाहले होते. तयांच्या म्हणण्यानुसार, या गणराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तभाविकांस ते ठिकाणी मंत्रालयी मिळावी तैसी वागणूक मिळते. म्हणजे ऐसे की, सर्वसामान्यांच्या हातात धोंडा, सेलेब्रिटींना मणीहार.. (गणोबा, अजब तुझे सरकार!!) त्यांची चीड व राग व संताप स्वाभाविकच होता, परंतु आमुच्या मनी ऐसे आले, की त्यात काय इतुके? गणोबा असो वा विठोबा, देव तेथे बडवे असतातच!! (आणि या कलीत तो ते आणखीही कोठेकोठे असतात! ही अर्थात राज की बात!)

या सर्व प्रकरणात आम्हांस हसू आले ते मात्र या गणोबाच्या बडव्यांच्या अज्ञान-अंधःकाराचे! त्या वाहिनीनुसार, त्यांनी म्हणे वास्तविक ऐसा सवाल केला होता, की बाप्पा काय तुमच्या बापाचा आहे का? या सभ्यशिवराळ "प्रासादि'क प्रश्‍नाच्या मुळाशी अज्ञान-अंधःकाराशिवाय दुसरे ते काय असणार!!

परंतु हल्ली ऐसा "बाप रे' सवाल एकूणच वातावरणात गुंजतो आहे... पितृपक्ष समीप आला, त्याची तर ही चाहूल नसावी?

-------------------

सर्वत्रांस "जय गणेश'!
भाद्रपद शुक्‍ल 14, शके 1930

सारे काही मनोहर आहे... सभोवती छानछान आरास आहे... सुरेलसुरेल संगीत आहे... (अगदी "कोंबडी पळाली'च्या तालावरची गणेशगीतेसुद्धा आहेत!)... जोरजोरात बाप्पांचा नामगजर सुरू आहे (त्यात अधूनमधून उंदिरमामा की जय म्हणूनी आमच्याही नामाचा घोष होत आहे. मंत्र्याबरोबर पीएसही सलाम मिळावा, तैसे हे! किंतु बरे वाटते ऐकूनी!).... सारे काही मनोहर (अगदी पंतांच्या सुहास्य वदनासम!) आहे... परंतु आज हे सारेसारे उदास गमते आहे!!

गत नऊ दिन ऐसे भुर्रकन उडून गेले, की जैशी विलासरावांसाठी सत्तेची चार वर्षे! आज विसर्जनघटिका समीप आल्यावरी स्मरताहेत ते गतक्षण. किती मौजेचा काळ होता तो... आमुच्यासाठी आणि बाप्पांच्या भक्तांसाठीही! ही भक्तीची मौजच म्हणावयाची! अन्यथा कोण बरे वीस-वीस कलाक दर्शनरांगेत उभे राहिल? अन्यथा कोण बरे यष्टीत धादांत एका पायी उभे राहून "मुल्कातल्या गन्पती'ला जाईल? रात्रीच्या वेळी मम्मी, डॅडी आणि डॅडींच्या स्कंधावर आरूढ होऊन टुकूटुकू पाहणारे त्यांचे चिंटुकले सुपुत्र वा सुकन्या ऐसे दृश्‍य मंडपपरिसरात दिसे... सुरस व चमत्कारिक पोषाख घालून फिरणारी महाविद्यालयीन फुलपाखरेही दिसत... दर्शन वगैरे झाले की फटाफट दूरध्वनी यंत्राने श्रींची छायाचित्रे काढीत... सत्य सांगतो, आम्हांस ते पाहूनी गल्बलून येई! मनीं वाटे, पोरांच्या काळजाची अगदीच काही यंत्रे झालेली नाहीत!! पण आता ती गम्मत पुढच्या शुक्‍ल भाद्रपदापर्यंत पाहावयास मिळणार नाही...

गमतीचाच उत्सव आहे की हा! धार्मिक असूनही सर्वत्रांची मने जोडणारा, सर्वत्रांस रिझविणारा! काल आमुचे एक मूषकबंधू पुण्याहून परतले. ते सांगत होते, की अखिल मंडई मंडळात त्यांनी एक प्रचंड मोठे अघटीत पाहिले. ते ठिकाणी बाप्पांसमोर मुस्लिम बांधवांनी नमाजही पढला व बाप्पांची आरतीही साग्रसंगीत गायिली! मनीं म्हटले, हे पाहावयास टिळक महाराज हवे होते!!

पण मग आमुच्या इटुकल्या मेंदूत विचार आला, की बरे जाहले! टिळक महाराज आज नाहीत ते! कारण कीं, मग त्यांस अन्यही काही व काहीच्या बाही पाहावयास लागले असते! उदाहरणार्थ त्यांस मंडपात दिसला असता पैशाचा धूर, सत्तेचा मद, संपत्तीचे प्रदर्शन आणि खऱ्या भक्तीची-संस्कृतीची वणवण! त्यांस दिसला असता उत्सवाचा झालेला फेस्टिव्हल! त्यांस दिसली असती मंडळांची केविलवाणी स्पर्धा! भला मेरा गणपती तुम्हारे गणपती से उंच क्‍यूं नहीं!!.. बरे जाहले टिळक महाराज आज नाहीत!

किंतु हे सर्व असूनही हा उत्सव बहु थोरच आहे! त्यांस तुलना नाही, त्यास उपमा नाही!! म्हणोनी तर आता या समयी आमुच्या काळजात कालवाकालव सुरू आहे! समुद्राच्या खाऱ्या पाण्यात वा कृत्रिम जलाशयात बुडावे लागेल म्हणोनी नव्हे. कालवाकालव सुरू आहे ती वर्षभराच्या वियोगाच्या कल्पनेने!! आता वर्षभर कोठूनी ऐकावयास मिळणार तो बाप्पा मोरयाचा गगनभेदी गजर व ते "गणराज रंगी नाचतो'चे स्वर?.... निदान त्यासाठी तरी आम्ही पुन्हा येऊ पृथ्वीतलावर... बाप्पा मोरयांसोबत. तोवरी आमुचा "जय गणेश'!!

No comments: