सेलफोन, आपण आणि सेल्युलर जेल!

सुरुवातीचे अप्रुपाचे दिवस गेल्यानंतर आता मोबाईल ही एक बला वाटू लागणे हे तर कोणाच्याही बाबतीत घडतेच घडते. या मोबाईलने जीवनात काय क्रांती वगैरे केली असेल ती असेल. पण एक मात्र नक्की की त्याने आम्हाला एका कवितेतील ओळीचा अर्थ चांगलाच शिकवला आहे. ती ओळ आहे - "इतुके आलो जवळ जवळ, की जवळपणाचे झाले बंधन!' म्हणजे कोणत्याही वेळी आम्ही आपले अवघ्या जगाला उपलब्धच. कोणत्याही वेळी, खरं तर बहुधा अवेळीच कोणाचाही फोन येतो. अशा वेळी अनेकदा "हॅलो हॅलोला हलकट उत्तर' येतं तोंडावर. पण देण्याची सोय नसते. प्राज्ञा नसते...

मोबाईलचे बिल द्यावे लागते हे सोडलं तर अनेक फायदे आहेत, पण तरीही माणसाला काही प्रायव्हसी नावाची चीज आहे की नाही? या यंत्राला अमेरिकन लोक सेल्युलर फोन असं संबोधतात. खरं तर तो सेल्युलर जेल वाटू लागला आहे! फार काय अलीकडे अमेरिकेतही जवळ सेलफोन नसणं हे त्या माणसाच्या मोठेपणाचं माप ठरु लागलं आहे.

आता काही लोक असं म्हणतात, की माहिती आणि संपर्काच्या माध्यम क्रांतीने जग आणखी जवळ आणलंय. ते दिसतंच आहे म्हणा! दीड लाख खपाच्या डॅनिश पेपरानं आतल्या पानावर छापलेल्या व्यंगचित्रांमुळे भेंडीबाजार पेटतो म्हणजे जग भलतंच जवळ आलेलं आहे! आणि हे जवळ आलेलं जग आपल्या तमाम अस्तित्वाला आपल्या कवेत जखडून घेत आहे. एका डिजिटल आवर्तात आपण सारे छान गटांगळ्या खात आहोत. आणि गंमत म्हणजे आपल्याला त्याची सवयही होत आहे!

हे जे घडतं आहे ते चांगलं की वाईट?

हे ठरवणं एवढं सोपं नाही. कारण तुम्ही, आम्ही, आपण सारे या मॅट्रिक्‍सचाच एक भाग आहोत. वुई आर प्रोग्राम्ड्‌! आता यावर तुम्ही म्हणाल, की हे कसं काय? तुम्ही यावर असंही म्हणाल, की सध्याचं जग हे माहिती-तंत्रज्ञानाचं जग आहे. माहिती हे सामान्य जनांच्या हातातील अस्त्र आहे. टेलिव्हिजन, रेडिओ, इंटरनेट, टेलिफोन, नियतकालिकं ही सगळी माहितीची साधनं आहेत. आजच्या डिजिटल क्रांतीने हे सगळं आमच्या आवाक्‍यात आलेलं आहे. तर त्याने आपण कसे काय प्रोग्राम्ड्‌ होतो? तर याचं उत्तर असं आहे, की माहितीची साधनं आपल्या हातात आहेत हे ठीक. पण भाऊसाहेब, माहितीचं काय? ती कोणाच्या हातात आहे? तिच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? शिवाय या सगळ्या साधनांमुळे माणसाचं खासगीपण ओरबाडून काढलंय त्याचं काय?

माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे. पण कळप विचार करीत नाही. विचाराची प्रक्रिया ही पूर्णतः खासगी असते. माहितीच्या डिजिटल क्रांतीत गिलोटिनवर चढतोय तो हा खासगीपणा. "आपले आपण' असण्यातला खासगीपणा. आपल्या लक्षात येत नाही, पण माहितीच्या, संपर्काच्या साधनांनी माणसांचे छानसे कळप बनविले आहेत. एकसारखे वागणारे, एकसारखे बोलणारे, एकसारखे "विचार' करणारे! प्रत्येक माणसाला त्याची स्वतःची स्पेस असावी लागते. ती या डिजिटल क्रांतीने कमालीची आक्रसली आहे. म्हणजे एकीकडून मला केव्हाही फोन येणार आणि तो घ्यायला मी बांधील असणार. आता तुम्ही म्हणाल, की मोबाईल बंद करण्याची सोय असतेच की. पण मी फोन स्वीच ऑफ केला आहे, हे मोबाईल कंपन्यांच्या सौजन्याने समोरच्याला कळणारच. तेव्हा ती पंचाईत आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावर चहू दिशांनी महितीचा इतका मारा होणार, की मी कोणत्या टूथपेस्टने दात घासावेत येथपासून देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत माझं मत काय असावं येथपर्यंत सगळं दुसरेच कोणाचे अदृश्‍य मेंदू ठरवणार! बरं पुन्हा हे सगळं "एन्‌ मास' होणार. मास मीडियाचा का केवढा भीषण साइड इफेक्‍ट! आणि डिजिटल क्रांतीने तर हा मास मीडिया आणखी आणखी मासेसजवळ जातोय, म्हणजे बघा! यात सगळ्यात मोठी मौज म्हणजे यूएन वगैरेत जी मानवाधिकारवाली मंडळी आहेत, त्यांना चिंता पडली आहे ती डिजिटल डिव्हाईडची.

लोकांच्या हातात संगणक आले की ते स्वतंत्र होतात असा एक छानसा भ्रम पसरविला जात आहे. म्हणजे या लोकांचं म्हणणं काय, तर इंटरनेट हा जो प्रकार आहे, त्यामुळे कोणालाही कोणतीही माहिती सहजसाध्य झालेली असल्याने कोणाही माणसाला कोणीही गुलाम करू शकत नाही. कारण माहिती हे तर अस्त्र आहे. बहुधा चीनमध्ये इंटरनेटवरही सरकारी सेन्सॉरशिप लागू आहे, याची माहिती अशा लोकांपर्यंत अजून पोहोचलेली नसावी. पुन्हा इंटरनेट म्हणजे काही सार्वभौम संस्थान नाही. त्यावरही अमेरिकेचंच नियंत्रण आहे. आता युरोपियन युनियन, तिसरं जग अमेरिकेशी भांडत आहे, ते या नियंत्रणात आपलाही वाटा असावा यासाठी.
एकूण काय, तर आपण सामान्य ग्राहकजन अखेर माहितीचेच गुलाम. गुलामांच्या बेड्या घट्ट करण्यासाठी डिजिटल साधनं उपलब्ध आहेतच. ती त्यांनी विकत घ्यावीत. यारदोस्तांत गप्पा मारत असताना मोबाईल येतो. तेव्हा दोस्त सोडून मोबाईलवरच बोलत राहावं. टीव्हीवर, इंटरनेटवर वाट्टेल ते पाहावं. स्वतःला इन्फोटेन करून घ्यावं. आणि आपला मेंदू मोफत कंडिशन करून घ्यावा. वर पुन्हा आपणच आश्‍चर्यचकितही व्हावं, की काय पण क्रांती झालीय! आमच्या लहानपणी साधा ट्रंक कॉल करायचा म्हटला, तरी केवढी वाट पाहायला लागायची. आता काय, वन इंडिया वन नेशन!!

(पूर्वप्रसिद्धी - सकाळ, 2 मार्च 2006)

No comments: