रॉ विषयी आणखी काही...


अॅमेझॉनवरही आहे ते. 
त्यासाठी येथे क्लिक करा. रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा या पुस्तकाबद्दल नियतकालिकांतून, समाजमाध्यमांतून, तसेच ब्लॉगमधून बरेच लिहिले गेले. 
आनंदाचा भाग हा, की त्यातील सर्वच प्रतिक्रिया चांगल्या, पुस्तकाचे स्वागत करणाऱ्या होत्या. 

त्यांपैकी हे लेख. पहिला 'जनपरिवार' मध्ये प्रकाशित झालेला. जॉन कोलासो यांच्यासारख्या जाणत्या व्यक्तीने तो लिहिलेला आहे. 
तरुण आणि अभ्यासू पत्रकार नामदेव अंजना यांनीही या पुस्तकाबद्दल भरभरून लिहिले. आपल्या ब्लॉगनामा मध्ये ते लिहितात - 
काश्मीरप्रश्न ऐन भरात असताना आणि त्यावरून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धाडसाबद्दल, एक घाव दोन तुकडे’टाईप निर्णयक्षमतेबद्दल देशभर चर्चा सुरु असताना आणि त्यातच ‘गेल्या 70 वर्षात काय झालं?’ या प्रश्नाची अपार चलती असताना, रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ हे पुस्तक हाती आलं.
वाचताना खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकांबाबत बोलायचं झाल्यास याआधी लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे, अनुराधा पुनर्वसु अनुवादित ‘अमृता-इमरोज’, सारंग दर्शने अनुवादित ‘शोध राजीव गांधी हत्येचा’ आणि अवधुत डोंगरे अनुवादित ‘राजीव गांधी हत्या : एक अंतर्गत कट’ ही तीन पुस्तकं मी वेड्यासारखी वाचली होती. त्यानंतर बहुधा ‘रॉ’वरील हे पुस्तकच त्या वाचन-वेडानं वाचलवं असावं. पुढल्या पानावर काय आहे, याची भयंकर उत्सुकता मनात सातत्याने बाळदग अगदी भान हरपून हे पुस्तक पूर्ण केलं.
त्यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 


कर्ण उर्फ सौरभ यांनी त्यांच्या गप्पिष्ट या ब्लॉगमध्ये लिहिला आहे. त्यात ते म्हणतात - 
सध्या भारतीय गुप्तचर संस्थेच्या सूरस कथा सांगणारे भक्तिरसाने ओतपोत असे बरेच सिनेमे निघत आहेतते मला फारच सुमार वाटतात. गुप्तहेर संघटनेचं काम इतकं ग्लॅमर्स नसत याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे या असल्या सिनेमांपासून मी दोन हात दूरच राहतो.चांगल्या पुस्तकाचा शोध हा मराठीत लिहिलेल्या रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा” या पुस्तकावर येऊन थांबला. हे पुस्तक रवि आमले यांनी लिहिले आहे. पुस्तक आपल्याला सुरुवातीपासूनच खेळवून ठेवते...या पुस्तकात रॉ च्या फक्त यशस्वी कारवाया आहेत असे लेखकाने आधीच नमूद केल्याने पुस्तक एकतर्फी वाटत नाही...
ज्यांना भारतीय राजकारणगुप्तहेर संघटनात्यांच्या कारवाया यांबद्दल जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक योग्य आहे.
श्रीजीवन तोंदले यांनी त्यांच्या पुस्तक एक्स्प्रेस या ब्लॉगमध्येही त्यांच्या वाचकांना रॉचा परिचय करुन दिला आहे. त्यात ते लिहितात - 
२९३ पानाच्या या पुस्तकामध्ये तब्बल २४ प्रकरणाद्वारे लेखकाने रॉ च्या सर्व कामगिरीची माहिती मांडली आहे. ही सर्व कहाणी वाचल्या नंतर या संस्थेचा अभिमान वाटतो.
त्यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  

याबरोबरच प्रीतम कातकर, मुंबई यांनी मराठी पुस्तकप्रेमी या फेसबुक पेजवर या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. 

गणेश कुबडे यांनी त्यांच्या माझे मनोगत या ब्लॉगमध्ये या पुस्तकाबद्दल सविस्तर लिहिले आहे. त्यात ते म्हणतात - 
स्वातंत्र्यानंतर खरंच आपल्या देशात काय घडलं,त्यातील आव्हाने कोणती होती आणि तुटपुंज्या साधणासह आपण आंतराष्ट्रीय पटलावर कशी भरारी मारली याचा इतिहास बघवयाचा असेल तर एकदा हे पुस्तक अवश्य वाचावे. माझ्या या लेखात पुस्तकातील  पहिल्या प्रकरणाचा उल्लेख मी कुठेच नाही केला.प्रकरणाचे शिर्षक आहे “ याला म्हणतात “ रॉ ”…!अद्भुत प्रकरण आहे ते जानेवारी 1971 साली घडलेलं...जाणून घ्यायचं आहे ना,चला तर मग नक्की वाचा...जवळपास तीनशे पानांचं पुस्तक आणि चोवीस प्रकरणे असं या पुसकाचं स्वरूप आहे. वाचनाचा आनंद घेत वाचल्यास अगदी दोन ते तीन दिवसात संपूर्ण वाचून होऊ शकतं...
माझे मनोगतवरील हा लेख येथे वाचता येईल. वाचनवेडा या पुस्तकप्रेमींच्या फेसबुक पेजवर सिद्धार्थ जाधव यांनीही या लेखाची लिंक दिली आहे. 

याशिवाय अनेक वाचकांनी फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून या पुस्तकाबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. हे सर्व फार भारी होते... 
या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.


Read more...

पाऊस : पडद्यावरचा...

(लोकप्रभासाठी (५ ऑगस्ट २०१३) लिहिलेला हा लेख. ललित वगैरे ढंगातला. खरं तर परीक्षाच होती ती. आज त्याचंही हसूच येतंय... पण मज्जाही वाटतेय... ललितबिलित जमल्याची...) पाऊस. 
वर्षा. बारिश. रेन.
त्याचेही अनेक प्रकार.
कधी भुरभुरता. कधी भुताळा.
कधी मुसमुसता, दुःखाच्या मंद सुरांसारखा,
तर कधी मुसळधार, उमड घुमड बरसणारा.
पाऊस टीनच्या छतावर जलतरंग वाजवणारा.
रान आबादानी करणारा . मन सुलगवणारा.
रहमानांच्या जलरंगी चित्रांसारखा.

पण कुठे असतो हा पाऊस?
हा असा काव्यमय पाऊस ज्यांच्या गावात पडतो ते भाग्यवानच म्हणायचे.
आमच्या बीपीएल डोळ्यांना पाऊसधारांतले हे सौंदर्य कधी दिसतच नाही.
सौंदर्य पाहणा-याच्या डोळ्यांत असते असं म्हणतात. खरेच असेल ते. नाही तर आपला पाऊस असा कसा असता?  गद्य, संपादकीय पानावरच्या लेखांसारखा!

तसे आम्हीही मनातल्या मनात नन्ना रे नन्ना रे करत बरसो रे मेघा म्हणतोच की. पण त्या प्रत्येक ये रे ये रे पावसाला एका प्रार्थनेची पार्श्वधूनही असते आमच्या मनी. की, पड बाबा. हवाच आहेस तू. पण अवेळी धिंगाणा घालू नकोस. सकाळी ऐन कचेरीसमयी कोसळू नकोस. तेवढी लोकल अडवू नकोस. पण तो का आपलं ऐकणा-यातला असतो? पूरग्रस्त गावातल्या माणसांप्रमाणेच वेधशाळेला धाब्यावर बसवतो तो. तिथं आपलं सामान्यांचं आर्त काय ऐकणार तो? माणसाच्या हुकूमाचा ताबेदार असायला तो थोडाच चित्रपटातला पाऊस असतो?


Read more...

एक असतो बॉण्ड... जेम्स बॉण्ड !

ही बॉण्डची गारुडकथा...


तसं पाहिलं तर बॉण्डपटांमध्ये असं वेगळं काय असतं?
म्हणजे बघा, कथा एका हेराची असते. त्या हेराचं नाव असतं बॉण्ड... जेम्स बॉण्ड. मग एक खलनायक असतो. त्याचं मागणं लई नसतं. त्याला फक्त जगावर राज्य करायचं असतं. मग बॉण्ड त्याच्या मागे जातो. तिथं त्याला नायिका भेटते. मग तो त्या खलनायकाचा निःपात करतो. सुष्ट शक्तीचा दुष्ट शक्तीवर जय होतो आणि त्यानंतर बॉण्ड जग पुढचा बॉण्डपट येईपर्यंत सुखाने जगू लागतात.
सगळं कसं अगदी तसंच. १९५३च्या कसिनो रोयालपासून चालत आलेलं. एखाद्या पारंपरिक कथेसारखं.

पण तरीही चित्रपटगृहात नवा बॉण्डपट आला किंवा एखाद्या चित्रवाणी वाहिनीवर बॉण्डपटांचा रतीब सुरू झाला, की आपण सगळं कामधाम विसरून पडद्यासमोर जाऊन बसतोच. आपल्यातल्या अनेकांनी तर बॉण्डपटाची अनेक पारायणंसुद्धा केलेली असतील. आमचा महाविद्यालयातला एक मित्र तर आपल्या पिताश्रींना, हा इंग्रजी सुधारण्यासाठीचा स्वाध्याय आहे, अशी थाप ठोकून व्हिडिओ थिएटरात बॉण्डपटाचे दिवसभरातले सगळेच्या सगळे खेळ पाहात असे. नंतर इंग्रजीत नापास झाल्यानंतर त्याने पिताश्रींना खुलासा केला, की बॉण्ड मूळचा स्कॉटिश असला, तरी अमेरिकन इंग्रजीत बोलायचा. त्यामुळे गोंधळ झाला! असो. सांगायचा मुद्दा असा, की आताच्या बहुवाहिन्यांच्या काळातील तरूणाईला हे कदाचित समजणार नाही, पण पूर्वी एकूणच हॉलिवूडी चित्रपट पाहणं हे केवढं तरी जिकिरीचं काम होतं. मुळात ते चित्रपट उमजायचे, पण समजत नसत. समजणार कसे? ते समजण्यासाठी संवाद समजावे लागतात. आणि संवाद कळण्यासाठी त्यांचे उच्चार मेंदूस ध्यानी यावे लागतात. बोंब नेमकी तिच होती. ते काय पुटपुटताहेत वा गुरगुरताहेत हेच समजत नसे. त्यामुळे व्हायचं काय, की सगळ चित्रपट पाहिला, तरी रामाची सीता कोण हे कोडंच असायचं. तरीही आमच्या त्या पिढीने बॉण्डपट (आणि अन्य हॉलिवूडी मारधाडपट) बहुप्रेमाने पाहिले. आज तर तशी काही समस्याच नाही. म्हणजे आजच्या पिढीचं इंग्रजी अधिक सुधारलंय असं नाही. आज सबटायटल्सची सोय झालेली आहे इतकंच.

पण बॉण्डपटातील संवादांवर तसं फारसं काही अवलंबून नसायचं. कारण एकूणच चित्रपट हा द्वैभाषिकच मामला असतो. त्याला दोन भाषा असतात. एक बोलभाषा आणि दुसरी चित्रभाषा. आणि बॉण्डपट म्हणजे काही आपले मराठी बोलपट नसतात, की बोवा, चला सगळ्या पात्रांनी कॅमे-यासमोर ओळीने उभं राहा आणि नाटकासारखे म्हणा... म्हणतच राहा... संवाद. त्यामुळे नाही बोलभाषा समजली, तरी चित्रभाषेवर काम चालून जायचं. आणि हाणामारीची भाषा काय, जगात कोणालाही समजतेच. पण मग प्रश्न असा येतो, की आम्ही व्हिडिओगृहांमध्ये जाऊन पाहायचो ते सद्गुरू ब्रुस ली यांचे अभिजात मारधाडपट आणि जेम्स बॉण्डचे चित्रपट यांत काहीच फरक नव्हता का?

फरक होता. चांगलाच फरक होता. सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे हाणामारी, स्टंटबाजी वगैरे सगळं काही असलं, तरी बॉण्डपट हा कधीही निव्वळ मारधाडपट नसायचा. मारधाडपटाचा सर्व गरम मसाला असूनही तो त्याही पलीकडचा असे. मुळात बॉण्ड हा रावडी राठोड जातकुळीतला नाहीच. तो डर्टी हॅरी नाही, पॉल कर्सी नाही, जॉन रॅम्बो तर अजिबातच नाही. तो ब्रिटनच्या एमआय-६चा गुप्तहेर आहे. झिरो झिरो सेव्हन हे त्याचं सांकेतिक नाव. शिवाय तो रॉयल नेव्हल रिझर्व्हमध्ये कमांडरही आहे. पण म्हणून तद्दन हेरगिरीपट म्हणूनही आपणांस बॉण्डपटांकडे पाहता येत नाही. कारण बॉण्ड हा इथन हंट (मिशन इम्पॉसिबल) किंवा जेसन बोर्नही (बोर्न चित्रचतुष्टी) नाही. तो त्याच्याही पलीकडचा आहे. बॉण्ड हे रसायनच वेगळं आहे. त्याची मूलद्रव्यं वेगळी आहेत. त्याचा हा वेगळेपणा लक्षात आला, की मग समजेल, की जग त्याच्यासाठी एवढं वेडं का होत असतं? चित्रपटगृहात नवा बॉण्डपट आला किंवा एखाद्या चित्रवाणी वाहिनीवर बॉण्डपटांचा रतीब सुरू झाला, की सगळं कामधाम विसरून पडद्यासमोर जाऊन का बसत असतं?

०००


Read more...

नवं पुस्तक - प्रोपगंडाहे पुस्तक म्हणजे ‘प्रचारभान’मधील लेखांचे निव्वळ संकलन नाही. वृत्तपत्रीय लेखनाला दोन मर्यादा असतात. एक म्हणजे उपलब्ध जागेची आणि दुसरी संपादकीय भूमिकेची. ‘लोकसत्ता’त ही दुसरी मर्यादा कधीच जाणवली नाही हे येथे आवर्जून नमूद करायला हवे. एखाद्या लेखकास सदर दिले, म्हणजे ती जागा त्याची झाली. आपणांस पटत नसलेली वा आपल्या वृत्तपत्राच्या भूमिकेत बसत नसलेली मते तो मांडत असला, तरी ते त्याचे स्वातंत्र्य आहे. त्या लेखनस्वातंत्र्याच्या आड संपादकांनीही येता कामा नये, ही संपादक गिरीश कुबेर यांची भूमिका. पत्रकारितेत हे हल्ली दुर्मीळच. जागेची मर्यादा मात्र असतेच. त्या विशिष्ट शब्दसंख्येतच लेख बसवावा लागतो. त्यामुळे सांगण्यासारख्या बऱ्याच मजकुराला कात्री लावावी लागते. विस्तार टाळावा लागतो. पुस्तकाच्या पायात या बेड्या नसतात. या पुस्तकासाठी ‘प्रचारभान’मधील सर्वच लेखांचे पुनर्लेखन, संपादन केले. त्यात भर घालून ते अधिकाधिक माहितीपूर्ण व्हावेत असा प्रयत्न केला. या विषयाबद्दल नव्याने उपलब्ध झालेल्या माहितीची त्याला जोड दिली. सदरात जाऊ शकली नव्हती अशी काही प्रकरणे नव्याने लिहिली. यामुळे ‘प्रचारभान’च्या तेव्हाच्या वाचकांनाही या पुस्तकातून नवे काही वाचल्याचे समाधान मिळू शकेल, असा विश्वास वाटतो....
Read more...