एक असतो बॉण्ड... जेम्स बॉण्ड !

ही बॉण्डची गारुडकथा...


तसं पाहिलं तर बॉण्डपटांमध्ये असं वेगळं काय असतं?
म्हणजे बघा, कथा एका हेराची असते. त्या हेराचं नाव असतं बॉण्ड... जेम्स बॉण्ड. मग एक खलनायक असतो. त्याचं मागणं लई नसतं. त्याला फक्त जगावर राज्य करायचं असतं. मग बॉण्ड त्याच्या मागे जातो. तिथं त्याला नायिका भेटते. मग तो त्या खलनायकाचा निःपात करतो. सुष्ट शक्तीचा दुष्ट शक्तीवर जय होतो आणि त्यानंतर बॉण्ड जग पुढचा बॉण्डपट येईपर्यंत सुखाने जगू लागतात.
सगळं कसं अगदी तसंच. १९५३च्या कसिनो रोयालपासून चालत आलेलं. एखाद्या पारंपरिक कथेसारखं.

पण तरीही चित्रपटगृहात नवा बॉण्डपट आला किंवा एखाद्या चित्रवाणी वाहिनीवर बॉण्डपटांचा रतीब सुरू झाला, की आपण सगळं कामधाम विसरून पडद्यासमोर जाऊन बसतोच. आपल्यातल्या अनेकांनी तर बॉण्डपटाची अनेक पारायणंसुद्धा केलेली असतील. आमचा महाविद्यालयातला एक मित्र तर आपल्या पिताश्रींना, हा इंग्रजी सुधारण्यासाठीचा स्वाध्याय आहे, अशी थाप ठोकून व्हिडिओ थिएटरात बॉण्डपटाचे दिवसभरातले सगळेच्या सगळे खेळ पाहात असे. नंतर इंग्रजीत नापास झाल्यानंतर त्याने पिताश्रींना खुलासा केला, की बॉण्ड मूळचा स्कॉटिश असला, तरी अमेरिकन इंग्रजीत बोलायचा. त्यामुळे गोंधळ झाला! असो. सांगायचा मुद्दा असा, की आताच्या बहुवाहिन्यांच्या काळातील तरूणाईला हे कदाचित समजणार नाही, पण पूर्वी एकूणच हॉलिवूडी चित्रपट पाहणं हे केवढं तरी जिकिरीचं काम होतं. मुळात ते चित्रपट उमजायचे, पण समजत नसत. समजणार कसे? ते समजण्यासाठी संवाद समजावे लागतात. आणि संवाद कळण्यासाठी त्यांचे उच्चार मेंदूस ध्यानी यावे लागतात. बोंब नेमकी तिच होती. ते काय पुटपुटताहेत वा गुरगुरताहेत हेच समजत नसे. त्यामुळे व्हायचं काय, की सगळ चित्रपट पाहिला, तरी रामाची सीता कोण हे कोडंच असायचं. तरीही आमच्या त्या पिढीने बॉण्डपट (आणि अन्य हॉलिवूडी मारधाडपट) बहुप्रेमाने पाहिले. आज तर तशी काही समस्याच नाही. म्हणजे आजच्या पिढीचं इंग्रजी अधिक सुधारलंय असं नाही. आज सबटायटल्सची सोय झालेली आहे इतकंच.

पण बॉण्डपटातील संवादांवर तसं फारसं काही अवलंबून नसायचं. कारण एकूणच चित्रपट हा द्वैभाषिकच मामला असतो. त्याला दोन भाषा असतात. एक बोलभाषा आणि दुसरी चित्रभाषा. आणि बॉण्डपट म्हणजे काही आपले मराठी बोलपट नसतात, की बोवा, चला सगळ्या पात्रांनी कॅमे-यासमोर ओळीने उभं राहा आणि नाटकासारखे म्हणा... म्हणतच राहा... संवाद. त्यामुळे नाही बोलभाषा समजली, तरी चित्रभाषेवर काम चालून जायचं. आणि हाणामारीची भाषा काय, जगात कोणालाही समजतेच. पण मग प्रश्न असा येतो, की आम्ही व्हिडिओगृहांमध्ये जाऊन पाहायचो ते सद्गुरू ब्रुस ली यांचे अभिजात मारधाडपट आणि जेम्स बॉण्डचे चित्रपट यांत काहीच फरक नव्हता का?

फरक होता. चांगलाच फरक होता. सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे हाणामारी, स्टंटबाजी वगैरे सगळं काही असलं, तरी बॉण्डपट हा कधीही निव्वळ मारधाडपट नसायचा. मारधाडपटाचा सर्व गरम मसाला असूनही तो त्याही पलीकडचा असे. मुळात बॉण्ड हा रावडी राठोड जातकुळीतला नाहीच. तो डर्टी हॅरी नाही, पॉल कर्सी नाही, जॉन रॅम्बो तर अजिबातच नाही. तो ब्रिटनच्या एमआय-६चा गुप्तहेर आहे. झिरो झिरो सेव्हन हे त्याचं सांकेतिक नाव. शिवाय तो रॉयल नेव्हल रिझर्व्हमध्ये कमांडरही आहे. पण म्हणून तद्दन हेरगिरीपट म्हणूनही आपणांस बॉण्डपटांकडे पाहता येत नाही. कारण बॉण्ड हा इथन हंट (मिशन इम्पॉसिबल) किंवा जेसन बोर्नही (बोर्न चित्रचतुष्टी) नाही. तो त्याच्याही पलीकडचा आहे. बॉण्ड हे रसायनच वेगळं आहे. त्याची मूलद्रव्यं वेगळी आहेत. त्याचा हा वेगळेपणा लक्षात आला, की मग समजेल, की जग त्याच्यासाठी एवढं वेडं का होत असतं? चित्रपटगृहात नवा बॉण्डपट आला किंवा एखाद्या चित्रवाणी वाहिनीवर बॉण्डपटांचा रतीब सुरू झाला, की सगळं कामधाम विसरून पडद्यासमोर जाऊन का बसत असतं?

०००



बॉण्ड या नायक विशेषाची मूलद्रव्यं वेगळी आहेत असं जे वर म्हटलेलं आहे, त्याचा एक अर्थ असा आहे की तो आपला नेहमीचा नायक नाही. सगळीकडच्या चित्रपटांत परंपरेने चालत आलेला जो नायक आहे तो नेहमीच टिनोपॉली शुभ्रधवल आहे. कारण मुळात चित्रपटांतला संघर्ष हाच मुळी आपण कृष्णधवल चष्म्यांतून पाहात आलेलो आहोत. त्यामुळे आपला नायक सहसा राखाडी रंगातला नसतोच. तो सफेदच असतो. त्या अर्थाने तो अगदी नित्शेच्या स्वप्नातला सुपरमॅन असतो. (आता ब्लॅक किंवा नॉर चित्रपटकुळीला अशा सफेदीलाल सुपरमॅनचं वावडं असतं हे खरं. त्या चित्रपटांत तसं कोणीच एकतर चांगलं वा एकतर वाईट असं नसतं. असतात ते सगळेच परिस्थितीशरण असतात. पण बॉण्डला कुणी फिल्मनॉरमध्ये बसवणार नाही. असो.) बॉण्ड मात्र असा नाही. तो फक्त कर्तव्यकठोर आहे. आपली मोहिम फत्ते करण्यासाठी वाट्टेल ते करणारा आहे. त्यासाठी खोटं बोलावं लागलं, कुणाला फसवावं लागलं, कुणाची हत्या करावी लागली, तरी तो ते करणारा आहे. डाय अनादर डे मध्ये मिरांडा फ्रॉस्ट या डबल-एंजटच्या तोंडी एक वाक्य आहे. ती म्हणते : “आय नो ऑल अबाऊट यू... सेक्स फॉर डिनर, डेथ फॉर ब्रेकफास्ट. बॉण्डची ही जीवनशैली आहे. एमआय- नेच त्याला लायसन्स टू किल दिलेलं आहे आणि त्या परवान्याचा वापर करताना तो कुठेही कचरत नाही. पुन्हा तो धुम्रपान करणारा आहे. मद्याचा भोक्ता आहे. ड्राय मार्टिनी (शेकन नॉट स्टर्’!) हे त्याचं प्रिय पेय आहे. गोल्फ आणि जुगार हे त्याचे आवडते खेळ आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सुंदर ललना. त्याचा हा विकपॉइंट आहे. (२२ चित्रपटांत ५२ स्त्रिया!) एकंदर मदमस्त मदनिका हा बॉण्डभोवतीच्या पर्यावरणाचाच एक भाग आहे. (इअन फ्लेमिंग यांच्या कादंब-यांतल्या बॉण्डची आवड चित्रपटांतल्या बॉण्डहून मात्र जरा निराळी आहे. तिथं विविहित स्त्रिया हा त्याचा विकपॉइंट आहे.) थोडक्यात सांगायचं, तर नीतिमान, मर्यादापुरुषोत्तम, एकपत्नीव्रती वगैरे विशेषणं बॉण्डसाठी नाहीत. तो मर्त्य मानव आहे. नित्शेचा सुपरमॅन नाही. आणि डीसी कॉमिक्सचा सुपरमॅन तर त्रिवार नाही. बॉण्ड अचाट कारनामे जरूर करतो. प्रसंगी गाड्याबिड्यासुद्धा उडवतो. पण तो स्वतः -यापैकी गुरुत्वाकर्षण शक्ती मानणा-यांतला आहे. शिवाय आताचा डॅनियल क्रेगचा दबंग बॉण्ड सोडला, तर बाकीचे बॉण्ड पाहून वाटावं, की हातापायाच्या लढाईत आपले साऊथचे हिरोअण्णासुद्धा त्यांना भारी पडतील. तो ढिशूमढिशूम जरूर करतो, पण आपण हे पाहिलेलं आहे, की जवळजवळ प्रत्येक चित्रपटात बॉण्डने खलनायक वा त्याच्या साथीदारांच्या हातून मार खाल्लेला आहे. खलनायकाने त्याला कैद केलेलं आहे. अगदी डॉक्टर नो या पहिल्यावहिल्या बॉण्डपटातल्या शॉन कॉनेरी यांच्या बॉण्डपासून परवाच्या क्वांटम ऑफ सोलॅसमधल्या डॅनियन क्रेगच्या बॉण्डपर्यंत हे दिसलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही, की बॉण्ड द्वंद्वकलानिपुण नाही. याचा अर्थ एवढाच, की तो -मानुष नाही.

बॉण्डचं अपिल त्याच्या या अमानुष नसूनही नायक असण्यात आहे. इअन फ्लेमिंग हा बॉण्डचा जनक. त्यानी १९५३मध्ये क्वांटम ऑफ सोलॅस ही कांदबरी लिहून बॉण्डचा अवतार घडवला. आज फ्लेमिंग नाहीत. पण तरीही त्याचं संभवामि युगेयुगे सुरूच आहे. फ्लेमिंग यांच्या नंतर जॉन गार्डनर, रेमंड बेन्सन, सेबेस्टियन फॉक्स, जेफ्री डिव्हर यांसारख्या लेखकांनी (आणि बॉण्डचे हक्क असलेल्या ईऑन प्रॉडक्शन या कंपनीने) बॉण्ड मालिका जितीजागती ठेवली. मात्र फ्लेमिंग यांनी आपल्या पहिल्या कादंबरीत बॉण्डला जी स्वभाववैशिष्ट्यं दिली होती तीच अखेरपर्यंत कमी-अधिक फरकाने कायम राहिलेली आहेत. आता कालानुरूप बॉण्डच्या काही सवयी बदलल्या आहेत. त्याने दारू, सिगारेट कमी केली आहे. पूर्वी तो अॅस्टन मार्टिन चालवायचा. ती त्याला शोभायची. त्याच्या वेगवान आयुष्याची आवड असलेला साहसी तरूण या त्याच्या कव्हरसाठी ती त्याला उपयोगी पडायची. पण मध्यंतरी त्याची कारची आवडही बदलली होती. पीअर्स ब्रॉस्ननचा बॉण्ड शानदार बीएमडब्लू चालवत होता. मात्र क्वांटम ऑफ सोलॅसमध्ये डॅनियल क्रेगच्या हाती पुन्हा अॅस्टन मार्टिन दिसली होती. असे काही मुलाम्याचे बदल दिसले, तरी मूळचा बॉण्ड मात्र कायम आहे आणि तो बहुतांशी शॉन कॉनेरीच्या पहिल्या बॉण्डसारखा आहे. स्वभावाने थंड, प्रसंगी क्रूर आणि असंवेदनशील आणि त्याचवेळी छानशी विनोदबुद्धी असणारा, तरुणींना भुलवणारा, घुमवणारा, अधूनमधून प्रेम वगैरे करणारा, धाडसी आणि सगळं करून अंतिमतः विजयी होणारा. प्रचंड पुरुषी नायक.

कधी कधी असं वाटतं, की बॉण्ड गुप्तचर होता, म्हणून वाचला. अन्यथा त्याच्यासारख्या नायकाला स्त्री-वादी टीकाकारांनी केव्हाच फाडून खाल्ला असता. गोल्डन आयमधे एक प्रसंग आहे. बॉण्ड त्याच्या सहकारी महिलेबरोबर बीएमडब्लूमधून चाललेला आहे. रस्ता घाटवळणाचा आहे. अचानक त्याच्या मागून सुसाट वेगाने अॅस्टन मार्टिन येते. त्यात झेनिया ऑनअटॉप ही खलसुंदरी आहे. तिचा वेग आणि देहबोली त्याच्यातल्या पुरुषाला आव्हान देतात. आणि मग सुरू होते श्वास रोखून धरायला लावणारी कार रेस. त्या प्रसंगात बॉण्डशेजारी बसलेली त्याची सहकारी त्याला कार थांबवायला सांगतो. तो थांबत नाही. ती त्याला म्हणते, मला माहित आहे तू काय करतो आहेस ते. बॉण्ड विचारतो, काय करतो आहे?” ती म्हणते, यू आर जस्ट ट्राइंग टू शो ऑफ साइज ऑफ युअर... युअर... तो सुचवतो, इंजिन?” ती म्हणते, इगो. वाहनांची थरारक शर्यत हे तमाम बॉण्डपटांचं प्रेक्षणीय वैशिष्ट्य राहिलेलं आहे. पण हा प्रसंग केवळ शर्यतीचा नाही. तो बॉण्डच्या संवादातील छुप्या लैंगिकतेबरोबरच त्याच्यातल्या वळणदार पुरुषी अहम् वर भाष्य करणारा आहे. या प्रसंगाच्या अखेरीस बॉण्ड त्या खलसुंदरीला जिंकू देत नाही. तो तिला, लेडिज फर्स्ट म्हणत पुढं जाण्याचा रस्ता करून देतो. हे बॉण्डच्या पौरुषाला साजेसं असंच तो करतो. (पण हे शॉन कॉनेरीच्या बॉण्डने केलं नसतं. त्याने तिला पुढं जाऊच दिलं नसतं. पण त्याने ब्रॉस्ननच्या बॉण्डप्रमाणे महिला बॉसच्या हाताखाली कामही केलं नसतं. काळानुरूप बॉण्ड बदललाय त्याचं हेही एक उदाहरण.)

बॉण्ड हा असा आहे. स्वप्नातही जे आयुष्य जगताना तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांना घाम फुटेल, ते सहजी जगणारा, भोगणारा, उधळणारा. शत्रूला काहीही, अगदी काहीही करून मात देणारा आणि आवडलेल्या स्त्रीची शिकार करणारा. बॉण्डच्या लोकप्रियतेची जी अनेक कारणं आहेत, त्यातलं हे एक महत्त्वाचं कारण आहे. तो प्रचंड आदिम पुरुषी नायक आहे.

०००

शॉन कॉनेरी, जॉर्ज लेझनबी, रॉजर मूर, टिमोथी डाल्टन, पीअर्स ब्रॉस्नन आणि आता डॅनिअल क्रेग. पन्नास वर्षं, पाच अभिनेते आणि तेवीस बॉण्डपट. १९६२ पासून आजच्या स्कायफॉलपर्यंत या पाच जणांनी बॉण्ड नावाचं गारूड उभं केलं आहे. अर्थात त्यात लेझनबी आणि डाल्टन यांना फारसं श्रेय देता येणार नाही. कारण लेझनबीला फक्त एकच बॉण्डपट मिळाला आणि डाल्टनला दोन. रॉजर मूर हा त्यातला सगळ्यात भाग्यवान. सात बॉण्डपटांमध्ये त्याने बॉण्ड साकारला. म्हणजे शॉन कॉनेरीपेक्षा एक जास्त.

इअन फ्लेमिंगने भलेही बॉण्ड जन्माला घातला, पण शॉन कॉनेरी आणि रॉजर मूर या दोघांनी त्याला आपापला चेहरा दिला. आणि ते करता करता त्यांनी बॉण्ड घडवलाही. कॉनेरीने बॉण्डला त्याचं क्रोर्य आणि विनोदबुद्धी, त्याची उदासीनता आणि उद्धटपणा, सभ्यता आणि खलाधमता दिली. या सगळ्या टोकाच्या आणि अंतर्विसंगती असणाऱया स्वभाववैशिष्ट्यांमुळे कॉनेरीचा बॉण्ड हा एक गुप्तहेर म्हणून विश्वसनीय वाटला. अन्यथा एकाच वेळी जगातला सर्वोत्तम वुमनायझर आणि त्याच वेळी जगातला क्रूरतम किलर म्हणून त्याला कोणी सहन केलं असतं?  शॉन कॉनेरीने बॉण्ड असावा तर असाच, असा एक विश्वास दिला आणि परिमाणही. रॉजर मूरसुद्धा त्या पलीकडं फारसा गेलेला नाही. एक मात्र खरं, की त्याचा बॉण्ड हा अधिक देशप्रेमी वगैरे होता आणि त्याची विनोदबुद्धी फार चांगली होता. स्पाय हू लव्हड् मीमधे नायिकेच्या बाहुपाशात असलेल्या बॉण्डला संरक्षणमंत्री विचारतात, बॉण्ड, व्हाट डू यू थिंक यू आर डुईंग?” त्यावर बॉण्डचं उत्तर आहे, किपिंग ब्रिटिश एंड अप, सर. किंवा मॅन विथ गोल्डन गनमधलं मिस अँडर्स, तुम्हांला कपड्यात पाहून मी ओळखलंच नाही. हे वाक्य, या अशा विनोदांनी रॉजर मूरने बॉण्डला एक वेगळाच इंटेलिजन्ट चेहरा दिला. हा चेहरा एवढा वेगळा होता, की बहुधा मरणावरही वन-लाइनर मारणारा बॉण्ड हा जगातला पहिला नायक असावा. पीअर्स ब्रॉस्नन आणि डॅनिअल क्रेग यांचे बॉण्ड हे अर्थातच आजच्या काळातले बॉण्ड आहेत. अधिक आधुनिक. ब्रॉस्ननच्या बॉण्डची बॉस महिला आहे. आणि काहीही झालं तरी हा आपल्याशी रत झालेला आहे. त्यामुळे तो आपल्याला मारूच शकणार नाही, असा विचार कोणतीही स्त्री अन्य कोणत्या बॉण्डबाबत करू शकली नसती. पण वर्ल्ड इज नॉट इनफमधली इलेक्ट्रा किंग या खलसुंदरीला ब्रॉस्ननच्या बॉण्डबाबत तसं वाटून जातं, यातंच सारं काही आलं. डॅनिअल क्रेगचा बॉण्ड मात्र असा नाही. तो पाशवी आहे. बिनसलेला आहे. पण या बाबी त्याला प्रेमात पडण्यापासून रोखू शकत नाहीत. किंबहुना प्रेयसीच्या मृत्युमुळेच तो मनोमन विस्कटलेला आहे. शॉन कॉनेरीचा बॉण्ड क्रूरपणे खलांची व्यंकटी सांडणारा होता. क्रेग अधिक थंड आहे. पाशवी आहे.

तर या सगळ्या अभिनेत्यांनी इअन फ्लेमिंगने रचलेल्या सांगाड्यात प्राण फुंकून त्याला जीवंत केलं. मोठ्या विचारपूर्वक त्यांनी बॉण्डची प्रतिमा उभी केली. आणि आता त्याची एक वेगळीच गंमत झाली आहे. जॉर्ज ऑर्वेलच्या भाषेत सांगायचं, तर सगळे बॉण्ड समान आहेत, पण काही अधिक समान आहेत, असं काहीसं ते झालं आहे. लोकांना बॉण्ड आवडतो. पण विशिष्ट अभिनेत्याचा बॉण्ड अधिक आवडतो. त्याला त्या-त्या बॉण्डची स्वभाववैशिष्ट्यं, त्याचं एकूणच व्यक्तिमत्त्व हे खासच कारणीभूत आहे. पण आपण कोणाचा बॉण्ड पाहात मोठे झालो, या गोष्टीचाही त्यात महत्त्वाचा वाटा आहे. म्हणजे असं, की ब्रॉस्नन आणि क्रेग यांच्या बॉण्डवर मोठ्या झालेल्या आजच्या पिढीला शॉन कॉनेरी म्हणजे अगदीच देव आनंद वाटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

बॉण्डपटांच्या अर्धशतकी लोकप्रियतेत या अभिनेत्यांचं मोठंच योगदान आहे. पण म्हणून बॉण्डपटातल्या अन्य गोष्टींकडं दुर्लक्ष करता येणार नाही. बॉण्डला बॉण्ड बनविण्यात त्या गोष्टींचाही मोठा वाटा आहे. उदाहरणार्थ त्यातले खलनायक.

०००

आता आपल्याला हे माहितच आहे, की ढेकणाला मारून काही कोणी नायक बनत नाही. जगातले गाजलेले नायक पाहा. त्यांच्यासमोरचे खलनायकही तेवढेच मोठे होते. रामासमोर रावण होता. शेरलॉक होम्ससमोर प्रोफेसर मोरिआर्टी होता. आणि म्हणून त्यांच्या संघर्षाला धार आली होती. आता चित्रपटातलंच उदाहरण द्यायचं, तर जय-विरू आणि ठाकूर यांचा शोले गाजतो, कारण त्यांच्यासमोर कालिया वा सांभा नसतो. गब्बर असतो. शान पडतो कारण तिथं शाकाल हा अगदीच विनोदी असतो. बॉण्डचं भाग्य असं, की त्याच्या वाट्याला नेहमीच चांगला खलनायक आलेला आहे. आता यात गुस्ताव्ह ग्रेव्हज (डाय अनादर डे) सारखा एखाद-दुसरा नीरस अपवाद आहे. पण डॉ. नो, स्कॅरामँगा, अर्न्स्ट ब्लोफेल्ड, ते परवाच्या कसिनो रोयालमधला शिफ्रे किंवा क्वांटम ऑफ सोलॅसमधला डॉमनिक ग्रीन यांच्यासारख्या अनेक थोर खलनायकांनी बॉण्डपटांची आणि बॉण्डची उंची वाढवली आहे.

बॉण्डपटांचं हे वैशिष्ट्यच म्हणावयास हवं, की त्यांनी आपल्याला असे खलनायक दाखवले की ज्यांचा आपण स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो. मुळात एकविसाव्या शतकाच्या उदयापर्यंत, एखादी व्यक्ती वा कंपनी वा कार्टेल संपूर्ण जगावर राज्य करू शकेल, ही कल्पनाच आपण करू शकत नव्हतो. बॉण्डपटांनी ही अवास्तव वाटणारी भयकल्पना अत्यंत परिणामकारकरीत्या आपल्यासमोर ठेवली. जगावर राज्य करण्याची मनीषा असलेले, जगातलं सगळं धन गोळा करण्याचा हव्यास असलेले प्रचंड महत्त्वाकांक्षी असे खलनायक बॉण्डपटांनी आपल्याला दिले. खलनायक कसले, स्वतंत्र संस्थानंच होती. म्हणजे थंडरबॉल’, ‘डायमंड्स आर फॉरएव्हर अशा चित्रपटांतून दिसलेला अर्न्स्ट ब्लोफेल्ड, मूनरेकरचा ह्युगो ड्रॅक्स हे समजा खलनायक नसते, तर नासासारख्या एखाद्या अंतराळ संस्थेचे मालक असते! या ह्युगो ड्रॅक्सनं तर चक्क अंतराळस्थानक उभारलेलं होतं. त्यातून तो विषारी वायू सोडून पृथ्वीतलावरची सगळी माणसं नामशेष करणार होता आणि मग त्याने अत्यंत काळजीपूर्वक निवडलेल्या तरुण-तरुणींमधून पुन्हा एक निरोगी, सर्वांगसुंदर मानवजात तयार करणार होता. (हिटलरची आठवण येतेय ना?) स्पाय हू लव्हड् मीमधला स्टॉर्मबर्गही असाच. त्याने समुद्रतळी त्याची दुनिया वसवली होती. आपण भडकविलेल्या अणुयुद्धात एकदा का सगळं जग बेचिराख झालं, की मग इथं मानवजातीचा नवा इतिहास रचायचा, हे त्याचं स्वप्न होतं. अशा थोर खलनायकांशी लढून बॉण्ड जिंकत असतो, म्हणून तो महानायक असतो.

गेल्या पन्नास वर्षांत बॉण्डने अनेक खलनायकांशी झुंज दिली. पण त्यातले गाजलेले खलनायक आठवू गेल्यास (किंवा अर्थातच गुगलल्यास) काही मोजकी नावं पुनःपुन्हा समोर येतात. म्हणजे उदाहरणार्थ गोल्डफिंगर (गोल्डफिंगर), डॉ. कनांगा (लिव्ह अँड लेट डाय), फ्रान्सिस्को स्कॅरामँगा ( मॅन विथ गोल्डन गन) किंवा मीडिया मोगल इलिऑट कार्व्हर (टूमॉरो नेव्हर डाइज). या सगळ्या महान खलनायकांतला सर्वांत खतरनाक मानला जातो तो मात्र ब्लोफेल्ड. स्पेक्टर या जागतिक गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख. बॉण्डपटांत तो पुन्हा पुन्हा अवतरलेला आहे. नेमकं सांगायचं, तर सहा बॉण्डपटांमध्ये तो आहे. त्या प्रत्येकात त्याचा अवतार वेगळा आहे. कधी तो पूर्ण टकला आहे, कधी त्याच्या तोंडावर उभ्या वाराची जखम आहे तर कधी त्याला बुल्गानिन दाढी-मिशा आहेत. पण त्याची ती आवडती पांढरी मांजर आणि त्याचं क्रौर्य हे मात्र सर्वत्र कायम आहे. पहिल्या दोन चित्रपटांत (फ्रॉम रशिया विथ लव्ह आणि थंडरबॉल) तर त्याचा चेहरा दिसलासुद्धा नव्हता. दिसले होते ते त्याचे मांजराला कुरवाळणारे हात. पण त्या दर्शनातूनही त्याने बॉण्डच्या तोडीस तोड असा प्रभाव पाडला होता.

हे झाले मुख्य खलनायक. पण त्यांच्याहून अधिक मौज आणतात ते सह-खलनायक. एक वेळ ही थोरथोर खलनायकी प्रभावळ अवचट आठवणार नाही, पण तोंडात दातांऐवजी किर्लोस्करचा लोखंडी नांगर असलेला सात फुटी जॉज ( स्पाय हू लव्हड् मी, मूनरेकर) किंवा स्कॅरामँगाच्या ग्लासहाऊसमधल्या पिस्तुलद्वंद्वात बॉण्डला खेळवणारा क्रूर-बुट्टा निक नॅक ( मॅन विथ गोल्डन गन) किंवा आपल्या डोक्यावरची गोल हॅट फेकून माणसांचं शीर उडवणारा ऑडजॉब (गोल्डफिंगर) हे सह-खलनायक विसरणं शक्यच नाही. बरं हे सह-खलनायक एवढे निष्ठावान असतात, की आपल्या मालकाचा मृत्यू झाल्यानंतरही ते बॉण्डची पाठ सोडत नाहीत. त्याला मारण्याचा प्रयत्न करतातच. अनेक बॉण्डपटांचा शेवट या सह-खलनायकांच्या शेवटाने झालेला आहे. बॉण्डपटांचं तेही एक सांगण्यासारखं वैशिष्ट्य आहे.

०००

कधी कधी वाटतं, बॉण्ड हा जरी ब्रिटिश गुप्तचर असला, तरी बॉण्डपट हा धादांत अमेरिकी मामला होता. आणि म्हणूनच बॉण्डपटांना असे खलनायक लाभले आहेत. दुस-या कोणत्या देशातून बॉण्डपट निघाले असते तर ते नक्कीच कचकड्याचे वाटले असते. जगाचा विनाश करू शकण्याची शक्ती असलेला खलनायक आणि त्यांच्यापासून जगाची सुटका करणारा नायक यांची कहाणी तशी कोणीही मांडू शकले असते. त्यात फार काही अवघड नाही. अवघड आहे, ते ती पडद्यावरची कहाणी विश्वासार्ह बनवणं. हॉलिवूडला ते जमतं, याचं कारण हॉलिवूड अमेरिकेत आहे आणि अमेरिका जगाच्या मध्यभागी आहे, हे आहे. इथं एक गोष्ट तर अजिबातच विसरता कामा नये, की बॉण्डपटातला खलनायक हा एका महासत्तेसमोरची भोकाडी आहे, महासत्तेसमोरचा बागुलबुवा आहे.

आता बॉण्डचे जन्मदाते इअन फ्लेमिंग हे ब्रिटिश आहेत. ते ब्रिटिश साम्राज्याचे शिपाई होते. त्यांनी दुस-या महायुद्धात भाग घेतला होता. काही गोपनीय कारवायांतही ते सहभागी झाले होते. म्हटल्यावर त्यांचा बॉण्ड हा आपादमस्तक ब्रिटिश असणार हे स्वाभाविकच होतं. पण हा बॉण्ड जन्माला आला तेव्हा ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य मावळत आला होता. दुस-या महायुद्धाने ब्रिटनचं कंबरडं मोडलेलं होतं आणि अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्ता जन्माला आल्या होत्या. हिटलरचा नाझीवाद संपला होता आणि आता ब्रिटन आणि अमेरिकेसमोर शत्रू म्हणून साम्यवाद उभा ठाकला होता. फ्लेमिंगच्या पहिल्या कादंबरीतला खलनायक हा स्मर्श या संघटनेचा सदस्य आहे. आणि स्मर्श ही सोव्हिएत रशियाची (काल्पनिक) गुप्तचर संस्था आहे. फार काय, क्युबातील क्षेपणास्त्र प्रकरणावरून अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात अभूतपूर्व तणाव निर्माण झाला होता, कधीही अणुयुद्ध सुरू होईल अशी परिस्थिती होती, त्याच वर्षात डॉ. नो हा पहिला बॉण्डपट आलेला आहे. आणि अमेरिकेच्या क्षेपणास्त्र चाचण्यांत रेडिओ लहरींच्या साह्याने गडबड करून ती क्षेपणास्त्रं भलतीकडेच पाडण्याचं डॉ. नोचं कारस्थान होतं. बॉण्ड डॉ. नोच्या तळावरची अणुभट्टी नष्ट करून ते कारस्थान हाणून पाडतो, अशी त्या चित्रपटाची कथा होती. आता याला काही अगदी योगायोग म्हणता येणार नाही. थोडक्यात सांगायचं, तर साठ आणि सत्तरच्या दशकांतल्या बॉण्डपटांच्या पार्श्वभूमीवर ही साम्यवादाच्या भयगंडाने ग्रासलेली अमेरिका आहे. तेव्हाच्या सगळ्या बॉण्डपटांवर ही शीतयुद्धाची पडछाया स्पष्ट दिसते. किंबहुना पुढेही सगळ्याच बॉण्डपटांमध्ये अमेरिकेच्या सामुहिक भयभावनेला दृश्यरूप दिलेलं दिसून आलेलं आहे.

डॉ. नो, गोल्डफिंगर, थंडरबॉल, डायमंड्स आर फॉरएव्हर, ऑर युवर आईज ओन्ली, ऑक्टोपसी या बॉण्डपटांवर महासत्तांमधल्या क्षेपणास्त्रं आणि अणुबॉम्ब स्पर्धेमुळे निर्माण झालेलं वातावरण स्पष्ट दिसतं. १९८१ मध्ये आयबीएमच्या वैयक्तिक संगणकाने अमेरिकेतल्या संगणक उद्योगाचा चेहरामोहरा बदलला. उत्तर कॅलिफोर्नियातली सांता क्लॅरा व्हॅली तोवर सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध झाली होती. अमेरिकी उद्योगसंस्कृतीत सिलिकॉन चीप्स हे नवं चलनी नाणं बनलं होतं. जग या नव्या तंत्रक्रांतीकडे नवलचकीत नजरेने पाहात होतं. या गोष्टीकडे बॉण्डच्या खलनायकाची नजर वळली नसती तर नवलच. १९८३ ला आलेल्या व्ह्यू टू किलमधला खलनायक मॅक्स झोरीन सिलिकॉन व्हॅलीच्या मुळावरच उठलेला होता. भूकंपाने ही व्हॅली उद्ध्वस्त करून जगातल्या मायक्रोचीप मार्केटवर आपली एकाधिकारशाही निर्माण करण्याचा त्याचा डाव होता.

ऐंशीचं दशक हे ग्लासनॉस्त आणि पेरेस्त्रॉयकाचं होतं. याच काळात सोव्हिएत रशियाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. शीतयुद्ध शेवटाकडं चाललं होतं. ९१ला सोव्हिएत रशियाचं विभाजन झालं.   
अमेरिका, ब्रिटन आणि सोव्हिएत रशियातले संबंध सुधारले. पण लगोलग रशियात निर्माण झालेल्या अराजकसदृश परिस्थितीमुळे तिथल्या अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न पडू लागला. अशा काळात रशियातल्या अमेरिकाविरोधी शक्तींनी उचल खाल्ली तर काय, हा सवाल अनेकांच्या मनात होता. लिव्हिंग डेलाइट्स (१९८७) किंवा गोल्डनआय (१९९५) हे बॉण्डपटांमध्ये पाहा, हीच भयचिंता मुखर झालेली आहे.

रुपर्ट मर्-डॉकसारखा मीडिया मोगल जेव्हा चर्चेत असतो, तेव्हा एलिऑट कार्व्हरसारखा दहशतवादी माध्यम सम्राट बॉण्डपटातून येतो. (टूमॉरो नेव्हर डाइज). जगापुढे तेलाचा प्रश्न आणि प्रामुख्याने सर्बियासारख्या देशांतल्या तेलावर नियंत्रण कोणाचे असे मुद्दे गाजत असतात, तेव्हा इलेक्ट्रा किंग ही तेलसम्राज्ञी बनण्याची इच्छा असणारी खलनायिका आणि तिचा दहशतवादी मित्र अवरतो. ( वर्ल्ड इज नॉट इनफ). जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी उत्तर कोरियाला रोग स्टेटचा दर्जा दिल्यानंतर आपणांसमोर सौरशक्तीच्या साह्याने दक्षिण कोरियावर हल्ला करू इच्छिणारा गुस्ताव्ह ग्रेव्हज हा कोरियन खलनायक येतो. (डाय अनादर डे). 

सांगण्याचा मुद्दा असा, की बॉण्डच्या खलनायकांची मूळं अशी कुठंतरी अमेरिका सेंट्रिक जागतिक परिस्थिती असतात. आणि त्यामुळेच ते कितीही काल्पनिक असले, तरी वास्तविकतेच्या खूप जवळचे वाटतात. आणि मग अमेरिकेतलं मिलिट्री-इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, रशियन माफिया, कोलंबियन ड्रग कार्टेल, कार्लोस जॅकलसारखा मुक्त दहशतवादी हे जर या जगातलं वास्तव आहे, तर इथं बॉण्ड खलनायक असायलाही काही हरकत नाही, असं वाटून जातं. बॉण्डपटांचं यश या वाटण्यात दडलेलं आहे.

०००


एक गोष्ट मात्र इथं स्पष्ट केली पाहिजे, की बॉण्डपट म्हणजे काही सामाजिक वा राजकीय वास्तव मांडणारे समांतर चित्रपट नाहीत. मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन हेच चित्रपटाचं कार्य आणि प्रयोजन असल्याचं मिस सिल्क सांगतात. (संदर्भासाठी पाहा :  डर्टी पिक्चर). बॉण्डपटांचा अवतारही नेमका त्याचकरीता आहे. त्यात पौरुषत्त्व आणि हिंसाचाराचा गरम मसाला आहे. आणि त्याला बॉण्डगर्ल्स आणि गॅझेट्स यांची फोडणीही आहे.

बॉण्डपटातल्या स्त्रिया त्या बॉण्डगर्ल असं म्हणणं जरा जास्तच होतंय. कारण बॉण्डपटांमध्ये शीर्षक मोन्ताजपासून अखेरच्या नामनिर्देशांपर्यंत सहसा असा एकही प्रसंग नसेल, की ज्यात आपणांस बाईमाणूस दिसणार नाही. तिथं हॉटेल, क्लब, कसिनो, प्रवासी विमाने यांत मदनिकांचे ताफे असतातच. ते स्वाभाविकच आहे म्हणा. पण पाणबुड्या चालविणं, विमानं उडविणं अशा कामांतही तिथं महिलांना बहुधा आरक्षणच असतं. पण या साईड-हिरॉईन्सना काही बॉण्डगर्ल म्हणता येणार नाही. काही बॉण्डपटांमध्ये खलनायकांच्या सहायक म्हणूनही स्त्रीपात्रं आली आहेत. डायमंड्स आर फॉरएव्हरमधल्या एका प्रसंगात जिम्नॅस्टसारख्या उड्या मारत हसत हसत बॉण्डला चोप देणा-या बाम्बी आणि थंपर किंवा अगदी अलीकडची उदाहरणं द्यायची झाली तर सेक्सचा क्रूर आनंद घेतघेत आपल्या मांड्यांमध्ये चिरडून एखाद्याला मारू शकणारी झेनिया ऑनअटॉप (फॅमके जॅनसन, गोल्डनआय) किंवा डाय अनादर डेमधली एमआय-६ची गद्दार एजंट मिरांडा फ्रॉस्ट (रोजमंड पाईक) यांची नावं घेता येतील. रुपाने देखण्या, बांध्याने कमनीय, मादक, चलाख अशा बॉण्डगर्लसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या अर्हता असल्या, तरी बॉण्डच्या जीवावर उठलेल्या या बायांना काही आपण बॉण्डगर्ल ही बहुमानाची उपाधी देऊ शकणार नाही. बॉण्डचं पौरूषत्व अधोरेखीत करणं हेच त्यांचं खरं काम. त्यापलीकडं त्यांना जीव नाही.

वर्ल्ड इज नॉट इनफमधली इलेक्ट्रा किंग (सोफी मार्सू) ही रुपवान पण खलनायिका होती. तेव्हा तीसुद्धा बाद ठरते. फ्रॉम रशिया विथ लव्हमधली रोझा क्लेब हिचा आपण सर्व बॉण्डपटांतली खतरनाक खलनायिका म्हणून हवं तर सत्कार करू शकू, पण तिला एखादा गतिमंदही बॉण्डगर्ल म्हणू शकणार नाही. बॉण्डची महिला बॉस एम आणि एमआय- मधली बॉण्डवर मरमर मरणारी सेक्रेटरी मनीपेनी याही त्या चौकटीत बसत नाहीत.

खरी बॉण्डगर्ल होण्यासाठी ती आधी, मधी शेवटी लावण्यवती हवी. भल्याभल्यांना खुळावणारी हवी. बॉण्डची मैत्रिण हवी. एकवेळ चलाख नसली तरी चालेल, पण तिला प्रथम पाहताच तिची शिकार करावी अशी तीव्र इच्छा बॉण्डला व्हायला हवं. उदाहरणार्थ हनी रायडर. हे नाव घेतल्यावर काही आठवतंय?  

निळ्या समुद्राचा विशाल कॅनव्हास. किना-यावर मऊशार वाळू. थोडं अलीकडं हिरवीगार झाडं-झुडपं. शॉन कॉनेरीचा बॉण्ड तिथंच झुडपांत पडलेला आहे. अचानक त्याच्या कानावर गाण्याची लकेर येते. तो शुद्धीवर येतो. उठतो. पाहतो. लॉंगशॉटमध्ये समुद्राच्या लाटांमधून एक मेनका येत आहे. पांढरी टू पीस बिकिनी. हातात नुकतेच गोळा केलेले समुद्रीशंख आणि कमरपट्ट्याला शिकारीचा सुरा. ओठांवर अंडर मँगो ट्री हे गाणं. छान गुणगुणत आपल्याच नादात ती रुपगर्विता पुढं पुढं येत आहे. बॉण्डची नजर तिच्यावरून ढळत नाहीये. तो पुढे येतो. ती दचकते. घाबरते. त्याला विचारते, तू काय करतो आहेस इथं?... लुकिंग फॉर शेल?” बॉण्ड अत्यंत प्रामाणिकपणे खरंखरं सांगतो. तो म्हणतो, नो... आयम जस्ट लुकिंग!”

केवळ बॉण्डच नव्हे, तर अब्जावधी प्रेक्षकांनीही ते जे काही होतं ते पाहण्यासारखंच होतं म्हणून दाद दिलेली आहे. उर्सूला अँड्रेस ही अभिनेत्री या एका प्रसंगाने अल्टिमेट बॉण्डगर्ल म्हणून गणली गेली आहे. (पुढं डाय अनादर डेमध्ये हाच प्रसंग सही रे सही दिसला होता. तिथं ऑरेंज बिकिनीतली हॅले बेरी होती.) पण अंगात अन्यही काही गुण असलेली बॉण्डमैत्रिण म्हणून पहिलं स्थान दिलं जातं ते गोल्डफिंगरमधल्या पुसी गॅलोरला. (होनॉर ब्लॅकमन) ही गोल्डफिंगरची साथीदार. ती वैमानिक आहे. ज्युदोपटू आहे. विचार करणारी आहे आणि म्हणून नंतर ती बॉण्डच्या बाजूने येते आणि गोल्डफिंगरचा फोर्ट नॉक्समध्ये अणुबॉम्ब फोडण्याचा डाव उधळून लावण्यास मदत करते. पुसी गॅलोर ही केवळ प्रदर्शनीय  नव्हती, तर ती मॅच्युअरही होती. जी नंतर कसिनो रोयालमधल्या व्हेस्पर लिंडमध्ये (इव्हा ग्रीन) दिसली होती. तशीही व्हेस्पर लिंड ही जरा खासच बॉण्डगर्ल होती. तिने बॉण्डला प्रेमात पाडलं होतं. असं या आधी फक्त एकदाच घडलं होतं. ऑन हर मॅजेस्टिज सिक्रेट सर्व्हिसमध्ये. तिथं काऊंटेस ट्रेसी डी व्हिसेंझोने (डायना रिग) बॉण्डचं हृदय जिंकलं होतं. त्यांचं लग्नही झालं होतं.

आता बदलत्या काळानुरुप बॉण्डमैत्रिणींचं स्वरूप आणि व्यक्तिमत्त्वं किंचित बदलत गेलं आहे हे खरं. अर्थात तशी उदाहरणं कमीच आहेत. कसिनो रोयालमधली हिशोबी अन् चलाख व्हेस्पर लिंड, टूमॉरो नेव्हर डाईजमधली मार्शल आर्टपटू कर्नल वाई लीन (मिशेल येओह) अशी काही नाव या संदर्भात घेता येतील. पण एकंदरच या सगळ्या बॉण्डगर्ल काय किंवा बॉण्डपटांतल्या (अर्थातच काही अपवाद वगळून) खलनायिका वा सह-खलनायिका काय, त्यांचं आणि बॉण्डचं नातं हे नेहमीच लैंगिकतेच्या सीमेआत-बाहेर तरळत राहिलेलं आहे. अनेकदा तर असं वाटतं, की बॉण्डपटातली निरनिराळी गॅजेट्स, तशाच या बॉण्डगर्ल. बॉण्डचं पौरुषत्त्व अधिक निखरुन यावं म्हणून योजलेल्या क्लृप्त्या. त्या जर बॉण्डसारख्याच हुशार अन् धाडसी (आठवा मिशेल येओह किंवा हॅले बेरीच्या बॉण्डगर्ल) वगैरे बनत चालल्या, तर मग बॉण्डचं महत्त्वं ते काय राहिलं?

०००

बॉण्ड म्हटला की एकवेळ पटकन् बॉण्डगर्ल्स नजरेसमोर येणार नाहीत, पण त्याची गॅजेट्स मात्र कोणीही विसरू शकणार नाही. स्टाईल इज मॅन म्हणतात. निरनिराळी चित्रविचित्र उपकरणं ही बॉण्डची स्टाईल होती. बॉण्ड हा कधीही सुपरमॅन नव्हता. त्याच्याकडं कोणतीही अनैसर्गिक शक्ती नव्हती. पण तो नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः असा राहिला, कारण त्याच्याकडं ही अफलातून उपकरणं होती. अफलातून म्हणजे ती किती अफलातून असावीत? साधं त्याचं घड्याळ घ्या. त्यात होमिंग डिव्हाईस असतं. स्फोटकं असतात. लेसर असतं. कुणाशी संवाद साधायचा तर त्याची सोय असते. कुठं लटकायचं, तर अतिभक्कम वायर असते आणि कुणाचा गळा आवळायचा तर तशी तारही असते. त्याच्या पेनमध्ये बंदुक असते, त्याची ब्रिफकेस जोरजबरदस्तीने कोणी उघडलीच तर त्यातून विषारी वायू येण्याची व्यवस्था असते. त्याच्या गॉगलमध्ये एक्स-रे व्हिजन असते आणि क्रेडिट कार्डमध्ये कोणतंही कुलुप उघडणा-या चाव्या असतात. आणि त्याची कार...

बॉण्डची कार हे खरोखरच वेगळंच प्रकरण आहे. ती वेगवान आणि बुलेटप्रूफ असणार हे तर ठरलेलंच आहे. पण तिच्यात कधी पॅराशूट असतात, तर ती कधी पाण्याखालीही चालू शकते. तिचं पॅसेंजर सीट हवं तेव्हा उडवून देता येतं, तर तिच्या हेडलाईटच्या आड कधी क्षेपणास्त्रं असतात. या कारमधून टायर पंक्चर करणारे खिळे, रस्ता निसरडं करणारं तेल, धूर असं काहीही निघू शकतं. एका बटणावर तिच्या नंबर प्लेट बदलू शकतात. तिच्या डॅशबोर्डमध्ये फर्स्ट एडचं सामान असतं आणि बॉण्डच्या शरीरातल्या एका मायक्रोचीपमुळे तो कुठंही असला, तरी लंडनमधून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणं शक्य असतं. बॉण्डची कार हे खरं तर, ज्यांच्या ज्यांच्या मनात एक लहान खट्याळ मूल दडलेलं आहे त्या प्रत्येकाचं स्वप्न असतं.

बॉण्डची उपकरणं हा खरोखरच बॉण्डपटातला मोहवून टाकणारा, आकर्षित करणारा भाग आहे. ती नसती, तर बॉण्ड नक्कीच अधुराच वाटला असता. ती नसती, तर बॉण्ड आणि अन्य नायकांत तसा काही फरक राहिला नसता.

०००

जेम्स बॉण्ड झीरो झीरो सेव्हन हा नायक गेली पन्नास वर्षं तुमच्या-आमच्या मनावर राज्य करतो आहे. आपल्या मनातल्या फँटसी शमवतो आहे. नव्या फँटसी निर्माण करतो आहे. त्याचं हे जे गारूड आहे ते शब्दातीत आहे. गेल्या तेविसेक चित्रपटांतून त्याने आपल्या मनाच्या कोप-यातल्या आदिम भावनांना कुरवाळलं, भयगंडांना गोंजारलं, पौरुषत्त्वाला गौरवलं. आणि ते लोकप्रिय झालं. झालं ते चांगलं की वाईट हा आपला प्रश्न नाही. तसेही बॉण्डपट हे काही सामाजिक नैतिकतेचे वहन करणारे चित्रपट म्हणून ओळखले जात नाहीत. आज ते लोकांना भावत आहेत. उद्या कदाचित ही मालिका बंदही होईल. कालप्रवाहात कदाचित बॉण्डही कालबाह्य ठरेल. सतत बदलत्या जगात काय बदल होतील हे कोणी सांगावं? पण आज इथं एक मात्र सांगता येईल, की या चित्रपटांनी गेल्या काही पिढ्यांना नक्कीच रिझवलं. जेम्स बॉण्डच्या खात्यावर एवढी तर श्रीशिल्लक इतिहासपुरुष नक्कीच ठेवील.

- रवि आमले
(पूर्वप्रसिद्धी लोकप्रभा - दिवाळी २०१२ http://www.lokprabha.com/diwali2012/diwali0201201.htm )

No comments: