‘आपल्या’ हिंदू धर्मावरील संकट

शिर्डीचे साईबाबा हे परमेश्वर आहेत की नाहीत हा प्रश्नच मुळी हास्यास्पद आहेत. हिंदूंच्या धर्मसंसदेने त्यांना देवत्त्व आणि गुरुपद नाकारले आहे. पण त्याला व्यवहारात खरोखरच काही अर्थ नाही. कारण तो अखेर श्रद्धेचा प्रश्न आहे. कोट्यवधी हिंदू आणि मुस्लिम त्यांना संत, गुरु, भगवान मानतात. त्यामुळे द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांना लुटेरा, वेश्यापुत्र, मांसाहारी म्हटले, त्यांच्या भक्तांना संक्रामक बिमारी झाली आहे अशी टीका केली किंवा शंकराचार्यांच्या नेतृत्त्वाखाली छत्तीसगढमधील कवर्धा येथे झालेल्या धर्मसंसदेने साईबाबांच्या मूर्ती उखडून गंगेत फेकण्याचा आदेश दिला म्हणून काही कोणताही साईभक्त साईबाबांची भक्ती सोडणार नाही. मुस्लिमांबाबत प्रश्नच नाही. त्यांना हा आदेश मानण्याचे बंधनच नाही. पण तसे तर ते हिंदू धर्मियांवरही नाही. तरीही शंकराचार्य वगैरे मंडळींची धर्मसंसद हा आदेश देते. गुजरातेतील बलसाडमधील शिवमंदिरात लगोलग त्याचे पालन केले जाते. त्या आधी उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका मंदिरातून अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते बळजबरीने साईबाबांची मूर्ती हटवतात. गायब करतात. जिल्हा प्रशासन तिचा शोध घेत आहे, तर त्याला विरोध करतात. या सर्व घटनांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. याचे कारण हा केवळ साईबाबांच्या भगवान असण्या-नसण्याशी संबंधीत प्रश्न नाही. तर हिंदू धर्माचे आजवरचे स्वरूप पालटण्याच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक छोटासा परंतु महत्त्वपूर्ण भाग आहे.

Read more...