वृत्तकथा - सर, यह गेम है…


काश्मीरमधील एका बड्या पोलिस अधिका-याला दोन बड्या दहशतवाद्यांसह अटक झाली. या अटकेने अनेक प्रश्न समोर आणले आहेत. पुलवामातील आत्मघातकी दहशतवादी हल्ला, संसदेवरील हल्ला यांबाबतही काही सवाल निर्माण झाले आहेत. हे सारे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असे प्रकरण आहे. पण त्याची चर्चा काही तेवढ्या तडफेने होताना दिसत नाही. असे का? नेमके हे प्रकरण आहे तरी काय?… 
ही गेल्या आठवड्यातील बातमी आहे. अनेकांनी ती वाचलीही असेल. पण हल्ली आपणपाच मिनिटांत शंभर बातम्याअशा धुवांधार वर्षावात सतत भिजत असतो. त्यामुळे लक्षात तरी किती आणि काय ठेवणार
शिवाय एखादी बातमी किती महत्त्वाची आहे, ती आपण लक्षात ठेवायची की नाही, त्यावर विचार करायचा की नाही हे ठरविणे आपल्या हातात नसतेच. त्याचा दूरनियंत्रक दूर तिकडे वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांतील बड्या अधिका-यांच्या हातात असतो. ते तिकडे ठरवित असतात, की राष्ट्राला काय जाणून घ्यायचे आहे ते. त्यामुळे आपण ज्या बातमीबाबत बोलत आहोत, तीही तशी पुचाटपणेच आपल्यासमोर आली. बातमी महत्त्वाची असेल, तर पत्रकार सातत्याने तिच्या मागावर असतात. नवनवी माहिती आपल्याला देत असतात. बातमीचाफॉलोअपम्हणतात त्याला. तो घेतलाही गेला. पण तुकड्यातुकड्याने. ना त्या बातमीचे सणसणीत हॅशटॅग चालविण्यात आले, ना तिच्यावर चर्चेचा मासळीबाजार भरविण्यात आला. जणू या काही वृत्तवाहिन्यांच्या दृष्टीने त्या बातमीतदम' नव्हता. वस्तुतः राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न होता त्यात. काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावर अपहरणविरोधी पथकाचा प्रमुख असलेल्या एका बड्या अधिका-याला - पोलिस उपअधिक्षक देवेंद्रसिंग (वा देविंदरसिंग) यांना अटक झाली होती. हल्लीब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात कोणी केळीच्या सालीवरून पाय घसरून पडले तरी त्याला खळबळजनक म्हणतात. खरेतर खळबळजनक होती ती ही बातमी - एका वरिष्ठ पोलिस अधिका-याला दोन खतरनाक दहशतवाद्यांसह अटक झाल्याची
तो दिवस होता शनिवार. तारीख 11 जानेवारी
काझीगुंड हे अनंतनाग जिल्ह्यातील एक शहर. श्रीनगरला जम्मूशी जोडणारा महामार्ग तेथूनच जातो. या महामार्गावर पोलिसांचे चेकपोस्ट असणे काही नवे नाही. पण त्या दिवशी त्या चेकपोस्टवर जरा तणावाचे वातावरण होते. दक्षिण काश्मीरचे पोलिस उपमहानिरिक्षक (डीआयजी) अतुल गोयल स्वतः तेथे उपस्थित होते. असे सांगितले जाते, की त्यांना देवेंद्रसिंग यांच्याबद्दल खास खबर मिळाली होती, की ते शनिवारी सकाळी आय-टेन कारमधून तीन जणांसह श्रीनगरहून जम्मूला जाणार आहेत
महामार्गावरील जवाहर टनेलच्या आधीच त्यांना रोखणे आवश्यक होते. कारण एकदा का ते त्या जम्मूला जोडणा-या बोगद्यातून बनिहाल पार करून गेले, की त्यांच्या गाडीचा शोध घेणे अवघड गेले असते. त्यामुळे काझीगुंडजवळ गोयल यांनी नाकाबंदी केली होती. दुपारच्या वेळी देवेंद्रसिंग यांची कार तेथे पोचली. पोलिसांनी त्यांना अडविले. इरफान शफी नावाची व्यक्ती कार चालवत होती. बाजूच्या सीटवर स्वतः देवेंद्रसिंग होते. मागे दोन जण बसलेले होते. गाडी रोखली तेव्हा देवेंद्रसिंग जरा तो-यातच होते. डीआयजी अतुल गोयल यांनी त्यांचा तोरा उतरविला. सोबत कोण आहेत असे विचारल्यावर देवेंद्रसिंग म्हणाले, सुरक्षारक्षक आहेत. गोयल यांनी त्यांना खाली उतरविले. देवेंद्रसिंग यांचा आवाज आता चढला होता. ते विरोध करीत होते. पण गोयल यांनी काहीही ऐकता गाडीची झडती घ्यायला लावली. त्यात पाच हातबॉम्ब आणि एक रायफल सापडली. तरीही देवेंद्रसिंग गोयल यांच्याशी वाद घालू लागले. आता गोयल यांचा संयम सुटला होता. राष्ट्रीय अन्वेषण संस्थेसारख्या (एनआयए) महत्त्वाच्या संस्थेत अनेक वर्षे काम केलेले ते अधिकारी. त्यांनी काडकन् देवेंद्र यांच्या मुस्कटात मारली. तिथेच देवेंद्र आणि त्या तिघांना अटक करण्यात आली. त्या तिघांत एक जण होता, हिज्बुल मुजाहिदीनचा जिल्हा कमांडर नावीद मुश्ताक ऊर्फ नावीद बाबू. हा कोणी साधा दहशतवादी नव्हता. हिज्बुलचाऑपरेशन चीफरियाझ नैकू याच्यानंतरचा तो दुस-या क्रमांकाचा दहशतवादी होता. आधी पोलिस हवालदार होता तो. तीन वर्षांपूर्वी ठाण्यातून चार रायफली चोरून पळाला. अनेक काश्मिरींच्या, पोलिसांच्या हत्येत त्याचा हात होता. गेल्या सप्टेंबरमध्ये काश्मीरात पश्चिम बंगाली ट्रक चालकांचे हत्याकांड झाले. ते नावीदनेच केले होते. त्याच्या सोबत होता आणखी एक दहशतवादी रफी अहमद राठेर. (याच्या नावाबाबत जरा गोंधळच आहे. पीटीआयने त्याचे नाव अल्ताफ असे दिले आहे. बीबीसी त्याला आसीफ म्हणत आहे.) आणि तिसरा इरफान हा या दहशतवाद्यांसाठी काम करणारा वकील होता.
हे सारेच भयंकर होते. काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना - ज्यांच्या नावाने आपण आपले अतिराष्ट्रवादी झेंडे फडकावत असतो, त्यांना - कशी वाळवी लागलेली आहे हेच यातून दिसत होते. गेल्याच वर्षी स्वातंत्र्यदिनीशेर--कश्मीरशौर्यपदकाने सन्मानित झालेला, चकमकींसाठी प्रसिद्ध असलेला एक पोलिस अधिकारी दहशतवाद्यांचा हस्तक होता हे समोर आले होते. अटकेनंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. तेथून दोन पिस्तुले आणि एक रायफल जप्त करण्यात आली
देवेंद्रसिंग याच्या चौकशीतून आता अशाच धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. गेल्या जूनमध्ये सुरक्षादलांनी श्रीनगरमध्ये दहशवाद्यांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली होती. त्या काळात, 25-26 जून रोजी देवेंद्र हिज्बुलच्या तीन दहशतवाद्यांना पठाणकोटला सुरक्षित घेऊन गेला होता. तेथून ते चंडिगडला गेले होते. तेथे दोन दिवस राहून त्यांनी एका बड्या मॉलची पाहणी केली होती. या लोकांना तेथे कोणते कांड करायचे होते? चौकशी सुरू आहे. यातून त्याच्या इतिहासातील काही घटनाही पुढे आल्या आहेत. अमली पदार्थांची तस्करी, खंडणीखोरी, कारचोरी अशा गोष्टींत त्याचा हात होता, हे तसे काश्मीरमध्ये अनेकांना माहितच होते. पोलिस, गुप्तचर यंत्रणा, लष्कर यांतील काही वरिष्ठ अधिका-यांशी त्याचे जवळचे संबंध होते आणि त्या बळावर तो आजवर बिनधास्त होता, हेही अनेकांना ठावूक होते. आता त्याचीही चर्चा होऊ लागली आहे. पण आता सांगितले जाऊ लागले आहे, की त्याच्यावर आधीपासूनच पोलिसांच्या गुप्तचरांची पाळत होती. पण तसे असेल, तर मग ते गुरुवारी श्रीनगर विमानतळावर काय करीत होते हा प्रश्नच आहे. दोन दिवसांपूर्वीच जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासीत प्रदेशांचीखुशालीजाणून घेण्यासाठी विदेशी नेत्यांचे शिष्टमंडळ गेले होते. गुरुवारी त्यांचे विमान श्रीनगरला उतरले तेव्हा स्वागतासाठी हा पोलिस अधिकारीही तेथे उपस्थित होता. देवेंद्रसिंग यांचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत याची कल्पना असताना, विदेशी शिष्टमंडळाच्या स्वागतासाठीच्या पथकात त्यांचा समावेश कसा काय करण्यात आला होता, हा प्रश्नच आहे. पण त्याहून गंभीर प्रश्न आहे तो संसद हल्ला प्रकरणाशी त्याचा संबंध होता की काय हा.
अफझल गुरू हा या प्रकरणातील एक महत्त्वाचा मोहरा. त्याला 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली. पण आजही काश्मीरच नव्हे, तर उर्वरित देशात असे अनेक जण आहेत की त्यांना वाटते गुरुला यात बळीचा बकरा करण्यात आला. अर्थात आपल्यासारख्या राष्ट्रवादी नागरिकांचा त्यावर विश्वास नाही. आपला पोलिसांच्या न्यायप्रियतेवर प्रचंड विश्वास. त्यांनी एकदा एखाद्याला गुन्हेगार ठरविले की झाले. पोलिस कबुलीजबाब मिळवतात, पुरावे जमा करतात. ते सारे न्यायबुद्धीने. त्यांच्या पुराव्यावरून मग गुन्हा सिद्ध होतो. न्यायालय शिक्षा सुनावते. आणि एकदा ते झाले की मग आपल्यादृष्टीने ते सारे सूर्यप्रकाशाएवढेच सत्य ठरते. तेव्हा अफझल गुरू हा दहशवादीच असल्याचे आपण मानतो. या गुरुने त्यावेळी तिहार तुरुंगातून एक पत्र लिहून आपल्याला देवेंद्रसिंग याने या संसदहल्ला प्रकरणात गुंतवले असे सांगितले होते. तीही मोठी विचित्र कथा आहे
गुरु सांगतो, की एके दिवशी त्याला स्पेशल टास्क फोर्सच्या जवानांनी उचलून पैहालन कँपमध्ये नेले. तेथे पोलिस उपअधिक्षक विनय गुप्ता यांनी त्याचा छळ केला. तुझ्याकडे दोन पिस्तुल आहेत. त्यांची माहिती दे, असे ते म्हणत होते. त्यानंतर मात्र दहा लाख रुपये दिले तर सोडून देऊ, नाही तर ठार मारू अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर त्याला हुमहामा कँपमध्ये नेण्यात आले. तेथे त्याला भेटले देवेंद्रसिंग. त्यांनीही गुरुचा अतोनात छळ केला. नागवे करून विजेचे धक्के दिले. अखेर दहा लाख देण्याचे कबूल केल्यावर त्यांनी त्याला सोडून दिले. गुरुने बायकोचे दागिने विकून ते पैसे दिले
गुरु आता कंगाल झाला होता. पूर्वी दिल्लीला असताना तो शिकवण्या घ्यायचा. ही गोष्ट बडगाममधील एका पोलिस अधिका-याचा मेव्हणा अल्ताफ हुसेन याला समजली. त्याने गुरुला त्याच्या मुलांची शिकवणी घ्यायला सांगितले. त्यातून त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले. याच अल्ताफने एके दिवशी गुरुला देवेंद्रसिंगकडे नेले. तेथे देवेंद्र म्हणाला, एक छोटे काम करायचे आहे. तू दिल्लीत राहिलेला आहेस. तेथे एका माणसाला घेऊन जा. त्याला भाड्याने घर मिळवून दे. त्या माणसाचे नाव होते मोहम्मद. त्याला पाहताच गुरुने ओळखले, की हा काही पाकिस्तानी नाही. त्याला काश्मिरी बोलता येत नाही. पण देवेंद्रची भीती होती. गुरू त्याला घेऊन दिल्लीला आला. तेथे देवेंद्रच्या सांगण्यावरून त्याने मोहम्मदला एक कार खरेदी करून दिली. देवेंद्र त्या दोघांना सतत फोन करीत असे. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर हल्ला झाला. त्यात पाच पाकिस्तानी हल्लेखोर मारले गेले. त्यातला एक होता - मोहम्मद. त्याचे आणि देवेंद्रचे संबंध होते असे गुरु सांगत होता. अत्यंत स्फोटक बाब होती ती
गुप्तचर संस्था एखाद्या ऑपरेशनची योजना आखतात, एखाद्या घटनेची चौकशी करतात तेव्हा ते एक संकल्पना वापरतात. तिचे नाव - ‘टेन्थ मॅन स्ट्रॅटेजी’. ती मूळची मोसाद या इस्रायलच्या गुप्तचरसंस्थेची. बहुसंख्याकांचे म्हणणे नेहमीच बरोबर असते असे नाही. सगळेच म्हणतात म्हणून एखादी गोष्ट खरी वा योग्य ठरत नाही, हे यामागचे तत्त्व. थोडक्यात सांगायचे, तर नऊ जण एक गोष्ट सांगत असतील, ती कशी योग्य आहे हे पटवून देत असतील, तर या दहाव्या माणसाचे काम काय, तर त्या नऊ जणांच्या सांगण्यातील कमतरता, चुका, त्रुटी शोधून काढायच्या. संसद हल्ला प्रकरणात, गुरुचे पत्र समोर आल्यानंतर तरी या टेन्थ मॅन स्ट्रॅटेजीनुसार विचार होणे अपेक्षित होते. एरवीही तपासातील मुद्दा - मग तो कितीही असंभवनीय वाटो, त्याचा विचार तपास यंत्रणांनी करायचा असतो. हे तर साधे तत्त्व. पण तेही पाळले गेले नाही. भलेही गुरु खोटे सांगत असेल, देवेंद्रसिंगला अडकवण्याचा त्याचा हेतू असेल, पण तरीही तपासात कोणतीही फट राहू नये म्हणून तरी त्याचा तपास करायला हवा होता. ते झालेच नाही. देवेंद्रसिंग हा त्यातूनही सुटला. यावेळी मात्र तो अडकला. गुप्तचरयंत्रणांतील अधिका-यांचे हेवेदावे, राजकारण यातून ही कारवाई झाली असावी असा कयास आहे. ते काहीही असो, यातून आता काही गंभीर प्रश्न उभे राहात आहेत. - 
  1. देवेंद्रसिंग हा एक भ्रष्ट, क्रूर, लालची अधिकारी होता. तो दहशतवाद्यांना मदत करीत होता, हे माहित असूनही त्याला कोण पाठीशी घालत होते
  2. संसद हल्ला प्रकरणात त्याची साधी चौकशीही का झाली नाही? गुरु म्हणतो ते खरे असेल, तर संसद हल्ल्यामागील कट कोणी रचला होता? त्यावेळी देवेंद्रसिंगला वाचवण्यात कोणाचा हात होता
  3. पुलवामातील जिल्हा पोलिस छावणीवर 25-26 ऑगस्ट 2017 रोजी आत्मघातकी हल्ला झाला होता. तेव्हा देवेंद्रसिंगची पोस्टिंग पुलवामातच होती. एरवी तो छावणीत राहायचा नाही. पण त्या दिवशी मात्र तो तेथे थांबला होता. आश्चर्याचीच बाब होती ती. पण त्याहून आश्चर्याची गोष्ट ही होती, की त्या आत्मघातकी दहशतवाद्यांना छावणीची खडान् खडा माहिती होती. त्यावेळी याची चौकशी का झाली नाही
  4. आणि देवेंद्रसिंग ऐन प्रजासत्ताक दिनाच्या तोंडावर त्या दोन दहशतवाद्यांना घेऊन नेमका कुठे चालला होता? त्यांची दिल्लीला येण्याची योजना होती काय?
आता या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यात येत आहे म्हणतात. कुठे कुठे बातम्या येतही आहेत त्याच्या शिंतोड्यासारख्या. एरवी एखाद्या फोकनाड नेत्याने एखादे फालतू विधान करताच त्यावर प्राईम टाईममधून गदारोळ करणा-या वाहिन्या मात्र यावर फारसे काही बोलत नाहीत. विरोधी पक्षांच्या टीकेकडे केवळ विरोधकांची टीका म्हणूनच पाहिले जात आहे. अशा प्रकारे
हळुहळू हे प्रकरणही नस्तीबंद होईल. त्यावरून कोणी कोणाला प्रश्न विचारणार नाही. देवेंद्रसिंग याला अटक करण्यात आली, तेव्हा तो म्हणाला होता - ‘सर यह गेम है. आप गेम खराब मत करो.’ हा गेम कोणाचा ते कधीच कोणाला कळणार नाहीRead more...

No comments: