एक ‘नूर’ शेरनी!


(भारतीय राजकन्या ते नाझीविरोधी गुप्तचर - नूर इनायत खान हिची कहाणी...) 

 

नाझी गुप्त पोलिसांचे - गेस्टापोचे - पॅरिसमधील प्रमुख जोसेफ कायफर यांना तो फोन आलातो ऑक्टोबर १९४३च्या पहिल्या आठवड्यातील अशाच एका दिवशी. हिटलरच्या नाझी फौजांनी फ्रान्सची भूमी घशात घातलीत्याला तेव्हा तीन वर्षे उलटून गेली होती. 

नाझींनी फ्रान्सवर पुरता कब्जा प्रस्थापित केला होता. आयफेल टॉवरवर भला मोठा स्वस्तिक चिन्हांकित ध्वज फडकत होता. संसद इमारतीच्या प्रवेशद्वारावर एक मोठा कापडी फलक लावलेला होता. त्यावर लिहिले होते - डॉईशलँड सिग्टा आन आलन फ्रंटिन’ - ‘सगळ्या आघाड्यांवर जर्मनीचा विजय होत आहे.’ मोठे मानसिक दडपण होते ते फ्रेंच नागरिकांच्या मनावरचे. पॅरिसमध्ये ठिकठिकाणी जर्मन सैनिकांच्या चौक्या बसविण्यात आल्या होत्या. त्यांच्या साह्याला फ्रेंच व्हिची सरकारचे पोलिस होते. जर्मन गुप्त पोलिसांचा - गेस्टापोंचा तर सुळसुळाट होता सगळीकडे. दहशतीने भारलेल्या त्या वातावरणात वरवर पाहता फ्रेंच जनतेचे सर्व व्यवहार नित्याप्रमाणे चालल्याचे दिसत होते. पण आत खोलवर मात्र मोठीच खळबळ होती. 

सुरुवातीची भयग्रस्तता झुगारून फ्रान्समधील स्वातंत्र्यप्रेमी नागरिक उभे राहू लागले होते. भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांचे गटच्या गट तयार झाले होते. जीवावर उदार झालेलेमातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हाती शस्त्र घेतलेले हे सामान्य जन. सगळ्या थरांतलेसगळ्या वर्गांतले लोक होते त्यांत. प्राध्यापकलेखककलावंतकामगारशेतकरीविद्यार्थीव्यावसायिकउद्योजकमजूर… सगळे पेटून उठले होते. गनिमी काव्याने लढत होते. घातपाती कारवाया करून नाझींची फ्रान्समधील सत्ता खिळखिळी करू पाहात होते. त्यांना साह्य होते ब्रिटिश गुप्तचरांचे. सर विन्स्टन चर्चिल यांनी युरोपला आग लावा’ म्हणून हाक दिलेली होती. त्यांच्या सूचनेबरहुकूम काम चालले होते या गुप्तचरांचे. त्यात आघाडीवर होते चर्चिल यांनीच स्थापन केलेल्या स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह’ - एसओई - या संस्थेचे गुप्तचर. जर्मनीने कब्जा केलेल्या राष्ट्रांमधील बंडखोरांच्यास्वातंत्र्यसैनिकांच्यापंचमस्तंभीयांच्या गटांना साह्य करणे हेच या संस्थेचे काम. घातपाती कारवाया हा त्यातला महत्त्वाचा भाग. नाझी आक्रमक फौजांसाठी मोठीच डोकेदुखी बनली होती ही हेरसंस्था. मात्र गेल्या काही महिन्यांत गेस्टापोंनी ब्रिटिश हेरांचे पॅरिसमधील जाळे बऱ्यापैकी उद्‌ध्वस्त केले होते. त्यांच्यातील एक हेर मात्र गेस्टापोंना हुलकावण्या देण्यात चांगलीच यशस्वी ठरली होती. दोनदा तर गुप्त पोलिसांच्या हाती येता येता सुटली होती ती. तिचे सांकेतिक नाव होते - मॅडेलिन. 

पॅरिस आणि परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या घातपाती कारवायांना आळा घालायचा तर ती हेर हाती येणे गरजेचे होते. गेस्टापो प्रमुख कायफर यांना तिची बरीच माहिती होती. जेन-मारी रेनिएर हे तिचे खरे’ नाव. ती एसओईची हेर. वायरलेस ट्रान्समीटर ऑपरेटर हे तिचे काम. तिचे वर्णनही त्यांना समजले होते. पण ती हाती मात्र येत नव्हती. त्या दिवशी तो फोन आला आणि कायफर यांची समस्या मिटली. 

त्या फोनवर एक महिला होती. ती सांगत होती, ‘तिच्याकडे अतिशय महत्त्वाची माहिती आहे. फ्रेंच बोलू शकणाऱ्या कुणाला पाठवले तर ती माहिती देईल. त्यात जर्मनीचा फायदाच आहे.’ त्या फोनवरच तिला कुठे भेटायचे ते ठरले. पॅरिसमधील ट्रॉकेडेरो भागातील एका बागेत ती भेट ठरली. कायफर यांनी सांगितलेकी त्या बागेत गेस्टापोचा एक अधिकारी येईल. अँड्रे हे त्याचे सांकेतिक नाव असेल. त्याच्या बगलेत इलस्ट्रेटेड रिव्ह्यूचा अंक असेल. तू त्याला रेनी असे नाव सांग. हातात फूल आणि विशिष्ट प्रकारचा पोशाख घालून ये. 

ठरलेल्या वेळी रेनी त्या बागेत आली. तिशीतली तरुणी होती ती. बऱ्यापैकी स्थूलशी. ती होती लेफ्टनंट एमिल हेन्री गॅरीची सख्खी बहिण. हा मॅडेलिन ऊर्फ जीन मेरीचा सहकारी. स्वातंत्र्यसैनिक आणि ब्रिटिश हेर. मॅडेलिन ब्रिटनमधून पॅरिसमध्ये आलीतेव्हाचा तिचा पहिला काँटॅक्ट’ होता तो हेन्रीच. त्याची बहिणच विश्वासघातकी निघाली होती. पैशांसाठी ती आपल्याच माणसांच्या पाठीत खंजीर खुपसणार होती.

कायफर यांनी आपला सहकारी अर्न्स्ट वोट याला तिला भेटण्यासाठी पाठविले होते. तिने त्याला सांगितले, ‘मी मॅडेलिन नावाच्या एका ब्रिटिश हेर तरूणीला पकडून देते. पण त्या बदल्यात पैसे हवेत.’ 

खात्री करून घेण्यासाठी त्याने विचारले, ‘कोण मॅडेलिन?’

रेनी म्हणाली, ‘फोनोची रेडिओ ऑपरेटर.

फोनो हे हेन्री गॅरीचे सांकेतिक नाव असल्याचेतो ब्रिटिशांसाठी काम करीत असल्याचे अर्न्स्टला ठावूक होते. आता त्याची नीट खात्री पटली. त्या माहितीच्या बदल्यात एक लाख फ्रँक एवढी रक्कम देण्याचे त्याने कबूल केले. त्याचा आणखी विश्वास बसावा म्हणून रेनीने त्याला मॅडेलिनचे कव्हर नेम’ म्हणजे ती ज्या नावाने वावरत होती ते नाव आणि पत्ताही सांगितला. जीन मेरी रेगनेर. पत्ता - केअर ऑफ सोलान्ज९८रू डी ला फेसनडेरी.

सोलान्ज हा गॅरीचा मित्र. रेनीची एक अट होती. या सोलान्जला अटक करायची नाही. तो तिथे नसताना मॅडेलिनला पकडा किंवा त्या फ्लॅटच्या बाहेर तिला अटक करा. अँड्रेने त्याला मान्यता दिली. 

यानंतर दोनेक दिवसांनी रेनीने अर्न्स्टला फोन केला. मॅडेलिन त्या फ्लॅटवर दुसऱ्या दिवशी सकाळी येणार असल्याचे तिने सांगितले. आता सापळा लावण्याची वेळ आली होती. फ्रान्सच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारी एक ब्रिटिश हेर अलगद नाझी गुप्त पोलिसांच्या हाती लागणार होती.

तो दुसरा दिवस. ता. १३ ऑक्टोबर १९४३. 

मॅडेलिनची ब्रिटनला जाण्याची तयारी झाली होती. तिने आपल्या काही सहकाऱ्यांना सांगितले होतेकी ती १४ ऑक्टोबरला ब्रिटनला परत जाणार आहे. थकली होती ती. त्या काळात पॅरिसमध्ये तीच एकटी वायरलेस ऑपरेटर होती. गेस्टापो तिच्या मागावर होते आणि त्यांना चुकवतहुलकावणी देत ती संदेश पाठवण्याचेस्वीकारण्याचेते स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत पोचविण्याचे काम करीत होती. नाझींच्या क्रौर्याविषयी तिला माहिती होते. थेट मृत्यूशीच गाठ होती आणि त्या आधी भयंकर छळाशी. दोनदा कशीबशी बचावली होती ती. आता तिसऱ्या वेळी आपण नक्कीच पकडले जाऊ असे तिचे अंतर्मनच तिला सांगत होते. तसे तिने एका परिचित व्यक्तीकडे बोलूनही दाखविले होते. आता पॅरिसमध्ये अखेरची नीरवानीरव करीत होती ती. 

त्या दिवशी सकाळी ती तिच्या फ्लॅटवर आली. 

एका कोपऱ्यातले घर होते ते. पॅरिसमधील '८४, ॲव्हेन्यू फॉश’ हे गेस्टापोचे मुख्यालय. त्याच्या अगदी जवळच होती तिची इमारत. तेथे आधीपासूनच गेस्टापोंची पाळत ठेवण्यात आली.

काही वेळाने मॅडेलिन त्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आली. तिच्या आवडीच्या निळ्या रंगाचा पोशाख तिने घातला होता. (हा तिचा आवडता रंग. गेस्टापो एजंटांना ते माहीत होते. या रंगाने तिचा घात केला.) डोईवर काळी हॅट होती.  

इमारतीत खाली एक बेकरी होती. त्या दुकानात ती गेली. काही मिनिटे ती तेथे होती. मग बाहेर आली आणि ताडताड पावले टाकत सरळ रस्त्याला लागली. 

वेर्नेर रुहल आणि हॉग या दोन जर्मन अधिकाऱ्यांवर तिला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी तिला ओळखले. ते तिचा पाठलाग करू लागले. आता काही क्षणांचाच अवकाश होता. सापळा आवळत चालला होता.  

महिलांचा सिक्स्थ सेन्स’ तीक्ष्ण असतो म्हणतात. हेरांचा तर अधिकच. मॅडेलिनच्या सहाव्या इंद्रियाला धोक्याची जाणीव झाली असावी. तिने अचानक वळून मागे पाहिले. तिला ते जर्मन अधिकारी दिसले. तिने ओळखलेपाठलाग होतोय. तिने चालण्याचा वेग आणखी वाढवला. रस्त्यावरच्या एका कोपऱ्यावर ती वळली. 

ते जर्मन अधिकारी येऊन पाहतात तो ती गायब. सगळ्या परिसरात शोध घेतला त्यांनी. पण मॅडेलिन जणू अदृश्यच झाली होती. गेस्टापोंच्या मुख्यालयापासून काही अंतरावर लावलेला गुप्त पोलिसांचा सापळा उधळून लावला होता तिने. पुन्हा एकदा नाझींच्या हातावर तुरी देण्यात ती यशस्वी झाली होती.

 

 

०००

 

गेस्टापो जिचा शोध घेत होते ती तरूणी ना मॅडेलिन होतीना जेन-मारी रेनिएर. 

मॅडेलिन हे तिचे सांकेतिक नाव. जेन-मारी हे तिने हेरगिरीसाठी धारण केलेले नाव. या नावानेच ती फ्रान्समध्ये वावरत होती. हेच नाव तिच्या फ्रेंच रेशन कार्डवर होतेविविध परवान्यांवर होते. ते अर्थातच बनावट होते. एसओईच्या डर्टी ट्रिक्स डिपार्टमेन्टने - सेक्शन डीने - तयार केलेला तो तिचा कव्हर’ होता. तिचे खरे नाव होते नूर-उन-निसा इनायत खान. 

मूळ भारतीय वंशाची ती तरुणी. भारतीय राजकन्याच म्हणत तिला. कारण तिला वारसा लाभला होता थेट टिपू सुलतानचा. ब्रिटिशांशी अखेरच्या श्वासापर्यंत लढलेल्या टिपूची खापर-खापर नात ती. पण ही ओळख ना तिने कधी सांगितलीना तिच्या आई-वडिलांनी कधी मिरवली. तिचे वडिल हजरत इनायत खान हे स्वतः सूफी परंपरेतील एक नामांकित तत्वज्ञ होते. 


आज त्यांच्या नावाने सुफींमधील एक पंथ ओळखला जातो. इनायती पंथ हे त्याचे नाव. ते स्वतः नावाजलेले संगीतकारही होते. त्यांचा जन्म बडोद्यातील. 

हे बडोदा होते महाराज सयाजीराव गायकवाड यांचे. कला आणि विद्येला आश्रय देणारे हे थोर संस्थानिक. सुधारकी विचारांचे. याच बडोद्यात आपले आजोबा संगीतरत्न प्रो. मौलाबक्ष शोलेखान यांच्या गायनशाळेत इनायत खान यांचे संगीतशिक्षण झाले. त्यांच्या लहानपणचा एक किस्सा आहे. एकदा एका बैठकीत त्यांनी महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यासमोर संस्कृतमधून हंसध्वनी रागात गणेशस्तवन गायले. ते ऐकून महाराज एवढे खूश झाले की गळ्यातील कंठा काढून इनायत यांना भेट दिला. गायनकलेत आणि वाद्यसंगीतातत्यातही खासकरून वीणावादनात त्यांनी महारत मिळविली होती. हिंदुस्थानी संगीताबरोबरच ते कर्नाटकी आणि पाश्चात्य संगीतही शिकले होते. त्यांचे मामा प्रो. अल्लाउद्दीन खान पठाण हे इंग्लंडमधून संगीताच्या पदव्या घेऊन आले होते. ते इनायत यांचे पाश्चात्य संगीतातील गुरु. बडोद्यातील वास्तव्यात इनायत खान मराठीसंस्कृतइंग्रजीउर्दू आणि गुजराती भाषा शिकले. पुढच्या आयुष्यात त्यांनी फ्रेंचस्पॅनिश तसेच पर्शियन आणि अरबी भाषाही आत्मसात केल्या. त्यांनी मराठीत काही गाणीही रचल्याचे सांगण्यात येते. गायनकलेशी संबंधित काही पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत. इनायत खान गीत रत्नावली’, ‘बालसंगीतमाला’ ही त्यातलीच. महाराजांच्या लक्ष्मीविलास राजवाड्यातील गरबा उत्सव मोठा मानाचा. त्याकरीता त्यांनी खास श्री सयाजी गरबावली’ हे पुस्तक लिहिले होते.

१९१० मध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ते युरोप-अमेरिकेत गेले. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोतील रामकृष्ण मिशन आश्रमात भाषण देण्यासाठी गेले असताइनायत यांचा परिचय एका अमेरिकी युवतीशी झाला होता. ओरा रे बेकर हे तिचे नाव. तिच्याशीच नंतर१९१३ साली लंडनमध्ये त्यांचा विवाह झाला. याच वर्षी त्यांना रशियातून कार्यक्रमाचे आमंत्रण आले. मॉस्कोमध्ये क्रेमलिनपासून दीड किलोमीटर अंतरावरील एका प्रशस्त घरामध्ये ते राहात असत. नूरचा जन्म तिथलाच. जन्मतारीख १ जानेवारी १९१४.

युरोपवर आता पहिल्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. या काळात इनायत खान आपल्या कुटुंबासह लंडनहून पॅरिसला येऊन स्थायिक झाले. नूर अवघ्या सहा वर्षांची होती तेव्हा. फ्रान्समधील वास्तव्य हा तिच्या मानसिकवैचारिक जडणघडणीचा काळ. पॅरिसच्या शूएन्ना या उपनगरातील एका प्रशस्त दुमजली बंगल्यात राहायचे ते. येथेच नूर आणि तिची तीन भावंडे यांचे बालपण गेले. येथेच नूरचे शिक्षण झाले. येथेच तिने पित्याकडून संगीताचे धडे घेतले. येथेच तिने सुफी तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले.

ती बारा वर्षांची असताना इनायत खान यांचे निधन झाले. पित्याचे छत्र हरवले. त्या धक्क्याने आई कोसळली. घराची जबाबदारी नूरच्या खांद्यावर पडली. एकीकडे तिचे औपचारिक शिक्षणही सुरू होते. साहित्यफ्रेंच आणि इंग्लिश हे तिच्या अभ्यासाचे विषय. सोबत संगीतविद्येची उपासना सुरू होती. या परिस्थितीने तिच्यातील कवयित्रीला जन्म दिला. नूर कविता करू लागली. १९३२ साली ती युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसमध्ये दाखल झाली. पदवीसाठीचा तिचा विषय होता बालमानसशास्त्र. बहुधा या अभ्यासाचा उपयोग तिला पुढे लेखनात झाला असावा. कथाकथनाची तिला आवड होती. पॅरिसमधील शेजारपाजारच्या मुलांना जातककथारामायण-महाभारतातील कथा सांगत असे ती. आता लहान मुलांसाठी स्वतंत्र कथालेखन करू लागली. संडे फिगारो’ या दैनिकाच्या मुलांसाठीच्या पुरवणीत तिच्या कथा नेमाने प्रसिद्ध होत असत. तिने केलेले जातक कथांचे भाषांतर - ट्वेंटी जातका टेल्स’ या नावाने १९३९ साली इंग्लंडमध्ये प्रकाशित झाले. याच काळात तिच्या डोक्यात एक कल्पना आलीखास मुलांसाठीचे वृत्तपत्र काढण्याची. अॅलेक्सिस डॅनन नावाच्या एका प्रसिद्ध पत्रकाराच्या मदतीने ती त्यावर काम करीत होती. त्या वृत्तपत्राचे नाव तिने नक्की केले होते -  बेल एज’. म्हणजे सुंदरसा काळ. 

पण तो काळ सुंदर नव्हता. १ सप्टेंबर १९३९ ला हिटलरच्या नाझी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि युरोप पेटले. या महायुद्धाने नूरचे सगळे जग उलटेपालटे केले. एका संवेदनशील लेखिका-कवयित्री-संगीतप्रेमी तरूणीलाहिंसेला विरोध असणाऱ्या शांततावादी मुलीला या युद्धाने गुप्तहेर बनविले. बदल सोपा नव्हता. मोठ्या मानसिक द्वंद्वातून जावे लागले होते नूरला. 

सुफी तत्त्वज्ञानाचे संस्कार होते मनावर. त्यातील अहिंसावाद तिला भावला होता. वडिलांनी कधी तरी महात्मा गांधी आणि त्यांचा अहिंसावाद यांची ओळख करून दिली होती. मनावर कोरली गेली होती ती. युद्धत्यातील हिंसा हे सारेच घृणास्पद. त्यात आपण कसे सहभागी व्हायचेपण नाझींचा तो विद्वेषयुक्त वर्णवर्चस्ववादतो विखारी ज्यू आणि कम्युनिस्टविरोधती हत्याकांडे यांचे कायविद्यापीठात शिकत असताना नूर प्रेमातही पडली होती एका मुलाच्या. गोल्डबर्ग त्याचे नाव. सहा वर्षे त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. ती जन्माने मुस्लिम. तो तुर्की ज्यू. घरच्यांच्या विरोधामुळे आणि नंतर देशासाठी लढण्याकरीता तिने ते प्रकरण थांबविले. पण त्याच्यासारख्या ज्यूंचा गुन्हा तो कायआपण अहिंसावादी म्हणून यास विरोध नाही करायचापण अहिंसा म्हणजे भ्याडपणा नव्हे. अन्याय सहन करणे नव्हे. अहिंसेत तर शौर्य असते. आपण लढायला हवे. घरात हातावर हात ठेवून बसता कामा नये. वडिलांकडून भगवद्‌गीतेचे संस्कार झाले होते मनावर. त्यातील 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हा श्लोक आवडतो आपल्याला. तो लक्षात घ्यायला हवा. पण काय करू शकतो आपणनूर आणि तिची धाकटी बहिण क्लेर या दोघींनीही फ्रेंच रेड क्रॉसमध्ये आपले नाव नोंदविले. युद्धात उपयोगी ठरावे म्हणून परिचारिकेचेप्रथमोपचाराचे प्रशिक्षण त्या घेऊ लागल्या. पण हे पुरेसे नव्हते. 

३ जून १९४० रोजी जर्मनीच्या लुफ्तवाफने - वायुसेनेने - पॅरिसवर बॉम्बहल्ले केले. युद्ध आता घराजवळ पोचले होते. अनेक लोक पॅरिस सोडून जाऊ लागले होते. तीस लाखांच्या त्या शहरात आता केवळ आठ लाख लोक उरले होते. बाहेर पडणाऱ्या लोकांच्या काफिल्यांवरही नाझींची विमाने बॉम्बवर्षाव करीत होती. 

या परिस्थितीत नूर आणि तिचा धाकटा भाऊ विलायत यांनीही फ्रान्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ठरविलेकी इंग्लंडला जाऊन त्यांच्या युद्धप्रयत्नांत सहभागी व्हायचे. विलायत यांनी ब्रिटिश फौजेत दाखल व्हायचे आणि नूरने जमेल ते काम करायचे.

५ जून रोजी नूरच्या कुटुंबाने फ्रान्सचापॅरिसचा निरोप घेतला. ही पाच फूट तीन इंच उंचीचीनाजूकशा चणीचीतपकिरी केसांचीबदामी डोळ्यांची२६ वर्षांची तरुणी आता एका अवघड आव्हानाला भीडणार होती

 

०००

 

इंग्लंडमध्ये आल्यानंतर नूरचा भाऊ विलायत याने रॉयल एअर फोर्समध्ये प्रवेश घेतला आणि नूर दाखल झाली वूमेन्स ऑक्झिलरी एअर फोर्समध्ये. वायुसेनेला साह्यभूत ठरणारी विविध कामे करण्यासाठी ही महिलांची फौज उभारण्यात आली होती. त्यात १९ नोव्हें. १९४० रोजी एअरक्राफ्ट्स वूमन सेकंड क्लास’ म्हणून नूर सामील झाली. वायरलेस ऑपरेशन्सचे प्रशिक्षण तिला मिळाले ते येथेच. या प्रशिक्षणाची एकेक पायरी चढत ती गेली. लवकरच तिला बढती मिळाली. वायुसेनेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती संदेशवहनाचे काम करू लागली. साधारण वर्षभरानंतर तिने कमिशनसाठी - बढतीसाठी - अर्ज केला आणि हेरगिरीसाठीच्या प्रशिक्षणासाठी तिची निवड करण्यात आली. नूरच्या आयुष्यातील हे महत्त्वाचे वळण. या कमिशनसाठी म्हणून तिला सिग्नल आणि वायरलेस संचालनाचा सात आठवड्यांचा अॅडव्हान्स्ड कोर्स करावा लागला. त्यातील तिची प्रगती पाहून एके दिवशी तिला कमिशनसाठीच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मुलाखत चांगली झालीपण एका अधिकाऱ्याने तिला भारतीय स्वातंत्र्यलढ्याबाबत तिला प्रश्न केला आणि गाडी रुळावरून घसरली. 

नेहमी खरे बोलावे’ हा नूरसाठी केवळ शाळेच्या भिंतीवरचा सुविचार नव्हता. सत्य हा तिचा ईश्वर होता. ती खोटे बोलूच शकत नव्हती. ती सातत्याने भारतीय स्वातंत्र्याच्या बाजूची होती. म. गांधी आणि नेहरूंची ती चाहती होती. त्यांच्या अटकेने बेचैन होत असे ती. विलायत या आपल्या भावाला तिने एका वर्षापूर्वीच तर वाढदिवस भेट म्हणून पं. नेहरूंचे अॅन अॅटोबायोग्राफी’ हे आत्मचरित्र दिले होते. तिने स्पष्ट सांगितलेकी ब्रिटनने भारताला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सशस्त्र सेना उभारण्याची परवानगी दिली पाहिजे. ही मागणी ब्रिटिशांना नापसंत आहे हे तिला माहित होते. या उत्तराने आपली ही मुलाखत फसलीच असे तिला वाटले. पण तसे झाले नव्हते.

तिचे फ्रेंच भाषेवरचे प्रभुत्व आणि बिनतारी संदेशवहनातील कसब महत्त्वाचे ठरले आणि तिला पुन्हा मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले. पण या वेळी तिची मुलाखत घेणार होते स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्हचे (एसओई) एक अधिकारी. 

एसओई. ऐन युद्धकाळातजुलै १९४० मध्ये स्थापन करण्यात आलेली ही हेरसंस्था. घातपातविध्वंस आणि जर्मन सत्तेचा पाया खिळखिळा करणे हे तिचे विहित कर्तव्य. लंडनच्या कॅक्स्टन स्ट्रीटवरील सेंट एर्मिन्स हॉटेलच्या अवघ्या तीन खोल्यांमध्ये स्थापना झाली होती तिची. आता मात्र युरोपातच नव्हेतर अगदी भारतातही तिचे एजंट काम करीत होते. तीन विभाग होते तिचे. एसओ-वन. प्रोपगंडा हे त्याचे काम. एसओ टू - प्रत्यक्ष मोहिमांची अंमलबजावणी आणि एसओ-थ्री - नियोजन. एरवी ब्रिटिश गुप्तचर म्हटले की नजरेसमोर येतो तो जेम्स बॉण्ड आणि त्याच्याकडील चमत्कारिक गॅजेट्स. एसओई ही त्याची प्रेरणा होती. या संस्थेत एक खास डर्टी ट्रिक्स डिपार्टमेन्टच होते. पोटात स्फोटके भरलेले मेलेले उंदीर किंवा स्फोटके भरलेली घोड्याची लीदकोळशाचा रंग दिलेले टीएनटीस्फोट होणारे नट-बोल्टपेनदूधाच्या बाटल्याएवढेच काय अगदी बुद्धमूर्तीही तेथे बनविल्या जात असत. नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये एसओईचे एक टॉयशॉप होते. त्यात लाकडी ओंडक्यांतपेट्रोलच्या कॅनमध्ये लपवलेले वायरलेस सेटचष्म्यावरील बिंदू एवढ्या मायक्रोफिल्मबटन कंपासछोट्या करवतीसिल्क स्कार्फवरील नकाशेअदृश्य शाईअशा विविध वस्तू बनविण्यात येत असत. 

एसओईचे हेर बॉण्डसारखेच असावेत असे बंधन मात्र नव्हते. तेथे शारिरीक क्षमता फार महत्त्वाची नव्हती. तेथे हवे होते उत्तम चारित्र्यप्रामाणिकपणाचलाखीसावधानता आणि सतर्कता. त्याचबरोबर स्थानिक बोलीभाषा बोलता येणे ही एसओई हेरांसाठीची सर्वांत महत्त्वाची अर्हता होती. त्या-त्या देशात हेरांना पाठविण्यात येई तो विशिष्ट कव्हर’ देऊन. बनावट नावच नव्हेतर अवघे बनावट जीवनचरित्र घेऊन ते जात असत. एक लिजंड’ तयार केले जात असे त्याचे. त्यात त्याचे आई-वडिलनातेवाईकजन्मठिकाणशिक्षणनोकरी-व्यवसाय असे सारे चरित्र बनविले जाई. त्याला आधार देणारी खोटी कागदपत्रे तयार केली जात. त्यांना त्या-त्या देशातील रेशनकार्डपरवानापत्रेओळखपत्रे दिली जात. तसे खास कपडे शिवून घेतले जात त्यांच्यासाठी. ते जुने दिसावेत याची काळजी घेतली जाईल. ते सारे बेमालूम असे. चिंतेची बाब असे ती भाषा. त्या हेराला स्थानिक भाषा बोलता आली नाहीउच्चारातशब्द वापरण्यात कुठे गफलत झालीतर सगळाच कव्हर’ केरात जाणार. त्याला वागण्या-बोलण्याच्या बारीकसारीक पद्धती माहित असायला हव्यात.  नूरबाबत ती काळजी नव्हती. ती पॅरिसमध्येतेथील बोलीभाषा बोलतच लहानची मोठी झाली होती. तरीही काही अंगभूत सवयी धोक्याच्या ठरू शकतात. नूरबाबत पुढे एकदा तसे घडलेही होते. एका चहापानाच्या वेळी तिने सवयीने कपात दूध घेतले आणि त्यात चहा ओतला. एका महिलेला ते विचित्र वाटले. कारण - फ्रान्समध्ये अशा पद्धतीने कोणी चहा बनवत नसे. ती खास ब्रिटिश पद्धत होती.  

८ फेब्रुवारी १९४२ रोजी नूर नोरा इनायत खान या नावाने एसओईमध्ये दाखल झाली. तिला हेरांना आवश्यक असलेली धावणेशस्त्र चालवणेगोपनीय संदेशवहनसांकेतिक भाषानकाशा वाचनबनावट कागदपत्रे बनविणे-ओळखणेमायक्रो-फोटोग्राफी अशी विविध कौशल्ये शिकविण्यात आली. सेफ हाऊस’ निवडणेएजंट वा आपल्या स्त्रोतांशी संपर्क साधणेनिरोप पोचविणे याकरीता डेड लेटरबॉक्स’ निवडणे अशी कामेही शिकविण्यात आली. डेड लेटर बॉक्स म्हणजे जेथे गुपचूप पत्र वा निरोप ठेवता येईल अशी गोपनीय जागा. ती सार्वजनिक ठिकाणीजाण्या-येण्याच्या मार्गावर तर असायला हवी पण जेथे निरोप लपवून ठेवताना कोणी पाहूही शकणार नाही. पिस्तुल चालवणेबॉम्ब फेकणेस्फोटके हाताळणे हे मात्र नूरला कठीण जात होते. तिच्या मनोभूमिकेत ते बसत नव्हते. पण ती तेही जिद्दीने शिकली. तिच्यावर फ्रान्समध्ये वायरलेस ट्रान्समीटर चालविण्याची जबाबदारी असणार होती. हे जेवढे बुद्धीचेकौशल्याचे तेवढेच जबाबदारीचे काम होते. 

एसओई गटनिहाय काम करीत असे. त्यांना सर्किट म्हणत. एका सर्किटमध्ये तीन मुख्य व्यक्ती असत. एक संघटकदुसरा जासूद आणि तिसरा रेडिओ चालक. संघटक आणि त्याचे एजंट यांतला दुवा म्हणून जासूद काम करीत असे. तर रेडिओ चालक हा ब्रिटनमधील एसओईचे मुख्यालय आणि सर्किट यांच्यातील दुवा असे. त्याचे काम महत्त्वाचे आणि तेवढेच धोकादायक. तो शत्रूच्या हाती लागण्याची आणि पर्यायाने मारला जाण्याची शक्यता खूपच दाट असे. याचे कारण म्हणजे त्याला आपल्यासोबत सतत तो वायरलेस ट्रान्समीटर-रिसिव्हर बाळगावा लागत असे. त्या ए मार्क टू’ ट्रान्समीटर-रिसिव्हरचे वजन असे सुमारे चौदा किलो. त्याच्या सोबत असे ७० फूट लांबीची एरिअल. ते एवढे जड ओेझे बसविलेले असे एका दोन फुटी सूटकेसमध्ये. ते घेऊन इकडून तिकडे फिरायचे. कोणालाही संशय आला तर संपलेच सारे. शिवाय नाझींचे हेरगिरीविरोधी पथक सतत मागावर असेच. रेडिओ ध्वनिलहरींचा माग काढून ट्रान्समीटरचा ठावठिकाणा शोधणारी यंत्रे  - वायरलेस डायरेक्शन फाईंडिंग (डीएफ) मशीन - बसवलेली वाहने सतत रस्त्यांतून फिरत असत. वरवर पाहता त्या असत बेकरीच्या वा लाँड्रीच्या व्हॅन. पण आतमध्ये असत साध्या वेशातली डीएफ पथके. त्यांची कार्यक्षमता एवढीकी एखादा वायलेस ऑपरेटर जरा जास्त काळ ट्रान्समीटरवर राहिलाकी संपलेच. पुढच्या अर्ध्या तासात त्याच्या दारात गुप्त पोलिसांच्या गाड्या उभ्या राहात. सरासरी सहा आठवड्यांत असे रेडिओ ऑपरेटर पकडले जात असत. 

या अशा कामी नूरसारख्या तरुणीला पाठविणे हा एसईओचा नाईलाज होता. तसाही अनेकांचा विरोध होता तिला फ्रान्समध्ये पाठविण्यास. कोणाला ती सिक्युरिटी रिस्क’ वाटत होतीतर कोणाला ती फारच स्वप्नाळू वगैरे वाटत होती. ती खोटे बोलू शकत नाहीहा मोठा दुर्गुण ठरला होता. पण तिकडे फ्रान्समधील परिस्थिती बदलली होती. नूरसारख्या रेडिओ ऑपरेटरची नितांत आवश्यकता होती तेथे. 

प्रशिक्षण संपले. तिची कव्हर स्टोरी’ तयारच होती. तिला नाव देण्यात आले होते जेन-मारी रेनिएर. ती बालकांची परिचारिका. जन्म फ्रान्समधील ब्लोआ शहरात. तारीख २५ एप्रिल १९१८. वडिल प्रिन्सस्टनमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. आई अमेरिकन. तिचे नाव रे बेकर. वडिल पहिल्या महायुद्धात मारले गेले. आई नंतर अमेरिकेला निघून गेली. अशी कहाणी तयार करण्यात आली. त्यासाठी जन्मप्रमाणपत्रशाळेची गुणपत्रकेमहाविद्यालयीन पदवीपरिचारिका म्हणून तिने जेथे कामे केली त्यांची शिफारसपत्रे वगैरे कागदपत्रे बनविण्यात आली. फ्रान्समध्ये सध्या वापरात असलेले रेशनकार्डपरवानेओळखपत्र तयार करण्यात आले. सारेच बनावटपण खऱ्याहून खरे भासणारे. या कव्हरला अनुषंगून तिला वेशभूषा देण्यात आली. एसओईच्या प्रत्येक एजंटाचे एक सांकेतिक नाव असे. एकमेकांशी संपर्क साधतानासंदेश पाठवताना त्याचा वापर केला जाई. नूरचे सांकेतिक नाव होते मॅडेलिन. या मोहिमेवर जाण्यापूर्वी एजंटांच्या हातात चार प्रकारच्या गोळ्या ठेवण्यात येत. एक होती झोपेची. कुणाच्या चहा-कॉफीत ती टाकायची. सहा तासाची झोप निश्चित. दुसरी होती - बेंझेड्रीन. झोप येऊ नये यासाठीची. तिसरी - पोट बिघडण्यासाठीची. गरज भासलीआजारपणाचे सोंग करायचे असेलतर ती घ्यायची. या गोळ्यांची पाकिटे नूरच्या हातात ठेवण्यात आली. आणि चौथी एकच गोळी देण्यात आली. तिचे नाव - एल पिल. सायनाईडची गोळी. रबरी आवरणातील ती गोळी दाताखाली धरून फोडायचीकी काम खतम. गिळली तर मात्र काहीच परिणाम नाही.

नूरची आता पूर्ण तयारी झाली होती. मूळ भारतीयधर्माने मुस्लिमजन्म अमेरिकी आईच्या पोटीनागरिक फ्रान्सची आणि हेर ब्रिटनची अशी ही तरूणी नाझी-फॅसिस्टांविरोधातील युद्धासाठी सज्ज झाली होती… 

 

०००

 


१६ जून १९४३. मध्यरात्रीनंतरची वेळ. पौर्णिमेच्या टिपूर चांदण्याने फ्रान्समधील लुआ खोरे न्हावून निघाले होते. कुणी नीट रोखून पाहिले असते त्या आकाशात तर त्यांना दोन छोटी लायसँडर विमाने दिसली असती. एकच इंजिन असलेलीवैमानिकाशिवाय जास्तीत जास्त तीन प्रवासी नेण्याची क्षमता असलेली ती विमाने. ती बऱ्यापैकी खालून उडत असत. त्यामुळेच जर्मन रडारची नजर चुकवू शकायची ती आणि म्हणूनच ब्रिटिश हेरांना फ्रान्समध्ये गुपचूप नेण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येत असे. 

त्या दिवशी एसओईच्या चार एजंटांना घेऊन ब्रिटनमधील एका छुप्या धावपट्टीवरून त्या विमानांनी झेप घेतली होती. त्यांचे लक्ष्य होते ऑन्जी या शहरापासून दूर शेतात तयार करण्यात आलेली धावपट्टी.

वैमानिकांनी पाहिलेत्या ठरलेल्या ठिकाणी तीन टॉर्च पेटविण्यात आल्या होत्या. सगळे काही आलबेल आहे असे मोर्स कोडद्वारे सांगण्यात येत होते. तो संदेश मिळताच त्यांनी मोठ्या कौशल्याने ती विमाने त्या तात्पुरत्या धावपट्टीवर उतरविली. तातडीने त्यांतून ते चारही हेर बाहेर पडले. तेथे अंधारात पाच व्यक्ती उभ्या होत्या. दोन एसओईचे एजंट आणि तीन फ्रेंच राजकीय नेते. चपळाईने ते विमानात चढले आणि अवघ्या काही मिनिटांत ती विमाने पुन्हा आकाशात झेपावली. नूर आणि ब्रिटनमधील अखेरची कडी आता तुटली होती. ती कधीही सांधली जाणार नव्हती. 

कुणालाही तेव्हा ठावूक नव्हतेपण नूर आणि तिच्या अन्य सहकाऱ्यांच्या स्वागतासाठी तेथे आलेला एसओईचा अधिकारी हेन्री डेरिकोर्ट हा डबल एजंट’ होता. जर्मनीला फितूर झाला होता तो. त्याने या चार हेरांची माहिती जर्मनीला दिली की काय कोण जाणेपण त्या दिवशी मात्र ते चौघेही तेथून सहीसलामत बाहेर पडले.

उतरताच नूरने आपल्या जवळील पिस्तुल बाजूच्या शेतात गाडले. तसा आदेश होता तिला. तिच्या कव्हर स्टोरीत ते पिस्तुल बसत नव्हते. डेरीकोर्टने आणलेली सायकल तिने उचलली आणि पहाटेच्या त्या चांदण्याच्या सोबतीने ती ऑन्जी रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली. तिला पोचायचे होते पॅरिसमध्येलेफ्टनंट एमिल हेन्री गॅरीच्या घरी. 

गॅरी हा पॅरिसमधील एसओईच्या प्रॉस्पर सर्किटच्या उपगटाचा प्रमुख. तो दिसायचा हॉलिवूड अभिनेता गॅरी कूपरसारखा. म्हणून त्याचे सांकेतिक नाव ठेवण्यात आले होते सिनेमा. पुढे त्याचे फोनो असे नामांतर करण्यात आले. या गटात वायरलेस चालक म्हणून नूर काम करणार होती.

प्रॉस्पर सर्किटचे प्रमुख होते फ्रान्सिस सुटिल हे बॅरिस्टर. त्यांचा गट आणि त्याच्या उपगटांनी अनेक घातपाती कारवाया करून नाझी फौजेच्या नाकात दम आणला होता. वीजकेंद्र उडविणेजर्मन फौजेस रसद घेऊन चाललेल्या मालगाड्या उलथवून लावणेपेट्रोलच्या वाघीणी पेटवून देणे अशा अनेक कारवाया त्यांच्या नावावर होत्या. एप्रिल १९४३ पर्यंत त्यांनी ४३ जर्मनांची हत्या केली होती११० जणांना जखमी केले होते. त्यामुळे हा गट जर्मनांची लष्करी गुप्तचरसंस्था अबव्हेअर’, गेस्टापो आणि जर्मनीच्या अंकित असलेल्या व्हिची सरकारच्या 'ला मिलिस’ या निमलष्करी संघटनेच्या डोळ्यांत सलत होता. प्रॉस्परचे हेर आणि बंडखोर त्यांना हुलकावणी देण्यात अजून तरी यशस्वी ठरले होते. पण हे यश फार काळ टिकणार नव्हते.

नूर जर्मनीत आली त्याच्या सहाव्या दिवशीच एसओईचे चार एजंट गेस्टापोंच्या हाती अगदी योगायोगाने लागले. पॅरिसकडे जात होते ते. रस्त्यावर गेस्टापोंनी नाकाबंदी लावली होती. त्यात त्यांची गाडी सापडली. एका एजंटचे फ्रेंच काही तितकेसे चांगले नव्हते. उच्चारांत कॅनेडियन झाक होती. त्यावरून संशय आला आणि ते सारे पकडले गेले. त्यांच्या कारमध्ये गेस्टापोंना घबाडच गावले. एक वायरलेस संच होता त्यात. शिवाय पॅरिसमधील काही एजंटांना त्यांच्या सांकेतिक नावांनिशी पाठविलेले संदेशही होते त्यांच्याकडे. एवढेच नव्हेतर एकाच्या ब्रिफकेसमध्ये काही एजंटांचे पत्तेही होते. या माहितीच्या आधारे गेस्टापोंनी प्रॉस्परच्या एकेका हेराला अटक केली. त्यांना मिळालेली सर्वात मोठी शिकार होती प्रॉस्परचे प्रमुख फ्रान्सिस सुटिल यांची.

नूर फ्रान्समध्ये आली त्याला अवघे दहा दिवस झाले होते. आणि या काळात ती ज्या सर्किटसाठी काम करणार होती त्याची पुरती वाताहात झाली होती. पुढच्या आठ-दहा दिवसांत गेस्टापोंनी शेकडो एजंटांनाबंडखोरांना पकडले होते.

कैदेतील या हेरांचाबंडखोरांचा अतोनात छळ सुरु झाला होता. त्यांच्याकडून अधिक माहिती काढून घेण्यात येत होती. काही जण त्या छळापुढे वाकले. त्यातील एकाकडून गेस्टापोंना समजलेकी ब्रिटनहून मॅडेलिन नामक हेर फ्रान्समध्ये आली आहे. ती दिसते कशी हे आता त्यांना समजले होते. ती वायरलेस रेडिओ ऑपरेटर आहे ही माहितीही त्यांना मिळाली होती. ते कळताच त्यांनी तातडीने एक वायरलेस संदेश शोधक केंद्र उभारले. नूर ऊर्फ मॅडेलिन कधी जाळ्यात अडकते याचीच त्यांना प्रतीक्षा होती. आता नूर आणि त्यांच्यात उंदीर-मांजराचा खेळ सुरू झाला होता. अर्थात त्यांना तेव्हा हे माहीत नव्हतेकी नूर उंदीर नव्हती. ती वाघीण होती.

 

०००

 

१९४३चा जुलै महिना उजाडला होता. नूरचे पॅरिसमधील बहुतांश सारे सहकारी गुप्तचर पकडले गेले होते. त्यांच्या सेफ हाऊसचे पत्ते गेस्टापोंच्या हाती लागलेले होते. परिस्थिती एवढी वाईट होतीकी आता पॅरिसमध्ये ब्रिटिश एसओईच्या सात वायरलेस चालकांपैकी फक्त एकच उरला होता. तो म्हणजे नूर. तिचे वर्णन गेस्टापोंच्या हाती लागलेले होते. ती कधीही पकडली जाण्याची शक्यता होती. 

एसओईच्या एफ विभागाचे प्रमुख मॉरिस बकमास्टर म्हणूनच काळजीत होते. या विभागातर्फेच फ्रान्समधील स्वातंत्र्यसैनिकांच्या साह्यासाठी लंडनमधून प्रशिक्षित एजंट पाठविण्यात येत असत. त्यांनी नूरला संदेश पाठविला. आता फ्रान्समध्ये थांबण्यात प्रचंड धोका आहे. तू परत यावेस. तुझ्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यात येईल.’  

नूरला याची जाणीव होतीकी ती परतली तर पॅरिस आणि लंडन यांच्यातील एकमेव दुवा तुटेल. तिने उत्तर पाठविलेकी शक्यतो मी थांबतेच. अन्यथा पॅरिसमध्ये काय चालले आहे ते लंडनला समजणे कठीण होईल… येथे थांबून मी हळुहळू नव्या सर्किटच्या उभारणीचाजुन्या सर्किटच्या फेरजुळणीचा प्रयत्न करीन.’ बकमास्टर यांनी नाईलाजानेच तिला परवानगी दिली आणि नूर पॅरिसमध्येच थांबली. एका इमारतीतील तळमजल्यावरची सदनिका तिने भाड्याने घेतली. या इमारतीतील बहुतांश घरांमध्ये राहात असत शूट्झस्टाफलचे अधिकारी. एसएस नावाने कुप्रसिद्ध असलेले हे नाझींचे निमलष्करी दल. नूर थेट त्यांच्या गराड्यातच राहायला गेली होती.  

सहा वायरलेस चालकांचे काम आता तिच्या एकटीवर पडले होते. पण ते तेवढेच नव्हते. गेस्टापोंच्या तावडीतून निसटलेल्या प्रॉस्परच्या उपगटांतल्या एजंटांशी संपर्क साधणेत्यांच्या तसेच फ्रेंच स्वातंत्र्यसैनिकांच्या गरजा लंडनला कळविणेनिरोपांची-पैशांची ने-आण करणेलंडनहून पाठविण्यात येणारी युद्धसामग्रीपैसेएजंट यांची व्यवस्था पाहणे अशा विविध जबाबदाऱ्या तिला पार पाडाव्या लागत होत्या. बकमास्टर यांनी तिला जरा शांतच राहण्याचा सल्ला दिला होता. पण ते परवडण्यासारखे नव्हते. लंडनबरोबर वायरलेसने संपर्क साधणे हा आता जीवावरचा खेळ बनलेला असलातरी तो खेळणे भाग होते. वायरलेस संदेश एकाच जागेवरून पाठविणे धोक्याचे. त्यासाठी सतत फिरते राहणे आवश्यक. नूरने त्याकरीता काही घरे शोधून ठेवली होती. जुन्या ओळखी त्यासाठी कामास येत होत्या. पॅरिसमधील किमान पाच सदनिकांचा वापर ती अशा प्रकारे संदेश पाठविण्यासाठी करीत होती. कधी कधी कारने दूरवर जायचेरस्त्यात कुठे तरी गाडी थांबवायचीवायरलेसची लांबच लांब एरियर बाहेर काढायचीसंदेश पाठवायचाअसेही ती करीत होती. काळजी तर ती घेतच होती. परंतु वेळ काही सांगून येत नसते. 

ऑगस्टमधील ही गोष्ट. दुपारची वेळ. एका सहकाऱ्याला भेटण्यासाठी ती गेली होती. त्यांनी बाहेर जेवण केले आणि त्याच्या घरी जाण्यासाठी निघाले. तिच्या लक्षात आले की आपला पाठलाग होतोय. त्याबरोबर तिने आपल्या चालण्याचा वेग वाढवला. ते तिच्यामागे लागले. तशी ती धावू लागली आणि पाहता पाहता तिने त्या गेस्टापोंना गुंगारा दिला. 

असेच एकदा तिने मोठ्या हुशारीने जर्मन सैनिकांना उल्लू बनविले होते. एकदा मेट्रो रेल्वेने ती चालली होती. सोबत वायरलेस संचाची बॅगही. रेल्वेतील दोन जर्मन सैनिक त्याकडे संशयाने पाहात होते. तिच्या ते लक्षात आले. पण ती गाडीतून उतरूही शकत नव्हती. पकडली गेली तर संपलेच सारे. पण नूर शांत होती. 

एका सैनिकाने तिला विचारलेच, ‘बॅगमध्ये काय आहे?’

चेहऱ्यावरची रेषही हलू न देता ती म्हणाली, ‘सिनेमॅटोग्राफीची उपकरणं आहेत.

बॅग उघड,’ त्यांनी फर्मावले. तिने बॅगचे झाकण किंचित उघडले. आत वायरलेस संच. त्याच्या वायरबल्ब. पण एव्हाना नूरला त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात आले होतेकी ते दोघेही अडाणी आहेत. तशी तिने आत्मविश्वासाने ती बॅग खोलली. ते यंत्र कसे आहे वगैरे सांगू लागली. त्या सैनिकांनी आयुष्यात कधी सिनेमॅटोग्राफीचे यंत्र पाहिलेले नव्हते. पण आपले अज्ञान कसे दाखवायचे या सुंदर तरुणीपुढे. ते मान डोलावत राहिले. म्हणाले, ‘आम्हाला वाटलं भल्तंच काही आहे या बॅगमध्ये.

याहून थरारक घटना घडली ती नूरच्या सदनिकेतच. तळमजल्यावरील या सदनिकेचा वापर ती बहुतांशी लेटर बॉक्स’ - निरोप वा पत्रांची देवाण-घेवाण करण्यासाठी - म्हणून वा कधी तरी वायरलेस संदेश पाठविण्यासाठी म्हणून करीत असे. एके रात्री तिला तातडीने लंडनला संदेश पाठवायचा होता. तिने वायरलेस संचाची एरियल खिडकीबाहेरच्या झाडाला टांगायची ठरविले. खिडकीतून सोडलेली ती केबल वरच्या फांदीला अडकवण्याची तिची धडपड सुरू होतीतोच बाजूच्या सदनिकेतील एकाने तिला विचारले, ‘काही मदत करू का मी?’ तो जर्मन सैनिक. त्याच्या लक्षात ती कसली एरियल आहे हे आले की कंबख्ती भरलेलीच. पण नूरने प्रसंगावधान राखले. शांतपणे ती म्हणाली, ‘बरंच होईल मदत केली तर.’ तो सैनिक आला. त्याने ती वायरलेस संचाची एरियल अडकवून दिली आणि तो गेला. नूर बचावली. बहुधा ती रेडिओची एरियल असावी आणि या तरूणीला गाणी वगैरे लावायची असावीत असे त्याला वाटले असावे. आपल्यातच राहून ही निष्पाप वाटणारी तरुणी शत्रूंना वायरलेस संदेश पाठवित आहे हे त्याच्या मनीध्यानीही आले नसावे.

पण नूर धोके पत्करत होती. लंडनला संदेश पाठवित होती. जर्मनांची हानी करीत होती. तिने पाठविलेल्या एका संदेशावरून हे नुकसान कोणत्या प्रकारचे होते याचा अंदाज यावा. ती ज्या फ्रेंच बंडखोर आणि घातपात्यांबरोबर काम करीत होतीत्यातील एकाला एक खबर लागली होतीकी जर्मनांनी यूबोटींसाठीचे काही टॉर्पेडो भूमिगत गटारांत लपवून ठेवले आहेत. ते उडवून लावण्यासाठी तातडीने स्फोटके पाठवा असा संदेश तिने लंडनला पाठविला होता. त्या चार महिन्यांत अत्यंत कठीण अशा परिस्थितीत तिने लंडनला महत्त्वाचे २० संदेश पाठविले होते. जर्मनांनी विमान पाडल्यामुळे दोस्त राष्ट्रांचे ३० सैनिक फ्रान्समध्ये अडकले होते. त्यांची सुटका करण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. फ्रेंच बंडखोरांना पैसे आणि शस्त्रास्त्रे पुरवण्याची कामगिरी तिने पार पाडली होती. ही शस्त्रेदारुगोळा विमानांतून गुपचूप नेमका कोठे उतरवायचा याची माहिती तिने लंडनला पाठविली होती. एसओईच्या काही एजंटांना लंडनला सुखरूप पाठविण्याच्या कामातही तिचा सहभाग होता. काही एजंटांपर्यंत तिने बनावट कागदपत्रे पोचविली होती. शत्रूचे हेर आणि पोलिस पाठीवर असताना केलेली ही कामगिरी आहे. यात जीवाचा धोका होता. पकडली जाण्याची भीती होती. पण एसओईचे प्रशिक्षणअंगची प्रसंगावधानता आणि सिक्स्थ सेन्स’ या बळावर ती नाझींना हुलकावण्या देण्यात यशस्वी ठरत होती. धाडसाचे म्हणालतर सप्टेंबर १९४३ मध्ये तिने एक खोली भाड्याने घेतली होतीवायरलेस संदेश पाठविण्यासाठी आणि निरोपांची देवाण-घेवाण करण्यासाठी. ही खोली होती गेस्टापोंच्या मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर. 

पण आता नूरचा एकेक कॉन्टॅक्ट’ गेस्टापोंच्या जाळ्यात अडकत चालला होता. गॅरी हा तिचा निकटचा सहकारी. त्याच्या सर्किटमधील अनेक जण पकडले गेले होते. नूर एकटी पडत चालली होती. दुसरीकडे तिच्याभोवतीचा सापळा आवळत चालला होता. आणि त्यास नकळतपणे लंडनचा हातभार लागला होता. हेरगिरीत गलथानपणाला स्थान नसते. एसओईमध्ये मात्र तेव्हा त्याची वानवा नव्हती.

एके दिवशी लंडनहून नूरला संदेश आलाकी शाम्झ-एलिझेत एक कॅफे आहे. तेथील क्लोकरुम ॲटेन्डन्टला भेट. त्याला सांकेतिक शब्द सांग. तो तुला एसओईच्या दोन कॅनेडियन एजंटांची भेट घालून देईल. नूर त्या प्रमाणे त्यांना भेटली. ही भेट नूरसाठी जीवघेणी ठरू शकली असती. याचे कारण - हे सगळेच प्रकरण म्हणजे नाझींनी रचलेला एक चलाख डाव होता. नूर ज्यांना भेटण्यासाठी गेली होती ते दोघेही एसओईचे नव्हेतर जर्मनीचे हेर होते. त्या मूळ कॅनेडियन एजंटांना केव्हाच अटक करण्यात आली होती. पण लंडनला त्याचा पत्ताच नव्हता. त्याचा फायदा नाझींनी घेतला होता. त्या एजंटांच्या नावाने ते त्यांच्याच वायरलेस संचाद्वारे लंडनशी सतत संपर्क साधून होते. लंडनला चुकीची माहिती पुरवत होते. आणि त्यावर विसंबून लंडनमधील एसओईचे अधिकारी निर्णय घेत होते. त्या दिवशी त्यांनी नूरला अगदी अलगद जर्मन हेरांच्या सापळ्यात धाडले होते. त्यांनी तिला अटक केली नाहीयाचे एकच कारण होते. तिच्या माध्यमातून त्यांना ब्रिटिश हेरांचे जाळे उद्ध्वस्त करायचे होते. त्या दिवशी त्यांनी तिच्याकडून एका ब्रिटिश एजंटचे नाव काढूनही घेतले. दोनच दिवसांत त्याला पकडले आणि मग पुन्हा त्याच्या माध्यमातून नूरला पकडण्यासाठी सापळा लावला. ती तारीख होती ३० सप्टेंबर. 

त्या पकडलेल्या ब्रिटिश एजंटाच्या नावे जर्मन हेरांनी तिला एका विशिष्ट ठिकाणी भेटण्यास बोलावले. पण नूरच्या मनात जरा शंका होती. त्या एजंटाशी गेल्या दोन दिवसांपासून तिचा संपर्क झालेला नव्हता. त्याला अटक झाली असावी असे तिला वाटत होते. त्यामुळे ती त्याला भेटण्यासाठी गेलीपण काळजी घेऊन. तिने त्या ठिकाणी टेहळणी करण्यासाठी आधी आपला एक माणूस पाठविला. त्याने पाहिलेतो ब्रिटिश एजंट ठरलेल्या ठिकाणी आला होता. पण बराच वेळ झाला तरी नूर येत नाही हे पाहिल्यावर त्याच्या आजुबाजूला दबा धरून बसलेल्या नाझी हेरांनी त्याला पकडून गाडीत टाकले. नूरच्या सिक्स्थ सेन्सने तिला पुन्हा एकदा वाचविले. 

त्या घटनेने नूरला किती धोका आहे हे मात्र दाखवून दिले. तिलाही त्याची जाणीव झाली. आपल्याशी आपल्याच सहकाऱ्याने गद्दारी करावी याचा धक्का मोठा होता तिच्यासाठी. तिने पुन्हा एकदा वेशांतर केले. केस रंगविले. फ्रेंच तरूणींप्रमाणे पोशाख केला. निळा सूटपोलो-नेक जंपर आणि त्यावर निळ्या रंगाची हॅट. पण आता फार काळ पॅरिसमध्ये थांबणे म्हणजे साक्षात् मृत्यूशी खेळ. तरीही ती पॅरिस सोडण्यास तयार नव्हती. तिची एकच अट होतीदुसरा वायरलेस चालक येईपर्यंत आपण येथून हलणार नाही. अखेर एसओईच्या एफ विभागाचे प्रमुख मॉरिस बकमास्टर यांनी तशी व्यवस्था केली आणि नूर लंडनला परतण्यास तयार झाली. तारीख ठरली १४ ऑक्टोबर. पण त्याच्या आदल्या दिवशीच घात झाला

सहकाऱ्याच्या बहिणीने विश्वासघात केला आणि चार महिने नाझी हेरांच्या नाकावर टिच्चून पॅरिसमध्ये हेरगिरी करीत असलेली ही भारतीय वाघीण गजाआड गेली. 

त्या दिवशी गेस्टापोंच्या एजंटांच्या हातावर तुरी देऊन ती निसटली. संकट टळले असा विचार करून बऱ्याच वेळाने ती तिच्या सदनिकेकडे परतली. दरवाजाचे कुलूप उघडून ती आत आली. पण त्या दाराआड गेस्टापोचा एक एजंट दबा धरून बसलेला होता. नूरवर त्याने झडप घातली. तिने जीवाच्या आकांताने प्रतिकार केला. त्याच्या हाताचा चावा घेऊन तिने आपली सुटका केली. पण त्याने सोफ्यावर तिला ढकलून देत तिच्यावर पिस्तुल रोखले. मोकळ्या हाताने दूरध्वनीचा रिसिव्हर उचलून मदत मागविली. नूर पकडली गेली. 

 

०००


कोठडीच्या भिंती भल्याभल्यांना भोकाड पसरवायला लावतात. तेथील छळापुढे मोठमोठ्या शूरवीरांचे मांजर होते. नूरचे मन मात्र पोलादाने बनले होते. स्वभावतः ती शांततावादी होती. संस्कार सूफी तत्त्वज्ञानाचे होतेगांधींच्या अहिंसेविषयी मनात आस्था होती. या अहिंसेत मोठी ताकद असते हे गांधींनी जगाला दाखवून दिले होते. वेगळ्याच संदर्भात नूरही त्याचेच एक उदाहरण जगासमोर सादर करीत होती.

अटकेनंतर तिला गेस्टापोच्या ताब्यातील एका इमारतीमधील कोठडीत बंद करून ठेवले होते. कसून चौकशी करण्यात आली तिची तेथे. पण ती ना घाबरलीना बधली. तिने अखेरपर्यंत कोणतेही गुपित उघड केले नाही. उलट त्या कारागारातील अन्य काही कैद्यांना सोबत घेऊन तेथून पळून जाण्याचे प्रयत्न तिने केले. एकदा नव्हेतर दोनदा. 

अशा अति खतरनाक कैद्याला पॅरिसमध्ये ठेवणे आता धोक्याचे होते. नाझींनी तिला जर्मनीला पाठविले. ती तारीख होती २६ नोव्हेंबर १९४३. जर्मनीत पाठविण्यात आलेली ती पहिली ब्रिटिश महिला गुप्तचर होती. हातापायात बेड्या घालूनअंधारकोठडीत ठेवण्यात आले होते तिला. एवढेच नव्हेतर तिला कोणाशी संपर्क साधता येऊ नये यासाठी तिच्या बाजूच्या कोठड्याही रिकाम्या ठेवण्यात आल्या होत्या.

१९४४. महायुद्धाचे पारडे आता पालटले होते. ऑगस्ट १९४४ मध्ये नाझी फौजांना पॅरिसमधून काढता पाय घ्यावा लागला होता. पण ते पाहायला नूर तेथे नव्हती. जर्मनीतील तुरूंगातून तिला डकाव छळछावणीत पाठविण्यात आले होते. १२ सप्टेंबरच्या मध्यरात्री नूर आणि अन्य तीन ब्रिटिश महिला एजंटांना घेऊन तुरुंगाचे वाहन त्या छळछावणीत आले. पहाटे पहाटे त्या तिघींना कोठडीतून बाहेर काढून गोळ्या घालण्यात आल्या. 

नूरला इतक्या पटकन मरण मात्र ते देणार नव्हते. तसा आदेशच होता तुरुंगाधिकाऱ्यांना. त्या रात्री तिला नग्न करून प्रचंड मारहाण करण्यात आली. अनन्वित अत्याचार केले त्यांनी तिच्यावर. त्या छळाने कोसळली ती. आणि मग १३ सप्टेंबरच्या १९४४च्या त्या काळ्या सकाळी तेथे कोठडीतच नूरच्या डोक्यात गोळी घालून तिचे प्राण घेण्यात आले.

यानंतर लवकरच महायुद्ध संपले. या युद्धानंतर नूरला भारतात यायचे होते. येथील स्वातंत्र्ययुद्धात सहभागी व्हायचे होते. पण तिचे ते स्वप्न मात्र अपूर्ण राहिले

 

०००

 

(हा लेख 'स्पाय प्रिन्सेस : शर्बनी बसूरोली बुक्स२००६' आणि 'नूर-उन-निसा इनायत खान : जॉं ओव्हरटन फ्युल्लरईस्ट-वेस्ट पब्लिकेशन्स फॉन्ड्स१९७१' या दोन पुस्तकांवर प्रामुख्याने आधारलेला असूनसंदर्भाकरीता 'स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह मॅन्युअल : विल्यम कॉलिन्स प्रकाशन,२०१४'चाही वापर करण्यात आला आहे.)

 

०००

 

(पूर्वप्रसिद्धी - कालनिर्यण दिवाळी अंक २०२१)

1 comment:

Dev_D said...

खूप सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.