संप संपविण्याचे शास्त्र

लिटल स्टील संप, १९३७

मोहॉक हे अमेरिकेतल्या न्यू यॉर्क राज्यातले खोरे. तेथे रेमिंग्टन रँड ही कंपनी होती. टाईपरायटर आदी वस्तूंचे उत्पादन करायची ती. जेम्स रँड हे तिचे अध्यक्ष होते. त्या कंपनीतील कामगार संघटनेने १९३६च्या मे महिन्यात संपाची हाक दिली. तो साधारण बारा महिने चालला. फार काही वेगळा नव्हता तो संप. मोर्चे, निदर्शने, हाणामा-या, कामगारांतील वाद, मालकांची अडेलतट्टू भूमिका, नंतर वाटाघाटी, चर्चा, आरोप-प्रत्यारोप, आणि मग समेट... सारे काही नेहमीप्रमाणेच होते. हा संप अधिक हिंसक होता इतकेच. कोणाचा जीव गेला नाही त्यात, परंतु हाणामाऱ्या, दगडफेक असे प्रकार खूप घडले. पुढे न्यायालयातून तेथील कामगारांना न्याय मिळाला. पण मधल्या काळात जेम्स रँड यांनी हा संप ज्या प्रकारे हाताळला, ते कामगारांशी ज्या प्रकारे लढले, त्यातून संप हाताळण्याचे, खरे तर संप फोडण्याचे एक सूत्र निर्माण झाले. मोहॉक व्हॅली सूत्र

त्याचे निर्माते म्हणून जेम्स रँड यांचे नाव घेतले जाते. पण अमेरिकी विचारवंत नॉम चॉम्स्की यांच्या मते, या सूत्राच्या निर्मितीत जनसंपर्क क्षेत्रातील तेव्हाच्या अनेक मातब्बरांचा सहभाग होता. या सूत्राला ते लोक संप फोडण्याची शास्त्रीय पद्धत म्हणत. तिचा वापर १९३७ मधील लिटल स्टील संपातही अतिशय प्रभावीपणे करण्यात आला. अमेरिकेतील तीन छोट्या पोलाद कंपन्यांमध्ये हा संप झाला. त्या दशकातला अत्यंत हिंसक संप म्हणून त्याचे वर्णन करण्यात येते. मिल मालकांनी त्यात संप फोडण्याची सगळी जुनी तंत्रे तर वापरलीच. त्यात संपफोड्या गुंडांपासून पोलिस आणि राजकारणी यांचा वापर आलाच. पण यावेळी त्यांनी दंडुक्यांबरोबरच प्रोपगंडाचाही वापर केला. या कंपन्यांमध्ये संप होणार अशी चिन्हे दिसू लागताच, मिल मालकांच्या अमेरिकन आयर्न अँड स्टील इन्स्टिट्यूट या संस्थेने जून १९३६ रोजी अमेरिकेतील ३४ राज्यांतील ३८२ वृत्तपत्रांतून एक जाहिरात प्रसिद्ध केली. तिचा मथळा होतापोलाद क्षेत्रातील उद्योजक आणि सामान्य जनता यांच्यासाठी. एक लाख १४ हजार डॉलर खर्चून करण्यात आलेल्या त्या जाहिरातीचा हेतू स्पष्ट होता. त्यांना लोकमानस प्रभावित करायचे होते. तो मोहॉक व्हॅली सूत्राचाच एक भाग होता. ते विरुद्ध आपण या संघर्षाच्या पायावर हे सूत्र उभे आहे.

वस्तुतः कोणतेही संपकरी हे काही परग्रहावरचे प्राणी नसतात. ते आपल्यातीलच असतात. आपल्यावर अन्याय झालेला आहे ही त्यांची भावना असते. आपल्या मागण्यांसाठी ते झगडत असतात. पण मोहॉक व्हॅली सूत्रातील पहिला नियम हा आहे, की या संपक-यांनातेठरवायचे. सामान्य जनता म्हणजेआपण’. त्या आपल्या विरोधात त्यांना उभे करायचे. म्हणजे उदाहरणार्थ संपकरी हे शिक्षक असतील, तर बाकीच्या समाजघटकांना त्यांच्याविरोधात उभे ठाकण्यास प्रवृत्त करायचे. संपकरी हे व्यवस्थेत तोडफोड करणारे आहेत, समाजकंटक आहेत, समाजासाठी - म्हणजे सामान्य नागरिक, उद्योजक, व्यावसायिक, कामगार, कामगारांची कुटुंबे, गृहिणी अशा सर्व वर्गासाठी म्हणजेच आपल्यासाठी - धोकादायक आहेत, अशी प्रतिमा तयार करायची. आपल्या सर्वांना शांततेत जगायचे असते. संघर्ष नको असतो आपल्याला. एकमेकांच्या हातात हात घालून एकसंघपणे समाज चालला पाहिजे ही इच्छा असते आपली. सामाजिक सौहार्द हे आपले श्रेयस आणि प्रेयस असते. पण हे संपकरी सामाजिक सौहार्दाचे वातावरणच नष्ट करू पाहात आहेत हे लोकांसमोर ठेवायचे

साधी गोष्ट आहे. समजा आपल्याला कोणी विचारले, की तुम्हांला सामाजिक सौहार्द हवे की नको? तुमचा सामाजिक शांततेला पाठिंबा आहे की नाही? तर आपण काही नाही असे म्हणणार नाही. हे प्रश्न तुमचे देशावर प्रेम आहे की नाही, तुम्ही आपल्या सैनिकांच्या पाठीशी आहात की नाही?’ यांसारखेच असतात. त्यांना कोण नकारार्थी उत्तर देईल? खरे तर हे प्रश्न अत्यंत पोकळ आणि भाबडे असतात. पण संपकरी हे शांतता आणि सौहार्द यांचा भंग करीत आहेत, असे सांगितल्याबरोबर आपण त्या संपक-यांच्या विरोधात उभे राहतो ते या भाबडेपणाने. आता प्रत्येक वेळी शांतता आणि सौहार्द हाच मुद्दा असेल असे नाही. तो त्या-त्या वेळेनुसार, त्या-त्या संपकऱ्यांनुसार बदलेल. म्हणजे तो कधी शेतमालाच्या नासधुशीचा असेल, कधी तो विकासाचा असेल

या सूत्रातील दुसरा नियम आहे - आंदोलकांच्या नेत्यांचे प्रतिमाहनन. आंदोलनाची शक्यता दिसताच पहिल्यांदा काय करायचे, तर या नेत्यांची बदनामीते नेते लोकांना भडकावणारे, पेटविणारे. ते विकले गेलेले. कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करणारे. ते देशद्रोही. ते जातीयवादी. तेराजकारणकरणारे समाजकंटक. विविध लेबले चिकटवायची त्यांना. त्याचबरोबर त्यांच्या विश्वासार्हतेवर आघात करायचा. ती संपवून टाकायची. लोकशाहीत लोकसंख्या महत्त्वाची असते आणि नेत्यांची ताकद त्यांच्या अनुयायांत असते या दोन गोष्टी लक्षात घेऊन, त्या आंदोलक नेत्यांमागे मोजकेच लोक आहेत, हे सातत्याने, वारंवार समाजमनावर बिंबवायचे. मूठभर समाजकंटक उभे राहतात आणि सगळ्या समाजाला वेठीस धरतात, अशा आशयाचे वाक्य अनेक आंदोलनांत आपण ऐकलेले आहे. ते येते या सूत्रानुसारच. आंदोलक हे अल्पसंख्य आहेत आणि म्हणून ते बहुसंख्येच्या विरोधात आहेत आणि बहुसंख्याकांची बाजू नेहमीच न्यायाची असते आणि म्हणून आपण बहुसंख्याकांबरोबर राहिले पाहिजे, हे स्पष्ट सांगताही मग जनतेला समजते. अशा प्रकारे त्या आंदोलनास असलेली सामाजिक सहानुभूती खिळखिळी केली जाते.  

यासाठी आणखी एक मार्ग आहे. नागरिकांच्या समितीचा. अशी समिती स्थापन करायची. समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, धर्मगुरू, लेखक, बँकर, उद्योजक, व्यापारी अशा विविध घटकांना एकत्र आणायचे आणि त्यांच्याद्वारे आंदोलकांवर विविध मार्गांनी दबाव आणायचा. या समितीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या सभा बोलवायच्या. पत्रके काढायची. यातून दोन गोष्टी साधल्या जातात. आंदोलकांच्या विरोधात समाजाचे नेते आहेत असे दाखविता येते आणि त्यातून आंदोलक हे समाजविरोधी वा देशविरोधी आहेत असे दाखवून देता येते. आंदोलनाविरोधात जनभावना तयार होते. हे आंदोलकांच्या विरोधातील प्रतिआंदोलनच. वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या संदर्भात हा प्रकार आपणांस सातत्याने दिसतो. सरकारविरोधात कोणी आंदोलन केले की त्या आंदोलकांच्या विरोधात मोर्चे काढले जातात. काही लोकांनी पत्रके काढली की लगेच त्यांच्या विरोधात त्याहून अधिक लोकांच्या सह्या असलेली पत्रके काढली जातात.  

मोहॉक व्हॅली सूत्रातील आणखी एक महत्त्वाची बाब आहे ती कायदा आणि सुव्यवस्थेची. जोवर एखादे आंदोलन शांततामय मार्गाने चाललेले असते, अहिंसक पद्धतीने चाललेले असते तोवर समोरची बाजू हतबल असते. अगदी एखादा हुकूमशहा जरी सत्तेवर असला, तरी त्याला जनतेच्यासँक्शनची, मान्यतेची आवश्यकता असते. त्यासाठीच अगदी हुकूमशाही देशांतही निवडणुकीची नाटके केली जात असतात. कारण त्यांना माहित असते, की एकदा का जनतेची मान्यता गेली की सत्ता पलटण्यास वेळ लागत नाही. अहिंसक, शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर एखाद्या सरकारने दंडशक्तीचा प्रयोग केला, तर जनतेत असंतोष निर्माण होऊ शकतो. लोकांची सहानुभूती आंदोलकांना मिळू शकते. महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरोधात अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग निवडला होता तो काही उगाच नव्हे. अशा प्रकारच्या आंदोलनात मग समाजातील प्रत्येक घटक, स्त्रिया, वृद्ध, लहान मुलेही सहभागी होऊ शकतात. अशा आंदोलनात नैतिक ताकद असते. महात्मा गांधींची अहिंसा आणि सत्याग्रह यांची खिल्ली उडविणाऱ्या अनेकांच्या हे लक्षातच आलेले नसते, की काही काळापूर्वी महाराष्ट्रात निघालेल्या मराठा मूक मोर्चांनी अशीच नैतिक ताकद दाखवून दिली होती. आणि म्हणूनच शांततामय आंदोलनात अनेकदा गुंड घुसवून हिंसाचार घडविला जातो. आंदोलकांना डिवचून, चिडवून उत्तेजित करून त्यांनी हिंसाचारास प्रवृत्त व्हावे असे वातावरण निर्माण केले जाते. आणि एकदा का कोणत्याही आंदोलनात हिंसा शिरली की ते मोडणे केव्हाही सोपेच असते. आंदोलकांची संख्या कितीही मोठी असो, राज्याच्या दंडशक्तीपुढे ती नेहमीच नगण्य असते. हिंसाचाराची सर्वांत मोठी क्षमता असते ती राज्याकडे. पोलिसांपासून लष्करापर्यंतच्या यंत्रणा असतात त्यांच्याकडे. लोकांच्या मान्यतेनेच त्या स्थापन झालेल्या असतात. या लोकांच्या नावानेच, ‘कायदा आणि सुव्यवस्थाराखण्यासाठी त्या अशी हिंसक आंदोलने मोडून काढू शकतात. देशातील कामगारांच्या संपाने याचा वेळोवेळी अनुभव घेतलेलाच आहे.  

आंदोलनातील हिंसाचारालाच नव्हे, तर एकूणच कोणत्याही संघर्षाला यात विरोध केला जात असतो. वस्तुतः हिंसाचाराला विरोध हा असलाच पाहिजे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. परंतु येथे जेव्हा आपण हिंसाचाराबद्दल बोलतो, तेव्हा तो संप फोडण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला हिंसाचार असतो. संघर्षाचे म्हणाल, तर मुळातच व्यवस्थेला संघर्ष नकोच असतो. तेव्हा, आंदोलकांची बाजू कितीही बरोबर असो, त्यांच्या मागण्या योग्य आणि न्याय्य असोत, त्यांच्यावर अन्याय होत असो, परंतु त्याविरोधात संघर्ष करण्याचा मार्ग संप वा बंद हा नव्हे. त्यांनी संबंधितांशी शांततेने चर्चा करून समस्या सोडविली पाहिजे, अशीच भूमिका प्रसृत केली जात असते. संघर्षामुळे समाजाचे म्हणजे आपले नुकसान होते. हे आपण नेहमीच सामाजिक सौहार्द, शांतता आणि विकासाच्या बाजूचे असतो. ते म्हणजे कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या संघटनावाले. त्या संघटनेच्या नेत्यांना सतत संघर्षच हवा असतो. कारण त्यावरच त्यांचे पोट चालत असते. तेव्हा आपण आपल्या हिताचे संरक्षण केले पाहिजे. अखेर संप हे विघातक, हिंसक, लोकशाहीच्या विरोधातील असतात. आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी संप संपविला पाहिजे, हा सारा प्रचार त्यातूनच येत असतो. हा सर्व प्रचार म्हणजेच मोहॉक व्हॅली सूत्र

हे सर्व सुरू असतानाच, दुसरीकडे संप वा बंद कसा फसलेला आहे, कारखाने वा जनजीवन कसे सुरळीत चाललेले आहेत, याचा प्रचार केला जातो. प्रसिद्धी माध्यमांतून अपमाहितीचा भडिमार केला जातो. माहिती नियंत्रित केली जाते. मोहॉक व्हॅलीतील संपांमध्ये हेच तंत्र वापण्यात आले होते. कारखान्यांत कामावर येण्यासाठी कामगार तयार आहेत, परंतु आंदोलक नेत्यांचे गुंड त्यांना धमकावत आहेत. अमुक ठिकाणी संपावरील कामगारांनी माघार घेतली. आंदोलकांचा तमुक नेता मिल मालकांशी चर्चा करीत आहेत... अशा नाना अफवा तेव्हा पसरविण्यात आल्या होत्या. वाचताना हे सारे साधे वाटते. परंतु अमेरिकेच्या औद्योगिक जगतात अतिशय प्रभावी ठरले होते हे सूत्र. आणि आजही ते प्रभावी ठरत आहे


अखेर आंदोलक वा संपकरीही नागरिक असतात. तेही याच समाजाचे भाग असतात. त्यांनाही कुटुंब असते. विकास हवा असतो. प्रगती हवी असते. ते आंदोलन करतात कारण त्यांच्या मनात अन्यायाची भावना असते. अशा गोष्टींना या सगळ्या प्रोपगंडामध्ये कोठेही स्थान नसते. असले तर त्याची जागा मागच्या बाकावर असते. पुढे दिसतो तो केवळ आंदोलकांचा हिंसाचार. त्यांच्यामुळे झालेले सार्वजनिक नुकसान. त्यांनी काढलेल्या मोर्चामुळे वा केलेल्या रास्ता रोकोमुळे झालेली वाहतूक कोंडी. या प्रोपगंडाचा परिणाम असा, की आंदोलन कामगारांचे असो की शासकीय कर्मचाऱ्यांचे, परिवहन कर्मचाऱ्यांचे असो की बँकेतील अधिकाऱ्यांचे, टॅक्सी-रिक्षा चालकांचे असो की शिक्षक-प्राध्यापकांचे, ते संपकरी आंदोलक सोडले, तर अन्य समाजघटकाची सहानुभूती त्यांना अभावानेच मिळते. शिक्षकांनी ऐन परीक्षेच्या हंगामात आंदोलन केले, सफाई कर्मचा-यांनी ऐन पावसाळ्यात संप केला की लोक वैतागतात. यांना अन्य वेळी आंदोलन करता येत नाही का? हे ब्लॅकमेलिंग आहे, अशा प्रतिक्रिया उमटतात. आंदोलनाच्या वेळेबद्दल बोलणाऱ्यांच्या हे लक्षातच येत नसते, की नाक दाबून तोंड उघडणे हेच तर अशा आंदोलनांचे मूलतत्त्व असते. किंबहुना त्याशिवाय या आंदोलकांकडे कोणी ढुंकूनही पाहणार नसते. परंतु प्रत्येक वेळी ते विरुद्ध आपण असा संघर्ष उभा केल्यामुळे, त्यांच्यामुळे समाज वेठीस धरला जातो अशी भावना निर्माण करण्यात आल्यामुळे आंदोलनकर्ते नेहमीच समाजद्रोही ठरतात. त्या-त्या आंदोलनकाळात वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तरी हे समजेल. हे सारेच व्यवस्थेच्या फायद्याचे असते

उद्या एखादे आंदोलन उभे राहिलेच, तर त्याविषयी चर्चा करताना हे सारे लक्षात घ्या. त्या आंदोलनाच्या मागण्या, त्याची योग्यायोग्यता याबाबत मतभेद असू शकतात. चर्चा व्हावी ती त्याविषयी. त्याला जर फाटे फोडले जात असतील, त्या आंदोलनात हिंसाचार होत असेल, तर पाहा त्यामागे कोण आहे? त्या आंदोलनाच्या नेत्यांना बदनाम केले जात असेल, त्यांना समाजद्रोही म्हटले जात असेल, तर पाहा मोहॉक व्हॅली फॉर्म्युला तर तेथे कार्यरत नाही ना? तसे असण्याचीच जास्त शक्यता असेल


(‘इत्यादीदिवाळी अंक, मनोविकास प्रकाशन, २०१९ मधील लेखाचा संपादित भाग.)

No comments: