कट्टा म्हणजे काय असे पुसतां, "मनुष्यमात्रांवर सुपारी घेऊन गोळी झाडण्याचे देशी साधन,' असे दुश्चित्र एखाद्याच्या नजरेसमोर उभे राहिले, तर त्यास आपण काय करणार? ते अभागी आपण येथून बाद करू या आणि पुन्हा विचारू या...
कट्टा म्हणजे काय?
पाहा, पाहता पाहता समस्त मंडळींच्या दृष्टीसमोर त्या मित्रांसमवेत तास न् तास रंगविलेल्या गप्पांच्या मैफली तरळू लागल्या...ती भंकस, ती एकमेकांची मस्करी, कुणा छावीच्या नावे चिडवाचिडवी, ते गांधीवादापासून पिक्चरची तिकिटे कोणी काढायची येथपर्यंत नाना विषयांवर झालेले आंतरराष्ट्रीय वाद, ते कटिंग चहाचे प्याले आणि चौघांनी मिळून फुंकलेली एक चारमिनार, ते आयुष्यात एकमेकांना न विसरण्याचे केलेले कस्मे-वादे...
खरे तर कट्टा म्हणजे काय हा सवालच फिजूल आहे!
कट्टा हे असे क्षेत्र, की जेथे विजयचा विज्या, राजूचा राज्या आणि आबाचा आब्या होतो! हा आबा दरमहा विलायतवारी करणारा यशस्वी व्यावसायिक असला किंवा राजू महाविद्यालयातला विद्वान प्रोफेसर असला, तरी त्यांच्या या बाह्य उपाध्यांवर तेथे काडीमात्र परिणाम होत नाही. कट्टा हा सगळ्या ऐहिक भेदांच्या पलीकडे गेलेला असतो. जेथे असे भेद असतात, त्यास कट्टा म्हणत नाहीत!
तुम्ही कुणीही असा, तुमच्या आयुष्यात असा एखादा कट्टा, असे एखादे आर्य गप्पा मंडळ वा फ्रेंड्स क्लब वा साधासुधा गप्पांचा अड्डा असतोच.
नसेल, तर मित्रांनो, शोधा! कदाचित तो कॅंटीनच्या टेबलांवर सापडेल, कदाचित तो कचेरीच्या बाहेर पानठेल्यावर असेल, कदाचित मित्राच्या वाड्याच्या ओट्यावर किंवा गावपांढरीतल्या पारावर दिसेल; पण माणसाला कट्टा हवाच!
माणूस झाला म्हणजे त्याला कधी तरी आयुष्याच्या इस्त्रीची घडी विस्कटावी वाटतेच. खी खी खी करून खिदळावे, वय हुद्दा-मानमरातब-वेतनबितन असे सगळे काही विसरून निरामय अशिष्ट वागावे, झालेच तर मित्रांच्या खांद्यावर मान ठेवून त्यांना, आपला साहेब साला कसा गर्दभ आहे, पार्शालिटी करतो वगैरे काळजात साठलेले आम्लपित्त सांगावे वाटते. गरज आहे ती प्रत्येकाची. आतली स्प्रिंग अशी पिळत पिळत गेली, की माणसे आजारतात. त्यांना मनाच्या तळातून मोकळे होण्याचे कट्टा हेच एक सैलक्षेत्र असते. तशी दुसरीही एक जागा असते, मानसोपचारतज्ज्ञाची खुर्ची! पण तिकडे जाणे पडू नये म्हणून तर कट्टा हवा मित्रांनो!
मनगटावरचे घड्याळ मानगुटीवर आल्याच्या आजच्या काळात कट्टे तसे हरवलेच. कुणाला ते फिजूल वाटू लागले. कुणाला तो वृथा टैमपास वाटू लागला. तशी गप्पाष्टके अगदीच संपली असे नाही. होतात; पण तेथे मित्रांऐवजी कलीग असतात. तेथे कुणी पाठीवर मारलेली थाप ही प्रेमाचीच असेल, याची गॅरंटी तर तो पाठीवर थाप मारणारासुद्धा देऊ शकत नाही. तेथेही हास्यविनोद होतात; पण माणसे हसतात ती चित्रवाणीतल्या विनोदी कार्यक्रमांतल्या परीक्षकांप्रमाणे- भाड्याने हसल्यासारखी!
परवा सीसीडीमध्ये चार पोरे जर्नल कशी कंप्लीट करावयाची व मास्तरच्या पूज्य टाळक्यावर असाइन्मेंट कशी आदळावयाची, याची गंभीर चर्चा करताना दिसली, तेव्हा तर आजची तरुणाईसुद्धा कट्ट्याविना बहकली आहे की काय, अशी दुःशंका मनी आली. महाविद्यालयांतील वर्ग, शिकवण्या, शिबिरे, छंदवर्ग, झालेच तर रिऍलिटी शोकरिता करायची तयारी अशा गुंत्यात गुंतल्यानंतर या पोरांस आयुष्याचे इस्टमनकलर दिसणार तरी कधी, असे वाटले. यांच्यासाठी आयुष्य म्हणजे तर ताणकाटाच झाला! म्हणून तर ती व्हर्च्युअल कट्ट्यांवर जात नसतील ना? ऑर्कुट अन् फेसबुकात मैत्र जिवांचे शोधत नसतील ना? पण हे असे सोशली कनेक्ट राहणे म्हणजे मृगजळाने तहान भागविणेच झाले. सगळाच आभास!
मैत्रीचा, सोशली कनेक्ट राहण्याचा, शेअरिंगचा. यांना जिताजागता, हसताखिदळता कट्टा हवाच!!
एकदा आमची यत्ता तिसरीतली कन्या बराच वेळ झाला, तरी वर आली नाही, म्हणून पाहायला गेलो, तर ती आणि तिच्या चार-पाच चिमुरड्या सख्या सोसायटीच्या गेटवर अशा घोळक्याने गप्पामग्न उभ्या! बऱ्याच वेळाने त्यांचे "च्यल् सीयू', "बायबाय' वगैरे झाले.
तिला विचारले, ""काय गं, एवढा वेळ कसल्या गप्पा मारत होता?'' तर ती म्हणाली, ""काही नाही... असंच! सहज गप्पा मारत होतो!''
म्हटले, चला, म्हणजे कट्टा अजूनही शाबूत आहे.
माणसे अजूनही सहजच गप्पा मारू शकत आहेत!
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ, सप्तरंग पुरवणी, रविवार, १२ सप्टें. २०१०)
Read more...
त्यांचे असत्याचे प्रयोग!
-
गांधींविषयी गैरसमज पसरविणा-या, त्यांचे चारित्र्यहनन करणा-या अशा अनेक गोष्टी
पसरविल्या जात आहेत. त्यांची बनावट चित्रे तयार करून ती प्रसारित केली जात
आहेत...