|| १ ||
एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चाड
राहिलेली नाही. रोजची वृत्तपत्रं (उदा. चित्रपट पुरवण्या), चित्रपट (कुणा एकाचं
नाव सांगता येईल का इथं? सगळेच म्हणा ना... डर्टी पिक्चर
वगैरे!), नाटकं (उदा. फुल्या फुल्याच्या मनीच्या गुजगोष्टी.
हे नाव चारचौघात उच्चारणंही कसंसंच वाटतं!), जाहिराती (उदा.
कामसूत्र वगैरे) यांपासून साहित्यापर्यंत सर्वत्र अश्लील धुडगूस चालू आहे. लोक
वाट्टेल तसं ग्राम्य वागत आहेत. पेयपानगृहांपासून समुद्रकिना-यांपर्यंत सर्वत्र
सनातन भारतीय परंपरेला हरताळ फासण्याचे असभ्य उद्योग सुरू आहेत. हे सगळं थांबलं
पाहिजे. ही असंस्कृतता आपण बंद केली नाही, तर पाच हजार वर्षांच्या भारतीय परंपरेचे
पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी नाही, असंच म्हणावं लागेल. हे कदापि चालणार
नाही. हे आम्ही सहन करणार नाही....
असे काही ज्वलजहाल सुविचार आपल्या मनात खदखदत असतील, तर मग आपल्यापुढं एकच पर्याय
राहतो. तो म्हणजे ही सगळी अश्लीलता, असभ्यता, असंस्कृतता, ग्राम्यता मुळापासून
निखंदून काढण्याचा. आता हे निर्मूलनाचं संस्कृती बचावो काम करायचं तर त्याची
सुरुवात कुठूनतरी, म्हणजे खरं तर सुरुवातीपासूनच करायलाच पाहिजे. तेव्हा मग ही
सुरूवात शोधणं आलं.
आपण आज ज्याला अश्लील वा ग्राम्य वा असंस्कृत म्हणतो ते नेमकं कधीपासून आलं?
हा गहनच प्रश्न झाला. याचा विचारच आपण कधी केलाच नव्हता. तेव्हा आताही काही
वेळासाठी आपण तो विचार बाजूला ठेवूया. आणि सरळच हाती हॉकी स्टीक, क्रिकेटचे स्टंप,
सळया असं साहित्य घेऊन आपणांस माहित असलेल्या खूप आधीच्या साहित्याकडं जाऊया. हे
साहित्य दोन गटांत मोडतं. आगम आणि निगम. आगमात तांत्रिक आचार-विचाराचे ग्रंथ येतात
आणि निगमात आपले परमपवित्र वेद, उपनिषदं, इतिहास आणि पुराणं येतात. आता हा जो
तंत्रवाद्यांचा प्रवाह आहे तो आपल्याकडं शैव आणि शाक्त म्हणून वावरतो. वाईट गोष्टी
करण्याला आपण वामाचार म्हणतो. ती खरी तंत्राची एक शाखा आहे. दक्षिणाचार ही त्याची
दुसरी शाखा. दक्षिणाचारात केवळ उपासनेचं अवडंबर असतं, तर वामाचारात वामा म्हणजे
स्त्री आवश्यक असते. त्यात स्त्रीसंभोगास अतिशय महत्त्व असतं. पुन्हा शैव
परंपरेतला सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ जो अभिनव गुप्त (काळ – दहाव्या शतकाची अखेर. स्थळ
– काश्मीर) तो सांगतो, की जगात ज्याला आपण अनैतिक किंवा बिभत्स म्हणतो त्याचा
वस्तुस्थितीशी काहीच संबंध नाही. कोणतीही वस्तू अथवा क्रिया शुद्ध-अशुद्ध,
नैतिक-अनैतिक होत असेल, तर ती हेतूमुळे होते. हे अध्यात्म एकदा ऐकल्यानंतर याच्या
फार खोलात जाण्यात काहीच अर्थ नाही, हे तर आपणांस उघडच दिसत आहे. तेव्हा हा
वामाचार निखंदूनच काढला पाहिजे किंवा त्याचा भिन्न काही तरी पवित्र अर्थ लावून ते
सगळंच झाकून ठेवलं पाहिजे. पण मग वेदांचं काय करायचं? यजुर्वेदामध्ये अश्वमेध यज्ञासंबंधीचे नियम
दिलेले आहेत. त्यात यजमानपत्नीला जे काही करायला सांगितलं आहे, ते तर अश्लील
म्हणून आपल्याला काढूनच टाकावं लागेल. पुन्हा वेदांतला तो यम-यमी या भावंडांचा
सुप्रसिद्ध संवाद. तोही वगळावा लागेल.
एकदा ही सगळी साफसफाई झाली, की मग पुढं येतात पुराणं. त्यातल्या इंद्र,
ब्रह्मदेव आदी देवादिकांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा. त्या वाचून आपल्या बालमनांवर
काय संस्कार होतील? तेव्हा
त्या न वाचणंच श्रेयस्कर, असं म्हणून पुढं निघालं, की मध्ये लगेच कोणार्क आणि
खजुराहोतली मैथुनशिल्पं येतात. ही शिल्प तांत्रिक शैवांचीच. खरं तर प्राचीन वगैरे
आहेत आणि त्यातही मंदिरांवर आहेत म्हणूनच आपण त्यांना सहन करतो. अन्यथा त्याच्यावर
आपल्या हॉकीस्टिक आणि क्रिकेटचे स्टंप कधीच पडले असते. पण आता एकदा अश्लीलता
निर्मूलन म्हटल्यावर अश्लीलता निर्मूलन! तिथं मागंपुढं
पाहण्याचं कारण नाही. तेव्हा ही शिल्प किमान झाकून तरी ठेवावीत किंवा ‘चावट संध्याकाळ’प्रमाणे तो मंदिरपरिसर केवळ
प्रौढांसाठी म्हणून जाहीर तरी करावा. आपली मागणी हीच असली पाहिजे. (त्या ‘एन्शंट मॉन्युमेंट्स अँड आर्कॅऑलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स अॅक्ट, १९५८’ ची पर्वा आपण करता कामा नये.)
आता आपण थेटच छत्रपती शिवरायांच्या काळात आलो. पण इथं करण्यासारखं आपल्याला
फारसं काहीच नाही. कारण की ते काम आचार्य अत्र्यांसारख्या थोर पुरुषाने आधीच करून
ठेवलेलं आहे. भले तरी देवू गांडीची लंगोटी असं म्हणणारा ग्राम्य तुकोबा त्यांनी
लख्ख पितांबरी लावून नागर करून घेतला आहे. गांडीची हा कसला अश्लील, असभ्य, अर्वाच्य,
अवाचनीय शब्द तुकोबांनी लिहून ठेवला होता. अत्र्यांनी तो कासेची लंगोटी असा शुद्ध करून
घेतला. याला म्हणतात धाडस! सुसंस्कृती जतनासाठी ते करावंच
लागतं. आता या तुकोबांनी काही काही अभंगात अश्लील शब्दप्रयोग केले आहेत. शिंदळीच्या
वगैरे तर सर्रास. अशा शब्दांवर एकदा पट्ट्या डकवून ते सेन्सॉर केले, की गाथा लख्ख
झाला म्हणता येईल!
तुकोबांची ही अवस्था म्हटल्यावर आपण नाथांच्या ‘माया छांड
सुनोजी, अच्छा भांड बनोजी’ या ‘भांड’ कवितेचं काय करणार याची कल्पनाही करवत नाही. आता
ब्रह्मदेवने वेद पढाया माया लादी मीठी
सरस्वतीके गले पडा, उसकी गांड फाटी||
विष्णू के गांड पीछे माया का धंदा
खेल करके फसल पडे मीठी लागी वृंदा||
असलं काही लिहिणारे भलेही एकनाथ महाराज असतील. भागवत, भावर्थ रामायणासारखी
अप्रतिम काव्यं त्यांनी लिहिलेली असतील. पण अखेर आपणांस आपल्या आधुनिक समाजपुरुषास
चांगलं वळण लावायचं आहे. पुढच्या पिढ्या घडवायच्या आहेत. म्हटल्यावर एकनाथांवर
फुली मारणं आपणांस क्रमप्राप्तच आहे. आणि एकदा एकनाथांवर अशी फुली पडल्यावर मग
पेशवाईतले ते सगनभाऊ अन् होनाजी बाळा येथपासून पठ्ठे बापूरावांपर्यंत कुणाची बिशाद
आहे आपल्या अश्लीलता निर्मूलन मोहिमेपुढं टिकण्याची? कुणी लावणी
वाङ्मयाला खासच मराठमोळं लेणं वगैरे म्हणू दे. एकेकाळी तमाशा अन् लावणी म्हटलं की
ती खास पुरुषवर्गाचीच मक्तेदारी. गावच्या जत्रेत तमाशाच्या कनातीत जाऊन शेमले
उडवायचे आणि दौलतजादा करायची ती त्यांनीच. आज मात्र लावण्यांच्या कार्यक्रमाला
महिलाही हौसेने जातात आणि पुरुष कलावंत नऊवारी नेसून नाचतात!
पण आपण त्याकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही. कारण की आपण तर हाती हॉकी स्टीक आणि
क्रिकेटचे स्टंप आणि सळया घेतलेल्या आहेत!
|| २ ||
आता असे हाती हॉकी स्टीक आणि क्रिकेटचे स्टंप आणि सळया घेतलेले काही आपण एकटेच
नाही. या आधी अनेकांनी तसे प्रयत्न केले आहेत. पण आपण मुलतः इतके सोवळे नव्हतो. कामसूत्र
आणि गीतगोविंदाच्या देशातली माणसं तुलनेने मोकळीच असणार. पण आपण आंग्लविद्या शिकलो.
त्याचे बाकी खूप फायदे झाले, हे मान्यच. पण त्या इंग्रजी शिक्षणाने आपल्यातले
सनातनी अधिकच व्हिक्टोरियन सोवळे झाले. त्यामुळे ‘रावबाजीचे
शहर नमुना पुणें ग्राम वस्ती : अहोरात्र अहोदिवस होती
इष्काची कुस्ती’ असं शाहिरांनी ज्याचं पूर्वी वर्णन केलं
होतं, त्या पुण्यातच पुढं अश्लीलमार्तंड कृष्णराव मराठे यांच्यासारखे लोक उदयाला
आले. बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘काही कविता’वरील अश्लीलतेचा खटला गाजला होता. तो याच अश्लीलमार्तंडांनी भरला होता. त्यांना
मर्ढेकरांच्या काव्यसंग्रहातील ४५, ४७, ५२, ५४ क्रमांकाच्या कविता आक्षेपार्ह
वाटल्या. त्यांतल्या काही ओळी अशा होत्या. –
४५ - अजुनि चालतोंचि वाट माल हा खपेना,
विश्रांति-स्तन कोठे घ्यायचा...
४७ – तुझ्या भुरक्या केसांचे
वळ माझ्या गालावर,
माझ्या ढिल्याशा बोटांचे
तळ तुझ्या स्तनांवर...
५२ – अशीच होती नक् टी एक,
उलटे केस नि तिरप्या भिवया,
मुरकत दावी उरोज उन्नत
ढेपा जैशा तेल्या घरच्या...
५४ – पाहा विचारूनि त्यांना कसली
मैथुनात रे असते झिंग
दाखवितील ते भोंक रिकामें
जिथें असावे मांसल लिंग...
या खटल्याचा निकाल ५ फेब्रुवारी १९५२ला लागला. त्यात मर्ढेकर निर्दोष सुटले. या
आधी पुण्यातल्या सनातन्यांनी र. धों. कर्वेंना असंच छळलं होतं. ‘समाजस्वास्थ्य’ सारखं संततीनियमानासारख्या महत्त्वपूर्ण विषयाला वाहिलेलं मासिक त्या
काळच्या पुण्यात चालवणं ही कठीणच बाब. त्यामुळे रघुनाथराव कर्व्यांनी काय केलं, तर
ते पुणं सोडून मुंबईसारख्या बड्या शहरात आले. पण तिथंही सनातन्यांनी त्यांना सोडलं
नाही. समाजस्वास्थ्यच्या सप्टेंबर १९३१च्या अंकात रधोंनी व्यभिचाराचा प्रश्न या
मथळ्याचा एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यात कृष्णाच्या सोळा सहस्त्र बायका,
कुंतीला वेगवेगळ्या देवतांपासून झालेली मुलं यांच्याविषयी लिहिलेलं होतं. ते वाचून
अहिताग्नी राजवाडेंसारखे लोक भडकले.
वस्तुतः कृष्णाची त्याच्या रासलीलेवरून थट्टा हा काही नवा विषय नाही. संतांनी
आणि शाहिरांनी दोघांनीही त्यावर भरपूर लिहिलं आहे. गण-गौळण हा पारंपरिक तमाशातला
प्रकार तर त्यावरच आधारलेला. तिथं त्याची भरपूर टिंगल-टवाळी केली जाते. पण तोही
आपल्या परंपरेचाच भाग. ती फार गांभीर्याने घ्यायची नसतं. पण हल्ली अशाबाबतीत
अनेकांच्या भावनांची गळवं फारच हळवी झालेली आहेत. त्यांना अहिताग्नी राजवाडेंचे
वारसदारच म्हणायला हवं. तर राजवाडेंनी रधोंविरुद्ध तक्रार केली. त्यावरून अश्लीलतेच्या
आरोपाखाली रधोंना १९ डिसेंबर १९३१ रोजी अटक झाली. या खटल्याचा निकाल ४ एप्रिल १९३२
रोजी लागला. तो अर्थातच रघुनाथरावांच्या विरोधात होता. त्यांना १०० रुपये दंड
झाला. समाजस्वास्थ्यवर असे तीन खटले झाले. त्यातला तिसरा खटला तर मजेशीरच होता.
समाजस्वास्थ्यच्या सप्टेंबर १९३८च्या अंकात कामकला नामक पुस्तकाची जाहिरात होती.
त्यात अप्राकृतिक संभोग असा शब्द होता. त्या शब्दावरून हा खटला झाला. पण त्यातून
रघुनाथराव कर्वे सुटले. आणि आज लैंगिक शिक्षण हा शाळकरी अभ्यासाचा विषय झालेला आहे
आणि वर्तमानपत्रांतून शक्ती आणि जोम वाढविणा-या तेलांच्या जाहिराती प्रसिद्ध होत
आहेत.
अश्लीलतेच्या आरोपावरून चंद्रकांत काकोडकर यांच्या ‘श्यामा’
(१९६२) आणि सुरेंद्र बारलिंगे यांच्या ‘क्रांतिपूजा’
(१९४६) या कादंब-यांवरही खटले झाले होते. ‘रंभा’च्या दिवाळी अंकात काकोडकरांची ‘श्यामा’ प्रसिद्ध झाली होती. शिक्षकांच्या जीवनावरची ही कादंबरी. तिच्यावर बंदी
घालण्याची मागणी करणारे पुन्हा पुण्याचेच होते. श्रीकृष्ण भिडे असं या गृहस्थांचं
नाव. ते नगरसेवक होते. या खटल्यात काकोडकरांच्या बाजूने ज्येष्ठ समीक्षक माधव
मनोहर होते. आणि विरोधात ना. सी. फडके आणि आचार्य अत्रे. तर काकोडकर उच्च
न्यायालयात हा खटला हरले. त्यांना एक आठवड्याची साधी कैद आणि २५ रुपये दंड झाला. कादंबरीवर
अर्थातच बंदी आली. पुढं काकोडकर सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथं ते खटला जिंकले.
सरकारला त्यांना दंडाचे २५ रुपये परत करावे लागले. या खटल्यासाठी त्यांना २५ हजार
रुपये खर्च आला. बारलिंगे हे मात्र वाचले. कारण त्यांच्या कादंबरीवर लेखकाचं नाव
होतं बी. आर. बी. राव आणि हे रावसाहेब म्हणजे बारलिंगे हे सिद्धच होऊ शकलं नाही.
त्यांना संशयाचा फायदा मिळाला. अलीकडंचं अश्लीलतेच्या आरोपावरून बंदीचं उदाहरण
म्हणजे वसंत गुर्जरांची ‘गांधी मला भेटला’ ही कविता.
अश्लीलतेच्या आरोपांच्या वादळात केवळ कादंब-या वा कविताच सापडलेल्या नाहीत.
विद्याधर पुंडलिकांची सती ही कथा, तेंडुलकरांची सखाराम बाईंडर, गिधाडे ही नाटकं हे
तर झालंच, पण आपल्याकडं तर एम. एफ. हुसेनांच्या ‘सरस्वती’वरून वाद होण्याच्या कितीतरी आधी एस. जी. ठाकूरसिंगांचं ‘ओलेती’ आणि प्र. रा. शिरूर यांचं ‘ओढा ओलांडताना’ ही चित्रं
वादाच्या भोव-यात सापडली होती. ओलेतीमधून न्हालेल्या स्त्रीच्या ओल्या
वस्त्रांआडून तिची पाठ आणि नितंब दिसतात. ओढा ओलांडतानामध्ये तर तेही नव्हतं. एक
तरूण नऊवारीतल्या एका तरूणीला उचलून ओढा ओलांडतो आहे असं ते चित्र होतं. पण स्त्री
मासिकाच्या १९३७च्या दिवाळी अंकावर ते प्रसिद्ध झालं आणि महाराष्ट्रात काय गदारोळ
झाला!
आता ही चित्रं, ही नाटकं, कादंब-या आणि कविता वाचताना प्रश्न पडतो, की असं काय
होतं त्यात की त्यावर बंदी वगैरेची मागणी व्हावी? बहुधा पाच
हजार वर्षांच्या भारतीय परंपरेचे पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी म्हणून
असले उद्योग होत असावेत.
|| ३ ||
असं म्हणतात, की पाहणाराच्या डोळ्यांत सौंदर्य असतं. म्हणजे काय, तर कुणाला
एखादी शूर्पणखाही सुंदर वाटू शकते. कारण अखेर प्रश्न फक्त वाटण्याचा असतो. म्हणजे
सौंदर्य हे मूल्य व्यक्तीसापेक्ष झालं. अश्लीलतेचं पण तसंच असतं. ती मुळात
पाहणाराच्या, वाचणाराच्या डोळ्यांत असते. म्हणजे ती व्यक्तीसापेक्ष असते.
देश-काल-संस्कृतीसापेक्ष असते. अश्लीलतेबाबत आणि तिच्या असभ्यता, ग्राम्यता या
भगिनींबाबत सगळा घोळ झालाय तो यामुळेच.
सुरुवातीलाच आपण एक प्रश्न विचारून तसाच सोडला होता, की आपण आज ज्याला अश्लील
वा ग्राम्य वा असंस्कृत म्हणतो ते नेमकं कधीपासून आलं?
त्याचं उत्तरही इथं आपसूकच मिळून गेलं. अश्लीलता ही गोष्टच मुळात मानण्यावर आहे. काल
जे अश्लील मानलं जात होतं, ते आज अश्लील वाटत असेलच असं नाही. मला जे अश्लील
वाटेल, ते दुस-याला वाटेलच असं नाही. भररस्त्यात चारचौघांदेखत एखाद्या सखीचे
तिच्या सजणाने चुंबन घेणं ही क्रिया पाश्चात्य लोकांत गैर मानली जात नाही. आपल्या
इथं तो सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याचा गुन्हा होईल आणि त्या सखी आणि
तिच्या साजणाला पोलिस आत घेतील. हा संस्कृतीतला फरक झाला. ‘सत्यम्
शिवम् सुंदरम्’ मधली नुसताच पदर पांघरणारी झीनत वा राज
कपूरच्याच ‘राम तेरी गंगा मैली’मधली
सचैल स्नान करीत बसलेली मंदाकिनी यांच्या दर्शनानेच आपल्या इथं अनेकांनी
संस्कृतीच्या शोकसभा घेतल्या होत्या. आजही पडद्यावर एखादी टॉपलेस सुकन्या पाठमोरी
दिसली, तर आपले संस्कृतीबाज तत्काळ डांबर विकत घेण्यास धावतील. धावतील काय? धावलेच होते. ‘हेट स्टोरी’ या
सिनेमाच्या पोस्टरच्या निमित्ताने ते आपण पाहिलंच आहे. ते पोस्टर योग्य की अयोग्य
हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. इथं सांगायची गोष्ट एवढीच, की आज अवघ्या
महाराष्ट्राच्या शेंडीला टॉपलेस म्हटलं की झिणझिण्या येतील. पण याच महाराष्ट्रात
सातवाहनकाळात, साधारणतः इसवी सनपूर्व पहिल्या शतकात स्त्रियांचा वरचा भाग अनावृत्त
असे. वाकाटक काळात इथं स्तनपट्ट आणि स्तनांशुक वापण्यास सुरुवात झाली. म्हणजे
स्त्रियांचा वरचा भाग अनावृत्त असणं ही बाब महाराष्ट्रात त्या काळात अश्लील
नव्हती. ती आज आहे. तेव्हा याचा अर्थ असा नाही, की सातवाहन काळातले मराठी लोक
असंस्कृत वा रानटी होते आणि आजचे आपण अधिक सभ्य-सुसंस्कृत आहोत. याचा अर्थ इतकाच,
की अशा गोष्टी सापेक्ष असतात.
या सापेक्षतेचीही एक मौज असते. म्हणजे बघा, आजची महाविद्यालयीन तरूणाई शक्यतो
अपशब्दांच्या भरमसाट वापर केल्याशिवाय बोलतच नाही. लैंगिक अवयवांचा उद्धार
केल्याशिवाय वाक्याला वजनच येत नाही असं त्यांना वाटत असावं. त्यांची ही भाषिक
कृती म्हणजे शिंगं फुटण्याच्या वयातलं इवलंसं बंड म्हणून सोडून देता येईल. पण ग्रामीण
भागात तर शिव्या म्हणजे वाचिक उद्गारवाचक चिन्हंच! लोक शब्दाशब्दातनं
शिव्या घालतात. रागानंही घालतात आणि प्रेमानंही घालतात. पण अखेर शिव्या म्हणजे
शिव्याच. तेव्हा त्यांचा उच्चार हा असभ्य मानला जातो. पण गंमत अशी की तेच
इंग्रजीतून म्हटलं तर मात्र ते ‘कूल’
होतं! हे म्हणजे शिंच्या या आपल्या सुपरिचित शब्दासारखं झालं.
याचा शब्दकोशातला अर्थ आहे शिनळ स्त्रीचा मुलगा. शिंच्या म्हटलं, तर ते कसं
सु-संस्कृत वाटतं! आणि रांडेच्या म्हटलं की ती शिवी होते.
मंगेशकरांनी चालीवर –
तरूण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास का रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?
असं म्हटलं की ते भावगीत होतं.
गे निळावंती कशाला झाकीसी काया तुझी
पाहू दे मेघाविण सौंदर्य तुझे मोकळे...
असं म्हटलं तरी त्याला कोणी अश्लील म्हणत नाही. मात्र तेच कुण्या शाहिराने –
संगिन कुच भरदार सजिव सजदार गुलगेंद उसासले
श्रमि भोक्ता होईल म्हणुन हे विसाव्याचे वाडे वसले
असं काही रसिलं वर्णन केलं तर ते मात्र ते अशिष्ट ठरतं. हे म्हणजे भावना अन्
अर्थापेक्षा ते ज्या शब्दांतून प्रवाहले ते शब्द आणि भाषासंकेतच महत्त्वाचे असं
झालं. अर्थात याच्यामुळेच मराठीत अजागळ, गलथान, कुतरओढ, गर्भगळीत यांसारखे शब्द निसंकोच
वापरले जाऊ लागले. अन्यथा ते अश्लील म्हणून केव्हाच वाळीत पडले असते.
|| ४ ||
अश्लीलता, ग्राम्यता या बाबी सापेक्ष असतात हे ठीकच. आजचं अश्लील उद्या तसंच
असेल असं नाही, हेही खरं. पण तरीही आज एखादी गोष्ट समाजात अश्लील मानली जात असेल,
तर त्या अश्लीलतेचे निकष तरी काय असतात? अश्लीलतेची नेमकी व्याख्या तरी
काय आहे?
पहिली गोष्ट
म्हणजे अश्लीलतेचे काहीही ठोस निकष नाहीत. पण आपण असं म्हणू शकतो की माणसाचं
लैंगिक वर्तन, लैंगिक अवयव, विवस्त्रता यांचा साहित्य-कलेतून व्यक्त होणारा असभ्य,
कामोत्तेजक, मनुष्यास सहसा नैतिक अधःपतनाकडं नेणारा अविष्कार म्हणजे अश्लीलता. आता
अश्लीलतेची ही कल्पना उघडच सामाजिक नितीसंकेतांशी निगडीत आहे. पुन्हा तीही
स्थल-काल-व्यक्ती-संस्कृतीसापेक्ष असते. त्यामुळे अश्लीलतेची ठोस व्याख्या करणं
अवघडच आहे. त्यामुळे झालं काय, की अश्लीलतेबाबतचे कायदेही नेमके करता आलेले नाहीत.
अश्लीलतेबाबतच्या कायद्यांची ही अशी भोंगळ अवस्था म्हटल्यावर, सर्वसामान्य माणसाचा
तर मोठाच गोंधळ होणार. त्याला जे वाटतं ते तो अश्लील समजणार. त्यावर वाचकांच्या
पत्रव्यवहारात लिहिणार आणि जमलंच तर हाती हॉकी स्टिक वा क्रिकेटचे स्टंप वा सळया
घेऊन निघणार. संस्कृतीमार्तंडांसाठी ही चांगलीच गोष्टच असते.
आता यावर उपाय काय? तर पहिली गोष्ट म्हणजे विवेकवादी दृष्टीकोन. अश्लीलता का नको असं लोक
म्हणतात, तर त्याने कामुक वासना चाळवल्या जातात. मग हे तपासलं पाहिजे, की एखादी
कथा, कादंबरी, चित्र वा चित्रपट याने खरोखरच कामुक वासना चाळवल्या जात असतील, तर
त्यांच्या आविष्कारामागचा हेतू तोच आहे का? म्हणजे जसा तो
पोर्नोग्राफीचा असतो. मुद्दा असा, की पोर्नोग्राफी आणि तथाकथित अश्लील अविष्कार
यातला फरक समजून घेतला पाहिजे. त्या अविष्काराचा एकंदर परिणाम, विद्यमान सामाजिक
नीतीमूल्यं, विद्यमान सौंदर्यकल्पना अशा विविध कसोट्यांवर तो घासून घेतला पाहिजे. पुन्हा
व्यक्तीस्वातंत्र्य हे मूल्य येतंच. त्याचाही विचार झाला पाहिजे आणि मग काय श्लील,
काय अश्लील याचा निर्णय घेतला पाहिजे. आता हे अवघड वाटत असेल, तर मग आपण केव्हाही
अश्लीलतेच्या बैलाचा घो करण्यास स्वतंत्र असतोच....
त्या निषेधाची
सुरूवात कुठून करायची हे लेखारंभी सांगितलं आहेच.
No comments:
Post a Comment