होळीपुराण

होळी तोंडावर आलीय...
त्या दिवशी कचेरीला सुटी. तेव्हा काय करायचं, कुठं जायचं, कुणाबरोबर जायचं, कुणाला टाळायचं, याचे बेत ठरू लागलेत... अशा वेळी सहजच मागे एकदा होळीवर खरडलेलं काही आठवलं...
साम मराठीवरच्या काय सांगताय काय या स्टॅण्डअप कॉमेडी शोसाठीचं ते स्क्रिप्ट होतं... वाटलं ते पुन्हा इथं टाकावं... (त्या शिमग्याची याद म्हणून)!

 १.

नमस्कार मित्र हो,
आज सकाळची गोष्ट. असा नुकताच उठून, स्नान वगैरे करून मी चहाच्या कोपाबरोबर पेपर घेऊन बसलो होतो. तोच दारावर टकटक झाली. अशी दारावर सुतारपक्षासारखी टकटक करणारांचा मला अतोनात संताप येतो.
का नाही येणार? नाही नाही, का नाही येणार?
एवढी हौसेने आम्ही दारावर नवी बेल बसवलीय. पण हे लोक ती घंटी नाही वाजवणार. दार बडवणार!
बरं दार वाजवण्याचीही काही एक पद्धत असावी ना! असं कर्ज वसूल करायला आल्यासारखे थपथप वाजवणार. आमचे एक शेजारी आहेत... त्यांचा समज असा, की आमच्या घराचे दार म्हणजे झाकीर हुसेनचा तबला आहे! आपण उघडेपर्यंत दारावर एकताल धरलेला असतो त्यांनी! मागे एकदा घरी एक पोलिस आला होता.... प्लीज गैरसमोज नको... पासपोर्टसाठी चौकशीला आला होता... तो हातातल्या काठीने दरवाजाला झोडपत होता... म्हटलं, काय? दरवाजाच्या भक्कमपणाची परीक्षा घेताय काय?

या लोकांची दारावरच्या घंटीशी काय दुश्मनी असते कोण जाणे? याच्या-त्याच्या घरी रोज बेल घालायला गेल्यासारखे न बोलावता जाता ना? मग तुम्हांला साधी बेल नाही वाजवता येत? पण म्हणतात ना - पडिले वळण...! याच्या उलट सोसायटीतली पोरं. हात पोचत नसला, तरी उड्या मारमारून बेल वाजवणार.
असाच एकदा दुपारचा झोपलो होतो. तर बेल! पाहतो तो सोसायटीतला एक नाकतोडा. म्हटलं, बेटा, आपको कौन चाहिये?
तर तो म्हणाला, कोई नही!
म्हटलं, अरे मग द्वाडा, बेल का बडवलीस?
तर तो मख्ख आवाजात म्हणाला, चालू आहे की नाही पाहात होतो!!

तर दारावर टकटक झाली. आम्ही कवाड खोललं, तर समोर एक हिरवा-निळा-नारिंगी-सोनेरी चेहरा!
एकदम दचकलोच हो! तसा मी काही असा अशातशाने घाबरणारा माणूस नाही! पोलिस, टीसी, घरी वर्गणी मागायला येणारे ते सफेदपोश लोक आणि रेल्वेत खंडणी मागायला येणारे ते टाळीबाज यांच्याशिवाय या जगात मी कोणालाही घाबरत नाही! अगदी हिलासुद्धा!
पण सकाळी सकाळी एकदम समोर असं इस्टमनकलर चलत्-चित्र उभं राहिल्यावर कोणाच्याही काळजाचा ठोका चुकणारच ना!
एक क्षण दचकलो. मग वाटलं, हा पेंटर असावा.
पण पेंटर काही असा स्वतःच्या चेह-यावर डिस्टेंपर लावून फिरत नसतो.
मागे आमच्या घराचा रंग काढायला दिला होता. तेव्हा त्या पेंटरनं भिंती कमी आणि खालच्या फरशा जास्त रंगवून ठेवल्या होत्या. पण स्वतःवर मात्र रंगाचा एक शिंतोडा उडू दिला नव्हता. फरशीवरचे ते डाग अजूनपर्यंत माझ्या काळजाला डागण्या देत आहेत.

हा पेंटर तर नक्कीच नाही. मग कोण असावा?
मी विचारच करीत होतो, तोच त्या रंगाच्या गळक्या डब्याला आवाज फुटला - अहो, असं पाहताय काय भूत पाहिल्यासारखं!
एकदम ट्यूब पेटली - हा तर रिसबूड!
म्हटलं, अरे रिसबूड, हे काय करून घेतलंस बुवा चेह-याचं? आणि तुझे केस... असे ऐतिहासिक सिरियलमधल्या इंग्रजाच्या केसासारखे सोनेरी का केलेस बाबा?
तो म्हणाला, होळीचे रंग आहेत हे. दोन दिवस झाले, पण जातच नाहीयेत... तुमच्याकडं थोडं रॉकेल आहे काय?
म्हटलं, रॉकेल? तुला काय मी धुळ्याचा राजकीय नेता वाटलो काय? इथं स्वतःला पेटवून घ्यायचं म्हटलं, तरी रॉकेल नाहीये!...
रॉकेल नाहीये म्हटल्यावर तो पेटलाच.
शेजा-यांसाठी एवढंही करू शकत नाहीत तुम्ही? साधं रॉकेल देऊ शकत नाही? आता हे डाग कसे घालवू मी?
म्हटलं, रिसबूड, जातील रे महिन्या-दोन महिन्यात. कशाला काळजी करतोस? आणि कोणीतरी म्हटलंच आहे ना - दाग अच्छे है!

रिसबूडला मी हे गंमतीत म्हटलं खरं, पण हे काही खरं नाही.
ही काही खरी होळी नाही. ही काही आपली धुळवड नाही.

ही जी होळीला असे रंग खेळण्याची प्रथा आहे, ती मुळात आपली नाहीच. आपला सण रंगपंचमी.
धुळवडीला आपण एकमेकांना पाण्याने भिजवतो. चिखल फासतो. तिकडं पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापुरातल्या काही भागात, तर शब्दशः धुळवड खेळतात. म्हणजे माणसाला असं धुळीने, फुफाट्याने माखून टाकतात. ती मराठमोळी धुळवड.
मग हे होळी-धुळवडीतलं दोनदोन दिवस चालणारं रंगाचं फॅड आपल्याकडं कुठून आलं?
याचं उत्तर आहे - उत्तरेतून.
आणि त्याचा प्रसार केला हिंदी चित्रपटांनी.

या हिंदी सिनेमावाल्यांचे काही ठरलेले सण असतात बघा!
पहिला म्हणजे दिवाळी. हिरोच्या लहानपणी तो, त्याची बहिण, त्याचे आई-बाप सुरसु-या, फुलबाजे उडवित, गाणं म्हणत दिवाळी साजरे करताना दिसले, की समजायचं पुढच्या सीनमध्ये हिरोचं घर किंवा त्याच्या बापाची मिल यांना आग लागणार.
ठरलेलंच असायचं ते.

सिनेमावाल्यांचा दुसरा आवडता सण म्हणजे करवाचौथ.
तुम्हांला सांगतो, हल्ली आमची हीसुद्धा तो चाळणीतनं चंद्र पाहण्याचा सण करायला लागलीये. मला तर त्यामागचं लॉजिकच समजत नाही!

(आतून - नाहीच समजणार! त्यासाठी नं, बायकांचाच जन्म घ्यावा लागतो!)

बायकांचा जन्म घेतल्यावर चाळणीतनं चंद्र पाहणं कंपल्सरी असतं काय? हिचं आपलं काही तरीच...
आपण ग्रहणात सूर्य बघायला ते काळे चष्मे वापरतो. लहानपणी आम्ही जाड काळ्या बाटल्यांच्या काचांतनं सूर्यग्रहण पाहायचो. आमचा रिसबूड त्याच्या फुफ्फुसाच्या एक्स रे फिल्ममधनं ग्रहण पाहतो. आमची ही - हिंदी न्यूज चॅनेलवरच्या नको नको त्या बातम्या पाहते - सूर्य ग्रहण में होगा पृथ्वी का विनाश - आणि मग घाबरून ग्रहण पाहात नाही!
ते ठीक आहे हो. पण त्या चाळणीतनं चंद्र पाहण्याच्या उपक्रमातलं खगोलशास्त्र काही मला समजलेलं नाही.
बरं, नव-याला टक्कल असेल, तर एकवेळ ठीक. चंद्र दिसला असं तरी म्हणता येईल!

हिंदी सिनेमावाल्यांचे असे आणखीही काही फेवरिट सण आहेत. रक्षाबंधन, गोविंदा, गणेशोत्सव...
पण त्यांचं खरं प्रेम आहे ते होळीवर.

आपल्याकडची होळीवरची मराठी गाणी आठवून बघा... एक पटकन् आठवायचं नाही.
मला तर होळीचं एकच मराठी गाणं माहित आहे - होळी रे होळी, पुरणाची पोळी...
ते संपूर्ण गाणं इथं म्हणता येणार नाही. म्हटलं, तर शिमगा होईल, चॅनेलच्या काचा फुटतील!

पण हिंदीतली गाणी आठवून बघा... दोन तासांचं छायागीत होईल त्यांनी.
पहिलंच गाणं आठवेल ते अर्थातच श्रीयुत अमिताभ बच्चन यांचं. - रंग बरसे...
त्यानंतर मग ते शोलेतलं - होली के दिन दिल खिल जाते है...
त्यानंतर मग....
जाऊ दे, गाण्यांची लिस्ट खूपच मोठी आहे....
तुम्ही आठवून ठेवा... तोवर आम्ही घेतो एक स्वल्पसा, अल्पसा विराम.

--------------------------------------------------------------------------------

२.
होळीच्या गाण्यांचं एक वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलंय का? त्यातले हिरो-हिरॉईन सोडून द्या, एक्स्ट्रॉसुद्धा पांढ-याफेक कपड्यांत असतात. बरं हे फक्त हिंदी सिनेमांतच नसतं बरं का. हल्ली तर मराठी सिरियल्समध्ये सुद्धा असंच असतं. मराठी सिरियलमध्ये तर शक्यतो दोनच वेळेला पांढरेसफेद कपडे दिसतात. मयताच्या सीनला, नाही तर होळीला.
मला सांगा, आपण कधी असं करतो का? की चला, उद्या होळी आहे, तेव्हा आज पांढरा पायजमा अन् नेहरू शर्ट भट्टीला (लॉंड्रीला) दिला पाहिजे. उद्या ते इस्टमनकलर, नाहीतर फ्युजीकलर होणार आहेत.

माझ्याकडं एकच पांढरा शर्ट आहे. पण त्यावर इतकासाही डाग पडू नये म्हणून मी केवढी काळजी घेत असतो. अर्थात, तरीही त्यावर डाग असतातच... पण ते हिने दिलेल्या निळीचे.

पण या उत्तरेकडच्या लोकांचं तर्कशास्त्र काही औरच असतं. ते होळीचे रंग खेळायला निघतात, ते हमखास पांढरेफेक कपडे घालून. आपलं तसं नसतं. आपण त्या दिवशी कपाटात, ट्रंकेत शोधून शोधून जुने, फाटलेले कपडे बाहेर काढतो.
आमच्याकडं तर बोहारणीसुद्धा ज्यांना शिवणार नाही, असे कपडे माझ्यासाठी खास राखीव होली ड्रेस म्हणून ठेवत असत. ते कपडे घातले, की होळीचं दुसरं कोणतंही सोंग घ्यायची गरजच नसायची! बायाबापड्या, 'काय भिका-याचं सोंग काढलंय' म्हणून न मागता माझ्या हातावर चवल्या-पावल्या टिकवायच्या!

होळीच्या सणात ही सोंगांची मस्त गंमत असायची. काय काय सोंग काढली जायची पूर्वी. आमच्या गावात तर एकदा मी दहा तोंडाचा रावण, त्याच्या बाजूला हनुमान, पुढे ढाल-तलवार घेतलेला मावळा आणि त्यांच्या मध्ये पोलिस हवालदार अशी काळावर मात करणारी मिरवणूक पाहिलीय. ती सोंगं आणि कडाकडा वाजणारी हलगी... अहाहा! गाव दुमदुमून जायचा!!

घरोघरी जाऊन पैसे उकळणारी सोंगं, मग दुपारी पालखीची किंवा नारळाच्या झाडाची मिरवणूक, त्या जडजड पालख्या लीलया आपल्या खांद्यावर पेलून नाचणारे ते गावरान गडी, आणि धडाडा पेटणारी उंचच उंच होळी आणि होळी पेटली रे पेटली, की त्या भोवती ठणाणा बोबा मारत फिरणारी समस्त ग्रामस्थ मंडळी... काही औरच मौज असायची ती!

होळीसाठी लाकडं गोळा करणं ही तर गावातल्या पोरांसाठीची महापराक्रम करण्याची संधीच.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची वखार लुटली होती. आमचे हे गावठी छत्रपती लाकडाची वखार लुटण्याचे बेत आखीत!
महिना महिना आधी त्यांची टेहळणी सुरु होई, की कोणाच्या अंगणात सरपणाचे ढीग आहेत आणि कुणाच्या शेतात वाळलेल्या आंब्याचे ओंडके आहेत. ओसरीवरच्या लाकडाच्या खुंट्यासुद्धा त्यांच्या नजरेतनं सुटायच्या नाहीत. एकदा तर पोरांनी म्हणे एकाच्या शेतघराचा दरवाजाच आणून होळीत टाकला होता. होळीच्या पोळ्या खावून तो शेतावर झोपायला गेला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं म्हणतात.

आणि हल्ली आमचे मंत्री म्हणतात, कच-याची होळी करा.
समस्त पर्यावरणप्रेमींची क्षमा मागून विचारतो, कच-याची होळी करण्यात त्या होळीची गंमत आहे काय हो?
उद्या म्हणाल, अशी होळी कशाला करता, गॅसची शेगडीच लावून ठेवा ना!
काही भरवसा नाही हं! उद्या एखादा मोहाची नाहीतर धान्याची पिऊन तसा आदेश द्यायलाही कमी करणार नाही! असो.


होळीभोवतीच्या बोंबा म्हणजे तर या सणातला हायपॉईंट! एरवी अशी नाकासमोर पाहून चालणारी माणसं... पण त्या दिवशी त्यांच्या रसवंतीला असा काही बहर येई, की ऐकता सोय नसे! मराठीतले सगळे म-कार, सगळे भ-कार झाडून त्यांच्या जीभेवर मुक्कामाला येत.
तिकडं पुण्याकडच्या एका गावाची गोष्ट सांगतात. त्या गावात नुकतेच एक गुरुजी बदलून आले होते. गुरुजी मोठे सालस. गावक-यांनी त्यांचा सन्मान करायचा, म्हणून होळीचा नारळ त्यांच्या हस्ते अर्पण करायचं ठरवलं. गुरुजींनी नारळ अर्पण केला. मनोभावे होलिकामातेला नमन केलं. तो विधी संपला. गुरुजींना तिथंच पारावर खुर्ची टाकून दिली. आणि इकडं शिमगा सुरु झाला... गुरुजींना कळेना, की आपण वर्गात मुलांना शिकवतो ती मराठी आणि हे लोक बोलतात ती मराठी यातली खरी कोणती? दुस-या दिवशी, गुरुजींनी तालुका पंचायतीत जाऊन बदलीचा अर्ज दिला!

खरं म्हणजे शिमग्यातली ती सोंगं, त्या बोंबा ही सगळी मनात कोंडून राहिलेल्या भावनांचा निचरा करण्याची परंपरेने करून दिलेली सोयच म्हणावयास हवी. मनातली सगळी घाण, मळमळ त्या होळीत जाळून टाकायची आणि स्वच्छ मनाने पुढचे दिवस रेटायचे हा त्या विधीचा अर्थ. पण आजकाल भावनांच्या विरेचनासाठी एका दिवसाची होळी कुठली हो पुरायला!

आणि आता तर होळीची पद्धतही बदललीय. तशा आताही होळ्या पेटतात...
फक्त पेटवतात ते राजकीय पक्ष असतात, पेटतात त्या लोकभावना असतात आणि सारं झाल्यावर बोंबलतात ते लोक असतात. असो. हे जरा सिरियस व्हायला लागलंय का?
पण मित्रांनो, बुरा न मानो, होली है...

आता घेऊ या छोटासा विराम... तुम्ही पटकन् इकडं-तिकडं जाऊन या, आत स्वैपाकाचं कुठवर आलंय बघून या... आणि... नक्की या!

---------------------------------------------------------------

३.
मघापासून आपण गावाकडच्या होळीबद्दल बोलतोय. पण मुंबईसारख्या शहरांतल्या होळ्यांचीही गंमत असते बरं का! अर्थात ही गंमत दिसायला तुमचं मन जवान असायला हवं.
आणि माझ्याबद्दल बोलायचं, तर यारदोस्तहो, अभी तो मैं किती तरी जवान हूँ...

(आतून - जन्मतारखेचा दाखला आहे घरात... भिंतीवर लावून ठेऊ का?.... म्हणजे वय विसरायला होणार नाही...)

अंहं, आपण तिकडं लक्ष द्यायचं नसतं. सगळ्या तरुणांना हा असा वयोवृद्ध लोकांचा त्रास सहन करावाच लागतो...

(आतून भांड्यांचा आवाज)

आयला, आत होळी भडकली वाटतं!

तर आपण शहरी होळीबद्दल बोलत होतो. ही होळी आली हे सांगायला कोणत्याही पंचांगाची किंवा कॅलेंडरची गरज नसते. ती आल्याची वर्दी अशी अचानक फटकन् लागते.
म्हणजे एखाद्या दिवशी आपण असे सोसायटीतनं बाहेर रस्त्यावर येत असतो. ऑफिसला जायचे कपडे घातलेले असतात धुतलेले-बितलेलेल, इस्त्री-बिस्त्रीचे... आणि अचानक आपल्या पायापाशी धपकन् पाण्याचा फुगा फुटतो... गुडघ्यापास्नं खाली पॅंट ओली होते... पॉलिश केलेल्या बुटांवर मातीची नक्षी येते... आपण ती प्लास्टिकची पिशवी कोठून आली म्हणून पाहायला जातो... तर तिथं कोणीच नसतं. सगळे दहशतवादी गॅलरीच्या कठड्याआड लपलेले असतात.
आपण मनोमन शिव्या घालत पुढे चालू लागतो... तोच पुन्हा धपकन् फुगा येतो... पण आपण आता सावध असतो.... त्यामुळे नेम चुकतो... म्हणजे पायापाशी फुटायचा फुगा आपल्या पाठीवर येऊन फुटतो!.... आणि तिकडं वर गॅलरीआड जल्लोष होतो...

मुंबईतली होळी आपल्या आगमनाची वर्दी अशा जोमदार, पाणीदार पद्धतीने देत असते!
यात आपण आपल्या फुटक्या नशीबाचे एकाच गोष्टीसाठी आभार मानायचे असतात, की त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साधं स्वच्छ पाणीच होतं. सांडपाणी असतं, तर आपण काय केलं असतं?
टाकतात, लोक सांडपाणीही टाकतात. त्यात त्यांचीही काही चूक नाही म्हणा. त्यांच्याकडे जे असणार तेच ते टाकणार ना! पण त्यात त्यांना काय आनंद मिळतो, हे एक त्यांचा ईश्वर आणि दुसरे त्यांच्यावर सुसंस्कार करणारे त्यांचे माता-पिताच जाणोत!
माझ्या एका मित्राने तर या फुग्यांचा एवढा धसका घेतलाय, की या काळात तो रेनकोट घालूनच बाहेर पडतो.

मला व्यक्तिशः हे प्लास्टिकचे फुगे फेकणं नाही आवडत. एकतर लपून-छपून अनोळखी माणसांवर असे फुगे फेकण्यात काय अर्थ आहे? वारच करायचा तर असा समोर येऊन करावा.
म्हणून मला पिचका-या आवडतात! त्यात खरी गंमत आहे. अशी पाण्याने पिचकारी भरायची, अशी मशिनगनसारखी धरायची आणि मग नेम धरून चालवायची.... अर्थात त्यातही समोर कोण आहे याला फार म्हणजे फारच महत्त्व असतं!
समोर जर भिजणारी कोणी सुबकठेंगणी असेल ना, तर तुम्हांला सांगतो, ती पंधरा रुपयांची पिचकारी तुम्हांला साक्षात् गोकुळातला कान्हा असल्याचा फील देते !
पंधरा रुपयांत हा फील म्हणजे तसा सस्ता सौदाच म्हणायला हवा !

(आतून - मी जिवंत आहे म्हटलं इकडं! )

ऐकलं वाटतं हिनं.
पण काय करणार? हा होळीमधला एक सनातन सिलसिला आहे...
म्हणजे आपण अमिताभ बनून एखाद्या रेखावर रंग बरसे करावं आणि तिकडनं आपल्या जयाने ते नेमकं टिपावं...
नव-याला हे असं नको त्या वेळी, नको त्या ठिकाणी टिपून काढण्यासाठीच त्या निर्मात्याने बायकांना डोळे दिले आहेत, असा माझा स्पष्ट दावा आहे.
याला दैवदुर्विलासच म्हणायला हवे.
नाही तर मला सांगा, नवरा कान्होबा बनून होळी खेळतोय...सोसायटीतल्या गौळणींच्या अंगावर रंग टाकतोय... आणि बायकोसुद्धा त्या खेळात रमली आहे... ती फक्त आपल्या नव-याच्याच अंगावर रंग टाकतेय, असं चित्र का बरं दिसू नये?

हा आपला एक पीजे हं. उगाच सिरियसली घेऊ नका. गोत्यात याल. होळीची पोळी तर दूर, होळीची राखसुद्धा नशिबी येणार नाही!
असो.


मुंबईत पाणी कपातीमुळं असेल, पण पाण्याऐवजी रंग लावण्याचं फॅड जसा जास्तच.
बरं ते रंगसुद्धा कसे, तर महिन्याची वॉरंटी असलेले.
आपल्याकडं बघा रंगपंचमीला कसले रंग असायचे पूर्वी?
एक म्हणजे हळदीचा पिवळा, दुसरा कुंकू किंवा गुलालाचा लाल आणि तिसरा कुठल्याशा झाडाची पानं कुटून केलेला हिरवा. हे रंग जरा घट्ट बसावेत म्हणून गावाकडं काही काही टपोरी पोरं त्यात केळीच्या झाडाचा चिक टाकायचे.
हा चिक म्हणजे एकदम पर्मनन्ट. कपडे फाटतील, पण डाग जाणार नाही.

आजकाल मात्र कसलेही रंग वापरतात हो. मी माझ्या या या डोळ्यांनी एकाला वंगण लावताना पाह्यलंय, वंगण! ही काय तोंडाला लावायची वस्तू आहे काय हो? पण एकदा भांगेची गोळी चढल्यावर कोण त्याचा विचार करतोय? तसाच तो एक सोनेरी रंग लावतात... पुढं आठवडाभर माणूस अंधारातसुद्धा चमचमताना दिसतो...
बरं रंग लावायचा तर तो कपड्यांवर टाका ना! त्याने तोंडं कसली रंगवताय शिमग्यातल्या सोंगांसारखी?
ही रंगबाधा झालेली मंडळी बघा - हॅलोविनची भूतं चाललीत असं वाटतं.
आमच्या रिसबुडांचंच घ्या. गेल्या वर्षी असेच होळी खेळून दुपारी घरी आले... तर त्यांचं पोरगं दारच उघडेना... रिसबूड सांगून थकले, की अरे मीच तुझा बाप! पण पोराचा विश्वासच बसेना. अखेर आम्हांला मध्यस्थी करावी लागली!

 

यापेक्षा आमच्या सेलेब्रिटी लोकांची होळी मोठी मनमोकळी!
सेलेब्रिटी लोकांची म्हणजे रंग खेळायला जातानाही ज्यांना पांढरेफेक कपडे घालणे परवडते ते... सिनेमा-सिरियलमधले लोक.

आमचे हिंदी सिरियलवाले या सणासुदीच्या बाबतीत मोठे धोरणी बरं का. ते काय करतात, सेटवरच सण साजरे करतात... म्हणजे कसं, होळी आली... चला, सिरियलमध्ये होळीचा एक एपिसोड घालू या. मग सगळी पात्रं एकत्र येतात... रंगपंचमी करतात... कलाकार मंडळींना होळीचा आनंद मिळतो, प्रोड्युसरचा एक एपिसोड वाढतो... पुन्हा होळीबिळी असली म्हणजे त्यात माफक छेडछाड, माफक रोमान्स, झालंच तर एखादं गाणंबिणं असंही टाकता येतं. म्हणजे पब्लिकही खुश होऊन जातं...

हिंदी सिनेमावाल्यांचं मात्र तसं नसतं. ते आपले स्वतंत्रपणे होळीच साजरी करतात. राज कपूर साहेबांची होळी तर याबाबतीत प्रसिद्ध होती. सगळी फिल्मइंडस्ट्री आरके स्टुडिओत जाऊन त्याकाळी होळी साजरी करीत असे. आजही ती प्रथा कायम आहे. त्याचं काय आहे, या कपूर मंडळींना एकूणच नट्यांना भिजवायची हौस आहे. सिनेमात तर हमखास भिजवतातच, पण बाहेरही असा होळीबिळीचा मोका साधून भिजवून घेतात.

अमिताभ बच्चन, जावेद अख्तर यांच्यासारख्या मंडळींची होळी त्या मानाने सुसंस्कृत. अमिताभ बच्चन यांना तर होळीचा ब्रॅंड अँम्बॅसिडरच म्हणायला हवे! नाही तरी अमिताभ हल्ली कशाचाही ब्रँड अँम्बॅसिडर असतो.. तर मग होळीचा का नको?

यात आपण आणखी एक सेलेब्रिटी होळी विसरतोय काय?
आठवून बघा....
अहो, लालूंची होळी.
तिचा उल्लेख केल्याशिवाय आपलं होळीपुराण पूर्ण होऊच शकणार नाही.

लालूंच्या राजकारणाबद्दल तुमची काहीही मतं असोत... पण एक मात्र मान्य करायलाच पाहिजे, की त्यांनी बिहारच्या गावरान, कपडेफाड होळीला चक्क सेलेब्रिटी स्टेटस दिलंय. त्याशिवाय का चॅनेलवाले तिथं कॅमेरे लावून बसतात!
अहाहा, काय ती होळी असते...
आठवतेय ना ती होळी? तिचं वर्णन करायला माझ्याकडं शब्दं अपुरे आहेत...
यासाठी मी एक बक्षीस योजना सुरु करण्याच्या विचारात आहे...
लालूंच्या होळीचं दीडशे शब्दांत योग्य वर्णन करणाराला राहुल महाजनच्या हसण्याची एमपी थ्री फुकट!

कशी वाटतेय योजना?
नक्की कळवा.
तोवर घेऊ या एक विराम... उद्या रात्री साडेआठपर्यंत.
------------------------------------------------------------------
(काय सांगताय काय? - 5 - होळी २८.०२.१०)

1 comment:

Unknown said...

Mast..
Maja aali..
lai Bharii..