कसा लागला लादेनचा पत्ता?

दहा वर्षे अमेरिका लादेनच्या शोधात होती.
कोणी म्हणत होते, तो अफगाणिस्तानातल्या तोराबोराच्या पहाडांमध्ये लपला आहे. त्या पहाडांमध्ये अंडरग्राऊंड बंकर्स आहेत, टनेल्स आहेत. त्यात तो आहे.
कोणी सांगे, तो पाकिस्तानतल्या वायव्य सरहद्द प्रांतात आहे. तेथील आदिवासी टोळ्यांचं संरक्षण त्याला आहे.
कोणी सांगे, तो अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला आहे. मधूनमधून अशाही बातम्या उठायच्या, की त्याला किडनीचा गंभीर आजार आहे. त्यातच औषधोपचाराअभावी त्याचा मृत्यु झालाय.
पण अशा बातम्या आल्या, की काही दिवसांनी अल् जझीरावर लादेनची टेप झळकायची. मग ती टेप खरी की खोटी अशी चर्चा सुरू व्हायची...
एकूण सगळाच गोंधळ होता.


सगळी ताकद लावूनही अमेरिकेला लादेनचा पत्ता लागत नव्हता. एका लष्करी महासत्तेसाठी ही मोठीच शरमेची गोष्ट होती.
पण आता ते सगळे संपले आहे. ओसामा बिन लादेनचा खातमा झाला आहे. रविवारी रात्री एकच्या सुमारास अमेरिकेच्या सैनिकांनी ओसामाला ठार मारले. ओसामा आमच्याकडे नाहीच, असे म्हणणा-या पाकिस्तानात घुसून अमेरिकेच्या सैनिकांनी त्याला मारले. डोक्यात गोळी घालून त्याला संपविले. जागतिक शांततेला पडलेल्या एका दुःस्वप्नाचा अंत केला.
एखाद्या थरारपटासारखी ही कहाणी आहे...

तिची सुरूवात झाली तब्बल चार वर्षांपूर्वी. क्युबातील ग्वाटेनामा बेमध्ये.
अमेरिकेच्या या लष्करी तळावर हायसिक्युरिटी तुरूंग आहे. जगभरात पकडलेले खतरनाक दहशतवादी या तुरूंगात ठेवले जातात. तेथे असलेल्या अल् कायदाच्या एका दहशतवाद्याची चौकशी सुरू असताना त्याने सुरक्षा अधिका-यांना एक लीड दिला. अल् कायदाच्या एका कुरिअरचे - जासूदाचे कोडनेम त्याने सांगितले. स्वतःस नाईन-इलेव्हनचा मास्टरमाईंड म्हणविणा-या खालिद शेख मोहम्मदच्या हाताखाली हा जासूद काम करीत असे. 

या माहितीवरून सीआयएने या कुरिअरवर आपले लक्ष केंद्रित केले. चार वर्षांपूर्वी त्यांना या कुरिअरचे खरे नाव शोधून काढण्यात यश मिळाले. नाव मिळाल्यानंतर आता तो कुरिअर कोठे राहतो याचा तपास सुरू करण्यात आला. त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. तो पाकिस्तानात, इस्लामाबाद नजीक राहतो हे साधारणतः दोन वर्षांपूर्वी सीआयएच्या गुप्तहेरांना समजले. पण त्यांना पक्का धागा मिळाला तो गेल्या ऑगस्टमध्ये. इस्लामाबादच्या जवळच असलेल्या अबोटाबाद या उपनगरातील एका बंगल्यात या जासूदाला जाताना पाहून सीआयए अधिका-यांना आश्चर्यच वाटले. पाकिस्तानी सैन्याधिका-यांच्या ट्रेनिंग सेंटरपासून जवळच हा अलिशान बंगला होता. एका साध्या कुरिअरचे या एवढ्या मोठ्या बंगल्यात वास्तव्य असणे शक्यच नव्हते. मग तेथे कोण राहात होते?

सीआयएने आता या बंगल्यावर आपले लक्ष केंद्रित केले. २००५ मध्ये सुमारे दहा लाख डॉलर्स किंमतीचा हा बंगला बांधण्यात आला होता. त्याच्या भोवताली १२ फुटी उंचच उंच कंपाऊंड वॉल होती. त्यामुळे आतील काहीही बाहेरच्या माणसाला दिसणे शक्य नव्हते. शिवाय बंगल्याच्या दरवाजावर २४ तास दोन हत्यारबंद रक्षकांचा पहारा होता. तेथे फारसे कुणाचे जाणे-येणेही नव्हते. बरे एवढा अलिशान बंगला असूनही तेथे टेलिफोन नव्हता. इंटरनेट कनेक्शन नव्हते. फार काय, आतील कचराही बाहेर फेकला जात नव्हता. आवारातच तो जाळला जात होता. याचा अर्थ स्पष्ट होता. टेलिफोन वा इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक हेगगिरी करणे सोपे असते. तसे करता येऊ नये म्हणून तेथे संदेशवहनाची कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने ठेवण्यात आली नव्हती. त्या बंगल्यात टीव्हीसुद्धा नव्हता. घरातील कच-यावरून तेथे काय चालते, कोण राहते, ते काय खातात-पितात अशा गोष्टींचा अंदाज येऊ शकतो. तेव्हा कचरा आवारातच जाळून त्या बंगल्यातील रहिवाशांनी तो मार्गही बंद करून टाकला होता. पण याच छोट्या छोट्या गोष्टींवरून या बंगल्यामध्ये एखादा बडा मासा राहाता असावा हा सीआयएचा संशय दृढ झाला होता.

हा मासा म्हणजे ओसामाच हे सीआयएला कधी आणि कसे समजले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण ठिकठिकाणाहून आलेल्या गुप्तमाहितीचे विश्लेषण करून सप्टेंबर २०१० ते फेब्रुवारी २०११ या कालावधीत कधीतरी सीआयए आणि नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला तेथे ओसामा राहात असल्याची शंभर टक्के खात्री पटली असावी. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात (ता. २९) अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला ओसामाला जिंदा वा मुर्दा पकडा म्हणून आदेश दिला. त्यानुसार रविवारी रात्री अमेरिकेच्या नेव्ही सिल्स या अतिप्रशिक्षित कमांडो पथकाच्या कमांडोंनी त्या बंगल्यावर हल्ला चढवला आणि ओसामाचा खातमा केला. त्याच्या वर्णनाच्या बातम्या सगळीकडे आल्या आहेत.

इस्लामाबादपासून तासाभराच्या अंतरावरील अबोटाबादसारख्या उपनगरात ओसामा राहात होता, हे ऐकून अनेकांना नवल वाटले असेल. पाकिस्तानी सैन्याधिका-यांच्या प्रशिक्षण केंद्रापासून अगदी हाकेच्या अंतरावरील बंगल्यात ओसामा होता, यावर विश्वास ठेवणे तसे कठीणच. पण दहशतवाद्यांची ही जानीमानी मोडस ऑपरेंडी आहे. लोकांमध्ये मिळूनमिसळून राहा, गर्दीच्या ठिकाणी राहा म्हणजे तुमच्यावर हल्ला करणे सुरक्षा दलांना अवघड होते. अशा हल्ल्यात सर्वसामान्य नागरिकांचे बळी जाण्याची शक्यता असते. सुरक्षा दलांची सर्वात मोठी चिंता असते तीच. त्याचमुळे दहशतवाद्यांविरोधातील कोणत्याही सशस्त्र कारवाईस वेळ लागतो. काश्मीरमध्ये हे नेहमीच दिसते. त्यामुळे ओसामाने आपल्या राहण्यासाठी ही योग्यच जागा निवडली होती, यात शंका नाही. यापूर्वी ओसामाच्या वास्तव्याच्या ठिकाणांबद्दल, त्याच्या मृत्युबद्दल ज्या बातम्या येत होत्या, त्यासुद्धा दहशतवाद्यांच्या, गोंधळ उडवून देण्याच्या धोरणाचाच भाग असाव्यात अशी शंका येण्यास जागा आहे.

ओसामा पाकिस्तानात, तेही राजधानी इस्लामाबादपासून जवळच सापडल्यामुळे पाकिस्तान सरकारची चांगलीच गोची झाली असणार. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयमधील काही लोकांची ओसामाला सहानुभूती होती, हे उघड गुपित होते. आता ते सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झाले आहे, एवढेच. पण अर्थात त्यातून फार काही साध्य होईल, असे नाही. पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणामुळे हे सहानुभूतीदार वाचतील. आणि ओसामाचा तो बंगला कुणाच्या नावावर होता, तो बांधण्यास पैसा कोणी दिला वगैरे चौकशा होऊन काही छोटे मासे गळाला लावले जातील.

ओसामा मेल्यामुळे अल् कायदावर किंवा जिहादी दहशतवादावर काही परिणाम होईल, असे मानणेही चुकीचे ठरेल. मुळात अल् कायदा ही गोळीबंद अशी एक संघटना नाही. नाईन-इलेव्हन आणि अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या हल्ल्यानंतरच्या परिस्थितीत ओसामा बिन लादेन हा या संघटनेचा एका अर्थी फक्त ऑयडॉल राहिला होता आणि वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या गटांमध्ये ही संघटना पसरली होती. लादेनच्या नेटवर्कमधून या गटांना अर्थसाह्य होत होते. त्यांच्या कारवाया मात्र सहसा एकमेकांपासून स्वतंत्र होत्या. वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर एखादी गोम असावी, तशी ही संघटना झाली होती. गोमेचा एक पाय मोडला म्हणून काहीही फरक पडत नसतो. म्हणूनच ओसामा मेला म्हणून दहशतवादाविरुद्धची लढाई संपत नसते.

No comments: