साने गुरुजी साहित्यिक नाहीत?

काही काळापूर्वी गंगाधर गाडगीळांनी आणि त्याही आधी श्री. ना. पेंडसे यांनी साने गुरुजींना (पुन्हा एकदा) साहित्याच्या पंक्तीतून उठवलं. आता हे काही पहिल्यांदाच घडलेलं आहे अशातला भाग नाही. मराठीतल्या बहुतेक कलावादी समीक्षकांना मुळातच साने गुरुजी हे साहित्यिक आहेत हेच मान्य नाही. ती तुमची स्वातंत्र्य चळवळ, बेचाळीसचं आंदोलन, मंदीर प्रवेशाचा लढा वगैरे सगळं ठीक. त्यासाठी आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य सैनिक वगैरे म्हणू. पण सॉरी, तुम्हाला साहित्यिक म्हणणं हे म्हणजे फारच झालं, असं काहीसं त्यांचं मत दिसतं. मग भलेही गुरुजींच्या नावावर शंभर-सव्वाशे पुस्तकं असोत. गुरुजींना मराठी साहित्याच्या मध्यवर्ती धारेत प्रवेश बंद आहे....

आता ही जी बंदी घालणारी मंडळी आहेत, त्यात खांडेकर, फडके, माडखोलकर यांचाही समावेश आहे. तर असे प्रतिभा साधनेवाले म्हणतात म्हटल्यावर मग बाकीच्या समीक्षक मंडळींनीसुद्धा बालवाङ्‌मय म्हणून मराठीत जो एक सावत्रसुभा आहे, त्यात गुरुजींना ढकलून दिलं. म्हणजे कसं, की शाळकरी मुलांना पूरक वाचन म्हणून काय द्यायचं, तर ही घ्या "श्‍यामची आई' किंवा "धडपडणारी मुलं'. असं सगळं गेली साठेक वर्षं महाराष्ट्रात सुखाने सुरू आहे. जणू काही गुरुजींना आपल्या साहित्यातून जी मूल्यं मांडायची होती, ती प्रौढांसाठी नाहीतच.
आपल्याकडं काही लोकांनी ठरवूनच टाकलंय, की गुरुजींचं साहित्य म्हणजे हळवं आणि रडकं. अर्थात ते कोण नाकारतंय? पण हळवं आणि रडकं आहे म्हणून ते खराब आहे, हे समीकरण कसं चालणार? खरं तर एकदा स्कालपेलच घेऊन बसलं, की असंही दिसेल की कोणत्याही कलाकृतीत कारागिरीचा म्हणून जो भाग असतो, त्याचा गुरुजींना पत्ताच नाही. शिवाय त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये पुनरुक्ती, पाल्हाळ असे दोषही सहजी दिसतात. आता पुन्हा याला दोष म्हणायचं की काय हेही एकदा नीट ठरवायला हवं. पुनरुक्ती, पाल्हाळ हा तसा शैलीचा भाग. आणि त्याचा माग काढायचा तर आपल्याला थेट आपल्या देशी मुळांपर्यंत जावं लागेल. कारण की कादंबरी वगैरे हा काही अस्सल भारतीय प्रकार नाही. तो विलायतेतून आला. आपण तो उचलला. तेही असं, की मराठीतली पहिली कादंबरी जी आहे हरी केशवजी यांची "यात्रिक क्रमण' म्हणून तीसुद्धा अनुवादित आहे! मराठीतली पहिली स्वतंत्र कादंबरी ("यमुना पर्यटन') प्रसिद्ध व्हायला 1887 साल उजाडायला लागलं. त्यातही गंमत अशी की हा जो "नॉव्हेल' नावाचा प्रकार होता, त्याला द्यायला चांगलं मराठी नावही आपल्याकडं नव्हतं. आपल्याकडं बाणाची कादंबरी प्रसिद्ध होती. पुन्हा हा जो "नावल' प्रकार होता, तो कादंबरीप्रमाणे म्हणजे दारूप्रमाणे चटक लावणारा, तेव्हा त्याला कादंबरीच म्हणू लागले. मुद्दा असा, की भारतीय म्हणून जी कथाकथनशैली आहे ती अघळपघळ अशीच आहे. साने गुरुजी हे एका अर्थी आपल्या वाचकांना गोष्टीच सांगत असतात. तेव्हा भारतीय देशी संस्कार ज्याच्या पेशीपेशीत रुजलेले आहेत, असा माणूस जेव्हा गोष्टी सांगायला बसणार तेव्हा त्यात पुनरुक्ती, पाल्हाळ असं काही असणारच. कादंबरीच्या अकादमीक साच्यात ते नसेल बसत, तर त्याला कादंबरीचा अकादमीक साचा लावू नये.
गुरुजींनी कादंबरीसाठी कादंबरी, कवितेसाठी कविता असं काही लिहिलेलं नाही. त्यांची भाषिक कृती ही त्यांच्या उद्दिष्टपूर्तीची साधनं होती. गुरुजींच्या कादंबऱ्यांमध्ये काळा रंग फारसा दिसतच नाही. असेल कुठं तर तो अगदी तीट लावल्यासारखा. शिवाय तोही कादंबरीच्या शेवटी पुसट होत जाणारा. त्याचं कारण गुरुजींना जे जग हवं होतं, ते उजळ शुभ्र रंगातलं. तिथं मलिनत्वाला थारा नाही. "किडलेल्या माणसां'च्या वा छुप्या लैंगिकतेच्या गोष्टी सांगितल्या म्हणजेच ते साहित्य होते असा तर काही नियम नाही. प्रेमळ, ध्येयवादी अशा माणसांच्या कथा आंतरिक उमाळ्याने गुरुजींनी संगितल्या. करुणा, दया, प्रेम, सत्य हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. तोच त्यांच्या लेखनातही उतरला. म्हणजे त्यांचा समाजवाद पाहा. तोसुद्धा गांधीवादाच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसतो. त्यांनीच म्हटलं आहे, की ""मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञानविज्ञानसंपन्न आणि कलामय व्हावा, सामर्थ्यसंपन्न नि प्रेममय व्हावा, हीच एक तळमळ मला आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात.'' आता अशा ध्येयवादाने लिहिलेलं साहित्य हे प्रचारी म्हणून कलावादी त्याचा विटाळ मानणार हे झालंच. पण ही काही साहित्याची अंतीम आणि एकमेव कसोटी नसल्यामुळे प्रश्‍न खरे तर मिटला पाहिजे.
गुरुजींनी विपुल लिहिलं. पण त्यातही सर्वाधिक गाजलं ते त्यांचं "श्‍यामची आई' हे पुस्तक. गंमत म्हणजे "श्‍यामची आई' ही कादंबरी आहे, हेच काही मंडळींना मान्य नव्हतं. अर्थात वाचक म्हणून जी काही लोकं असतात त्यांचा सुदैवाने अकादमीक समीक्षेशी फारसा संबंध नसतो आणि शिवाय महाविद्यालयांमध्ये त्यांचं मराठी मेजरही नसल्याने त्यांना अशा वादात फारसा रसही नसतो. पुन्हा हे जे साहित्यिक वाद असतात, ते बहुधा साहित्यिक असण्यापेक्षा साहित्यिकांचेच असतात. मराठीतील असे काही गाजलेले वाद बघा. साने गुरुजींवर केली जाणारी टीकाही अशीच व्यक्तिनिष्ठ असावी अशी दाट शंका आहे. म्हणजे जर भालचंद्र नेमाडे म्हणतात की साने गुरुजी हाच मला एकमेव मोठा कादंबरीकार वाटत होता आणि अजूनही तसंच वाटतं, आणि नेमाडेंनी "टीकास्वयंवरा'त बहुतेक सगळ्या थोर साहित्यिकांना झेंजरलेले असेल, तर ते लोक म्हणणारच की नेमाडेंना काय कळतं? ते तर साने गुरुजींना मोठा कादंबरीकार मानतात! मग नेमाडेंना ठोकण्याचा उत्तम उपाय म्हणून गुरुजी हे साहित्यिकच नव्हेत असा बोभाटा करा. एरवी जिथं मारुतराव चितमपल्लीसुद्धा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून येतात, तिथं साने गुरुजींना ते "त्या अर्थी साहित्यिक नाहीत', असं हिणवण्याचं प्रयोजन काय? दुसरी गोष्ट म्हणजे, एकदा हेही तपासून घेतलं पाहिजे की गुरुजींना हा जो नकार मिळतो आहे, तो त्यांच्या साहित्यातील मूल्यांमुळं तर नाही? "श्‍यामची आई'चंच उदाहरण घेतलं, तर ते मातृत्त्वाचं मंगल गान तर आहेच, पण त्या पदराखाली अस्सल देशी परंपरांचा प्रवाहही आहे. गांधीवादी समाजवाद वेगळा सांगावाच लागणार नाही असा तो प्रवाह आहे. भारतीय परंपरा आणि गांधीवादी समाजवाद यात द्वैत नाही, याचीच ग्वाही गुरुजींनी दिलेली आहे. आता ज्यांना हेच, म्हणजे गांधी वगैरे नकोसा आहे, त्यांचा विरोध असणारच. गुरुजी साह
ित्यिक नाहीत, असं म्हणणाऱ्यांना गुरुजींनी जे लिहिलं ते साहित्य म्हणायच्या लायकीचं नाही असं म्हणायचं असतं, हे तर स्पष्टच आहे. ज्यांच्या साहित्याने महाराष्ट्राला असंख्य धडपडणारी मुले दिली, ज्यांच्या ध्येयवादाच्या, आदर्शवादाच्या संस्कारावर येथील काही पिढ्या पोसल्या गेल्या आणि व्यवहाराच्या आज समजेल अशा भाषेतच बोलायचं तर ज्यांच्या पुस्तकांच्या आवृत्यांवर आवृत्त्या येथे खपत आहेत, त्या साने गुरुजींना साहित्यिक मानण्यास नकार दिला जात आहे याची संगती अन्यथा कशी लावणार?
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ, साने गुरुजी जयंती विशेष पुरवणी, 24 डिसेंबर 2005)

2 comments:

Rushi said...

Pujya sane guruji he sarvashreshtha sahityik ahet asech mi manato.karan manvavi vasanana haat ghalun yenkenprakare apali booke khapavanarya tathakathit sahityikanshi tyanchi tulana karane he mahapaap ahe.pujya gurujinchya sahityavar tika karanarya potabharu sahityikani samajmanavar kasale sanskar kele?konate manavatavadi vichar rujavale?aaj samaj adhogatikade jhukala aahe yala ase nich lekhakach karanibhut aahet.yancha dhikkar karava tevadha kamich.bharis bhar he lekhak nusate vachavir ahet,pujya gurujinsarakhe karmavir nahit.kajava suryachi samiksha karu shakel ka?

Rushi said...

Pujya sane guruji he sarvashreshtha sahityik ahet asech mi manato.karan manvavi vasanana haat ghalun yenkenprakare apali booke khapavanarya tathakathit sahityikanshi tyanchi tulana karane he mahapaap ahe.pujya gurujinchya sahityavar tika karanarya potabharu sahityikani samajmanavar kasale sanskar kele?konate manavatavadi vichar rujavale?aaj samaj adhogatikade jhukala aahe yala ase nich lekhakach karanibhut aahet.yancha dhikkar karava tevadha kamich.bharis bhar he lekhak nusate vachavir ahet,pujya gurujinsarakhe karmavir nahit.kajava suryachi samiksha karu shakel ka?