बिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा!
मॅनहंट
पीटर बर्गन
अनुवाद : रवि आमले
बाजारात 'बेस्टसेलर' ठरलेल्या इंग्रजी किंवा अन्य भाषांतील पुस्तकांचे मराठीत झटपट अनुवाद होतात. 'बेस्टसेलर' पुस्तकांची लोकप्रियता 'कॅश' करण्यासाठी मराठीतील प्रकाशकही घाई करतात. परिणामी, अनेक अनुवादित पुस्तकं ही निव्वळ भाषांतरित किंवा पटकन उरकलेली अशी दिसतात. सुदैवानं 'मॅनहंट'बाबत तसं झालेलं नाही. बर्गन यांनी जितक्या उत्कटतेनं आणि काळजीपूर्वक लादेनच्या शोधाचा प्रवास मांडला, तितक्याच उत्कटतेनं व काळजीनं रवि आमले यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. मराठी शब्दांचा आग्रही वापर आणि सुटसुटीत वाक्यरचना हे या अनुवादित पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. त्याखेरीज या पुस्तकाला मूळ पुस्तकासारखा प्रवाहीपणा आलाच नसता. 'मॅनहंट' हे अनुवादित पुस्तक आहे, असं वाटत नाही, इतका अस्सलपणा या अनुवादात उतरला आहे. ओसामा बिन लादेनवर गेल्या दोन-अडीच वर्षांत बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातल्या फारच थोडी अस्सल आणि कष्टपूर्वक केलेल्या संशोधनावर आधारित आहेत. 'मॅनहंट' हे त्या अधिकृत दस्तावेजांपैकीच एक.
- असिफ बागवान
ऑनलाइन शॉपिंग
दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत (रविवार 22 डिसेंबर 2013 रोजी) प्रसिद्ध झालेला मॅनहंटमधील काही भाग :
'आपण मारलं त्याला, आपण त्याला मारलं'
DivyaMarathi
Tuesday, December 31, 2013 AT 07:13 PM (IST)
Tags: manhunt, Bin laden, Bin Laden Chya Shodhachi Thararak Satyakatha !, Daimond Prakashan, Peter Bergen, Ravi Amale
...सर्वांत वरच्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये असलेला बिन लादेन त्याच्याच सुरक्षा व्यवस्थेचा बळी ठरला होता. तिथे त्याच्यासोबत अमाल ही त्याची लाडकी पत्नी असे. त्या लहानशा खोलीला खूपच कमी खिडक्या होत्या. त्यांच्यातून बाहेरचं कोणी आत पाहू शकत नव्हतं; पण त्यामुळे त्यालाही बाहेर काय चाललं होतं, हे पाहणं अशक्य झालं होतं. बदामी सलवार-कमीझ परिधान केलेला अल्-कायदाचा नेता बिन लादेन सुमारे पंधरा मिनिटं तिथेच अंधारात गुपचूप वाट पाहत बसला होता. अमेरिकी सैनिकांनी त्याच्या अखेरच्या आश्रयस्थानावरही हल्ला केल्याने जणू त्याला मानसिक लकवा आला होता. अमावास्येची रात्र, विजेचा अभाव आणि सर्वत्र गडद अंधार यांमुळेही त्याच्या गोंधळात भर पडली असावी. त्याच्या कपड्यांत शेकडो युरो आणि दोन दूरध्वनी क्रमांक लिहिलेली चिठ्ठी शिवून लपवून ठेवलेली होती. त्यातला एक मोबाइल क्रमांक पाकिस्तानमधला आणि दुसरा पाकिस्तानच्या आदिवासी भागातल्या एका कॉल सेंटरचा होता. अशी एवढीच त्याच्या सुटकेची योजना होती आणि आता तीही त्याच्या कामाला येणार नव्हती.
बिन लादेनच्या घराची अंतर्गत रचना कशी होती, याची सील्जना अजिबात कल्पना नव्हती. जरा आत गेल्यानंतर त्यांना स्वयंपाकघर आणि दोन मोठ्या साठवणुकीच्या खोल्या लागल्या. एखाद्या बंकरसारख्या भासणाºया त्या घराच्या मागच्या बाजूला एक जिना होता. तिथून वरच्या दोन मजल्यांवर जाण्यासाठी त्यांचा मार्ग रोखून एक कुलूपबंद लोखंडी दरवाजा उभा होता. आपल्याकडच्या दरवाजे फोडण्याच्या सामग्रीच्या साहाय्याने सील्जनी तो दरवाजा उडवून दिला. त्या वेळी घरामध्ये पेरलेल्या छुप्या बॉम्ब्जची चिंता लेईटरना वाटत असल्याचं ते सांगतात. अल-कायदाने इराकमध्ये या तंत्राचा चांगलाच वापर केला होता. लेईटर सांगतात, ‘त्या इमारतीत एखादा प्रचंड मोठा स्फोट होऊन त्यात सगळंच गाडलं जाण्याची जणू मी वाट पाहत होतो.’ ब्रेनन यांच्या मनातही अशीच चिंता होती.
सील्ज दुसºया मजल्यावर जात असतानाच त्यांचा सामना बिन लादेनचा तेवीस वर्षीय मुलगा खालिद याच्याशी झाला. त्यांनी त्याला जिन्यावरच गोळ्या घातल्या. त्या वेळी तो नि:शस्त्र असल्याचं दिसत होतं.
बिन लादेनच्या शयनगृहातल्या एका कपाटावर त्याची सतत साथ देणारी एके 47 रायफल अणि मॅकारोव्ह मशीन पिस्तूल होतं, पण ते घ्यायला तो गेलाही नाही. त्याऐवजी त्याने लोखंडी दरवाजा उघडला. हा दरवाजा फक्त आतून लावता येत होता आणि एकदा लावला की, त्याच्या खोलीकडे जाणारे सगळे मार्ग बंद होत होते. खाली काय गडबड चालली होती, हे पाहण्यासाठी बिन लादेनने दरवाजातून डोकावून पाहिलं. तेवढ्यात पायºयांवरून वर धावतच येत असलेल्या एका सीलने त्याला पाहिलं. या क्षणी आपले दोन्ही हात वर करून, ‘मी शरण येत आहे’ असं म्हणत बिन लादेन बाहेर आला असता, तरच त्याला जिवंतपणी अटक होण्याची शक्यता होती; पण तो माघारी गेला आणि जाताना त्याने एक घातक चूक केली. त्याने त्या दरवाजाची कडी लावली नाही. त्यामुळे सील्ज तो दरवाजा ढकलून सरळ त्याच्यामागे आत शिरले. आत एक लहानसा व्हरांडा होता. तिथून उजवीकडे वळून ते थेट त्याच्या शयनगृहात शिरले.
त्या अनोळखी माणसांचा आवाज ऐकून, ती आपल्या खोलीत घुसत असल्याचं पाहून अमाल अरबी भाषेत जोरात काही तरी किंचाळली आणि तिने स्वत:ला आपल्या पतीसमोर झोकून दिलं. तिच्या अंगावर आत्मघातकी बॉम्ब असेल, या शंकेने त्या खोलीत घुसलेल्या पहिल्या सीलने तिला बाजूला ढकलून दिलं. तेवढ्यात दुसºया सीलने तिच्या पोटरीत गोळी घातली. त्याबरोबर ती बेशुद्ध झाली आणि ज्या गादीवर ती बिन लादेनसमवेत झोपत असे, त्याच गादीवर कोसळली. बिन लादेन कोणताही विरोध न करता उभा होता. अचानक त्याला एकामागोमाग एक-दोन गोळ्या घालण्यात आल्या. एक त्याच्या छातीत, तर दुसरी त्याच्या डाव्या डोळ्यात घुसली. ते अतिशय भयानक दृश्य होतं. त्याच्या मेंदूचे तुकडे छतावर इतस्तत: उडाले होते, त्याच्या डोळ्यांच्या खोबणीतून बाहेर आले होते. त्याच्या बेडनजीक जमिनीवर त्याच्या रक्ताचं थारोळं पडलं होतं.
‘मी लढता लढता मरेन’, ‘मला अमेरिकी लोकांनी पकडलंच, तर माझे अंगरक्षक मला गोळ्या घालून ठार मारतील’ अशी दर्पोक्ती करणारा बिन लादेन तो क्षण आला, तेव्हा मात्र साधा आवाजही न करता मेला. 54 वर्षांचा बिन लादेन गेलं दशकभर पळून पळून थकला असावा किंवा त्याने कशाचीही फिकीर करणं सोडलं असावं; पण त्याच्याकडे पळून जाण्याची कोणतीही योजना नव्हती. त्याच्या बंगल्यातून बाहेर पडण्यासाठी कोणताही गुप्त मार्ग नव्हता. किंबहुना संकटाचा काही एक पूर्वइशारा स्वत:ला मिळण्याची त्याची अपेक्षा होती; पण ती पूर्ण झाली नव्हती. किंवा त्याच्या घरातल्या बंदिस्त जागेत जर चकमक झालीच असती, तर त्यात त्याची बायका-मुलं मारली जाण्याची शक्यता होती, याची त्याला कल्पना असावी. अखेरीस, त्या कंपाउंडमध्ये सामोºया आलेल्या बहुतेक प्रौढ व्यक्तींना सील्जने एक तर गोळ्या घालून जखमी केलं होतं किंवा मारलं होतं. त्यांनी चार पुरुष आणि एका महिलेला ठार केलं होतं, तर अन्य दोन महिलांना जखमी केलं होतं. त्या रात्री त्या कंपाउंडमध्ये खालिद, मरियम आणि सुमैया या बिन लादेनच्या तीन मोठ्या मुलांसह एकूण 11 प्रौढ व्यक्ती होत्या. त्यातल्या सात जणांना अवघ्या पंधरा मिनिटांच्या अवकाशात गोळ्या घालण्यात आल्या होत्या.
मॅकरेव्हन तिथून येत असलेले ध्वनिसंदेश ऐकत होते. अचानक त्यांच्या कानी सील टीमने उच्चारलेला ‘जेरोनिमो’ हा सांकेतिक शब्द पडला. या मोहिमेच्या प्रत्येक टप्प्याला एकेका इंग्रजी मुळाक्षराचं नाव देण्यात आलेलं होतं. त्यातल्या ‘जी’चा अर्थ होता, बिन लादेनला ‘ताब्यात’ घेतलेलं आहे. मॅकरेव्हन यांनी लगेच व्हाइट हाउसला तो शब्द कळवला; पण बिन लादेनला पकडलेलं होतं की मारलेलं होतं, हे त्यातून कळत नव्हतं. तेव्हा मॅकरेव्हन यांनी सील्जच्या प्रत्यक्ष मैदानावरच्या कमांडरला विचारलं, ‘तो ईकेआयए (Enemy Killed in Action) आहे का?’ काही सेकंदांतच तिकडून उत्तर आलं, ‘रॉजर, जेरोनिमो ईकेआयए.’ लगेच मॅकरेव्हन यांनी व्हाइट हाउसला कळवलं, ‘जेरोनिमो ईकेआयए.’ ते ऐकताच रूममध्ये अनेकांच्या तोंडातून अभावितपणे श्वासध्वनी बाहेर पडले. मात्र, कोणीही चित्कारलं नाही किंवा कोणी एकमेकांना टाळ्या दिल्या नाहीत. राष्ट्राध्यक्ष शांतपणे म्हणाले, ‘आपण मारलं त्याला, आपण त्याला मारलं.’
No comments:
Post a Comment