यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरून करून दिलेला
रॉ - भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा
या पुस्तकाचा परिचय...
पराग फाटक
रिसर्च अँड अनॅलिसिस विंग अर्थात रॉ हे ऐकल्यावर किंवा वाचल्यावर पॉश एरियामध्ये तगडा एसी असणाऱ्या ऑफिसमध्ये बैठं काम करणाऱ्या मंडळींचं ऑफिस असा समज होणं साहजिक। पण दिसतं तसं नसतं। RAW या संज्ञेभोवती गुप्तता, गोपनीयता, गूढता यांचा पडदा आहे। त्यापल्याडचं विश्व समजून घ्यायचं असेल तर हे मस्ट रीड पुस्तक आहे।
भक्त आणि ट्रोल अशी विभागणी होणाऱ्या कालखंडात हे पुस्तक वाचणं अत्यावश्यक आहे। देशभक्ती, राष्ट्रवाद या संकल्पनांबद्दल आपल्या मनात साचेबद्ध गोष्टी नोंदलेल्या असतात। हे पुस्तक ही झापडं भिरकावून देतं।
पुस्तक वाचताना अनेकदा आपल्याला सांस्कृतिक धक्के बसतात। दुसऱ्या देशाचं सरकार खिळखिळ करणं, प्रतिस्पर्धी देशातल्या अति महत्वपूर्ण व्यक्तींचं बोलणं टॅप करणं, त्या देशांचा गोपनीय डेटा फोडणं, शत्रूराष्ट्राच्या शत्रूला हाताशी धरून स्वतंत्र मोट बांधणं, शत्रूराष्ट्रात तेढ निर्माण व्हावी यासाठी फुटीरतावादी संघटनांची स्थापना, त्यांना प्रशिक्षण, निधीपुरवठा करणं, त्या देशाची फाळणी होऊन आणखी तुकडे होऊ देणं हे आणि अशा असंख्य विघातक गोष्टी पण हेतू-उद्दीष्ट एकच, देशासाठी।
देशासाठी सीमेवर लढणारा जवान एवढंच आपण जाणून असतो पण या शांतीत क्रांती आर्मीबद्दल आपण अनभिज्ञ असतो। या बॅकऑफिस सेनेबद्दल अनेक प्रवाद आहेत, अनेक दंतकथा आहेत- वाचायचं काय आणि सत्य काय मानायचं हाही विषय आहे। हे पुस्तक आपल्याला गुप्तहेर, गुप्तहेरांची कामं, देशांतर्गत आणि मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय समीकरणं, त्यामागचे अन्वयार्थ उलगडून दाखवतं। आपल्यापर्यंत येणाऱ्या बातम्यांचे आतले कंगोरे किती वेगळेच असतात याची जाणीव होते। अमुक क्षणी, तमुक कालखंडात संबंधित व्यक्ती असं का वागली होती याची उकल पुस्तक वाचताना आपल्या मनात होते। देश चालवणाऱ्या व्यक्ती सर्वसमावेशक असणं किती आवश्यक आहे याची सातत्याने जाणीव होते।
हे पुस्तक वाचताना आपण दमून जातो। शेकडो माणसांचे उल्लेख आहेत। अनेक जांगडगुत्ते आहेत। लोक गोष्टी एवढ्या जटिल का होऊ देतात असं वाटत राहतं। पण तरीही हे पुस्तक रँडम सनावळ्या राहत नाही। खिळवून ठेवण्याची ताकद या लिखाणात आहे। थरार शब्दोशब्दी भरला आहे पण एकदाही सनसनाटी करण्याची धडपड दिसत नाही। या लिखाणाला विषयाच्या अतीव आवडीची, खंडप्राय वाचन आणि संशोधनाची, खूप साऱ्या आशयघन चर्चांची बैठक आहे। आपल्या सगळ्यांना इतिहास शिकवला जातो। पण इतिहासाला वेगळा आयाम देणाऱ्या मानकऱ्यांबद्दल का सांगितलं जात नाही? असा प्रश पडतो। त्यांचं काम 'नाही चिरा नाही पणती' असंच का राहतं?
या पुस्तकात पाकिस्तानबद्दल अनेक संदर्भ आणि प्रकरणं आहेत। तिथे जाऊन किंवा इथे बसून तिथल्या सौर्सेसद्वारे फत्ते केलेल्या मोहिमांबद्दल वाचताना रोमांच उभे राहतात। आता सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान आलं आहे पण दळवळणाची साधनं धड नसताना, संगणक-व्हाट्सअप आणि पूर्व इंटरनेट काळात या मोहिमा कशा पार पाडल्या असतील असं वाटत राहतं। बांगलादेश निर्मित्ती काळात या संघटनेने नेमकी काय भूमिका बजावली हे वाचणं भन्नाट आहे। सिक्कीमचं भारतात विलीनीकरण उशिराने झालं। त्या निमित्ताने पुस्तकात दोन प्रकरणं आहेत। ती वाचताना ही संघटना नेमकं काय काय करते असा प्रश्न पडतो। देशातलं सरकार, त्यांची राजकीय भूमिका, सत्तेचं राजकारण, उपलब्ध निधी आणि तंत्रज्ञान, जागतिक घडामोडी ही सगळी कसरत सांभाळून निर्धारित वेळेत लक्ष्य साध्य करणं प्रचंड आव्हान आहे पण या संघटनेनं ते वर्षानुवर्षे केलं आहे, करत आहे।
काश्मीर खोरं इतकं धगधगतं का? हे काश्मीरकथा१ आणि 2मधून लक्षात येतं। परिस्थिती कशी हाताबाहेर गेली ते समजतं। सत्ता-पद-पैसा असतानाही माणसं असहाय्य होतात, परिस्थिती कसं अगतिक बनवते हे जाणवतं।
पाकिस्तान-बांगलादेश-चीन यांच्याबद्दल सतत ऐकायला, वाचायला मिळतं पण श्रीलंकेत काय घडलं ते समजत नाही। लंकाकांड१आणि२ वाचणं अस्वस्थ करणारं आहे। डोकं गरगरून जातं। त्या सगळ्या घडामोडींचे घाव किती खोलवर उमटलेत। हे समोर बसून कधीच सांगितलं जातं नाही याची खंत वाचताना वाटते।
पुस्तकात कुठेही रॉचं उदात्तीकरण नाही आणि विखारी टीकाही नाही। हेरगिरीचा प्राचीन इतिहास हा भाग रंजक आहे। या पुस्तकाच्या निमित्ताने रामेश्वरनाथ काव या अवलिया, द्रष्ट्या व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या प्रचंड कार्याची सविस्तर ओळख आपल्याला होते। त्यांनी दिलेला विचार आणि त्यांचा वारसा जपणारी मंडळी आपल्याला या पुस्तकामुळे समजतात।
देशाला बळकट करणाऱ्या एका संघटनेच्या अनवट विश्वाची ही थरारक सफर आहे। थ्री डी इफेक्टवालं मुखपृष्ठ देखणं झालं आहे।
व्यासंग, ज्ञानाची बैठक अशी माणसं कोणत्याही क्षेत्रात दुर्मीळ। पत्रकारिता त्याला अपवाद नाही। रवी सर या मोजक्या दुर्मीळ गटाचे मानकरी। राजकारण ते समाजकारण आणि सभोवताल यांच्या सखोल अभ्यासातून तिरकस, कोपरखळ्या लगावत खुशखुशीत अर्कबाज शैलीतला रविवारी प्रसिद्ध होणारा त्यांचा कॉलम रविवार आनंदमय करून देत असे। त्यांना कोणताच विषय वर्ज्य नाही। जागतिक, बॉलिवूड सिनेमे ते मराठी संत साहित्य- त्यांची मुशाफिरी वाचकाला समृद्ध करते। विषय कोणताही असो ते डुबकी घेतात आणि सर्वांगभर भिनल्याशिवाय बाहेर येत नाहीत। म्हणूनच त्यांचं कोणतंही लिखाण सर्वंकष, अभ्यासपूर्ण आणि सकस असतं। एक रोचक जग मात्र तांत्रिक तपशीलाने भरलेलं-त्याबद्दल लिहिणंही अवघड। अभ्यास, मांडणी आणि शैली यांची परफेक्ट भट्टी जमलेला हा खजिनारूपी दस्ताऐवज। रॉ साक्षर केल्याबद्दल मंडळ ऋणी राहील।
No comments:
Post a Comment