तसं पाहिलं तर बॉण्डपटांमध्ये असं वेगळं काय असतं?
म्हणजे बघा, कथा एका हेराची असते. त्या हेराचं नाव असतं बॉण्ड... जेम्स बॉण्ड. मग एक खलनायक असतो. त्याचं मागणं लई नसतं. त्याला फक्त जगावर राज्य करायचं असतं. मग बॉण्ड त्याच्या मागे जातो. तिथं त्याला नायिका भेटते. मग तो त्या खलनायकाचा निःपात करतो. सुष्ट शक्तीचा दुष्ट शक्तीवर जय होतो आणि त्यानंतर बॉण्ड व जग पुढचा बॉण्डपट येईपर्यंत सुखाने जगू लागतात.
सगळं कसं अगदी तसंच. १९५३च्या ‘कसिनो रोयाल’पासून चालत आलेलं. एखाद्या पारंपरिक कथेसारखं.
पण तरीही चित्रपटगृहात नवा बॉण्डपट आला किंवा एखाद्या चित्रवाणी वाहिनीवर बॉण्डपटांचा रतीब सुरू झाला, की आपण सगळं कामधाम विसरून पडद्यासमोर जाऊन बसतोच. आपल्यातल्या अनेकांनी तर बॉण्डपटाची अनेक पारायणंसुद्धा केलेली असतील. आमचा महाविद्यालयातला एक मित्र तर आपल्या पिताश्रींना, हा इंग्रजी सुधारण्यासाठीचा स्वाध्याय आहे, अशी थाप ठोकून व्हिडिओ थिएटरात बॉण्डपटाचे दिवसभरातले सगळेच्या सगळे खेळ पाहात असे. नंतर इंग्रजीत नापास झाल्यानंतर त्याने पिताश्रींना खुलासा केला, की बॉण्ड मूळचा स्कॉटिश असला, तरी अमेरिकन इंग्रजीत बोलायचा. त्यामुळे गोंधळ झाला! असो. सांगायचा मुद्दा असा, की आताच्या बहुवाहिन्यांच्या काळातील तरूणाईला हे कदाचित समजणार नाही, पण पूर्वी एकूणच हॉलिवूडी चित्रपट पाहणं हे केवढं तरी जिकिरीचं काम होतं. मुळात ते चित्रपट उमजायचे, पण समजत नसत. समजणार कसे? ते समजण्यासाठी संवाद समजावे लागतात. आणि संवाद कळण्यासाठी त्यांचे उच्चार मेंदूस ध्यानी यावे लागतात. बोंब नेमकी तिच होती. ते काय पुटपुटताहेत वा गुरगुरताहेत हेच समजत नसे. त्यामुळे व्हायचं काय, की सगळ चित्रपट पाहिला, तरी रामाची सीता कोण हे कोडंच असायचं. तरीही आमच्या त्या पिढीने बॉण्डपट (आणि अन्य हॉलिवूडी मारधाडपट) बहुप्रेमाने पाहिले. आज तर तशी काही समस्याच नाही. म्हणजे आजच्या पिढीचं इंग्रजी अधिक सुधारलंय असं नाही. आज सबटायटल्सची सोय झालेली आहे इतकंच.
पण बॉण्डपटातील संवादांवर तसं फारसं काही अवलंबून नसायचं. कारण एकूणच चित्रपट हा द्वैभाषिकच मामला असतो. त्याला दोन भाषा असतात. एक बोलभाषा आणि दुसरी चित्रभाषा. आणि बॉण्डपट म्हणजे काही आपले मराठी ‘बोल’पट नसतात, की बोवा, चला सगळ्या पात्रांनी कॅमे-यासमोर ओळीने उभं राहा आणि नाटकासारखे म्हणा... म्हणतच राहा... संवाद. त्यामुळे नाही बोलभाषा समजली, तरी चित्रभाषेवर काम चालून जायचं. आणि हाणामारीची भाषा काय, जगात कोणालाही समजतेच. पण मग प्रश्न असा येतो, की आम्ही व्हिडिओगृहांमध्ये जाऊन पाहायचो ते सद्गुरू ब्रुस ली यांचे अभिजात मारधाडपट आणि जेम्स बॉण्डचे चित्रपट यांत काहीच फरक नव्हता का?
फरक होता. चांगलाच फरक होता. सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे हाणामारी, स्टंटबाजी वगैरे सगळं काही असलं, तरी बॉण्डपट हा कधीही निव्वळ मारधाडपट नसायचा. मारधाडपटाचा सर्व गरम मसाला असूनही तो त्याही पलीकडचा असे. मुळात बॉण्ड हा रावडी राठोड जातकुळीतला नाहीच. तो डर्टी हॅरी नाही, पॉल कर्सी नाही, जॉन रॅम्बो तर अजिबातच नाही. तो ब्रिटनच्या एमआय-६चा गुप्तहेर आहे. झिरो झिरो सेव्हन हे त्याचं सांकेतिक नाव. शिवाय तो रॉयल नेव्हल रिझर्व्हमध्ये कमांडरही आहे. पण म्हणून तद्दन हेरगिरीपट म्हणूनही आपणांस बॉण्डपटांकडे पाहता येत नाही. कारण बॉण्ड हा इथन हंट (मिशन इम्पॉसिबल) किंवा जेसन बोर्नही (बोर्न चित्रचतुष्टी) नाही. तो त्याच्याही पलीकडचा आहे. बॉण्ड हे रसायनच वेगळं आहे. त्याची मूलद्रव्यं वेगळी आहेत. त्याचा हा वेगळेपणा लक्षात आला, की मग समजेल, की जग त्याच्यासाठी एवढं वेडं का होत असतं? चित्रपटगृहात नवा बॉण्डपट आला किंवा एखाद्या चित्रवाणी वाहिनीवर बॉण्डपटांचा रतीब सुरू झाला, की सगळं कामधाम विसरून पडद्यासमोर जाऊन का बसत असतं?
०००
Read more...