अखेर श्रीयुत सचिन रमेश तेंडुलकर ट्विटरवर आले. 4 मे रोजी त्यांनी या वेबसाईटवर दाखला घेतला आणि लिखाण सुरू केले. ही गोष्ट सामान्य नसल्याने त्याची बातमी झाली. ती विविध वृत्तपत्रांत व चित्रवाणी वाहिन्यांवरून झळकली आणि दुसऱ्याच दिवशी दुपारपर्यंत सचिनच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 80 हजारांवर गेली. ती वाढतच चालली आहे. हे अपेक्षितच होते. कारण सचिन ट्विटरवर येणे याचा साधासोपा अर्थ असा होता, की त्याच्या चाहत्यांना "बाप्पाशी गप्पा' मारण्याचा हमरस्ता खुला झाला आहे! अखेर सचिन हा अनेकांसाठी साक्षात् क्रिकेटेश्वर आहे!!
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सचिन क्रिकेटविश्वात आहे. क्रिकेटचे मैदान आणि भारतीयांचे मन या दोन्हींवर तो राज्य करीत आहे. त्याच्या बॅटचा तडाखेबंद फटका पाहण्यासाठी रसिक जेवढे उत्सुक असतात, तेवढेच ते त्याच्या एका शब्दासाठी व्याकुळ असतात. परंतु हा गडी सहसा क्रिकेटबाह्य विषयांवर बोलत नाही. भरभरून बोलणे हे त्याच्या अंतर्मुख स्वभावाला मानवत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल सर्वांच्याच मनात एक सुप्त आकर्षण आहे. आता मात्र वयाच्या या टप्प्यावर बहुधा त्याला जरा मोकळे व्हावेसे वाटले असावे आणि म्हणूनच त्याने ट्विटरवर आपले खाते खोलले असावे. एकंदरच "मोकळे होणे', "सोशली कनेक्ट' राहणे ही सध्या सेलेब्रिटींची गरज बनल्याचे दिसत आहे.
लोकप्रिय असण्याचे अनेक फायदे असतात; परंतु त्यात एक तोटाही असतो. लोकप्रियतेच्या शिखरावरची हवा खूपच विरळ असते! तुम्ही जेवढे लोकप्रिय तेवढे तुम्ही एकटे पडत जाता. तुमचा सामाजिक संवाद जवळजवळ बंद होतो. समाजाशी संवाद साधण्याचा एकच मार्ग तुमच्यासाठी बाकी असतो. तो म्हणजे प्रस्थापित माध्यमांचा. परंतु त्यातूनही तुम्हाला जे म्हणायचे आहे, ते नेमके तसेच लोकांसमोर येईल याची खात्री नसते. प्रस्थापित मीडिया प्रत्येक वेळी तुमचे म्हणणे मांडेल, याचीही खात्री नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो एकदिशा मार्ग असतो. त्यातून संवादाचे समाधान मिळणे अशक्य असते. सोशल मीडियाने ही अडचण दूर केलेली आहे. तुम्ही आणि लोक यांतील मध्यस्थ दूर केले आहेत. पुन्हा या माध्यमातून तुम्ही तुम्हास हव्या त्या विषयावर बोलू शकता, चर्चा करू शकता, वाद घालू शकता. (आणि निर्माणही करू शकता!) मध्यंतरी सलमान खानने ट्विटरवर एका तुटक्या, गुळगुळीत होऊन भोकं पडलेल्या स्लिपरचा फोटो टाकला होता. आणि लिहिले होते की - इस चप्पल के मालिक को चप्पल देना बनता है बॉस! ही अशी भंकस एरवी प्रस्थापित मीडियातून करणे सलमानसारख्यालाही शक्य नव्हते! पण सोशल मीडियावर कोणतीही बंधने नाहीत. म्हणूनच सचिनप्रमाणे भारतातील अनेक सेलिब्रिटी आज ट्विटरवर आहेत. काही फेसबुकवर आहेत. अमिताभसारखा व्यस्त आणि श्रेष्ठ अभिनेता ब्लॉगवर आहे.
पण सोशल मीडिया हे केवळ सेलिब्रिटींचेच माध्यम आहे का? तर तसे नाही. असंख्य लोक आज कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया साईटवर आहेत. जगभरात सर्वत्र औद्योगिक क्रांतीने विभक्त कुटुंबसंस्थेला जन्म दिला. आयुष्य ठराविक चौकटीत कोंबले गेले. कुटुंबे चौकोनी - त्रिकोनी झाली. वास्तविक पौर्वात्य देशांची ही जीवनरीत नव्हे. परंतु बाह्य परिस्थितीने ती त्यांच्यावर लादली गेली. आता तर तंत्रक्रांतीने या चौकटीलाही तडे गेले. प्रत्येक माणसाचा स्वतंत्र कोष झाला. परंतु निदान पौर्वात्य माणसे तरी असे जगू शकत नाहीत. कुळ-गणगोत यांत असणे हे त्याच्या गुणसूत्रांत आहे. त्याला इतरांपासून तुटून जगता येत नाही. भारत किंवा चीनमध्ये मोबाईल फोनचा सर्वाधिक वापर होतो, त्याचे कारण हे आहे. आणि भारतासारख्या देशात ऑर्कुट, फेसबुक आणि आता ट्विटरला जगातील अन्य देशांच्या तुलनेने प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे त्याचेही हेच कारण आहे. या साईट्समुळे आपणांस आपल्या अटी आणि शर्तींवर इतरांशी जोडून घेणे सहजसाध्य झाले आहे. ते सोईस्करही आहे. हे "जोडले जाणे' कदाचित आभासी असेल; पण ते आजच्या पिढीला पुरेसे वाटते आहे आणि म्हणूनच इंटरनेटवरील सोशल मीडिया साईट्सना एवढा प्रतिसाद मिळत आहे.
यानंतर आता एक प्रश्न येतो, की या साईट्सवर केवळ चॅटिंगच, गप्पा-टप्पाच चालतात काय? चालत नाहीत असे नाही. आजही काही लोक फेसबुक अकाऊंटवर "हाय, हाऊ आर यू?' असा फालतू स्क्रॅप टाकून जातात. पण सोशल मीडिया साईट्स त्यासाठी नाहीत. उलट आज तर माहिती प्रसारणाचे एक माध्यम म्हणून सोशल मीडिया साईट्स समोर येऊ लागल्याचे दिसत आहे. ट्विटर या साईटने याबाबत चांगलीच आघाडी घेतली आहे. अनेक बातम्या हल्ली ट्विटरवरून "ब्रेक' होत आहेत. क्षणार्धात जगभरात पोचत आहेत. याहून अधिक म्हणजे प्रस्थापित माध्यमांसाठी ही साईटच बातमीचा स्रोत बनली असल्याचे दिसून आले आहे. आयपीएल प्रकरणात आपण हे पाहिले आहे.
याच आयपीएल प्रकरणाच्या निमित्ताने, भविष्यात सोशल मीडियासाईट्स हा प्रस्थापित मीडियाला एक समर्थ पर्याय बनू शकतील काय, अशी एक चर्चा माध्यम अभ्यासकांमध्ये पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र आज तरी आपल्याकडील वृत्तपत्रे आणि चित्रवाणी वाहिन्यांनी त्याची काळजी करण्याचे कारण नाही. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतातील डिजिटल डिव्हाईड. इंडियन रिडरशिप सर्व्हे 2010च्या गेल्या तिमाहीतील अहवालानुसार भारतीय लोक हल्ली मीडियावर रोज सरासरी 125 मिनिटे वेळ खर्च करतात. मात्र त्यातील इंटरनेटचा वाटा सर्वात कमी आहे. तेव्हा जोवर मोबाईल फोनमध्ये कवडीमोलाने इंटरनेट येत नाही, तोवर वृत्तपत्रे आणि वाहिन्यांना मरण नाही. पण आता भारतात मोबाईलची तिसरी पिढी येऊ घातली आहे. ती थ्री-जी टेक्नॉलॉजी स्वस्तात उपलब्ध झाली, तर साहजिकच मोबाईलमधून इंटरनेट सर्फिंग, सोशल नेटवर्किंग याला जोर येईल.
अशा वेळी कल्पना करा, की तुम्ही रस्त्याने चालला आहात. अचानक तुमच्यासमोर अपघात होतोय. तुम्ही पटकन् तुमच्या मोबाईल कॅमेऱ्याने त्याचा व्हिडीओ टिपला. तो एमएमएस तुमच्या मित्रांना पाठविला. त्यांनी तो आणखी लोकांना पाठविला. कोणी तो ट्विटरवर, फेसबुकवर, ब्लॉगवर टाकला... चित्रवाणी वाहिन्यांच्या आधी तुमची ही अपघाताची बातमी जगभर पोचलेली असेल... आणि मग वाहिन्यांना घ्यावा लागेल, तो केवळ त्या बातमीचा फॉलोअप. वृत्तपत्रे तर त्यानंतर काही तासांनी तुमच्या दारी येणार. ती काय करतील? एकूणच या सोशल मीडिया साइट्समुळे भविष्यात प्रस्थापित मीडियाची संपूर्ण भूमिकाच बदलणार आहे. आजच त्याची काही अंशी सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता हेच पाहा ना, की सचिन तेंडुलकरने त्याच्या बोटाच्या जखमेचे टाके काढले, ही त्याच्या चाहत्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बातमी आपल्याला सर्वात आधी दिली ती ट्विटरनेच!
ट्विटरची टिवटिव
काही वर्षांपूर्वी भारतात ऑर्कुट या सोशल नेटवर्किंग साईटची मोठी क्रेझ होती. नंतर फेसबुक आले. ब्लॉग्ज आले आणि सध्या ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटची चलती आहे. ट्विटर हे काही तरी "कूल' प्रकरण आहे याचा साक्षात्कार भारतीयांना झाला तो अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान. बराक ओबामा हे ब्लॅकबेरीशिवाय क्षणभर राहू शकत नाहीत आणि ते त्यावरून सतत ट्विट करीत असतात, हे समजल्यानंतर आपल्याकडील अनेक राजकीय नेतेही ट्विटरकडे वळले. पण या साईटचा खऱ्या अर्थाने बोलबाला झाला तो माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यामुळे. ट्विटरवर त्यांनी भारत सरकारच्या काटकसर मोहिमेसंदर्भात केलेल्या "कॅटल क्लास' शेरेबाजीमुळे मोठा वाद निर्माण झाला आणि ही साईट चर्चेत आली. विशेष म्हणजे याच साईटमुळे - म्हणजे या साईटवर ललित मोदी यांनी केलेल्या एका ट्विटमुळे पुढे आयपीएलगेट उजेडात आले. त्यात शशी थरूर आणि मोदी दोघांनाही आपल्या खुर्च्या गमवाव्या लागल्या. या सर्व प्रकरणात ट्विटरचा गाजावाजा होतच राहिला. (या अर्थाने शशी थरूर यांना ट्विटरचे ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणावयास हरकत नाही!) आता पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरच्या निमित्ताने ही साईट मीडियात झळकू लागली आहे.
(प्रसिद्धी : सकाळ, ११ मे २०१०, ई-सकाळ)
त्यांचे असत्याचे प्रयोग!
-
गांधींविषयी गैरसमज पसरविणा-या, त्यांचे चारित्र्यहनन करणा-या अशा अनेक गोष्टी
पसरविल्या जात आहेत. त्यांची बनावट चित्रे तयार करून ती प्रसारित केली जात
आहेत...
No comments:
Post a Comment