“इटालियन मरिन्स यांच्याविषयीची कायदेशीर लढाई असो की भारतीय जवानांचा शिरच्छेद की आपल्या भूमीतील चिनी आक्रमण वा सरबजीत सिंग प्रकरण… हे सगळे केंद्र सरकारच्या अपयशाचे पुरावे आहेत… सरबजीत सिंगचे प्रकरण स्वतंत्रपणे पाहिले जाऊ नये… ही सगळी प्रकरणे म्हणजे या सरकारच्या अपयशाचे आणि कमकुवतपणाचे पुरावे आहेत.”
- नरेंद्र मोदी, ७ एप्रिल २०१३, मनमोहनसिंग सरकारवर गांधीनगर येथे टीका करताना.
पाकिस्तानी तुरुंगात सरबजीत सिंग हा आपला कथित हेर खितपत पडला होता. पाकिस्तानात दहशतवादी कारवाया केल्याच्या तथाकथित गुन्ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्या सुटकेसाठी भारतातून वाढता दबाव होता. रझा मुराद, सलमान खान यांच्यासारखे अभिनेते त्यासाठी मोहीम चालवत होते. मे २०१२ मध्ये एक लाख भारतीय नागरिकांच्या सह्यांची दयायाचिका पाकिस्तानी राष्ट्रपतींना करण्यात आली होती. पाकिस्तानची भूमिका आडमुठी होती आणि त्यावरून विरोधक मनमोहनसिंग सरकारला लाखोल्या वाहात होते. नरेंद्र मोदी हे त्यापैकी एक. ते तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. केंद्र सरकार आपल्या वीर सपुताला सोडवू शकत नाही हे पाहून त्यांचे काळीज तिळतिळ तुटत होते. या उद्गारांतून त्यांच्या मनाला झालेल्या वेदना आणि काँग्रेस सरकारबद्दलचा संतापच दिसत होता.
आज तेच नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. दोन भारतीय मच्छीमारांची गोळ्या घालून हत्या करणारे ते दोन्ही इटालियन सैनिक आता त्यांच्या मायदेशात सुखरुप आहेत. त्यांच्यावर भारतीय न्यायालयात खटला चालविण्यात येऊ नये, असा निकाल आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेला आहे. चिनी आक्रमण होतच आहे. आणि सरबजीत सिंग यांच्याप्रमाणेच हेरगिरीचा आरोप असलेला एक भारतीय नागरिक पाकिस्तानी कारागृहात खितपत पडलेला आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यांचे नाव - कुलभूषण सुधीर जाधव.
त्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची, त्यांना मुक्त करण्याची भारताची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्याचवेळी या शिक्षेचा फेरविचार करण्यात यावा असे पाकिस्तानला बजावले आहे. या प्रकरणात हाच ‘योग्य उपाय’ असल्याचे न्यायालयाचे यावरचे मत. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कुलभूषण यांच्या शिक्षेस आधीच स्थगिती देण्यात आली होती. असे असले, तरी ‘फेरविचारा’त काय होणार आणि कुलभूषण कधी सुटणार हा प्रश्नच आहे. खरे तर आज हा प्रश्नही आपले बहुसंख्य अतिराष्ट्रप्रेमी विसरून गेलेले आहेत. आणि असा काही प्रश्नच समोर नसल्यामुळे नरेंद्र मोदींना सवाल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, की एप्रिल २०१३ मध्ये ज्या कारणांमुळे मनमोहनसिंग सरकार अपयशी आणि कमकुवत ठरत होते, तशाच कारणांमुळे विद्यमान सरकारला अपयशी आणि कमकुवत असे कोणी म्हटले, तर त्या म्हणणाऱ्यास काय म्हणणार? देशद्रोही?
Read more...



