1.
सौंदर्य म्हणजे काय?
ते कुठं असतं? कशात असतं? कसं असतं?
नशीब, यक्षाने युधिष्ठिराला असे काही सवाल घातले नव्हते! नाही तर पुढचं महाभारतच घडलं नसतं!
यातला गमतीचा भाग सोडा. पण हे खरोखरच अवघड सवाल आहेत यात काही प्रश्न नाही!
त्यांची उत्तरं शोधण्याचे प्रयत्न तत्त्वज्ञान्यांपासून काव्यचिंतकांपर्यंत अनेकांनी केले आहेत. त्यातल्या अनेकांची लाईफलाईन त्या शोधातच संपली. त्यातही काहींना सौंदर्याचं शास्त्र मांडण्यात यश आलं. पण ते त्यांचं-त्यांचं उत्तर होतं! साधं काव्यापुरतं बोलायचं तर रविकिरण मंडळाच्या कविता आणि आजच्या दलित कविता यांच्या सौंदर्याला एकाच शास्त्राचा काटा कसा लावणार? नाहीच लावता यायचा. कारण -
सौंदर्य हा "ज्याचा-त्याचा प्रश्न' आहे!
तो ज्याच्या-त्याच्या मनाचा, संस्कारांचा, ज्ञानाचा, प्रज्ञेचा खेळ आहे!
कुणीतरी म्हटलंच आहे ः सौंदर्य हे पाहणाराच्या नजरेत असतं.
तशी नजर असेल, तर मग तुम्हाला खास निसर्गसौंदर्य पाहायला म्हणून पर्यटनस्थळी जावं लागणार नाही आणि "निसर्गसौंदर्य आलं की आम्हाला उठवा हं', असं गाडीतल्या सहप्रवाशाला सांगावंही लागणार नाही. तशी नजर असेल, तर ते डालड्याच्या डब्यात लावलेल्या सदाफुलीतसुद्धा दिसेल. रस्तेदुभाजकावर लावलेल्या रंगीतबुटक्या रोपट्यांतही दिसेल. मुलाने चित्रकलेच्या वहीत गिरबाडलेले तीन डोंगर, त्यामधून दिसणारा अर्धा सूर्य, खालून वाहणारी नदी, किनाऱ्यावर माड, त्याआड "चारआकडी' पाखरं आणि त्याखाली छानसं कौलारू घर अशा चिरंतन निसर्गचित्रातही दिसेल!
2.
आमचा एक सुहृद डोळ्यांची खूप काळजी घेणारा. परवाच त्याने कुठलासा इम्पोर्टेड गॉगल घेतला. म्हटलं, अरे त्याच्या किमतीत एक अख्खा डोळा आला असता! तर असे अनेक चष्मे आजकाल बाजारात मिळतात. पण सौंदर्यदृष्टीचा चष्मा... तो काही विकत मिळत नाही! तो आपला आपणच बनवावा लागतो. बनवायचा असतो!
जरा आजूबाजूला पाहिलं की लक्षात येईल, असे चष्मे बनविलेली किती तरी माणसं आपल्या भोवती वावरत आहेत. त्यांना या जगात केवढं सौंदर्य भरलेलं आहे हे तर दिसतंच, पण कुरूपाचं सुरूप कसं करायचं हेही सुचत जातं. मग आपसूक त्यांची धडपड सुरू होते आपली माती, आपली माणसं सुंदर करण्याची! आता त्यांना ते पूर्णतः जमतं का? नसेल जमत. पण प्रयत्न तर तोच असतो. आणि अखेर "कुछ खार तो कम कर गए गुजरे जिधर से हम' असं काही झाल्याशिवाय थोडंच राहतं? अशी माणसं ज्या रस्त्यावरून जातात तिथली धूळ उडून रस्ता थोडा तरी स्वच्छ होतोच. आनंदवनाच्या कर्मयोग्यापासून राळेगणच्या साधकापर्यंतच्या अनेक माणसांच्या धडपडीचा दुसरा अर्थ तो काय आहे? आपलं विश्व सुंदर करता करता ही अशी माणसंही मग नकळत सुंदर होऊन जात असतात!
सर्वांच्या परिचयाची म्हणून ही दोन नावं घेतली. पण असे अनेक-अनेक सौंदर्यप्रेमी आहेत आपल्यात, आपल्या गावात, आपल्या घरा-दारात. गोलगोल भाकरी बडवतानाची आईची वत्सल तन्मयता यातसुद्धा राजे, सौंदर्य आहे! शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या वावरातले काटेकुटे कमी व्हावेत म्हणून झटणाऱ्या पी. साईनाथांसारख्या पत्रकाराच्या लेखणीतही सौंदर्य आहे!
फक्त ते पाहणारी नजर हवी!!
3.
"सौंदर्याच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे,' असं बालकवी म्हणतात. ही सौंदर्याची सुमनं म्हणजे काही गुलबकावलीची फुलं नसतात! ती दुर्मिळ नसतात आणि महाग तर नसतातच नसतात. आयुष्य जाहिरातपुरस्कृत आणि समाजजीवनाचा "शो-बीझ' झाल्याच्या आजच्या काळात आपल्याला उगाचच असं वाटतं, की महाग ते सुंदर. असं समीकरण होणं मार्केटवाल्यांच्या सोयीचं असेल, पण ते खासच चुकीचं आहे.
एका दिवाळीच्या सुटीत आमच्या सोसायटीतल्या बच्चेकंपनीने दोन दिवस खपून भलामोठा आकाशकंदील केला होता. आता त्याचे कोन भूमितीशी वैर साधणारे झाले होते, हे कुणाच्याही सहज लक्षात येत होते. पण आम्हाला नाही ते दिसले! आम्हांला त्या कंदिलात मुलांचा आनंद दिसत होता. त्यांनी नाकाच्या शेंड्याला जीभ लावून केलेलं चिकट-काम दिसत होतं. आम्हांला तो कंदील विकतच्या शोभिवंत कंदिलांपेक्षा अनंत पटीने सुंदर दिसत होता! सौंदर्यदृष्टी म्हणतात ती याहून काय वेगळी असते?
सौंदर्यशास्त्राची गणितं कोणाला मांडायची त्याने मांडावीत, आपल्या सौंदर्याच्या व्याख्या इतक्या साध्यासोप्या ठेवल्या ना, तर "हे जीवन सुंदर आहे' असं मुद्दामहून आळवायचीही गरज पडणार नाही. ते गाणं असंच आपल्या मनात मुरत-मुरत आपल्याला सतत ताजं ठेवत राहील. फक्त ती नजर तेवढी कमवायला हवी!!
(सकाळ-प्रेरणा, ता. 22 ऑक्टो. 2007)
त्यांचे असत्याचे प्रयोग!
-
गांधींविषयी गैरसमज पसरविणा-या, त्यांचे चारित्र्यहनन करणा-या अशा अनेक गोष्टी
पसरविल्या जात आहेत. त्यांची बनावट चित्रे तयार करून ती प्रसारित केली जात
आहेत...
1 comment:
तुमच्याशी संपर्क साधायचा आहे, तुमचा इ-पत्ता मिळेल काय?
माझ्या जीमेलच्या पत्त्यावर कळवलेत, तर फार बरे होईल.
Post a Comment