वृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार



गुरुवार, ४ जून.
वेळ - सकाळी आठ.

६ डोग्रा रेजिमेन्टच्या ४६ जवानांचा चार ट्रकचा काफिला मणिपूरमधील मोल्तूकहून दिमापूरला निघाला होता. वाट डोंगराळ होती. जंगलातून जाणारी. अशा रस्त्यांवर लष्करी जवान नेहमी सतर्क असतात. पण आजची वेळ वेगळी होती. त्यातील बहुतेक जवान सुटीवर निघाले होते. अनेकांकडे तर शस्त्रेसुद्धा नव्हती. एरवी असा ताफा निघाला की पुढे-मागे मशिनगनधारी वाहन असते. आज तेही नव्हते.
गाड्या आता तेंगौपाल ते परावलोन रस्त्यावरून धावत होत्या. एकाबाजूला उंच टेकडी अन् दुसरीकडे खोल दरी. अचानक समोर एक धोकादायक वळण आले आणि काही कळायच्या आतच रस्त्यावर भीषण स्फोट झाला. पुढच्याच क्षणी त्या वाहनांवर रॉकेट प्रॉपेल्ड गन (आरपीजी)मधून रॉकेट हल्ला करण्यात आला. अडीच टनी ट्रकचा उभा तुकडा पाडण्याची ताकद या रॉकेटमध्ये असते. जवानांना प्रतिकाराची संधी मिळण्याच्या आतच त्यांच्या वाहनांनी पेट घेतला. त्यातून उड्या टाकाव्यात तर नागा बंडखोरांच्या बंदुका आग ओकत होत्या...
काही मिनिटेच हा प्रकार चालला. तो संपला तेव्हा १८ जवान शहीद झाले होते. ११ जणांना भीषण जखमा झाल्या होत्या. आणि जवानांच्या गोळीने एका बंडखोराला वेध घेतला होता. त्याचे प्रेत तेथेच टाकून ते पळून गेले होते. लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान घटनास्थळी पोचण्याच्या आतच हे नागा बंडखोर १५ किमीवरील सीमा ओलांडून म्यानमारमध्ये पोचले होते.


गुरुवार. ४ जून.
वेळ - सकाळी नऊ.

हा हल्ला साधा नव्हता. कारगिल युद्धानंतर प्रथमच भारतीय लष्कराचे एवढे मोठे नुकसान झाले होते. या बातमीने दिमापूरमधील ६ डोग्रा रेजिमेन्टचे मुख्यालय सुन्न झाले होते. दिल्लीतील साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकला हा जबरदस्त धक्का होता. तोवर या हल्ल्यामागे नागा बंडखोरांच्या नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडचा खापलांग गट (एनएससीएन-के) असल्याचे स्पष्ट झाले होते. २ एप्रिलला याच गटाने अरूणाचलमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ला करून तीन जवानांचा बळी घेतला होता. त्यानंतर महिनाभरात नागालँडमध्ये त्यांनी आसाम रायफल्सच्या चार जवानांची हत्या केली होती. या सर्व हल्ल्यांची पद्धत सारखीच होती. शिवाय त्यांनी आपण असे हल्ले करणार आहोत, अशी जाहीर धमकीही दिली होती. एनएससीएनच्या अन्य गटांनी सरकारशी केलेला युद्धबंदी करार या गटाला अमान्य होता. तेव्हा ते असा आततायीपणा करणार यात शंकाच नव्हती. नागालँड, मणिपूर, अरूणाचलमध्ये ऑपरेशन हिफाजत सुरूच होते. तशात एनएससीएनच्या खापलांग गटाशी अन्य बंडखोर गटांना झुंजविण्याची योजना केंद्रीय गृहमंत्रालयाने आखली होती. पण त्यापूर्वीच या गटाने अगदी जाहीर आव्हान देऊन हा भीषण हल्ला केला. गृह आणि संरक्षण मंत्रालयासाठी हा मोठाच धक्का होता.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी तातडीने संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि लष्करप्रमुख जन. दलबिरसिंग सुहाग यांची बैठक बोलावली. नागा बंडखोरांना आता कायमचा धडा शिकवण्याची वेळ होती. भारतात कारवाया करायच्या आणि म्यानमारच्या जंगलात जाऊन लपायचे ही त्यांची खोड आता मोडायलाच हवी होती. शिवाय नागा बंडखोर आणखी हल्ले करणार असल्याचे संदेशही लष्कराने टिपले होते. (मिलिट्री ऑपरेशन्सचे अतिरिक्त महासंचालक मेजर जन. रणबीरसिंह यांनीच ही माहिती दिली आहे.) तेव्हा आता वेळ न दवडता बंडखोरांच्या तळांवर हल्ला चढवणे आवश्यक झाले होते. पण त्यासाठी म्यानमारमध्ये घुसावे लागले असते.
अर्थात त्यात नवे काही नव्हते. यापूर्वीही भारतीय लष्कराने आणि गुप्तचरांनी अन्य देशात - अगदी पाकिस्तानातसुद्धा - घुसून अशा कारवाया केल्या होत्या. लष्कर-ए-तय्यबाने २०००च्या फेब्रुवारीत दोडा आणि राजौरी जिल्ह्यात हिंदुंचे हत्याकांड केले होते. त्याच महिन्याच्या २४ तारखेला पाकव्याप्त काश्मिरमधील लांजोटे या गावातील मुस्लिमांचे अगदी तसेच हत्याकांड झाले. तेथे ९० वर्षांच्या एका वृद्धापासून दोन वर्षांच्या बालकापर्यंत काही जणांचे हातपाय तोडण्यात आले होते. मुंडकी उडविण्यात आली होती. हे हत्याकांड कोणी केले ते अखेरपर्यंत गोपनीयच राहील. पण ज्यांनी ते केले त्यांनी जाताना त्या गावात एक भारतीय बनावटीचे घड्याळ आणि त्याखाली एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात लिहिले होते : अपना खून देख के कैसा लगता है? हे हत्याकांड भारतीय लष्कराच्या विशेष दलाने केले म्हणून आजही पाकिस्तान ओरडत आहे.
राजीव गांधी यांच्या काळात तर रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेने काउंटर इंटेलिजन्स टीम – एक्स नावाचे पथकच तयार केले होते. खलिस्तानवाद्यांच्या हल्ल्यांचा सूड ते पथक पाकिस्तानात जाऊन घेत असे. रॉचे अधिकारी बी. रमण यांनीच हे लिहून ठेवले आहे.
आणि म्यानमारशी तर आपला करारच होता. त्यानुसार नरसिंह राव सरकारच्या काळात एप्रिल-मे १९९५ मध्ये म्यानमारमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत ३८ बंडखोरांना कंठस्नान घालण्यात आले होते. तर ११८ जणांना अटक करण्यात आली होती. ऑपरेशन गोल्डन बर्ड म्हणून ती मोहिम ओळखली जाते.
आता पुन्हा तशीच मोहिम हाती घ्यावी असा सूर नॉर्थ ब्लॉकमधील त्या बैठकीत उमटू लागला होता. उद्याच म्हणजे शुक्रवारीच हल्ला करावा असा काहींचा आग्रह होता. परंतु तसे शक्य नाही हे अजित डोवाल आणि जन. दलबीरसिंग यांना माहित होते. अखेर सोमवारचा दिवस नक्की करण्यात आला. लष्कराच्या स्पेथल फोर्सेसचे कमांडोच ही कारवाई करणार हे स्पष्टच होते. कोणी तरी म्हणाले त्यात सुखोई आणि मिग-२६ लढाऊ विमानांचाही वापर करा. पण हवाई हल्ल्यात निरपराधांचे प्राण जाण्याचा धोका असतो. तेव्हा हवाई दलाची मदत कमांडोंना नेण्या-आणण्यासाठीच घ्यायची असे ठरले. 

शुक्रवार, ५ जून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौ-यास आज सुरुवात होणार होती. चित्रवाणी वाहिन्यांवर त्याचा उत्सव साजरा केला जात असताना इकडे हल्ल्याच्या योजनेची आखणी सुरू झाली होती. मणिपूर हल्ल्याचा बदला घेण्याची लष्कराची इच्छा असल्याचे पर्रिकर यांनी सकाळीच नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातले होते. 
लष्कर प्रमुख दलबीरसिंग मंगळवारी गोरखा रेजिमेन्टच्या एका खास समारंभासाठी ब्रिटनला जाणार होते. परंतु त्यांनी आपला दौरा पुढे ढकलला. त्यांचे सगळे लक्ष आता मणिपूर आणि म्यानमारकडे लागले होते. अजित डोवाल हेही बांगलादेशला जाणार होते. त्यांनीही दौरा रद्द केला. दोघे मिळून मणिपूरला गेले.   
या हल्ल्याची कल्पना म्यानमारला देणे आवश्यक होते. ती जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाची होती. आँग सान सू ची यांना नेहरू शांतता पुरस्कार दिल्यापासून म्यानमारचे लष्करशहा भारतावर नाराज होते. परंतु मनमोहनसिंग यांच्या काळातच त्यांची नाराजी दूर करण्यात परराष्ट्र खात्याला यश आले होते. एकीकडे सू ची यांना पाठिंबा आणि दुसरीकडे लष्करशहांना मदत अशी तारेवरची कसरत या खात्याचे अधिकारी लीलया करीत होते.
म्यानमारी लष्करशहा बंडखोरांच्या बाबतीत भारताला साह्य करीत असतात याचे एक कारण अर्थातच म्यानमारला भारताकडून केल्या जाणा-या शस्त्रपुरवठ्यातही आहे. त्यामुळेच गेल्या ऑगस्टमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्यानमार दौ-यावर गेल्या असताना म्यानमारने हे सहकार्य कायम ठेवण्याची ग्वाही दिली होती. आता ती प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली होती.
अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या योजनेला अंतिम मंजुरी मिळाली नव्हती. सर्वांनाच तिची प्रतीक्षा होती.
मात्र एका वृत्तानुसार पंतप्रधानांनी बांगलादेशला जाण्यापूर्वी संरक्षणविषयक कॅबिनेट समितीची बैठक घेऊन तशी परवानगी दिली होती.


शनिवार, ६ जून

आतापर्यंत बंडखोरांच्या दोन ठिकाणांवर हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील एक तळ होता ओंझिया येथे आणि दुसरे दोन, एकमेकांना खेटूनच असलेले तळ होते पोन्यो येथे. या तळांवरच्या बंडखोरांचा ४ जूनच्या मणिपूर हल्ल्याशी संबंध नव्हता, असे लष्करी गुप्तचरांचे म्हणणे आहे. एनएससीएनचा मुख्य तळ म्यानमारच्या सागाईँग जिल्ह्यातील तागा परिसरात आहे. म्यानमारमध्ये आत खोलवर तामू येथे एक छावणी आहे. ४ जूनच्या हल्लेखोरांनी तेथे आश्रय घेतला असावा असा गुप्तचरांचा संशय आहे. पण तरीही ही दोन ठिकाणे निवडण्यात आली याची कारणे दोन होती. एक म्हणजे हाती पुरेसा वेळ नव्हता. आणि दुसरे - सीमेपलीकडेही तुम्ही सुरक्षित नाही आहात हा संदेश त्यांना द्यायचा होता.
म्यानमारमधील कारवाईची तयारी सुरूच होती. ४ जूनच्या हल्ल्यानंतर लागलीच काही गुप्तचरांना बंडखोरांच्या तळांची माहिती काढण्यासाठी पाठविण्यात आले होते. ते परतले होते. उपग्रहांच्या मदतीनेही काही माहिती जमा केली जात होती. या सर्व माहितीचे विश्लेषण करून हल्ल्याची आखणी करण्यात येत होती.
लष्कराच्या २१ स्पेशल फोर्सेस (पॅरा) आणि आसाम रायफल्सच्या २७ आणि १० सेक्टरमधील तुकड्या यांना या मोहिमेसाठी निवडण्यात आले. एका बातमीनुसार, स्पेशल फोर्सेसच्या कमांडोंनी बंडखोरांच्या तळाची प्रतिकृती उभारून सराव सुरू केला होता.
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी या कारवाईनंतरच्या क्रिया-प्रतिक्रियांचा अंदाज घेत होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे स्वतः एक गुप्तचर होते. हेरगिरीच्या अनेक धाडसी कारवाया त्यांच्या नावावर जमा आहेत. ते सर्व परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून होते. हल्ल्याच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर होती.  


रविवार, ७ जून

रविवारी रात्री मोदी बांगलादेशाच्या यशस्वी दौ-यावरून परतले. डोवल, राजनाथसिंह आदींनी त्यांना या योजनेची पुन्हा तपशीलवार माहिती दिली. सर्व बाजूंचा विचार करून त्यांनी हल्ल्याच्या योजनेला अंतिम परवानगी दिली. त्याबरोबर सर्व चक्रे एकाचवेळी फिरू लागली.
डी डे ठरला – मंगळवार. वेळ – पहाटे ३.
त्या दिवशी हल्ल्याच्या अगदी काही वेळ आधी म्यानमारच्या लष्करी अधिका-यांना त्याची कल्पना द्यावी अशी सूचना संबंधित भारतीय लष्करी अधिका-यास देण्यात आली. म्यानमारमधील राजदूत गौतम मुखोपाध्याय आणि संरक्षण अटॅशे कर्नल गौरव शर्मा यांना या हल्ल्याची कल्पना देण्यात आली. मात्र मंगळवारी कार्यालये उघडली की मगच – म्हणजे हल्ला अगदी उरकून गेल्यावर - म्यानमारच्या परराष्ट्र खात्याला ही माहिती द्या असे मुखोपाध्याय यांना सांगण्यात आले.

सोमवार-मंगळवार, ८-९ जून

२१ पॅराचे कमांडो एका धाडसी मोहिमेसाठी सज्ज झाले होते. त्यांच्याकडे लहान शस्त्रे, रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेड्स, अंधारातही ज्याच्या साह्याने पाहता येऊ शकते ते थर्मल इमेजर्स आणि स्फोटके असा पुरेसा शस्त्रास्त्रसाठा होता. त्यांच्या साह्याला मात्र पीछाडीवर लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान होते. वायुदलाची एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टरही तयार ठेवण्यात आली होती. पहाटे दीड-दोनच्या सुमारास लष्कराच्या ध्रुव हेलिकॉप्टरने त्यांना भारत-म्यानमार सीमेवर, मात्र भारताच्या भूमीत उतरविण्यात आले. तेथे ते दोन गटांत विभागले. एक गट ओंझियोच्या तळाकडे गेला. दुसरा पोन्योकडे. हे दोन्ही तळ सीमेपासून जवळजवळ ११ किमी अंतरावर आहेत.
या तळांनजीक ते पोचले तेव्हा मंगळवार पहाटेचे तीन वाजले होते. दोन्ही तळांवर शांतता होती. योग्य अंतरावर गेल्यानंतर कमांडोंनी प्रथम आजुबाजूच्या परिसराची, रस्त्यांची नीट पाहणी केली. भुसुरुंगांचा, छुप्या हल्ल्याचा धोका होता. आता ते रांगत रांगत तळाकडे सरकू लागले आणि...
पुढच्या ४५ मिनिटांत काय काय घडले ते कोणालाच माहित नाही. माहित आहे ते एवढेच, की त्या ४५ मिनिटांत दोन्ही तळांची राखरांगोळी झाली होती. अर्धवट झोपेत असलेल्या बंडखोरांना भारतीय जवानांनी कायमचे झोपविले होते. अत्यंत धाडसी अशी मोहिम त्या जाँबाज सैनिकांनी फत्ते केली होती...

या हल्ल्यात किती बंडखोर मारले गेले. आकडे वेगवेगळे आहेत. अगदी १००पासून ३८ पर्यंत. लष्कराने मात्र अद्याप अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. मात्र लष्करी सूत्रांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात किमान २० बंडखोर ठार झाले. गृहमंत्रालय मात्र ५०च्या खाली येण्यास तयार नाही.
इंडियन एक्स्प्रेसने अधिकृत सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लष्कर आणि गुप्तचर यांनी या हल्ल्यानंतरची जी माहिती गोळा केली आहे त्यानुसार आतापर्यंत केवळ सात मृतदेह हाती लागले आहेत. आणि बंडखोरांचे जे वायरलेस संभाषण टिपण्यात आले आहे त्यानुसार १२ हून कमी बंडखोर जखमी झाले आहेत. अद्याप सरकार वा लष्कराने या वृत्ताचा इन्कार केलेला नाही.
याच वृत्तानुसार, एनएससीएन-के चे या हल्ल्यात फार नुकसान झाले नाही. पोन्यो तळावर या संघटनेचा कथित लेफ्ट. जन. निकी सुमी होता. पण तो त्याच्या ४० साथीदारांसह पळून जाण्यात यशस्वी झाला आणि ओझियो तळावरील बंडखोरांचा तर एनएससीएन-केशी संबंधच नव्हता.

मग या हल्ल्याचे महत्त्व काय?
ते येणा-या दिवसांत – ईशान्य भारतातील परिस्थितीतील बदलांतून, म्यानमारच्या प्रतिक्रियांतून, मोदी यांनी नागा शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेच्या फलितातून - समजेल.
एक मात्र खरे, की या हल्ल्यामुळे भारत आक्रमक होऊ शकतो हे भारतीयांना समजले. पूर्वी अशा घटनांचा गाजावाजा होत नसे. त्यामुळे असंख्य राष्ट्रप्रेमी य़ा सुखावह व थरारक भावनेपासून वंचित राहात असत.


(स्त्रोत – इंडियन एक्स्प्रेसमधील ४ जून ते १३ जून २०१५ या कालावधीतील संबंधित बातम्या.)

Read more...

No comments: