चला, संशयात्मा होऊया..

‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सातत्याने सांगत राहिलात की हळुहळू लोकांना ती खरी वाटू लागते. लोकांचा त्यावर विश्वास बसतो.’ 
हिटलरचा प्रोपागंडा मंत्री जोसेफ गोबेल्स याचे हे विधान. अनेक ग्रंथांतूनही ते त्याच्या नावावर उद्धृत करण्यात आले आहे. या विधानाची मौज अशी की त्याला हेच विधान तंतोतंत लागू पडते! म्हणजे – गोबेल्सच्या नावावर खपविण्यात येणारे हे विधान त्याचे नाही. मिशिगनमधल्या केविन कॉलेजचे प्रो. रँडल बेटवर्क हे नाझी प्रोपागंडाचे अभ्यासक. त्या विषयावरचे अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या संशोधनाचा हा निष्कर्ष.

अशा अनेक गोष्टी सांगता येतील. उदाहरणार्थ न्यूटन आणि सफरचंदाची गोष्ट.
सर आयझॅक न्यूटन हे बागेत बसले असताना त्यांच्या डोक्यावर सफरचंद पडले. ते पाहून त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला ही आपण लहानपणापासून ऐकलेली कथा. ती खोटी असेल असा विचारही आपल्याला कधी शिवलेला नसतो. पण स्टीफन हॉकिंग सांगतात की ती कथा ‘नक्कीच संशयास्पद’ आहे. न्यूटन स्वतः एवढेच म्हणाले होते, की ते असे विचारमग्न अवस्थेत बसले असता अचानक त्यांच्या मनात गुरुत्वाकर्षणाची कल्पना आली. खाली पडणारे सफरचंद त्याला निमित्तमात्र ठरले. (ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम, स्टीफन हॉकिंग) म्हणजे ही साधी दंतकथाच. पुन्हा पुन्हा सांगितल्याने प्रत्यक्षात घडलेली वाटू लागलेली.

न्यूटनचे हेच सफरचंद पुढे अपलचे बोधचिन्ह बनले. त्याचीही एक कथाच आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार ते सफरचंद न्यूटनचे नाही तर अलन ट्युरिंग यांचे आहे. ट्युरिंग हे संगणकाचे जनक. त्यांनी म्हणे सायनाईडचे इंजेक्शन दिलेल्या सफरचंदाचा तुकडा खाऊन आत्महत्या केली. त्यामुळे अपलच्या बोधचिन्हात ते एक घास घेतलेले सफरचंद आले. पण मुळात तसे नाही. अपलच्या मूळ बोधचिन्हात झाडाखाली बसलेल्या न्यूटनचे चित्र होते. थोडे गुगल केले की ते दिसते.

काही काही गोष्टींचा अर्थ मात्र जाणीवपूर्वक समजून घ्यावाच लागतो. अन्यथा चांगलेच घोटाळे होतात. आणि त्याहून मोठा घोटाळा म्हणजे त्या घोटाळ्यांची आपल्याला जाणीवही नसते. उदाहरणार्थ आपण लहानपणी शिकलेले इंग्रजी बालगीत. जॅक अँड जिल, वेंट अप द हिल... किती निरागस बडबडगीत वाटते हे. पण हे गीत म्हणजे आपण महाविद्यालयात असताना एनसीसी कॅम्प वा सहलींमध्ये ज्या गाण्यांचे टाळ्या पीटत समूहगान करतो तशापैकी गाणे आहे. द्वयर्थी, अश्लील अर्थ असलेले. अर्थात आपल्याला ते माहीत असण्याचे कारणच नाही. कारण परंपरेने आपणास ते बडबडगीत आहे असे सांगितले आहे. त्याच्या इतिहासात गेले, तर सांगण्यात येते की त्याचा संबंध फ्रान्सचा राजा सोळावा लुई आणि त्याची पत्नी मेरी अँतॉनेत यांच्याशी आहे. लुई आणि मेरी यांचा शिरच्छेद करण्यात आला. जॅक फेल डाऊन अँड ब्रोक हीज क्राऊन अँड जिल केम टंबलिंह आफ्टर! या गीताबाबत आणखीही काही उगमकथा सांगितल्या जातात. परंतु ख्रिस रॉबर्ट्स या ब्रिटिश इतिहासतज्ञाच्या मते हे लोकगीत आहे आणि ते तरूणाईला विवाहपूर्व छुप्या लैंगिक संबंधांपासून परावृत्त करण्यासाठी रचले गेले आहे. अशा ब-याच बडबडगीतांमध्ये लैंगिक, धार्मिक अर्थ असल्याचे मत त्यांनी ‘हेवी वर्ड्स थ्रोन लाइटली’ या पुस्तकात मांडले आहे.

वर ज्या मेरी अँतोनेतचा उल्लेख आला, ती कुख्यातीस पावली ती एका विधानामुळे. दुष्काळात अन्नान्नदशा झालेल्या आपल्या प्रजेबद्दल ती म्हणाली होती, की पाव मिळत नसेल तर त्यांनी केक खावा. पण तिच्या चरित्रकार अँतोनिया फ्रेझर सांगतात, की हे विधान मुळात मेरी अँतोनेतचे नाहीच. तिच्याआधी १०० वर्षांपूर्वी होन गेलेल्या मेरी-थेरेस तसे म्हणाली होती. ती चौदाव्या लुईची पत्नी. रूसोच्या कन्फेशन्स या ग्रंथात हे उद्गार येतात ते एका राजकन्येच्या तोंडी. त्यांनी त्यात कुठेही मेरी अँतोनेतचे नाव घेतलेले नाही. पण पुढे लोकांनी राजकन्या म्हणजे तीच असे गृहीत धरले आणि ते तिला चिकटले ते कायमचे. एक असत्य वारंवार सांगितले गेले आणि तेच खरे होऊन बसले.

खोट्याचे खरे असेच केले जात असते. मिथके अशीच तयार होत असतात. हे आपण एकदा नीट समजून घेतले पाहिजे. एक सुप्रसिद्ध इंग्रजी वाक्य आहे. तुम्ही जे वाचता त्या सगळ्यावरच विश्वास ठेऊ नका. आपल्याकडे नेमका त्याच्या उलटा परिपाठ आहे. आपले धर्मग्रंथच सांगतात की संशयात्मे नाश पावतात. त्यामुळे बाबा वाक्यम् प्रमाणम् हे वचन आपणांस शीरोधार्य असते. त्यातून मग ऐतिहासिक असत्येही आपण डोक्यावर घेऊन मिरवत राहतो. त्याची किती उदाहरणे सांगायची? सध्याच्या गाजत असलेल्या बाजीराव-मस्तानी वादाबद्दल या सदरातील दोन लेखांमध्ये लिहिलेच आहे. त्या मस्तानीला आपण सरळ वारांगना ठरवून टाकले. असेच पाप आपण संभाजीराजांबाबत केलेले आहे. मल्हार रामरावाच्या बखरीचा आधार घेऊन आपण संभाजींच्या चारित्र्याविषयीच्या दंतकथांवर नाटक-सिनेमे काढले. या मल्हार रामरावाचा खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस असतो आणि त्याला महाराजांनी शिक्षा केलेली असते ही कडी मात्र येथे आपण दुर्लक्षित करतो. वारंवार सांगितलेल्य असत्यावर विश्वास ठेवतो. जे आपण इतिहासाबाबत करतो तेच वर्तमानाबाबतही. अगदी कालपरवापर्यंत अनेकांच्या तोंडून एक वाक्य यायचे – पेपरात छापून आलंय म्हणजे ते खरंच असणार! छापील शब्दांवर आपला प्रचंड विश्वास असतो. तसाच तो ऐकीव शब्दांवरही असतो. वृत्तवाहिन्यांवरून दाखवतात म्हणजे ते खरेच असणार, असे आपण मानतो. व्हाट्सअपवरून येणारे संदेश खरे मानून चालतो आणि ते प्रसृतही करतो. हे सगळेच खोटे असते असा याचा अर्थ नाही. येथे मुद्दा फक्त आपल्यापर्यंत येणा-या माहितीवर कोणताही विचार न करता विश्वास ठेवण्याचा आहे.

हे मान्यच आहे, की आपल्यावर आज चारी दिशांनी माहिती आदळते आहे. रोजची वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरचित्रवाणी, नभोवाणी, समाजमाध्यमे, संकेतस्थळे अशा विविध माध्यमांतून माहितीचा मारा होत आहे आणि त्यापुढे आपण हतबल आहोत. येणा-या माहितीवर विचार करायचा, तिचे विश्लेषण करायचे, शहानिशा करायची यासाठी लागणारा अवकाश आपल्याकडे कोणाकडेच नाही. अशा वेळी आपण फक्त माहितीशरण होण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. पण असा समाज फार काळ स्वतंत्र राहू शकत नाही. किंबहुना त्या परतंत्र समाजाची झलक आजच आपण आजुबाजूला पाहात आहोत. समाजाचा बराच मोठा भाग आज आपल्या डोक्याने विचारच करताना दिसत नाही. माध्यमे, त्यातही खास करून समाजमाध्यमे त्याच्या विचारांची दिशा ठरवत आहेत आणि खेदाची बाब अशी की त्याला त्याची जाणीवही नसते. ट्विटरवर वा फेसबुकवर एखाद्या घटनेबाबत मत नोंदविताना त्याला वाटते हे आपल्या स्वतंत्र प्रज्ञेतून आलेले विचार. पण तो भ्रम असतो.

सन २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांनी आपल्याला ‘प्रोपागंडा’ आणि ‘पर्सेप्शन’ या दोन संकल्पनांचा अर्थ नीटच समजावून सांगितला आहे. मराठीला मुळात प्रोपागंडा ही संकल्पनाच ज्ञात नाही. प्रचार या शब्दातून त्याचा पुरेसा अर्थ स्पष्ट होत नाही. ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार त्याचा अर्थ आहे – राजकीय कार्य वा मत यांचा प्रचार करण्यासाठीची, खासकरून पक्षपाती वा भ्रामक स्वरुपाची माहिती. जनतेला भुलविण्यासाठी, आपल्या बाजूने वळविण्यासाठीचे हे प्रभावी शास्त्र आहे. त्याच्या इतिहासातील सर्वोत्तम प्रयोगाचे श्रेय द्यावे लागेल ते हिटलरला. त्याने हे शास्त्र अशा काही उंचीवर नेले की त्याच्या वापराने एक राष्ट्रच्या राष्ट्र त्याच्या विचारसरणीचे गुलाम बनले. त्याचा प्रयोग आज ठिकठिकाणी होताना दिसतो. त्यातून नवी मिथके निर्माण केली जातात. जुना इतिहास पुसून नवा इतिहास सांगितला जातो. समाजातील विचारहवा त्यातून बदलली जाते. आज आपण त्या वळणावर आलो आहोत. या प्रोपागंडाच्या वहनाचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे ते समाजमाध्यम. हिटलरने नाझी कार्यकर्त्यांची एक फौज बनविली होती. तिचे नाव स्टॉर्मट्रूपर्स. असे विविधरंगी जल्पकांचे – ट्रोल्सचे स्ट्रॉर्मट्रूपर्स आज समाजमाध्यमांतून दिसत आहेत. माध्यमतज्ञ, व्यवस्थापनतज्ञ मंडळींचे गट त्यांचे व्यवस्थापन करीत असतात, त्यांना दिशा देत असतात. हे गट विचारहवा बनवत असतात. ट्विटर आणि फेसबुकवरचे ट्रेंड तयार करीत असतात. व्हाट्सअपवर येणा-या राजकीय विनोदांचा उगम नक्की कोठून होतो, एखादी घटना घडताच त्यावर एवढ्या तातडीने विनोदी प्रतिक्रिया देण्याइतका, त्यावर फोटोशॉप प्रतिमा बनविण्याएवढा वेळ कुणा सामान्याकडे असतो याचा विचार केला, तरी लक्षात येईल की ते सारे अत्यंत योजनाबद्ध असते. एखाद्या जाहिरातीच्या मोहिमेप्रमाणे ते चाललेले असते. त्यामागे अत्यंत कुशल मेंदू बसलेले असतात. यातून आपल्यासमोर जे चित्र येते ते सत्यच असते असे कोणत्या विश्वासाने म्हणता येईल? मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत झोपल्याचे चित्र समाजमाध्यमांतून फिरत होते. मोदींचे डोळे मिटलेले होते. ते झोपले आहेत असे चित्राखाली लिहिले होते. म्हटल्यावर कोणीही म्हणाले असते की मोदी झोपलेच होते. परंतु वस्तुस्थिती अशी होती, की मोदींनी केवळ काही क्षणासाठी डोळे मिटले होते. नेमक्या त्या क्षणी ते छायाचित्र घेण्यात आले होते. याहून भयानक म्हणजे फोटोशॉप केलेली छायाचित्रे. अत्यंत विकृत मानसिकतेतून परंतु राजकीय हेतूंसाठी तयार केलेल्या त्या छायाचित्रांवर समाजातील मोठा वर्ग विश्वास ठेवताना दिसत आहे. निव्वळ घोषणाबाजीवर फिदा होणारा एक मोठा अविचारी वर्ग या प्रोपागंडातून तयार होत आहे. हे सगळेच भयंकर आहे. प्रश्न असा आहे, की याचा मुकाबला कसा करायचा?

संशयात्मा होणे हा त्यावरचा जालीम उपाय आहे. साधे कापड खरेदी करतानाही आपण त्याचा रंग, पोत नीट तपासून घेतो. विचार आणि मतांच्या बाबतीत ते करायला नको? प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू, विभिन्न कंगोरे असतात ते आपण पाहणार असू, तरच प्रोपागंडापासून वाचणे शक्य आहे. गेले वर्षभर चाललेल्या या पाक्षिक सदराचा हेतू नेमका तोच होता. नाण्याला दुसरीही बाजू असते हे सांगणे. परंपरेने आपल्या समोर आलेल्या इतिहासातील सत्ये कुठे भलतीकडेच असतात हे दाखविणे. या सदरातून दिलेली माहिती म्हणजे वैश्विक सत्य आहे असा दावा मुळीच नव्हता. इतिहासाबाबत तर तसा दावा कोणालाही करता येणार नाही. हा सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न होता. तो असाच सुरू ठेवू या... हे सदर थांबले तरी...

No comments: