एक होता आनंदमार्ग...

ही फक्त माहिती आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वीची. आनंदमार्ग नावाच्या एका संघटनेची. या माहितीचा आजच्या कोणत्याही संघटनेशी ताळमेळ जुळला तर कृपया तो योगायोग मानू नये. कारण अशा सर्व संघटना, त्यांचा उदय, विकास, त्यांची कार्यपद्धती स्थूलमानाने सारखीच असते. फरक फक्त तपशीलात असतो. आशय तोच असतो. तो आज समजून घ्यायचा, कारण त्यामुळे या संघटनांचे खरे स्वरूप समजणे सोपे जाईल.


आनंदमार्ग या संघटनेला आपण पंथही म्हणू शकतो. हिंदू धर्मात असे अनेक पंथ आहेत. अशा अनेक पंथांनी आणि जीवन मार्गांनी मिळून हिंदू धर्म बनलेला आहे. या पंथांचे म्हणणे असते की आपण सांगतो, तोच खरा धर्म आणि दाखवतो तोच खरा मोक्षाचा मार्ग. त्यातील काही पंथ वैदिक, काही अवैदिक. काही अहिंसक, काही हिंसेवर श्रद्धा ठेवणारे. म्हणजे परमेश्वरी अवतारांनी नाही का विनाशाय दुष्कृताम् हाती शस्त्र घेतले होते. तशीच त्यांची हिंसा. त्यांना जे दुष्ट वाटतात त्यांचा संहार करणारी. त्यात काही चूक आहे असे न मानणारी. आनंदमार्ग त्यातलाच. तो मुळचा बिहारातला. त्याचे संस्थापक – प्रभातरंजन सरकार.

प्रभातरंजन सरकार हे सरकारी नोकर. जमालपूर रेल्वे वर्कशॉपमध्ये ते लेखापाल म्हणून काम करीत असत. त्यांचा ओढा पहिल्यापासून धर्माकडे, त्यातही तंत्रमार्गाकडे. ९ जानेवारी १९५५ रोजी त्यांनी एक सामाजिक-सांस्कृतिक संघटना स्थापन केली. आपले नाव बदलले. आता ते श्री श्री आनंदमूर्ती झाले. त्यांनी दाखविलेला मार्ग तो आनंदमार्ग. बिहारमध्ये त्यांनी आपला आश्रम स्थापन केला. पुढच्य चार-पाच वर्षांत या आश्रमात ब-यापैकी अनुयायांचा राबता सुरू झाला. आनंद मार्ग बिहार आणि लगत पश्चिम बंगालमध्ये विस्तारत गेला.

तो समजून घेण्यापूर्वी हिंदुंच्या अध्यात्मविचारातील प्रवाह समजून घेणे आवश्यक आहे. ते आहेत आगम आणि निगम. निगमात वेद, पुराणे इतिहास, उपनिषदे हे साहित्य येते. आगम हा तंत्रविचार आहे. या तंत्राच्या दोन शाखा. वामाचार आणि दक्षिणाचार. दक्षिणाचारात केवळ उपासनेचे अवडंबर असते. वामाचारात वामा म्हणजे स्त्री आवश्यक असते. त्यात स्त्रीसंभोगाला विशेष महत्त्व असते. या तंत्रवाद्याचा प्रवाह हिंदुंमध्ये प्रामुख्याने शैव आणि शाक्त म्हणून वावरतो. कालमुख, पाशुपत, कापालिक, लकुलिश, गाणपत्य, शाक्त, भैरवनाथ हे तांत्रिकांचे संप्रदाय. काश्मीर, आसाम आणि दक्षिणेत श्रीशैल ही शैव तांत्रिकांची प्रमुख केंद्रे होती. महाराष्ट्राशीही या तांत्रिकांचे जवळचे नाते. योगिनी कौलमत हा या तांत्रिक संप्रदायातील एक प्रख्यात संप्रदाय आहे. तो त्र्यंबकमठिकेशी निगडीत आहे. ही त्र्यंबकमठिका म्हणजे महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर. येथून द्वैती, अद्वैती आणि द्वैताद्वैती शैव तांत्रिकांचे संप्रदाय उदय पावले. शैव परंपरेतील सर्वांना एकमुखाने वंदनीय असणारा सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ म्हणजे अभिनव गुप्त. तो दहाव्या शतकात काश्मिरात होऊन गेला. त्याने कामाचा अध्यात्मविचार मांडला. तो म्हणतो – जगात ज्याला आपण अनैतिक वा बिभत्स म्हणतो त्याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही. कोणतीही वस्तू अथवा क्रिया शुद्ध-अशुद्ध, नैतिक-अनैतिक होत असेल, तर ती हेतूमुळे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे यामुळे आनंदमार्गाची पुढील वाटचाल समजणे सोपे होईल. कारण या मार्गाचा पाया तंत्रयोग हा आहे. त्यात साधना, ललिता मार्मिक हा नृत्यप्रकार आणि कीर्तन म्हणजे मंत्रोपासना याला महत्त्व आहे.

एकीकडे तंत्रयोग, सहजयोग यांसारखे सर्वसामान्यांना आकर्षित करणारे प्रकार आणि दुसरीकडे अध्यात्माला दिलेली आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांची डूब, यामुळे हा मार्ग स्थानिक पातळीवर लोकप्रिय झालाच, पण त्याकडे सुखी माणसाच्या सद-याच्या शोधातील परदेशी मंडळीही आकर्षित झाली. पुढे काही वर्षांनी रजनिशांनीही याच तंत्राचा वापर करून आपले अध्यात्मिक साम्राज्य उभारले. त्यातील संभोगातून समाधी हे एक गाजलेले प्रकरण. त्याचा उगम या तांत्रिक परंपरेत होता.

आनंदमार्ग आणि अलीकडच्या काही संघटना यांच्यात एक साम्य आढळते. ते म्हणजे अध्यात्माला वैज्ञानिक संकल्पनांत रंगवून काढण्याचे. वैचारिक गडबडगुंडा निर्माण करून मन, आत्मा, पुनर्जन्म, वैश्विक चेतना अशा गोष्टी आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाल्या आहेत असे सांगायचे. त्यातील वैज्ञानिक संज्ञांच्या चलाख वापराने सर्वसामान्य भारावून जातात. काही संघटना म्हणे प्राचीन अध्यात्मिक संकल्पना हल्ली प्रयोगाने सिद्ध करून दाखवतात. त्यासाठी त्यांची डॉक्टरमंडळी वैज्ञानिक उपकरणे वापरतात. आपणांस हवे ते निष्कर्ष काढतात. लोकांना मूर्ख बनवितात. ही क्लृप्ती अनेकांनी केली आहे. करीत आहेत. आनंदमार्ग असे करणारी पहिली संघटना नाही. अखेरची तर नाहीच नाही. परंतु अशा गोष्टींमुळे आनंदमार्गच्या साधकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होती.

आनंदमार्ग, त्यांचे आश्रम, त्यांचे साधक यांच्याभोवती गोपनीयतेचे एक घट्ट कवच असे. संस्थेतील कोणत्याही गोष्टीबाबत कुठेही वाच्यता करायची नाही आणि संस्थेवर, गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवायची हा त्यांचा जीवनमार्ग होता. त्यामुळे त्यांच्या आश्रमांमध्ये नेमके काय चालते हे बाहेरच्या कोणालाही कळणे कठीणच. इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तचर संस्थेचे माजी संचालक टी. व्ही. राजेश्वर यांनी अलीकडेच त्यावर प्रकाश टाकला आहे. इंडिया – द क्रुशियल इअर्स (हार्पर कॉलिन्स, २०१५) या काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकात यावर अख्खे एक प्रकरणच आहे. त्यात ते सांगतात – या संप्रदायात काळ्या जादूचे प्रयोग केले जात. त्यात मानवी कवट्यांची पूजा, तलवारी आणि कवट्या घेऊन नृत्य करणे, रात्रीच्या वेळी स्मशानात जाऊन पूजा करणे असे प्रकार चालत. त्यांच्या आश्रमांत तरूण साधक-साधिकांचे लैंगिक शोषण होत असल्याचीही चर्चा होती. अशा एका प्रकरणात तर खुद्द त्यांच्या गुरुंवर लौंगिक शौषणाचे आरोप झाले होते. तेही कोणी केले होते, तर आनंदमार्ग परिवाराच्या पूजनीय मार्गमाता आणि आनंदमूर्ती यांच्या पत्नी उमा सरकार यांनी. ही ऑक्टोबर १९७१ची गोष्ट. (आजच्या काळातील काही घटना आणि व्यक्तिंशी किती तरी मिळती-जुळती!)

त्यानंतर दोनच महिन्यांनी आनंदमूर्तींना चार साधकांसह अटक झाली. कारण – सहा साधकांची हत्या. आनंदमार्गात गोपनीयतेला भलते महत्त्व. त्यामुळे एकदा आत आलेल्यांनी बाहेर जाणे हा गुन्हाच. तो त्या सहा जणांनी केला होता. त्या गुरुद्रोहाची शिक्षा त्यांना मिळाली. त्यांना ठार मारण्यात आले. एकंदरच हिंसाचार आणि आनंदमार्ग यांचे जवळचे नाते होते. राजेश्वर सांगतात – १९७० ते ७४ या काळात बिहारच्या काही जिल्ह्यांतून हत्येच्या अनेक घटना समोर आल्या. पण त्यांचा उलगडा होऊ शकला नाही. मात्र या हत्यांमागे काही आनंदमार्गींचा हात असल्याचे दिसत होते. बहुतांशी आपल्या गुरूंच्या कारवायांबाबत प्रश्न उपस्थित करणारे, आश्रम सोडून जाणारे अशा साधकांचा या बळींमध्ये समावेश होता. (आसाराम बलात्कार प्रकरणातील साक्षीदार असलेल्या काही आसाराम भक्तांची आठवण हमखास यावी असे हे स्थळ आहे.) या खटल्यातून पुढे पुरेशा पुराव्याअभावी आनंदमूर्तींची सुटका झाली. राजेश्वर यांचे निरिक्षण या संदर्भात पाहण्यासारखे आहे. ते सांगतात – या हत्याप्रकरणांच्या चौकशीत अडचणी येत होत्या. कारण बिहारमधील अनेक पोलिस अधिकारी आनंदमूर्तींचे भक्त होते. त्यात काही उच्चपदस्थांचाही समावेश होता. एकदा तर जिल्ह्यातील हत्यारी पोलिसांच्या मुख्यालयात आनंदमूर्तींचे प्रवचन ठेवण्यात आले होते. अशा संघटना या विविध सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या मदतीनेच फोफावत असतात. (हे आजही दिसत आहे!) आनंदमार्गला राजकीय आशीर्वाद असण्याचे आणखी एक कारण होते. ते म्हणजे त्यांचा साम्यवादविरोध.

आनंदमूर्तींची स्वतःची अशी एक राजकीय-सामाजिक विचारधारा होती. काही संघटनांना भारत हे हिंदू वा मुस्लिम धर्माचे राष्ट्र व्हावेसे वाटते. आनंदमूर्तींना या राष्ट्रात त्यांचा नवमानवतावाद प्रस्थापित करायचा होता. त्यांनी १९५९ मध्ये प्राऊट नावाचा तत्त्वविचार मांडला होता. प्राऊट म्हणजे प्रोग्रेसिव्ह युटिलायझेशन थेअरी. पहिल्यापासूनच त्यांचे राज्यात सत्ताधारी असलेल्या कम्युनिस्टांशी खटके उडत होते. आजच्या काही धार्मिक संघटना काँग्रेस सरकार आमचा छळ करीत असे असे म्हणतात. आनंदमार्गी कम्युनिस्टांचे नाव घेत. प. बंगालच्या राजकीय संस्कृतीनुसार हा संघर्ष लवकरच हिंसाचारात परिवर्तित झाला. ३० एप्रिल १९८२ मधील बिजॉन सेतू हत्याकांड म्हणून ओळखली जाणारी घटना ही त्यापैकी एक. कोलकत्त्यातील त्या घटनेत एका जमावाने १७ आनंदमार्गींना भरदिवसा जाळून ठार केले. ते मुले पळविणा-या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयावरून ते हत्याकांड झाल्याचा प्रवाद आहे. परंतु त्यामागे आनंदमार्गी विरुद्ध कम्युनिस्ट हाच संघर्ष असल्याचा अनेकांचा संशय आहे.

असा हिंसाचार कम्युनिस्टांकडूनच होत होता असे नाही. ही संघटनाही दहशतवादी कारवाया करीत होती. २ जानेवारी १९७५ मध्ये तत्कालिन रेल्वेमंत्री एल एन मिश्र यांची बिहारच्या समस्तीपूर रेल्वे स्थानकात बॉम्ब फेकून हत्या करण्यात आली. ३९ वर्षांनंतर २०१४ मध्ये त्या खटल्याचा निकाल लागला. त्यात चार आनंदमार्गींना शिक्षा झाली. एव्हाना ही संघटना अन्य देशांतही पसरली होती. १९७८ मध्ये ऑस्ट्रेलियातील सीडने येथे राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीसाठी तत्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यासह ११ देशांचे प्रमुख ज्या हॉटेलात उतरले होते, त्या हॉटेलनजीक बैठकीच्या दिवशी पहाटेच्या वेळी जबरदस्त बॉम्बस्फोट झाला. ऑस्ट्रेलियातील हा पहिला दहशतवादी हल्ला मानला जातो. त्यामागे आनंदमार्गींचा हात होता. त्याप्रकरणी टीम अँडरसन आणि इव्हान पेडरिक या दोन साधकांना शिक्षाही झाली. तत्पूर्वी कॅनबेरामध्ये एक भारतीय अधिकारी आणि त्याची पत्नी यांच्यावर हल्ला झाला होता. मेलबर्नमध्ये एअर इंडियाच्या कर्मचा-याला भोसकण्यात आले होते. राजेश्वर यांच्यानुसार, आणीबाणीच्या कालखंडात सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन न्यायाधीश ए. एन. रॉय यांच्यावर झालेल्या बॉम्बहल्ल्यातही आनंदमार्गींचा समावेश होता. खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्याचाही या संघटनेचा बेत होता. त्याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली होती.

प. बंगालमधील पुरुलियात मुख्यालय असलेली ही संघटना एवढी वाढली कशी? स्थानिक भोळेभाबडे लोक अशा बाबांच्या नादी लागतात यात काही नवल नाही. त्यातील काही बाबांची साम्राज्ये उभी राहतात. त्यांचे आश्रम म्हणजे त्यांचे राज्यच असते. त्याला ते ईश्वरी राज्य मानतात हेही सर्वांना माहीत आहे. हे सर्व होते ते राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या मदतीनेच. परंतु आनंदमार्ग परदेशातही वाढली होती. भारतात ती ज्योती बसूंच्या सरकारशी लढत होती. हे बळ तिला कोठून मिळाले? त्यासाठीचा पैसा कोठून आला? राजेश्वर यांच्या आत्मकथनात त्याचा खुलासा होतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, या संघटनेला अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएकडून मदत आणि आर्थिक साह्य मिळत असल्याचे ठोस संकेत होते. भारतात आणि आशियात साम्यवादाचा प्रसार होत होता. ज्या ज्या धार्मिक संघटनांकडे भरपूर अनुयायी आहेत अशा संघटनांना मदत करून हा प्रसार रोखता येईल असे तेव्हाचे सीआयएचे मत होते. ७०च्या दशकात भारतात धार्मिक पंथांना प्रोत्साहन मिळाले त्याचे हे एक कारण सांगता येईल. पुढे जाऊन ते सांगतात, की आयबीने आनंदमार्गाच्या हिंसक कारवायांची एक फाईल बनविली आणि ती विविध देशांच्या गुप्तचर प्रमुखांना पाठविली. त्यानंतर लवकरच अनेक देशांनी आनंदमूर्ती यांना आपल्या देशात येण्यास मनाई केली. हळुहळू आनंदमार्गाचा आर्थिक स्त्रोतही आटत गेला. तशी आजही ही संघटना विविध देशांत कार्यरत आहे. पण तिचे हे जुने रूप संपलेले आहे.

धार्मिक संघटना म्हटले की तिच्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन मवाळ असतो. त्यांच्या धार्मिक पडद्याआड काही हिंसाचार सुरू असेल असा संशयही कोणास येत नाही. आनंदमार्गी आपल्या विरोधात जाणा-या साधकांचे खून करीत होते, राजकीय हिंसाचार घडवून आणत होते, दहशतवादी कारवाया करीत होते, मुलांना आपल्या आश्रमात आणून त्यांना त्यांच्या पालकांपासून तोडत होते. लोक मात्र त्यांना संशयाचा फायदा देत होते. तेही सरकार आमचा कसा छळ करते हेच सांगत होते. आनंदमार्गच्या प्रकरणातून समजून घ्यायचे तर हेच. त्यासाठी ही माहिती.

No comments: