संतांची फॅक्टरी


Populus vult decipi – ergo decipiatur.t 
(लोकांना स्वत:ला फसवून घ्यायचे असते, म्हणून ते फसले जातात. एक लॅटिन वचन.) 

कोणत्याही राष्ट्राला जगण्यासाठी उद्योगधंदे वगैरे उभारावेच लागतात. व्हॅटिकन हे जगातील सर्वात लहान राष्ट्र. तेथे असे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे बहुधा त्यांनी तेथे संतांचे कारखाने काढले आहेत. धर्म हे सार्वकालीन चलनी नाणे आहेच. त्यात हे उत्पादन. या जोरावर व्हॅटिकनचा जागतिक संसार छान चालतो. अलीकडच्या काळात व्हॅटिकनचा हा संतनिर्मितीचा उद्योग चांगलाच वाढल्याचा दिसतो. आकडेवारीत सांगायचे, तर १९७८ ला पोपपदी आलेल्या जॉन पॉल दुसरे यांनी तब्बल ४८२ जणांना संतपद बहाल केले. सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी तो विक्रम मोडण्याचा चंग बांधल्याचे दिसते. त्यांनी आल्या आल्या ८१३ जणांना घाऊकपणे संतपदी नेऊन बसविले आणि आता भारतरत्न मदर तेरेसा यांचा संतपदाचा मार्ग मोकळा केला आहे.

संतांबाबत चर्चचे खास कायदे आहेत. त्यानुसार एखादी व्यक्ती कितीही संतासारखे जीवन जगलेली असली तरी तिला संत मानता येत नाही. त्यासाठी तिच्या खात्यावर किमान दोन चमत्कारांची नोंद असावी लागते. माता तेरेसा यांच्या नावावरही असे दोन चमत्कार नोंदले गेले आहेत. त्यातील पहिला चमत्कार आहे भारतातला. तेरेसा यांनी मृत्यूनंतर एक वर्षांने एका महिलेचा कर्करोग बरा केला असा तो चमत्कार आहे. त्याविरोधात प. बंगालमध्ये ‘सायन्स अँड रॅशनलिस्ट्स असोसिएशन’ या अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेने आवाज उठवला होता. आज ती मंडळी तेरेसांना संतपद देण्याच्या निर्णयाविरोधात उभी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार चमत्कारांमुळे असे संतपद बहाल करण्याच्या पद्धतीमुळे एकूणच अंधश्रद्धेला प्रोत्साहन मिळते. त्यांचे म्हणणे असे की, माता तेरेसा या त्यांच्या कार्यामुळे आधीच संतपदी पोहोचल्या आहेत. त्यांना अशा चमत्कारकथांची आवश्यकता नाही. हे कितीही रास्त वाटत असले, तरी धर्म ते मान्य करणार नाही. याचे कारण सर्वच धर्मांना हे पक्के माहीत असते, की नावावर असे चमत्कार असले, म्हणजे लोकांना त्या व्यक्तीच्या भजनी लागणे आणि लावणे, दोन्ही सोपे जाते. चमत्कार असले की, आपोआपच नमस्कार मिळतात, अनुयायी वाढतात, त्याने धर्मसत्ता वाढते. अलीकडच्या काळात संतांची मांदियाळी वाढत चालली आहे, त्याचे कारणच चर्चच्या धर्मसत्तेला मिळत असलेल्या आव्हानांमध्ये आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पोप फ्रान्सिस हे तुलनेने आधुनिक विचारांचे मानले जातात. वर्षभरापूर्वी त्यांनी ‘देवाच्या हाती जादूची छडी नाही’ असे क्रांतिकारी उद्गार काढून खळबळ माजवली होती. सर्वच धर्माच्या विश्वोत्पत्तीच्या मूलभूत सिद्धांतालाच छेद देणारी भूमिका घेतली होती. तेच संतांची संख्या वाढवत चालले आहेत, हे लक्षणीय आहे. एकीकडे काही पाद्रीमंडळींच्या लीलांमुळे प्रक्षुब्ध झालेले पाश्चात्त्य जनमत आणि दुसरीकडे इस्लाममधील मूलतत्त्ववादी शक्तींनी जगभरात घातलेला धिंगाणा अशी दोन मोठी आव्हाने चर्चसमोर आज उभी आहेत. भारतात हिंदू मूलतत्त्ववादी शक्ती प्रबळ झालेल्या आहेत. माता तेरेसा यांना संतपद बहाल करण्याच्या हालचाली या पार्श्वभूमीवर सुरू आहेत. मध्यंतरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी तेरेसांवर टीका केली होती. भारतात धर्मांतराविरोधात रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे. या गोष्टीही येथे लक्षात घेण्यासारख्या आहेत. एकंदर हे धर्मयुद्ध आहे. चमत्कार हे त्यातील एक अस्त्र आहे. चर्चने ते परजले आहे.
परंतु येथे प्रश्न केवळ तेरेसा यांच्या चमत्कारांचाच नाही. तसा तो मानला जाता कामा नये. प. बंगालमधील अंधश्रद्धा निर्मूलनवाले लोक याबाबतीत घोटाळा करीत आहेत. तेरेसा यांचे चमत्कार सोडून अन्य कार्य त्यांना प्रशंसनीय वाटत असल्याचे दिसते. येथे प्रश्न असा पडेल, की मग त्यांचे सेवाभावी कार्य प्रशंसा करण्याच्या योग्यतेचे नाही का? पण हा केवळ तेरेसांबाबतचाच प्रश्न नाही. तशा सगळ्याच तथाकथित संतांबाबत असे प्रश्न उभे राहतात. त्याचे उत्तर माँट्रियल विद्यापीठातील प्रो. सर्जे लॅरिव्ही आणि जेनव्हीव शेनार्ड आणि ओटावा विद्यापीठातील कॅरोल सेनेशल यांच्या ‘द डार्क साइड ऑफ मदर तेरेसा’ या संशोधन लेखात मिळते. ‘स्टडिज इन रीलिजन’ या संशोधन पत्रिकेत मार्च २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखात म्हटले आहे, की ‘मदर तेरेसा या संत अजिबात नव्हत्या. त्या अत्यंत परिणामकारक अशा माध्यममोहिमेची निर्मिती होत्या.’ त्या मोहिमेच्या अग्रस्थानी होते माल्कम मगरिज हे ब्रिटिश लेखक. त्यांच्या ‘समथिंग ब्युटिफूल फॉर गॉड’ (१९७१) या पुस्तकातून आणि तत्पूर्वी त्याच नावाच्या, बीबीसीवरील माहितीपटातून त्यांनी तेरेसा यांना जगासमोर आणले. दीनदुबळ्यांची सेवा, अनाथाश्रम, रुग्णालये चालवणे अशा गोष्टींतून त्यांनी तेरेसांची महती गायली. अशा गोष्टी आल्या, की सर्वसामान्यांची मने अगदी हेलावून जातात. केवळ तेवढय़ासाठी लोक तशा व्यक्तींच्या पायांवर डोकी ठेवतात. राजकारणी स्वत:स लोकसेवक म्हणवून घेत सत्ता गाजवतात हे सर्वांनाच दिसते. तसेच या सेवाभावी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने करीत असतात. हे मात्र कोणाच्याही लक्षात येत नसते. उपरोक्त संशोधन लेखात यावर नेमके बोट ठेवले आहे. ‘‘गरिबांच्या वेदनांमध्ये आपणांस सौंदर्य दिसते, असे मदर म्हणत. त्या गरीब, मरणासन्न, अनाथ व्यक्तींची सेवा करण्यासाठी त्यांनी संस्थांची उभारणी केली. तेथे त्यांच्यावर ज्या पद्धतीने उपचार केले जात, ते सर्वच शंकास्पद होते. लोकांच्या वेदना दूर करण्याऐवजी वेदनांच्या उदात्तीकरणातच माताजींना अधिक रस होता,’ असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

ख्रिस्तोफर हिचेन्स यांच्या ‘मिशनरी पोझिशन्स’ या पुस्तकातही हेच म्हटले आहे. तेरेसांचे सेवाकार्य, त्यामागील हेतू आणि विचार यांवर टीका करतानाच त्यांनी सेवाकार्यासाठी गोळा करण्यात येणाऱ्या देणग्यांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. चार्ल्स किटिंग, रॉबर्ट मॅक्सवेल यांच्यासारख्या भ्रष्टांकडून, शॉन क्लॉड डय़ुवेलियर याच्यासारख्या हुकूमशहाकडून पैसे घेताना, त्याला येत असलेला गरिबांच्या, सर्वसामान्यांच्या घामाचा, रक्ताचा वास माता तेरेसांच्या नाकापर्यंत कधी गेलाच नाही. सामान्यांच्या शोषणातून व्यापारी, उद्योजक, गुंडपुंड यांनी मिळविलेले धन देणगीदाखल घ्यायचे आणि त्यांना नैतिकतेच्या टोचणीतून सुटका देत पुण्यकर्म केल्याचे समाधान मिळवून द्यायचे हे अनतिकच. हिचेन्स यांच्या टीकेचा अर्थ तोच आहे. अशा अनेक माताजी आणि बाबाजी आहेत. लोकसेवेचा, भक्तांच्या वेदना दूर करण्याचा दावा करणारी ही मंडळी खरे तर लोकांचे दु:ख, वेदना, चिंता, गंड यांवर जगत असतात. त्यावर त्यांची साम्राज्ये उभी असतात. रुग्णालये, अनाथाश्रम, बालगृहे हा त्यावरचा सुंदरसा मुलामा असतो. एका अर्थी ती व्यावसायिक गुंतवणूकही असते. त्या भांडवलातूनच पुढे तहहयात देणग्या मिळण्याचा मार्ग खुला होत असतो. यातील अनेक जण आपणांस पैशांचा मोह नाही, असे सांगताना सगळे ऐश्वर्य आणि सत्ता उपभोगत असतात. हिचेन्स हे दाखवून देतात, की माता तेरेसा यांच्या आजारावर उपचार होतात ते परदेशातील इस्पितळांत, त्यांच्या आश्रमातील रुग्ण जेथे उपचार घेतात त्या तथाकथित रुग्णालयांत नव्हे. यातील ‘चमत्कार’ असा की, या गोष्टी समाजातील मी मी म्हणणाऱ्या बुद्धिनिष्ठांच्याही लक्षात येत नसतात. 
माता तेरेसा यांच्या तथाकथित चमत्कारांहून हा ‘चमत्कार’ मोठा आहे. या चमत्कारावरच अशा व्यक्तींची थोरवी आधारलेली असते आणि त्या थोरवीवर धर्माची सत्ता. पोप फ्रान्सिस संतांची फॅक्टरी सुरू करतात, तेव्हा त्याचा नेमका अर्थ हा असा धार्मिक सत्ताकारणात सापडत असतो. तो समजून घेणे महत्त्वाचे.अधिक माहितीसाठी - 

No comments: