‘परकीय हात’ ही संकल्पना आपल्याला नवी नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षांआधीच्या इतिहासापासून अगदी कालपरवापर्यंतच्या काही घटना-घडामोडींमागे हा परकीय हात दिसलेला आहे. बाह्यशक्तींची, परराष्ट्रांच्या गुप्तचरसंस्थांची कारस्थाने आणि कारवाया या देशाने पाहिलेल्या आहेत. पण त्यांचे एक वैशिष्ट्य असते. सामान्य हेरगिरीची प्रकरणे सोडली, तर ती देशविरोधी कारस्थाने, त्या कारवाया सामान्यांपर्यंत क्वचितच येतात. त्यांची ठोस माहिती समजते, त्यांचा खरे-खोटेपणा कळतो, तेव्हा बराच काळ उलटून गेलेला असतो. तोवर माध्यमांतून, कुजबूज आघाड्यांतून प्रसारले जातात ते परकीय हाताविषयीचे केवळ अंदाज, अफवा, वावड्या; कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय मांडलेले षड्यंत्र सिद्धांत. यांचेच दुसरे नाव कटकाल्पनिका.
आपल्याकडे सध्या अशीच एक कटकाल्पनिका उजव्या माध्यमविश्वात चवीचवीने चघळली जात आहे. या आंदोलनामागे बाह्य शक्तींचा हात आहे, ही ती काल्पनिका. तिचे आघाडीचे प्रवक्ते आहेत रिपब्लिक वाहिनीचे मालक-संपादक अर्णब गोस्वामी. त्यांचा सिद्धांत असा, की हे आंदोलन म्हणजे मोदींविरोधात रचलेला मोठा कट आहे. त्यामागे चीन आहे. अमेरिकेतील ‘डीप स्टेट’ आहे. जॉर्ज सोरोस हे उद्योगपती आहेत. पाकिस्तान तर अर्थातच आहे. पण बांगलादेशातील जमातवादीही या आंदोलनामागे आहेत. एकाच वेळी हे सारे येथे ‘रेजिम चेंज’ म्हणजे ‘सत्तापालट’ करू पाहात आहेत.
याचे पुरावे काय? तर कोणा परकीय व्यक्तीने आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेले एखादी ट्विप्पणी, एखादी फेसबुक पोस्ट वा व्यक्त केलेले समर्थन. बाकीची मग त्या-त्या पत्रकाराची द्वेषभक्ती आणि कल्पनाशक्ती. आजच्या समाजमाध्यमांच्या काळात शत्रूराष्ट्रे आपल्या देशातील कोणत्याही घटनेचा - मग ते असे आंदोलन असो वा नैसर्गिक आपत्ती वा धार्मिक/जातीय संघर्ष - मनोवैज्ञानिक युद्धासाठी सहज वापर करून घेणार, हे वेगळे सांगावयास नको. पण त्याचा अर्थ त्या शत्रूराष्ट्राचा त्या घटनांशी संबंध आहे असा लावणे हा बिनडोकपणा झाला. पाकिस्तानातून आंदोलनाशी संबंधित काही चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या. कृत्रिम प्रज्ञा वापरून केलेल्या त्या बनावट चित्रफिती. त्यांचा हेतू लोकांच्या मनात असंतोष भडकावणे हाच असणार. हे वेगवेगळ्या संदर्भात भारतातील जल्पक टोळ्या आणि आयटी सेलही करीत असतात. यावरून विद्यार्थी आंदोलन हा परराष्ट्रांच्या कटाचा भाग असल्याचे म्हणणे हा शुद्ध खोडसाळपणा. मध्यंतरी बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’ नामक संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दर्शविल्याचे एक पत्र अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले. ते बनावट होते, हे नंतर सिद्ध झाले. हे पत्र नेमके कोठून तयार करण्यात आले, याचा पत्ता लागलेला नाही. पण भारताचा ‘बांगलादेश’ करायचा आहे या कथनाला ते उपयुक्त ठरले. अशा प्रकारची कथानक तयार करून कटकाल्पनिकांना बळकटी दिली जाते.
असेच एक नवे कथानक आले आहे अमेरिकेतून. तेथील ‘फॉक्स न्यूज’कडे आपल्याकडील रिपब्लिक आणि तत्सम अन्य वाहिन्यांची वैचारिक पितृत्व जाते. एकच गुणसूत्रे आहेत त्यांची. या फॉक्स न्यूजच्या ‘डिजिटल’ आवृत्तीच्या वरिष्ठ संपादक आहेत आसरा क्यू. नोमानी. त्यांचा जन्म मुंबईचा. माता-पित्यासह बालपणीच त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांनी ८ ऑक्टोबर, १९ ऑक्टोबर आणि २० ऑक्टोबर अशा तीन दिवशी तीन बातम्या प्रसिद्ध केल्या. या बातम्या होत्या प्रामुख्याने फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित. नोमानी यांची शोधपत्रकारिता अशी, की - फ्रान्समधील विद्यार्थी ‘दंगलीं’मागे कम्युनिस्ट, कामगार संघटना आणि मोठे वैश्विक प्रोपगंडा जाळे आहे. ९ ऑक्टोबरच्या बातमीत त्यांनी या अशा, देशोदेशीच्या ५० संघटना असल्याचे सांगितले. १९ नोव्हेंबरच्या बातमीत ही संख्या ५४ वर गेली आणि २० नोव्हेंबरच्या बातमीत १०१ वर. त्याला त्यांनी ‘केऑस इन्कॉर्पोरेटेड’ - गोंधळ घालणारी कंपनी - असे नाव दिले. त्यात पुन्हा कम्युनिस्टांच्या, समाजवाद्यांच्या आणि कट्टर डाव्यांच्या संघटना असल्याचे त्यांचे म्हणणे. आता यात विशेष ते काय असे कोणासही वाटेल. विरोधात असलेल्या डाव्या विचारांच्या संघटना आणि व्यक्तींनी सरकारविरोधातील आंदोलनास पाठिंबा देणे यात कट तो काय असा प्रश्न कोणाही सुज्ञास पडेल. नोमानी यांचे म्हणणे असे, की नऊ देशांतील या १०१ संघटना त्या आंदोलनास ‘कोऑर्डिनेट, ऑर्गनाईज आणि ॲम्प्लिफाय’ करीत आहेत. आंदोलनाचे समन्वय आणि संघटन फ्रान्समधील डाव्या संघटना करीत आहेत, हे स्वाभाविकच. आणि बाकीच्यांचे काय, तर त्या या आंदोलनाचा आवाज जगात पसरवत आहेत. तो कसा, तर ट्विट वगैरे करून, पत्रके काढून. हाच त्यांचा कट असल्याचा पुरावा. हे पुन्हा युरोपाबाबत. मग यात भारत कुठे येतो?
नोमानी बाईंच्या या तिन्ही बातम्यांत भारताचे काही उल्लेख आहेत. एक बातमी सांगते, की ‘प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल’ नावाची एक डावी संघटना आहे. तिने १६ ऑक्टोबर रोजी पत्रकारांना माहिती देताना फ्रान्स, स्पेन, भारत आणि अल्बानियातील आंदोलनांचा उल्लेख केला. ‘हे नवे बंड संघटित राजकीय सत्ता कशी प्राप्त करू शकेल?’ असा सवाल केला आणि सांगितले, की ‘या शक्तींना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडून घेण्यासाठी आमची संघटना कार्य करीत आहे.’ याच बातमीत आणखी एका संघटनेचे नाव आहे - ‘इंडिया अलायन्स पॅरिस’. नोमानी यांची शोधपत्रकारिता अशी, की तीन वर्षांपूर्वी मॅनहटनमध्ये एक नाटोविरोधातील कार्यक्रम झाला होता. ही संघटना त्या कार्यक्रमाची प्रायोजक होती. आणि हा कार्यक्रम झाला होता डाव्या विचारसरणीचे उद्योगपती नेव्हिल रॉय सिंघम यांच्या मालकीच्या ‘पीपल्स फोरम’च्या सभागृहात. त्यावरून या संघटनेचे आणि सिंघम यांचे नाते आहे. सिंघम हे अमेरिका आणि युरोपातील उजव्यांच्या विरोधात आहेत. बस्स एवढेच. मग या ‘इंडिया अलायन्स पॅरिस’चा आणि फ्रान्समधील आणि भारतातील आंदोलनाशी काय संबंध? तर या संघटनेच्या ट्विटर खात्यावरून भारतातील आंदोलनाच्या अनेक बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. ७ ऑक्टोबर रोजी तर या संघटनेने ‘लव्ह टू जेन झी : इन फ्रान्स. इन इंडिया. ब्राव्हो फॉर टुडे’ असे ट्विट केले होते. हे या आंदोलनामागचे ‘इंटरनॅशनल कनेक्शन’. ही संस्था म्हणजे ‘ॲम्प्लिफायर’ आहे. अशा या भयंकर प्रभावशाली संघटनेच्या ट्विटर खात्याचे (हे लिहित असताना) अनुयायी किती आहेत, तर तब्बल ९३२. डावी संघटना. भारतीय लोकांची. ती भारतातील आंदोलनाची छायाचित्रे, बातम्या ट्विट करणार. त्यात विशेष ते काय? पण ही बाब नोमानी अशा पद्धतीने सादर करतात की तो कटाचा पुरावा वाटावा.
नेव्हिल रॉय सिंघम यांची ‘ब्रेकथ्रू न्यूज’ नामक माध्यमसंस्था आहे. त्यावर युरोपातील आंदोलनाचे कार्यक्रम दाखवले जातात. नोमानी यांनी १९ ऑक्टोबरच्या ‘युरोप्स यूथ रिव्होल्ट’ या कार्यक्रमाचे उदाहरण दिले आहे. त्या कार्यक्रमातील चर्चेत कुठेही भारताचे नाव येत नाही. पण त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘जगभरातील तरूणांचा उठाव’ या शीर्षकाखाली आंदोलनांच्या छायाचित्रांचे ‘कोलाज’ प्रसिद्ध केले होते. त्यात मात्र भारतातील विद्यार्थी आंदोलनाचे छायाचित्र होते. पाहा, मोठाच पुरावा. शिवाय सिंघम यांच्या पत्नी अमेरिकेत ‘कोड पिंक’ नामक शांततावादी संघटना चालवतात. पुढच्या महिन्यात त्या अमेरिकेत वाढत्या लष्करी खर्चाविरोधात कार्यक्रम करणार आहेत. त्या संबंधीच्या मुलाखतीत त्यांनी भारतातील आंदोलनाचा दाखला दिला. हाही मोठा पुरावा. जाता जाता नोमानी यांनी असेही ठोकून दिले आहे, की भारतातील श्रीमंतांची फ्रान्समधील आंदोलनाला मदत आहे. याला पुरावा?... शून्य.
असे हे शोधवृत्त भारतातील माध्यमांनी मात्र डोक्यावर घेतले. वृत्तवाहिन्यांसाठी तर ते मोठेच खाद्य होते. आंग्ल वृत्तपत्रांनीही ते प्रसिद्ध केले. एवढेच नव्हे, तर भाजपनेही त्याची मोठ्या गांभीर्याने दखल घेतली. या कामी त्यांनी गौरव भाटीया या आपल्या प्रवक्त्यास लावले. त्यांचे म्हणणे असे, की या बातम्यांतून काँग्रेसचा अराजक पसरवण्याचा आणि सत्तापालटाचा कट उघडकीस आला आहे. राहुल गांधी हे अराजकाचे आणि गद्दारीचे प्रतिमान सादर करीत आहेत. या बातम्यांतून त्यांच्या विश्वासघाताचे धागेदोरे कसे परदेशी ‘एजन्सीं’शी जोडलेले आहेत हे स्पष्ट झाले आहे. पण ते कसे?
फॉक्स न्यूज डिजिटलच्या त्या बातम्यांत दिसते ते एवढेच, की डाव्यांच्या काही संघटना फ्रान्समधील आंदोलनात आहेत. काहींचे अशा आंदोलनांना समर्थन आहे. त्या बातम्यांत अशा काही संघटनांची नावे आहेत. काही डाव्या व्यक्तींची नावे आहेत. पण यावरून त्या सर्व संघटना एका वैश्विक कटाचा भाग आहेत. त्यांनी सगळ्यांनी मिळून आंदोलनाची कारस्थाने रचली आहेत, हे कसे म्हणता येईल? पण कटकाल्पनिकांचे हेच तर वैशिष्ट्य असते.
त्यात वडाची झाड पिंपळाला लावलेली असते. बादरायण संबंध जोडलेले असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या इतक्या अविश्वसनीय आणि अतार्किक असतात, की एवढे खोटे कोण बोलेल या भावनेने लोक त्यांवर विश्वास ठेवत असतात. नोमानी बाई आणि अर्णब गोस्वामी यांच्या कटकाल्पनिकांत ही सर्व वैशिष्ट्ये दिसतात. एकीकडे मोदी आणि ट्रम्प यांच्या, मोदी आणि जिनपिंग यांच्या दोस्तीचे गोडवे गायचे. पाकिस्तान हा भिकेला लागलेला देश म्हणायचे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या चाणक्यनीतीचे कौतुक करायचे आणि त्याच वेळी केंद्र सरकारविरोधात एवढा मोठा कट अंमलात येत आहे, असेही सांगायचे. यात काही अंतर्गत विसंगती आहे, हेही सदर कथानक रचताना लक्षात घेतलेले नाही. परंतु ओरडून वारंवार तेच ते बोलले, की ते खरे मानले जाईल, यावर अर्णब यांची श्रद्धा असल्याने दिसते. त्यामुळे त्यांच्या कटकाल्पनिका चालून जातात. त्यांच्या प्रेक्षकांची ‘झॉम्बी’करणाकडील वाटचाल सुरूच राहते…
(ता. २६ ऑक्टोबर २०२६.)
(लेखातील मते माझी वैयक्तिक आहेत. त्यांचा मी कार्यरत असलेल्या संस्थेशी कोणताही संबंध नाही.)




