एरवीच्या कविता

महाविद्यालयीन जीवनात माणसाला कविता होतात. आपोआप! मलाही झाल्या. नंतर कधीतरी तो बहर ओसरला. आता कधीतरी एखादी ओळ, एखादी कविता सहज सुचून जाते. पण तेवढेच. कवितांपासून मी आता खूप दूर आलो आहे...

माझ्या कविता कशा होत्या? त्या 'माझ्यातल्या माझ्या' तरी होत्या का? माहित नाही. आतापर्यंत एखाद-दुसरा अपवाद वगळता मी त्या कुठे प्रसिद्धही केल्या नव्हत्या. पण आता का कोण जाणे त्या येथे लिहून ठेवाव्यात असे वाटू लागले. म्हणून त्या येथे लिहितोय. बस्स. त्याहून सिरियस काहीच नाही.

.
उपसंपादक
सबंध वैश्विक गांडूपणाचा अर्क पिल्यावर
कुणीही उपसंपादकच होईल सहज
तेव्हा त्याच्या श्वासाला येईल
शाईचा इस्टमनकलर वास
तो बोलेल फॉन्टसाईजमध्ये
आणि हसेल क्लासिफाईडच्या मर्यादेत

गहाण ठेवून आपल्या लेखण्या
त्याला लिहावीच लागेल हेडलाईन
आपल्याच अनधिकृत जिंदगानीवर
बुलडोझरने बलात्कार केल्याची

दरबानाकडे सराईत दुर्लक्ष करून
तो घुसेल उंची हॉटेलात
पिईल चिल्ड बीअर 
वार्ताहर परिषदेच्या नाटकात
(नंतर मग शोधत फिरेल मुतण्यासाठी
तटलेल्या पोटाने सार्वजनिक मुतारीच)

पत्रकारितेचा हा फायदाच म्हणायचा की
त्याला मिळतात फुकट सिस्टिमॅटिक पेनं
नसबंदी केलेल्या कुत्र्याच्या शिस्नासारखी
सोपंच होतं मग त्याला
आपल्याच आयाभैणींवर सग्यासोय-यांवर
झोपड्याचाळींवर झालंच तर स्वतःच्या मेंदूबिंदूवर
तंगडी वर करणे

सबंध वैश्विक गांडूपणाचा अर्क पिल्यानंतर
कुणीही हेच करील
तुम्हीसुद्धा!




मुंबई
इथल्या मातीचा गंधही सुकासुका
लेडच्या घनदाट धुक्याने करपलेला
माणूस गर्दीत चिंब घामाने
वासनांचा देह त्याचा भुकाभुका

मी घेईन अंगावर इथली हवा
तर श्वास बंद होवो
प्रदूषित माणसांच्या कवेत फुलं
मला काट्यांचा छंद होवो



.
का सुखाचा होत आहे भास आता?
जीवना रे, मस्करी ही बास आता!

मीच आहे लावलेली वाट माझी
श्रेय हे देऊ कसे कोणास आता?

गाव हे होते सुरंगी पाखरांचे
हिंडती येथे कुलंगी डास आता

सोड रे, सांगू नको त्या देवळांचे
तेथल्या तीर्थास येतो वास आता!

रोज सूर्याला इथे खग्रास आहे
बातमी त्याची कशाला खास आता?



४.
भरू दे ना ऊस
झोंबू नको रे वाढ्याला
अजून सरावला नाही
हात हिरव्या चुड्याला
जून बाभळीच्या देही
बघ फुललाय काटा
गच्च ओलिचिंब नार
तुवा धरता ओढ्याला



ओठांत सांग माझ्या ओठांतली कहाणी
ऐकेल चोर कोणी दोघांतली कहाणी

छेडून तार गेली एकेक पावसाची
ओली अधीर वेडी स्पर्शातली कहाणी

वेड्या नभा तुला ना हेही कळून आले
सांगून वीज गेली भेटीतली कहाणी

हे बंध इंद्रियांचे तोडून इंद्रियांनी
मस्तीत गात जाऊ मुक्तीतली कहाणी

ही पालखी सुखाची अश्रूंत आज न्हाता
आनंदकंद झाली रक्तातली कहाणी



.
रक्तामधली अमूर्त गाणी
शब्द मुकेसे डोळ्यांमधले
कधी तुला समजले जरासे
तरी भरूनी मला पावले

मला हवी ती दाद समेवर
एकांती अन् कौतुक हळवे
आणि तुझी ही थंड रूक्षता
कसे जुळावे नाते हिरवे?



खिन्न अशी तू नकोस होवू
तुला सखी काळजी कशाची?
या वृक्षांच्या पानगळीतून
मला दिसे पालवी उद्याची...



तुझ्या सायओठांवर
अलगद उमलावे
माझे अवघे जीवन
एक शब्दफूल व्हावे
अर्थशोध मीपणाचा
तुझ्यामधे गवसावा
माझे हरवलेपण
तुझ्यामधे हरवावे



पाहता मी लागले मागे पळाया आरसे
काय मी आता करू माझे नव्याने बारसे?

भेटतो तो पुसतो या प्रकृतीची कारणे
(वेदना खाऊन आलेले मला हे बाळसे!)

इवलेसे पाय त्यांनी बूट मोठे लाटले
फेंगडी ही लोकशाही दात काढूनी हसे

ऐकतो मी बातमी की दंगली झाल्या सुरू
पण मराया मात्र तेव्हा राहिली ना माणसे



१०
आयुष्य फूल आहे?
सांभाळ! भूल आहे

गाण्यात सत्य त्यांची
थंडीच चूल आहे

लाचार गाढवांना
रंगीत झूल आहे

दुष्काळ थोर येथे
पाऊस गूल आहे

दोस्तीत घात त्यांच्या
प्रेमात हूल आहे

मी हासतो तरीही
माझ्यात मूल आहे



११
दुपार किरटी स्तब्ध वा-याचा झोपाळा
करपले झाड खाली निष्पर्ण पाचोळा
सुस्तावल्या पारावर सुस्ती पांगुळली
डोळ्यांतली आग सा-या गावभर झाली

लाहीलाही सैरभैर अनावर मन
उन्हाची झळई : तिचं माहेराला जाणं
ऊन तव्यावर पाणी तशी झाली झोप
सा-या अंगाला डसतो राणी लालजर्द साप



१२
जरी नाहिशी चांदरात आहे
तुझे चांदणे अंगणात आहे

कसे गीत गाऊ गडे सुखाचे
तुझी वंचना अंतरात आहे

बरे हेच की दूरदूर झालो
बरे हेच तू आठवांत आहे

मला लाभले दान वेदनांचे
अता ना कशाची ददात आहे

कसे मानभावी रडू जनांचे
मला ओरबाडून जात आहे

जरी रोज दारात हे निखारे
पुढे आगळा पारिजात आहे



१३
पिसाटल्या वा-यामधे भान राहिना पदरा
तिच्या यौवनरथाचा ध्वज उडाला भरारा
सावरिता सावरेना पोर बावरून गेली
वावटळीच्या मिठीत अशी आपसूक आली
भान हरपले तिचे एक हलेना पाऊल
गो-यामो-या पापणीला आली वर्षेची चाहूल



१४
तुला शोधता अशा कोरड्यावेळी
तृष्णेला माझ्या फिरूनी येई झळाळी
डोह अनावर हृदयामधला वेडा
देह शोधतो गोकुळातला माळी
दूर उदेला पाऊसकाळा मेघ
मयूरांचे चंद्रक पैंजण होऊन जाई
परि फिरले नभ अक्रूर जीत झाला
अन् पुन्हा कोरडी तहानवेडी सराई



१५

कसं भरून येईना आभाळ मेघांनी
पावसाच्या वाटेवर डोळ्यांच्या कमानी

मेघ वा-याचा पाहुणा आभाळी भिंगोरी
काळ्या मातीचं जळीत डोळ्यांच्या किनारी

फेर धरूनिया मेघ वाकुल्या दाविती
डोळां रूतूरूतू येती करपली पाती

मेघ येती आणि जाती फिरूनी दिशांनी
कसं आवरावं आता डोळ्यांतलं पाणी

गेले फिरून एकदा उजाडून मेघ
गेली शिवून डोळ्यांना काजळाची रेघ



१६
सारखी माझी लढाई - संपलो नाही
हारतानाही तसा मी हारलो नाही!

ठेविली गुंडाळूनी पैशांवरी त्यांनी
मी पुन्हा त्या संस्कृतीला भाळलो नाही

जिंदगीची ही कमाई केवढी माझी
शोषकांच्या उंब-यांशी वाकलो नाही

मान्य की माझी फुले कोमेजली थोडी
हे नसे का थोडके मी पेटलो नाही!

हासती सारेच येथे तोंडदेखले
छान! मी कित्येक वर्षे हासलो नाही

मारतो जो तो बढाई - राहिलो जिंदा!
जीवना, तेव्हाच का मी वारलो नाही?



१७
जाहला तुरूंग  तुझाच संग
शृंखलांचा रंग  हातांपाया

सभोवती माझ्या  उठली जंगले
राऊळ भंगले  विश्वासाचे

जिच्या प्रितीसाठी  शीर हे कलम
लावी ती मलम  इतरांना

मन आज झाले  जळता निखारा
सांत्वनाचा वारा  फुंकती ते

इतके सोसून  कसा मी जीवंत
म्हणावे का संत  मीच मला?



१८
माणसे आता कुठे गावात या
राहिली नुसती घरे गावात या

रे नको जाऊस त्या पारावरी
आज ना त्या मैफली गावात या

हे विचारूही नये येथे कुणी
खुंटली का पाखरे गावात या

तीच डेरेदार झाडे वाकली
ताठ जी होती कधी गावात या

लोटुनी पायात पिल्ले आपली
श्वास सारे मागती गावात या

लागली येथे लढाया मंदिरे
राम नाही राहिला गावात या

कोणते चेटूक झाले ना कळे
फाटले आभाळही गावात या
Read more...