बालकथा - टून्देशातून सुटका


||||
लांबूनच स्कूलबस येताना दिसली, तशी बिट्टूची मम्मी सरसावली. तिनं बिट्टूला हाक मारली. पण बिट्टूचं तिच्याकडं लक्षच नव्हतं. बाजूलाच सोसायटीचे वॉचमन अंकल एक कार धूत होते. बिट्टूचं सगळं ध्यान त्या कारच्या अंघोळीकडंच होतं. वॉचमन अंकल कारच्या बॉनेटवर बादलीतलं पाणी असं सप्पकन मारायचे. सगळं पाणी तिच्या नाकात, तोंडात, कानात, डोळ्यांत जायचं. मग त्या पाण्याचा मस्त फेसफेस व्हायचा. त्यांचे फुगे बनायचे. फटकन् फुटायचे. एक फुगा तर केवढा मोठा झाला होता. टेनिसच्या बॉलएवढा. बिट्टूला जाम मज्जा वाटली. त्याच्या मनात आलं, समजा हा फेसाचा फुगा ड्रायरनं सुकवला, तर त्याचा कडककडक टेनिस बॉल बनेल?
बिट्टूsss, जायचंय ना शाळेत?...”  मम्मी ओरडली.
आपली मम्मी म्हणजे डिट्टो विद्याबालनच! पण ती चिडली की तिचे डोळे कसे टिचरसारखे दिसतात! ते डोळे पाहून बिट्टू एकदमच शहाणा झाला. त्याने मम्मीच्या हातातली बॅग घेतली.  ती एकशेदहा किलोची बॅग त्याने पाठीवर लटकवली. एकदा कारच्या अंघोळीकडं पाहून घेतलं. मम्मीला बाय केलं आणि तो स्कूलबसमध्ये चढला.
आं? हे काय? व्हाटिजधिस...कोंबडीचे पीस?
बसमध्ये कसलाच आवाज कसा येत नाही?
तो फोर्थ-बी मधला दुष्टदुम्न नेहमी गाणी म्हणत बसल्याबसल्या नाचत असतो. ड्रायव्हर अंकल त्याला गावठी गंगनम म्हणतात. पण तोपण गप्प आहे. फर्स्टमधली रिंकी नेहमी कायतरी कारण काढून रडतच असते. तिला सगळे लेडी नोबिता म्हणतात. पण तीपण गप्प आहे. सगळेच गप्प आहेत. म्यूटचं बटण दाबल्यासारखे. काय झालं म्हणून त्याने पाहिलं, तर बापरे! त्याला काहीच दिसेना.
सगळा डिट्टो अंधार! बसमध्ये अंधार, बाहेरपण अंधार!
बिट्टू जाम टरकला. त्याला वाटलं, आपले डोळेच गेले. आपण आंधळे झालो. आता आपल्याला दुस-या मजल्यावरच्या रानडे आजोबांसारखा काळा गॉगल घालावा लागणार.  
त्याने आपले डोळे मिटले. मग दोन्ही हातांनी ते खसाखसा चोळून उघडले. अन् पाहतो तो कायत्याच्या समोर एक माणूस उभा. धारदार नाकाचा. बारीक टोकदार मिशा असलेला. त्याने काळी पँट, काळं जाकिट घातलं होतं. डोक्यावर काळी उभट हॅट होती. पाठीवर तांबडी शॉल सोडलेली होती. आणि त्याचे डोळे... डिट्टो कॅमे-याच्या फ्लॅशसारखे!
त्याला पाहून बिट्टूच्या पोटात फूटबॉलएवढा गोळाच आला.
मला ओळखलं काय?” त्या माणसाने विचारलं.
बिट्टू हळूच म्हणाला, “हो.”
मला ओळखलंस तू? व्वा व्वा! मँड्रेक खूश हुवा!” असं म्हणून तो मोठ्याने हॉहॉहॉ करून हसला. मग म्हणाला, “सांग बरं मी कोण आहे?”
बिट्टू म्हणाला,  “स्ट्रेंजर!”
तो माणूस चिडून म्हणाला, “स्ट्रेंजर.... म्हणजे अनोळखी माणूस? गाढवा, मग मला ओळखलं, असं कसं म्हणतोस?... पण तू बच्चा मला कसा ओळखणार म्हणा! तू मला कधी पाहिलेलंच नाही. पण तुझे पप्पा ओळखतात मला. ते लहान असताना माझ्या आणि फँटमच्याच गोष्टी वाचायचे. माझं नाव जादूगार मँड्रेक! आणि मी तुला किडनॅप केलंय!” असं म्हणून तो पुन्हा हॉहॉहॉ करून हसला.
ते ऐकताच बिट्टूने टक्कन डोळे उघडले. त्याचा चेहरा उजळला. ओठांवर हसू पसरलं.
तो म्हणाला, “हायला! मला किडनॅप केलंय? डिट्टो धम्माल!”
जादूगार मँड्रेकला काही कळेनाच. अपहरण केलं, तर या कार्टून मुलाला आनंद झालाय. याला आता चांगलाच धडा शिकवला पाहिजे. जगातल्या सगळ्या कार्टून मुलांना धडा शिकवला पाहिजे.
त्याने जादूची छडी फिरवली.
ओम-हीमक्लिमआइस्क्रीम सनस्क्रीन कोल्डक्रीम सो जा सो जा ओमफट आहा!”
त्याबरोबर बिट्टू गाढ झोपी गेला. पण त्याचे दोन्ही डोळे मात्र तसेच टक्क उघडे होते!
आणि ते पाहून जादूगार मँड्रेक हॉहॉहॉ करून हसत होता. व्हिलन वगैरे लोकांच्यात असं हसणं कम्पल्सरीच असतं!


||||
किती तरी वेळ झाला, तरी बिट्टूची स्कूलबस धावतच होती. रस्त्यांवरून, सोसायट्यांच्या टेरेसवरून, उंच उंच टॉवरवरून ती वेगाने पळतच होती.
किती तरी वेळाने बिट्टू जागा झाला. त्याने उघडे डोळे मिटले. मग पुन्हा किलकिले केले आणि तो पाहू लागला. जादूगार मँड्रेक्स ड्रायव्हरच्या सीटवर बसून ढाराढूर झोपला होता. बस आपोआपच पळत होती. बिट्टूने बाहेर पाहिलं. रस्त्याच्या दोन्ही कडेला फक्त टीव्हीच दिसत होते. एकेक टीव्हीचा पडदा एकेका भिंतीएवढा. भिंती टीव्हीच्या. घरे टीव्हीची. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नुसती एकशे दहा किलोमीटर टीव्हींचीच रांग. प्रत्येक टीव्हीत वेगवेगळी चित्रं. कुठे सिनेमा सुरू, तर कुठे मालिका. कुठे बातम्याच बातम्या तर कुठे गाणीच गाणी.
ही काय भानगड आहे? टीव्हीचं शोरूम आहे का हे? पण शोरूममध्ये काही एवढे मोठे टीव्ही नसतात. आणि शोरूममधून काही बस जात नसते. तशी ती गेली तर त्याला अक्सिडेन्ट म्हणतात. मग चॅनेलवर दिवसभर त्याच्याच बातम्या येतात. पण मग हे आहे तरी काय? या मँड्रेकने आपल्याला आणलंय तरी कुठं? बिट्टूला काहीच समजेना.
आपोआपच त्याचे डोळे भरून आले. आपण डिट्टो भोकाड पसरून रडावं, असं त्याला वाटू लागलं. पण रडणार कसं? तो मँड्रेकबाबा जागा झाला आणि त्याने पुन्हा हीमक्लिमआइस्क्रीम केलं म्हणजे?
त्याला मम्मीची, पप्पांची, घराची, शाळेची जाम म्हणजे जाम आठवण आली.
तेवढ्यात त्याची स्कूलबस कर्रकच्चदिशी वळली आणि पॉंग पॉंग करत एक भल्या मोठ्या टीव्हीमध्ये अलगद घुसली.
बिट्टू पाहतो तर काय, टीव्हीच्या आत सगळी त्याच्या ओळखीची कार्टून!
डोनाल्ड डक डुलत डुलत चाललेला. टॉम आणि जेरी एका कट्ट्यावर बसून मस्त गप्पा मारत बसलेले. रोड रनर बसस्टॉपवर पेपर वाचत उभा. सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, आयरनमॅन सायकलवरून चालले होते... आणि बिट्टूचा लाडका गणेशा एका हॉटेलात बसून डिट्टो मोदक चापत होता!
गणेशाला पाहताच बिट्टूचा चेहरा एकदम उजळला. आता काही काळजी नाही. गणेशा आपल्याला बरोबर मम्मीकडं घेऊन जाईल. फक्त तो आपल्याला भेटला पाहिजे. त्याला हाक मारण्यासाठी बिट्टूने तोंड उघडलेच, पण तितक्यात त्याची बस तिथून वेगाने पुढे गेली. बिट्टू पुन्हा हिरमुसला. बाहेर आवडती कार्टून असूनही त्याला गंमत वाटेनाशी झाली.
ती स्कूलबस एका भल्यामोठ्या बंगल्यासमोर कचकन् आपोआप उभी राहिली. त्या धक्क्याने जादूगार मँड्रेक उठला. आयायी करत त्याने भलाथोरला आळस दिला. मग जादूची छडी फिरवली. त्याबरोबर गेटचा दरवाजा उघडला. बिट्टूला वाटले, हॉरर सिनेमातल्याप्रमाणे तो करकर आवाज करत उघडेल. पण तो गुपचूपच उघडला!
चला, उतरा आता. आला आपला लास्ट स्टॉप,” मँड्रेक म्हणाला.
बिट्टूने त्याची एकशेदहा किलोची स्कूलबॅग उचलली आणि तो खाली मान घालून चालू लागला. मँड्रेक महालात तो आला आणि त्याच्या पाठोपाठ महालाचा दरवाजा खटकन् बंद झाला.
जादूगार मँड्रेकच्या तावडीत बिट्टू पुरता कैद झाला.||||
मँड्रेक महालमधल्या एका खोलीमध्ये बिट्टूला ठेवण्यात आलं होतं. साधीसुधी खोली नव्हती ती. जादूची होती. तिथं लोळायला मऊमऊ गाद्या होत्या. फिरत्या खुर्च्या होत्या. जादूच्या कपाटात हवी ती चॉकलेट्स होती. जादूच्या फ्रिजमध्ये हवी ती आइस्क्रिम होती. एका कोप-यात तर वेफर्स अन् पॉपकॉर्नचं जादूचं यंत्रच होतं. मॅगी, पिझ्झा, बर्गर काय हवं ते सगळं होतं. खायचं तर तेच. पोळीभाजीचं नावसुद्धा नको. आणि एक भिंतीवर भिंतीएवढा टीव्ही. चोवीस तास सुरू. सुरुवातीला बिट्टूला त्याची जाम गंमत वाटली
हवं ते खायचं, हवं तसं वागायचं. कधी लोळून टीव्ही पाहायचा, तर कधी टीव्ही पाहात लोळायचं.
बिट्टू, जेवून घे आता! बिट्टू, किती वेळ टीव्ही पाहतोयस? बिट्टू, होमवर्क केला का? बिट्टू, झोपून घे आता! अशी कोणाची कटकट नाही. कोणी बोलायला नाही, की रागवायला नाही. डिट्टो मज्जानू लाइफ!
पण मज्जा असते तेवढ्यापुरतीच! फार काळ मज्जा झाली की तिची फज्जा होते! बिट्टूला काही वेळातच त्या सगळ्याच कंटाळा आला. मम्मीची,  पप्पांची, घराची, शाळेची, सोसायटीच्या वॉचमनची, फार काय फोर्थ-बी मधल्या दुष्टदुम्नची अन् लेडी नोबिताचीसुद्धा आठवण त्याला येऊ लागली.
पण या जादूच्या महालातून सुटायचं कसं? विचार करता करता त्याचा डोळा कधी लागला हे त्यालासुद्धा समजलं नाही.
अचानक कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. खिडकीच्या काचेवर कोणीतरी टकटक करीत होते. पडदा दूर करून त्याने पाहिलं अन् तो आनंदाने उड्याच मारू लागला. गाऊ लागला...
भीम भीम भीम... छोटा भीम छोटा भीम...”
अरे हो हो, जरा हळू! कोणी ऐकलं म्हणजे? इथं जादूचे सीसीटीव्ही बसवलेले आहेत,’’ भीम म्हणाला.
हायला! मग आता?.... भीम, मला सोडव इथून...”
‘’आधी खिडकी तर उघडशील की नाही?” भीम हसत हसत म्हणाला.
जादूची खिडकी ती. बिट्टूला उघडताच येईना. अखेर भीमने एका बुक्कीने तिची काच फोडली आणि तो आत आला.
भीम, मला मँड्रेकने किडनॅप केलंय. मला सोडव. चल, आपण या खिडकीतून पळून जाऊ.”
भीम गंभीरपणे म्हणाला, “खिडकीतून जाणं सोपं आहे रे. पण या देशातून कसं बाहेर पडणार?  तू कैदी आहेस या देशाचा.
ते ऐकून बिट्टूच्या पोटात पुन्हा एकदा फूटबॉलएवढा गोळा आला. त्याने विचारलं, “मी कैदी? आणि हा कोणता देश आहे?”
भीम म्हणाला, “ते नंतर सांगतो. आधी आपण तो जादूगार येण्याच्या आत बाहेर पडू या.”
ती खोली असली तरी तिची उंची खूप होती. तेव्हा भीमने बिट्टूला आपल्या खांद्यावर घेतलं आणि खिडकीतून खाली उडी मारली.
खाली चुटकी त्यांची वाटच पाहात होती.
चला चला, लवकर चला...  मँड्रेकची फरारी कार आताच महालात शिरलीय. त्याला काही कळण्याच्या आत इथून पळालं पाहिजे.” चुटकी म्हणाली.  आणि त्या तिघांनीही तिथून धूम ठोकली.||||
चुटकीच्या घरी ते आले तेव्हा दुपार झाली होती. भीमला खूप भूक लागली होती. बिट्टूच्या पोटातही कावळे ओरडत होते. तेव्हा त्यांनी ठरवलं की आधी पोटोबा आणि मग गप्पांचा विठोबा!
चुटकीच्या आईने त्यांना पालकची भाजी आणि ज्वारीची रोटी वाढली.
चुटकीने विचारलं, “बिट्टू, तुला चालेल ना हे? नाही तर तुझ्यासाठी जेम्सची उसळ, कुरकुरेची भाजी आणि बिस्किटांची भाकरी आणू का?”
भाजी-भाकरीचा मोठ्ठा घास तोंडात कोंबत बिट्टू म्हणाला, “अंहं! हेहॉबॉजॉकॉखॉठॉ... 
कॅय म्हणालास?”
तोंडातला घास गिळून बिट्टू म्हणाला, मी म्हणालो, हेच जेवण मस्त आहे. पण भीम हे का खातोय? ही तर पोपॉय द सेलर मॅनची आवडती भाजी आहे.”
भीम म्हणाला, “म्हणजे काय मी सतत लाडूच खात असतो की काय? नुसते लाडू खाऊन का कधी ताकद येते? ते फक्त शूटिंगच्या वेळी खातो मी.”
बिट्टूला हे शूटिंग बिटिंग काही कळेनाच. तो म्हणाला, “म्हणजे?”
चुटकी म्हणाली, “अरे, याला काही माहितच नाही. याला वाटतंय, आपण सगळे कार्टूनच आहोत.”
मग तुम्ही कार्टून नाहीत?”
भीम म्हणाला, “कार्टून आहेत रे. पण कार्टून नाही! छे! याला सगळं दाखवल्याशिवाय समजणारच नाही. चल पाहू माझ्याबरोबर.”
ते सगळे बाहेर पडले.
चालता चालता भीम सांगू लागला, “जादूगार मँड्रेकने तुला किडनॅप करून कुठं आणलंय हे तुला माहित आहे का? अरे, हा यूएसटी नावाचा देश आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ टीव्ही. तुला येताना सगळीकडे टीव्हीच टीव्ही दिसले असतील ना?  ती या देशातली छोटीछोटी राज्यं आहेत. बातमीनाडू, मालिकाप्रदेश, गानराष्ट्र अशी त्यांची नावं. आपल्या या राज्याचं नाव टून्देश. आम्ही सगळे इथं राहतो.”
हायला, तो बघ पोकेमॉन पिकाचू. तिथं लाइटच्या खांबावर चढतोय.”
चुटकी म्हणाली, “तो कार्टन मालिकेत शॉक देत असला, तरी इथं मात्र लाइट दुरुस्तीचं काम करतो. आम्ही त्याला सुपरमॅनसारखं वायरमॅन म्हणतो!”
पिकाचूने वरूनच त्यांना हात केला. बिट्टूनेही त्याला हात केला.
जरा वेळाने भीम म्हणाला, चला,  आपण चौधरी स्कूलमध्ये जाऊ. यावेळी तिथं सगळेच भेटतील.”
हे कसलं स्कूल?”
अक्टिंग स्कूल आहे ते. चाचा चौधरींचं.”
रोडरनर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसच्या बसने ते चौधरी स्कूलमध्ये आले.  त्यावेळी तिथं मधली सुटी सुरू होती. कोणी आपलं टिफिन खात होतं. कोणी नुसतंच इकडून तिकडं धावत होतं. एका कोप-यात टॉम आणि जेरी भांडणाची रिहर्सल करीत होते. मैदानात क्रिश आणि जादूची पोत्यात बसून धावण्याची शर्यत सुरू होती. डोरेमॉन अन् सुपरमॅन उडण्याची प्रॅक्टिस करीत होते. ही सगळी चंमतग पाहून बिट्टूच्या तोंडाचा जो आ झाला तो मिटेनाच! पण त्याला खरा धक्का बसला तो शिनचॅनला पाहून. एरवी कार्टूनमध्ये वात्रट मस्ती करणारा शिनचॅन वर्गात बाकावर शांतपणे आयपॅडमध्ये काही तरी पाहात बसलेला होता. 
शिनचॅनची तब्येत तर बरी आहे ना?” बिट्टूने भीमला विचारलं.
अरे तसं काही नाहीये. तोपण तुझ्यासारखाच आहे. पाहावं तेव्हा आयपॅडवर सिरियल्स पाहात असतो, नाहीतर मोबाईलवर गेम्स खेळत असतो, चुटकी म्हणाली.
तो कार्टून पाहतो?”
नाही रे. पृथ्वीवरल्या मुलांचे रिअलिटी शो पाहतो.
भीम म्हणाला, मला पण हे कार्यक्रम खूप आवडतात. तुम्ही मुलं कार्टून पाहताना काय कार्टूनसारखे दिसता माहितेय!”
हायला, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं!” बिट्टू म्हणाला.
तेच तर सांगतोय मी. तुम्हांला हे समजत नाही, पण एकसारखी कार्टून पाहून मुलं कार्टूनसारखीच दिसायला लागतात. ती पूर्ण कार्टून झाली, की मग जादूगार मँड्रेक त्यांना टून्देशात आणतो. मग त्यांना इथं कार्टून सिरियल्समध्ये काम दिलं जातं.
बाप रे! म्हणजे मी कार्टून झालोय? मला आता इथंच राहावं लागणार?” बिट्टूचा आवाज एकदम रडवेला झाला.
इथून सुटका होणं मोठं कठीण आहे. पण घाबरू नकोस. गणेशा आहे ना. तो तुला नक्की मदत करील, भीमने त्याला धीर दिला.
कुठं आहे गणेशा? गणेशा... गणेशा...
त्याच्या रडवेल्या हाका ऐकून खुद्द गणेशाच तिथं प्रकट झाला. म्हणाला,
बिट्टू, रडू नकोस. तुझी सुटका येथून होणारच आहे. पण त्यासाठी मी तुला मदत करणार नाही. तुझी तूच सुटका करून घ्यायची आहे. जर तू तसं केलं नाहीस, तर मात्र तुला परत जादूगार मँड्रेकच्या महालात जावं लागेल.
नको नको. तू सांगशील तेच मी करीन. डिट्टो. बिट्टू म्हणाला.
फार अवघड नाहीये ते. फक्त एक बटण दाबायचं.
मग दाबीन की!”
अंहं, ते एवढंही सोपं नाहीये. अनेकांना तर ते जमतच नाही.
असं कोणतं बटण आहे ते?”
टीव्हीच्या रिमोटवरचं.... लाल बटण!”
म्हणजे टीव्ही बंद करण्याचं?”
अनेक मुलांना ते बटण दाबून टीव्ही बंद करायचा असतो हेच समजत नाही. तासन् तास टीव्हीवर कार्टून पाहात बसतात. मग टून्देश त्यांना कैद करतो. तुला हे बटण योग्य वेळी दाबायचं असतं हे समजलं की झालं. तू सुटलास टून्देशाच्या कैदेतून. गणेशा अतिशय गंभीरपणे म्हणाला.
चल तर मग. हा घे रिमोट आणि दाब पाहू लाल बटण, भीम म्हणाला.
बिट्टूने त्या बटणावर बोट ठेवलं. त्याबरोबर घणघण अशी घंटा वाजली अन् त्या आवाजाने एकेक करून सर्व कार्टून हवेत विरून जाऊ लागली.
बिट्टूने हात हलवत त्यांना निरोप दिला. बाय बाय, गणेशा. बाय बाय भीम, चुटकी... मी रिमोटचं हे बटण नेहमी लक्षात ठेवीन. प्रॉमिस!”
अजूनही ती घणघण घंटा वाजतच होती. त्या कर्कश आवाजाने बिट्टूने डोळे उघडले.
पाहतो तो काय, तो आपल्याच घरात कोचवर होता. समोर टीव्ही सुरू होता. तो पाहता पाहता आपल्याला कधी झोप लागली हेच त्याला समजलं नव्हतं.
पुन्हा एकदा घंटा वाजली. तसे टुणदिशी उडी मारून त्याने दरवाजा उघडला. बाहेर मम्मी, पप्पा उभे होते.
बिट्टूने त्यांना घट्ट मिठी मारली आणि गहिवरल्या आवाजात म्हणाला,

मम्मी, मी आता जास्त वेळ कार्टून पाहणार नाही. तू सांगशील तेवढाच वेळ कार्टून पाहीन. गणेशा शप्पथ!”

पूर्व प्रसिद्धी - लोकप्रभा १७ मे २०१३. 4.5.2013 for lokprabha

Read more...

No comments: