हेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ

ये शॅल नो द ट्रुथ!
1.
सकाळची वेळ. कोणत्याही शहरात तशी ही वेळ लगबगीचीच. मुंबईत तर अधिकच. शेजारच्या नवी मुंबईचीही तऱ्हाही याहून वेगळी नसते. तिथं तर आणखी वेगळं चित्र दिसते. सकाळी नोकरी-धंद्यासाठी तिथून जेवढे लोक बाहेर जातात तेवढेच लोक तिथं येतात. दर संध्याकाळी हेच चित्र उलटं होते. गेली अनेक वर्षे हे असंच चालू आहे. नवी मुंबईची एक भली मोठी धर्मशाळा झालेली आहे. धर्मशाळेत रोज नवी माणसं येतात जातात. इथं माणसं तीच ती असतात. एवढाच फरक.

एक मात्र खरं की यामुळे नवी मुंबई हे शहर पोलिसांच्या दृष्टीने एक मोठी डोकेदुखी बनलेलं आहे. कोणीही यावं, कुठंही राहावं, कधीही जावे, कुणाला कशाचा पत्ता नाही. आणि लागणार तरी कसा? नसत्या चौकशा करायला इथं आहेच कुणाकडे वेळ?

म्हणूनच नवी मुंबईच्या खाडीकिनारी उभ्या असलेल्या आलिशान इमारतीच्या तेराव्या मजल्यावरील राजेशाही अपार्टमेंटमध्ये कोण राहात आहे, याची चौकशी तरी कोण कशासाठी करील? गेली काही वर्षे हे अपार्टमेंट रिकामंच होतं. सोसायटीच्या सेक्रेटरीला विचाराल तर एवढंच समजेल की त्याचा मालक कोणी जॉर्डनचा शेख आहे. त्याचा मुलगा नवी मुंबईत शिकायला येणार होता. त्यासाठी त्याने हे अपार्टमेंट खरेदी करून ठेवलं होतं. पण तो मुलगा काही आलाच नाही. तो शेखही कधी कुणाला दिसला नाही. त्याचा एक एजंट या अपार्टमेंटची देखभाल करतो.

वॉचमनलाही याहून अधिक काही माहिती असायचं कारण नाही. पण विचारलं, तर तो एवढं सांगू शकेल की गेल्या सात-आठ महिन्यांपासून तिथं कोणा अरबाचं कुटुंब राहायला आलं आहे. आपले नोकरसुद्धा त्यांनी तिकडूनच आणले आहेत. एकजात सगळे गुंडांसारखे दिसतात. बहुतेक हा अरब म्हणजे तिकडचा कोणी डॉन असावा.
हा झाला वॉचमनचा कयास. पण वॉचमन म्हणजे काही चारित्र्याचं प्रमाणपत्र देणारी संस्था नव्हे.

आताही वर पाहाल, तर सकाळच्या कोवळ्या उन्हात कॉफीचे घोट घेत, सिगार ओढत उभा असलेला तो अरब त्या तेराव्या मजल्याच्या बाल्कनीत दिसेल. अंगावरचा उच्च अभिरुची दर्शविणारा पायघोळ रोब, डोळ्यांवरचा सोनेरी फ्रेमचा चष्मा. रेलिंगला टेकून उभा आहे, पण त्यातलीही खानदानी ऐट... हे सगळं पाहता तो किमान एखाद्या मल्टीनॅशनलचा सीईओ असला पाहिजे असं वाटतं. तो नक्की कोण आहे, त्याचा पोटापाण्याचा उद्योग काय आहे, तो नवी मुंबईत का आला हे मात्र कोणालाच माहित नाही. सोसायटीचं सोडूनच द्या. पोलिसांनासुद्धा ते माहित नाही. "रॉ' किंवा "आयबी'चं मात्र सांगता येत नाही.


2.
शुक्रवार, दि. 12 डिसेंबर 2003
सकाळी 8.35 (आयएसटी)

भल्या पहाटे मासेमारीसाठी गेलेली मच्छीमारांची होडकी खाडीच्या त्या चंदेरी-काळ्या पाण्यात पिंपळपानासारखी तरंगताना दिसत होती. एखाद्या कॅलेंडरप्रमाणे दिसणारं ते दृश्‍य तो बराच वेळ पाहात होता. निःस्तब्ध. एकटक. त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे स्नायू डिसेंबरच्या त्या फिक्‍या थंडीने जणू गोठून गेले होते. समोर खाडी शांत होती. त्याच्या मनात मात्र मोठं वादळ घोंघावत होतं. पण त्याच्याकडे पाहून कोणालाही, अगदी आत दिवाणखान्यात बसलेल्या त्याच्या बेगमलासुद्धा त्या वादळाचा पत्ता लागला नसता.

डोळ्यांच्या कोपऱ्यातून अचानक त्याला कसलीशी अस्पष्ट हालचाल जाणवली. तसा तो एकदम सावध झाला. कमीतकमी हालचाल करीत त्याने हातातला कॉफीचा कप बाजूला ठेवला. सिगार डाव्या हातात घेतली. उजवा हात रोबच्या खिशात सरकावित तो अचानक वळला.
त्याचा सेवक कम अंगरक्षक एका ट्रेमध्ये सेलफोन घेऊन येत होता. त्याला पाहताच खिशातल्या रिव्हॉल्वरच्या ट्रिगरवरचं बोट काढीत तो सैलावला.

माणसाने साठी ओलांडली म्हणजे चाळिशीही साथ देत नाही. सेलफोनचा स्क्रीन अगदी नजरेजवळ धरत तो नंबर पाहू लागला. नंबर ओळखीचाच होता. तसा तो नसता, तर हा फोन त्याच्यापर्यंत आलाही नसता. त्याच्या सेवकांनीच तो परस्पर कटवला असता. मुळात असा अनोळखी फोनच त्याला आला नसता. हेही त्याला माहित होतं. तरीही त्याने खात्री करून घेतली आणि मगच तो सेलफोन आपल्या कानाला लावला.
पलीकडून बोलणारा अतिशय उत्तेजित होऊन बोलत होता.

"अमेरिकी लष्कराने अखेर त्याला पकडलंच. अल्‌ दावरमध्ये अटक केली. नक्की काही समजत नाहीये. पण इथं बगदादमधे चर्चा आहे, कुणा तिक्रितीनंच ब्रेमरला त्याचा पत्ता दिला...''
तो मात्र थंडच होता.
"कसं पकडलं? जिवंत... की मेलेलं?''
"काहीच पत्ता लागत नाहीये. नक्की कोणालाच माहिती नाही. सगळाच गोंधळ आहे. पण जिवंतच पकडलं असणार...''
"ब्रेमर प्रेसशी कधी बोलतोय?''
"उद्या.''
"ठिक आहे. पण त्याआधी मला सगळी माहिती मिळाली पाहिजे.''

फोन बंद करून तो काही वेळ तसाच, खाडीच्या पाण्यातल्या त्या पिंपळपानांकडं पाहात विचारमग्न उभा राहिला. मग आत गेला.

"हे वाचलंत? आपले लोक कसे लढताहेत. बगदाद, तिक्रित, मोसूल सगळीकडं अजूनही युद्ध सुरू आहे. लोग मर रहे हैं, लेकिन मार भी रहे हैं...'' त्याची पत्नी "टाइम्स' पुढे करीत म्हणाली.
टीव्हीवर "सीएनएन' लावत तो पुटपुटला, "आणखी काही दिवसांचीच गोष्ट आहे. मग थांबेल हे सगळं.''
"म्हणजे?''
"सद्दामला अटक झालीये.''
"सद्दामला अटक? कसं शक्‍य आहे?''

तिचा विश्‍वासच बसत नव्हता. सद्दामला अटक. हे काहीतरी विनोदच करताहेत. पण त्यांचा चेहरा तर अगदी गंभीर आहे. तिला काही समजेनाच.
हळूहळू त्याच्या वृद्ध डोळ्यांत मिश्‍किल हसू उतरू लागलं. आणि मग तिला एकदम सगळ्याच उलगडा झाला. त्या एका वाक्‍याचे सगळे परिणाम तिच्या ध्यानात आले. आपले वय, आपला रुतबा, सर्व काही विसरून ती जोरजोरात हसू लागली. हसता हसता तिच्या डोळ्यांतून गेल्या वर्षभरातले दुःख वाहू लागले.

हळुवारपणे तिचे अश्रू पुसत, तिच्या पाठीवर हलकेच थोपटत, तो तिच्या कानात पुटपुटला, "सब्र करो बेगम. आता सगळं काही ठीक होईल.''


3.
शुक्रवार, दि. 12 डिसेंबर 2003.
सकाळी 9.05 (आयएसटी)
व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश आपल्या प्रेसिडेन्शियल चेअरमध्ये बसले होते. समोर अध्यक्षांच्या संरक्षण सल्लागार कोंडालिसा राइस एका फाईलमध्ये डोके घालून बसल्या होत्या. बाजूला सोफ्यावर परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल, संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड, संरक्षण उपमंत्री पॉल वुल्फोवित्झ यांची आपसांत जोरदार चर्चा सुरू होती. तेवढ्यात बुश यांच्या टेबलावरील टेलिफोन वाजला. ते जणू त्याचीच वाट पाहात होते.
"येस, नॅन्सी.''
"मि. ब्रेमर इज ऑन लाइन, मि. प्रेसिडेंट सर.''
"येस येस, पूट हिम ऑन.''

व्हाइट हाऊसच्या मेनबोर्डवरील टेलिफोन ऑपरेटर लाइन जोडून देत असतानाच माऊथपिसवर हात ठेवत ते सगळ्यांना उद्देशून म्हणाले, "इट्‌स पॉल.... या पॉल, गिव्ह अस सम गुड न्यूज...''

इराकमधील अमेरिकेचे प्रशासक पॉल ब्रेमर यांच्याशी बोलून बुश यांनी रिसीव्हर क्रेडलवर ठेवला, तेव्हा त्यांचा चेहरा आनंदाने अक्षरशः फुलला होता.

सगळ्यांकडे विजयी, आनंदी मुद्रेने पाहात ते म्हणाले, "वेल, लेडीज ऍण्ड जंटलमेन, इट्‌स टाइम टू सेलिब्रेट. पॉलने आत्ताच मला सांगितलं, डीएनए टेस्टचे रिझल्ट पॉझिटिव्ह आलेत. तो सद्दामच आहे.''

त्या वाक्‍यासरशी ओव्हल ऑफिसमध्ये जणू आनंदाची हजारो कारंजी उसळली. राइस यांनी झटकन उठून बुश यांचा हात हातात घेतला. टाळ्या वाजवत पॉवेल, रम्सफेल्ड, वुल्फोवित्झ यांनी बुश यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

"पण आपण खऱ्या अर्थाने अभिनंदन करायला हवं ते वुल्फी आणि विल्यमचं...'' खुषीची पहिली लहर ओसरल्यानंतर बुश म्हणाले. विल्यम म्हणजे विल्यम टेनेट. सीआयएचे संचलक. या वेळी ते सीआयएच्या लॅंगलेतील मुख्यालयाच्या सातव्या मजल्यावरील पेन्टहाऊसमधील आपल्या कार्यालयात बसून इराकमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

"...या ऑपरेशनचं क्रेडिट वुल्फी अन्‌ विल्यमचं आहे. पॉल त्याबद्दल तूच सांग ना,'' वुल्फोवित्झ यांच्याकडे वळत बुश म्हणाले.
"वेल, ऍज यू नो, 9 एप्रिलला आपण बगदाद जिंकलं. तेव्हापासून आम्ही सद्दामच्या मागावरच होतो. त्यासाठी फोर्थ इन्फन्ट्री डिव्हिजनच्या फर्स्ट ब्रिगेडच्या सहाशे सैनिकांचं एक स्पेशल पथक तयार केलं होतं. सद्दाम तिक्रितमध्येच लपल्याचा संशय आम्हाला होताच. गेल्या आठवड्यात त्याची पक्की टीप आम्हाला मिळाली...''
"कोणी दिली ती टीप?'' पॉवेल यांनी विचारले.
"सद्दामचाच एक नातेवाईक आहे. अगदी जवळचा. पण बक्षीसाची 25 मिलियन डॉलर्स ही काही कमी रक्कम नाही,'' वुल्फोवित्झ म्हणाले, "सीआयएच्या स्टेशन इनचार्जच्या माध्यमातून त्याने ब्रेमरशी संपर्क साधला. अल्‌ दावर... तिक्रितजवळचं हे एक छोटं खेडं आहे.... तिथं एका फार्म हाऊसमध्ये सद्दाम लपल्याची माहिती त्याने दिली. पुढं काय झालं हे तुम्हाला माहितच आहे...''
"त्याच्या डीएनए टेस्टबद्दल काय? ती रिलायबल आहे ना?'' राइस यांनी त्यांना मध्येच अडवलं.
"ऍब्स्युलेटली! त्याचे डीएनए सॅम्पल्स सीआयएकडे होतेच. प्रश्‍न फक्त ते मॅच होण्याचा होता...''
"... आणि ते मॅच झालेयत. आताच ब्रेमरनं ते कन्फर्म केलंय,'' बुश यांनी सांगितलं. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरून विजयाचा आनंद अगदी ओसंडून वाहात होता.

"आपण ही बातमी कधी जाहीर करणार आहोत?'' पॉवेल यांनी विचारले.
"उद्या! उद्या मी स्वतः मीडियाशी बोलेन,'' बुश म्हणाले.
"मिस्टर प्रेसिडेंट, मला वाटतं त्यापेक्षा ही स्टोरी बगदादमधून येऊ द्यावी. ते अधिक नॅचरल होईल. वॉशिंग्टनमधून आपण फक्त ती लिक करू यात,'' राइस यांनी सुचवलं. त्यावर जरा वेळ विचार करुन बुश "ओके' म्हणाले.
ते या सूचनेला होकार देणार याची तेथील सगळ्यांनाच खात्री होती. कारण सूचना कोंडालिसा राइस यांची होती!


4.
शुक्रवार, ता. 12 डिसेंबर 2003.
सकाळी 9.55 (आयएसटी)
"सीएनएन', "बीबीसी'पासून अगदी "आजतक'पर्यंत सगळे चॅनल्स सर्फ करून करून तो अखेर कंटाळला. अमेरिकी सैन्यावर झालेला आत्मघातकी हल्ला आणि "सीएनएन'च्या एका महिला पत्रकाराने केलेली एक ह्युमन इंटरेस्ट स्टोरी वगळता इराकमधील अन्य कोणतीही बातमी अद्याप दाखवली जात नव्हती. ती एवढ्यात दाखवलीही जाणार नव्हती. पण ते त्याला माहित असण्याचे काहीही कारण नव्हते. आणखी काही वेळ बातम्या पाहून त्याने आपल्या सेलफोनवर एक इंटरनॅशनल कॉल लावला. या परिस्थितीत कुणालाही फोन करणे चूक होते. वातावरण अजूनही धोकादायक होते. फोन टॅपिंगची शक्‍यता अधिक होती. नव्हे, तो टॅप होतच असणार याची त्याला पूर्ण खात्री होती. अर्थात या सेलफोनलाही स्क्रॅम्बलर जोडलेला असल्याने तो टॅप झाला तरी त्यावरील संभाषण दुसऱ्या कुणाला कळणे अशक्‍य होते. त्यामुळेच त्याने हा धोका पत्करण्याचे ठरविले.

पलिकडून उत्तर येताच त्याने विचारले, "काही नवीन खबर?''
"चांगली खबर आहे, सय्यदी रईस,'' पलिकडून अतिशय अदबीने उत्तर आले. ते अपेक्षितच होते. "सय्यदी रईस' हे आदरार्थी विशेषण मिरवणाऱ्या व्यक्तिशी इराकमध्ये तरी कोणी उद्धट बोलू शकत नाही. "तुमचा प्लॅन फत्ते झालाय. त्याला पकडलं त्यांनी.''
""मला माहित असलेल्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगू नकोस,'' तो काहिशा चिडक्‍या आवाजात म्हणाला, ""त्याला जिंदा पकडलं की मुर्दा हे महत्त्वाचं आहे.''
""जिवंतच हाती लागला तो, सय्यदी रईस.''
"त्याच्याकडं पिस्तुल होतं ना?'' त्याने विचारलं. वास्तविक हे विचारण्याचीही आवश्‍यकता नव्हती. बगदाद सोडण्यापूर्वी त्याने स्वतःच त्याच्या हातात ती प्रसिद्ध गोल्ड प्लेटेड बेरेटा गन ठेवली होती.
"पिस्तुल होतं त्याच्याकडं, सय्यदी रईस. पण ते चालवण्याची त्याची हिंमतच झाली नाही. सद्दाम हुसेन यांच्या नावाला काळिमा फासला त्याने. घाबरला तो. उदय आणि कुसै अखेरपर्यंत लढत होते. हा न लढताच शरण गेला.''

ते ऐकताच त्याचा संताप अनावर झाला. दाढा आवल्या गेल्या. डोळे अधिकच दगडी बनले. काही क्षण तसेच थंड शांततेत गेले.
मग स्वतःला सावरत त्याने विचारले, "त्याची ओळख पटली?''
"हां सय्यदी रईस. अमेरिकी सैनिकांनी पकडल्याबरोबर त्याने, मीच इराकचा अध्यक्ष म्हणून कबुली दिली. त्यांनीही तोच सद्दाम हुसेन आहे हे ओळखलं. शिवाय त्याची डीएनए टेस्टही करण्यात आलीय. तिच्यात तर तोच सद्दाम हुसेन आहे हे सिद्ध होणारच होतं. सीआयला डीएनएचे सॅम्पल्स आपल्याच लॅबमधून देण्यात आले होते.''
"त्याची बायको आणि मुलं?''
"बायको बिमार आहे त्याची. तिक्रितमध्येच लपवलंय तिला. एक मुलगा होता. रिपब्लिकन गार्डमध्ये. पण त्याचा काही पत्ता नाही.''
"ठिक आहे. त्याच्या बायकोची काळजी घ्या.''

आता त्याची बरीचशी चिंता दूर झाली होती. सद्दामला अमेरिका फासावर चढवणार हे नक्की होतं. त्याला जिवंत ठेवून कोणालाही इराकमध्ये फार काळ राज्य करता येणार नाही, हे सगळेच जाणून होते. सद्दाम जिवंत राहणं कोणालाच परवडण्यासारखं नाही. पण त्याआधी खटला चालवण्याचं नाटक होईल. सद्दामची चौकशी होईल. त्या वेळी तो काय सांगेल? सगळं खरं सांगेल?... पण नंतर त्यानं काहीही सांगितलं तरी काही फरक पडणार नाही. फक्त आपण सावध राहिलो की झालं.

या नुसत्या विचारांनी त्याला आपल्या डोक्‍यावरील टांगती तलवार दूर झाल्यासारखे वाटले. ९ एप्रिलला अमेरिकी रणगाडे बगदादमध्ये घुसले. त्यानंतर एकही गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नव्हती. आपल्याच मायभूमीतून त्याला एखाद्या चोराप्रमाणे पळावे लागले होते. एवढ्या महिन्यांनंतर आज त्याला काहीसे सुरक्षित वाटू लागले होते. आणखी काही दिवसांचीच गोष्ट आहे. एकदा त्या सद्दामला फासावर चढवण्यात आले, की मग बाकीचे आयुष्य शांततेत जगता येईल असा विश्‍वास त्याला वाटू लागला होता. भविष्याच्या त्या सुखद स्वप्नात मायभूमी, सत्ता, ऐश्‍वर्य या सर्व गोष्टींना मुकावे लागल्याची त्याची खंतही वाहून गेल्यासारखे झाले...



5.
शनिवार, ता. 13 डिसेंबर 2003.
सायंकाळी 4.45 (आयएसटी)
दुपारपासून सगळे चॅनेल्स अगदी वेडावल्यासारखे झाले होते. एकच एक बातमी पुन्हा पुन्हा सांगत होते. सद्दाम हुसेन यांना अटक. अंदाज, शंका, प्रतिक्रिया, तज्ञांची मतमतांतरे... नुसता हल्लागुल्ला सुरू होता. पेंटॅगॉन, ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी या बातमीला दुजोरा दिला होता. पण त्यावर विश्‍वास ठेवावा की ठेवू नये? कोणालाच काही समजत नव्हते. इराकमधील अमेरिकेचे प्रशासक पॉल ब्रेमर पत्रकार परिषद घेणार आहेत, हे जाहीर होताच सगळ्या जगाचे लक्ष तिकडे लागले होते. परिषदेच्या ठिकाणी पत्रकारांची एकच गर्दी झाली होती. अखेर सायंकाळी साडेचारच्या सुमारास ब्रेमर आपल्या सहकाऱ्यांसह परिषदेच्या ठिकाणी आले. सगळ्यांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.
एकवार सगळ्या पत्रकारंवरून नजर फिरवित ब्रेमर बोलू लागले,
"लेडिज ऍण्ड जंटलमेन, वुई गॉट हिम!''

त्यांचे ते वाक्‍य पूर्ण होते न होते तोच आनंदाच्या चित्कारांनी, सद्दामविरोधी घोषणांनी अवघे सभागृह दुमदुमून गेले. या पूर्वी कोणत्याही पत्रकार परिषदेमध्ये असे कधी घडले नव्हते. आज खरोखरच इतिहास घडत होता.



6.
शनिवार, ता. 13 डिसेंबर 2003.
सायंकाळी 5.00 (आयएसटी)
"रॉ'चे संचालक सी. डी. मुखर्जी अतिशय गहन विचारात बसले होते. समोर एक "टॉप सिक्रेट' फाईल उघडी पडली होती. तिच्यात वरच ठेवलेला कंप्युटर प्रिंटआऊट त्यांनी पुन्हा हातात घेतला. आतापर्यंत इतक्‍या वेळा त्यांनी तो वाचला होता, की त्यातील शब्द न्‌ शब्द त्यांना मुखोद्‌गत झाला होता. बगदाद, तेहरान आणि काबूलहून "रॉ'च्या गुप्तहेरांनी पाठविलेले रिपोर्टही त्याच फाइलमध्ये होते. ब्रेमर यांच्या पत्रकार परिषदेत दाखविण्यात आलेली सद्दाम हुसेन यांची केविलवाणी छायाचित्रे तर अजूनही त्यांच्या दृष्टीसमोर तरळत होती.

आणि त्यानेच ते कोड्यात पडले होते. त्यांच्या हातातील रिपोर्टशी ती छायाचित्रे काही केल्या जुळत नव्हती. कसे शक्‍य आहे हे?

पण आजवरच्या गुप्तहेर खात्यातील अनुभवाने त्यांना एक गोष्ट शिकविली होती, की सत्यालाही अनेक चेहरे असतात. जे दिसते ते सत्य असते असेही नसते. सगळ्या शक्‍यता एकदा बाद झाल्या की खाली जे उरते, ते कितीही अतर्क्‍य असले तरी सत्यच असते. या कसोटवर ते आपल्या समोरील माहिती ताडून पाहात होते. एकच व्यक्ती एकाच वेळी दोन ठिकाणी असणे अशक्‍य आहे, हे त्यांनाही माहित होते. पण तसे जर दिसत असेल तर? एकच व्यक्ती एकाच वेळी दोन ठिकाणी असेल, तर?...

... तर दोन्हींतली एक व्यक्ती बनावट आहे हे समजावे. मग अमेरिकेच्या ताब्यात कोण आहे? मुखर्जी यांना याच प्रश्‍नाचे उत्तर शोधायचे होते.



7.
शनिवार, दि. 13 डिसेंवर 2003.
सायंकाळी 5.00 (आयएसटी)
सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्‍ट, बेलापूरमधील त्या पंधरा मजली इमारतीच्या तेराव्या मजल्यावरील त्या अपार्टमेंटमध्ये आज दुपारी अगदी ईदच साजरी करण्यात आली होती.
माणसे मोजकीच होती. तो, त्याची बायको, धाकटा मुलगा, तीन सेवक वजा अंगरक्षक आणि त्याच्या बायकोची सेविका. पण त्यांचा आनंद आभाळाएवढा होता. ब्रेमरच्या पत्रकार परिषदेनंतर बगदादमध्ये कम्युनिस्ट कार्यकर्ते रस्त्यावर उतरून जेव्हा आनंदोत्सव साजरा करीत होते, त्या वेळी आनंदाने बंदुकीची फैर झाडायला त्याच्या अंगरक्षकांचे हात शिवशिवत होते. मोकाच तसा होता. पण इथला दस्तुर तसा नव्हता.

आता मात्र जो तो नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागला होता. त्याची बायको मात्र अजूनही टीव्हीला चिकटून होती.

"बेगम, तुम्ही आता अधिक काळ इथं राहणं ठिक नाही. जॉर्डनमध्ये एव्हाना तुमची चौकशी सुरू झाली असेल. तुम्ही लवकरच पॅरिसला गेलेलं बरं. तिथं माझी माणसं आहेत. पैशाचीही व्यवस्था केलेली आहे. आणखी काही दिवसांनी लोक आपल्यालाच काय, इराकलाही विसरतील. तेव्हा आपण पुन्हा एकत्र येऊ.''

बोलता-बोलता त्याचे डोळे पाणावले. तिच्या ते लक्षात येऊ नये म्हणून तट्‌कन उठून तो आपल्या बेडरूममध्ये गेला. बेसिनचा नळ सोडून आपल्या चेहऱ्यावर त्याने सपासप थंड पाण्याचे शिपकारे मारले. चेहरा पुसता-पुसता सहजच त्याचे लक्ष समोरच्या आरशातील आपल्या प्रतिबिंबाकडे गेले.

किती अनोळखी वाटतोय हा चेहरा. नुसती मिशी काढली आणि भुवया पातळ केल्या तरी माणसाचा चेहरा किती बदलतो! आज सहा महिन्यांनंतरही हा चेहरा अचानक पाहिला तरीसुद्धा आपण दचकतो! उत्तम वेशांतर तेच की जे कमीत कमी बदल करून केले जाते, असे इराकच्या गुप्तचर संघटनेचा, "मुखबरात'चा प्रमुख सादिक रेहमानी एकदा सांगत होता, ते किती खरे आहे.

चेहरा स्वच्छ पुसून तो बेडवर बसला. आता त्याला विश्रांतीची नितांत आवश्‍यकता होती. पण त्या आधी एक इंटरनॅशनल कॉल करणे आवश्‍यक होते. खिशातून सेलफोन काढून अमेरिकेतला एक नंबर तो डायल करू लागला.



8.
शनिवार, ता. 13 डिसेंबर 2003.
सायंकाळी 5.40 (आयएसटी)
लॅंगलेतील "सीआयए' मुख्यालयातील आपल्या कार्यालयातून विल्यम टेनेट बाहेर पडले. खास संचालकांसाठीच्या लिफ्टकडे जाण्यासाठी ते वळले, तोच त्यांचा सेलफोन व्हायब्रेट होऊ लागला. लिफ्टमध्ये शिरताच त्यांनी फोनच्या स्क्रिनवर नजर टाकली. हा कॉल त्यांना अपेक्षितच होता. पण तो एवढ्या लवकर येईल असे त्यांना वाटले नव्हते.

त्यांनी फोन कानाला लावताच पलिकडून फक्त दोन शब्द आले ः "थॅंक यू!'

टेनेट यांच्या पातळ ओठांवर एक हलकेसे स्मित तरळले. कॉल डिस्कनेक्‍ट करून त्यांनी पॉकेटवॉच बाहेर काढले. "व्हाइट हाऊस'मधील मिटिंग सुरू होण्यास आता केवळ वीस मिनिटांचाच अवधी होता. मिटिंग महत्त्वाची होती. विषय इराकचाच होता. लिफ्ट थांबताच ते घाईघाईने बाहेर पडले. जाताना नेहमीच्या सवयीने त्यांचे लक्ष समोरील मार्बलच्या भिंतीवर गेले आणि पुन्हा एकदा त्यांच्या ओठांवर स्मिताची एक अस्पष्ट रेषा उमटली. त्या भिंतीवर "सीआयए'चे ध्येयवाक्‍य कोरलेले होते. :
"ये शॅल नो द ट्रुथ ऍण्ड द ट्रुथ शॅल मेक यू फ्री.'
............................................................ 
पूर्ण. (ता. 14 जानेवारी 2004)
(सर्व पात्रे, घटना आणि प्रसंग काल्पनिक.) 


Read more...

No comments: